Wednesday, October 28, 2015

I’m a Barbie girl :D

सोसायटीच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी माऊ आणि तिच्या मैत्रिणींचा नाच बसवताहेत. तीन – साडेतीन वर्षांच्या मुलींचा नाच बसवायला गाणं कुठलं निवडावं? … I’m a Barbie girl!!!

माझ्या माहितीच्या / आवडीच्या सगळ्या इंग्रजी गाण्यांप्रमाणेच हेही गाणं मी (कुणीतरी लावलेलं) फक्त ऐकलेलं. व्हिडिओ बघितलेला नाही, स्वतःहून मुद्दाम नीट गाणं ऐकलेलं नाही, त्यामुळे सगळे शब्द माहित नाहीत. पण हे गाणं निवडल्याबरोबर माझी पहिली प्रतिक्रिया होती, “हे नको. यापेक्षा एखादं बालगीत घेऊ या.” (“नाहीतरी या सगळ्या बार्बीच आहेत की!” एका आईची टिप्पणी. माऊला बार्बी म्हणण्याएवढा मोठा अपमान नसेल माझ्या मते! तीन वर्षाच्या सगळ्याच मुली गोड दिसतात हे खरंय. पण बार्बीसारख्या, ओ येईल इतक्या गोड (आणि मठ्ठ)? यक्क!

आजीच्या शब्दात सांगायचं तर माऊ “दांडोबा पांडेकर” आहे. बाहुल्या प्रकारात अजून तरी तिने जवळपास शून्य रस दाखवलाय. त्यामुळे (माझ्या सुदैवाने) अजून बार्बीची (आणि प्रिन्सेसची) आणि माऊची ओळख झालेली नाही, आणि तिला गुलाबी कावीळ झालेली नाही. बार्बीचं रूप, तिचे कपडे आणि एकूणातच तिची सगळी खेळणी, त्यातलं स्टिरियोटायपिंग (आणि तिची किंमत!) या सगळ्याचा मला मनापासून तिटकारा आहे. (एका निरुपद्रवी खेळण्याविषयी केवढा तो राग?!!!) त्यामुळे माऊ आणि बार्बी हे समीकरण मला काही पचलं नसतं. माऊला गाण्याच्या अर्थाशी काहीही देणंघेणं नाही, नाचायला मिळालं की पुरेसं आहे. त्यामुळे माझ्या डोक्यातल्या गुंत्यासाठी तिला मज्जा करण्यापासून वंचित ठेवायचं का हे कळत नव्हतं. आज जरा बार्बी गर्लचा व्हिडिओ, शब्द बघितले, आणि एकटीच खोखो हसत बसले!!! या गाण्यावर नाच बसवू या म्हणताना कुणालाच त्या गाण्याचे शब्द, संदर्भ तपासावेसे वाटले नाहीत? अज्ञानात सुख असतं ते खरंच. पण गाणं आवडलंच मला ते एकदम! माझा विरोध मावळलाय! अजून पंधरा एक वर्षांनी, समजून उमजून, माऊने सोसायटीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात हे गाणं म्हटलं तर मला फार आवडेल!!!

(मधल्या काळात “हे गाणं या मुलांच्या वयाला योग्य नाही + फार फास्ट आहे म्हणून दुसरं गाणं निवडण्याची सूचना पुढे आली आणि ती संमतही झालीय. त्यामुळे सद्ध्या माझी संभाव्य बार्बीविषयक प्रश्नांच्या सरबत्तीमधून सुटका झालीय! :D)

***
हे पोस्ट केलं आणि मग बघितलं ... ही इथली दोनशेवी पोस्ट! आमच्या कासवाने चक्क डब्बलसेंचुरी मारली की हो!!!

No comments: