Monday, November 2, 2015

जुळी मैत्रीण

माऊची एक जुळी मैत्रीण आहे. दोघींना एकत्र खेळताना पाहून आतापर्यंत इतक्या लोकांनी “या जुळ्या आहेत का?” म्हणून विचारलंय, की आता मी त्या “जुळ्या मैत्रिणी आहेत” म्हणून सांगायला सुरुवात केलीय! :) जुळी म्हणजे जवळजवळ सयामिज जुळ्यांसारखी अवस्था आहे दोघींची – जेवायला एकत्र, खेळायला एकत्र, एकीला रागवलं की दुसरीने सॉरी म्हणायचं. सुट्टीच्या दिवशी उठल्याबरोबर तोंडही धुण्यापूर्वी माऊचा प्रश्न असतो, “सखीकडे जाऊ?” दोघी दिवसभर इकडच्या घरी किंवा “आपल्या घरी” (म्हणजे मैत्रिणीकडे) अश्या फेर्‍याच घालत असतात. थोडा जास्त वेळ इकडे खेळलं की मैत्रीण मला “आई” म्हणते आणि माऊ तिथे खेळून आली की “गौरी मावशी” म्हणून हाक मारते! :D मैत्रिणीचं वकीलपत्र घेऊन जगातल्या कुणाशीही भांडायला माऊ सज्ज असते, आणि मैत्रिणीला पण दुसर्‍या कुणी हात लावलेला चालत नाही पण माऊची दंगामस्ती चालते!

दोघी एकत्र असल्या म्हणजे दुप्पट दंगा करतात. मधुनमधून (काही काही दिवशी सारखीच) भांडण, मारामारी होतेच, आणि दोघींनी दोन घरी खेळावं असं फर्मान मोठ्यांपैकी कुणीतरी काढतं. दोघी एकेकेट्या आपापल्या घरी खेळायची काहीही शक्यता नाही – त्यामुळे आम्ही मुळ्ळीच भांडणार नाही, मारामारी तर करणारच नाही म्हणून दोघी लग्गेच सांगतात. पण तरीही मोठ्यांनी ऐकलंच नाही, अगदीच नाईलाज झाला तर आधी विरहाच्या कल्पनेने रडारड होते, मग काही वेळा तर मैत्रीण आमच्या घरी आणि माऊ मैत्रिणीच्या घरी अश्या खेळायला जातात. :D  दोघी एकाच शाळेत असल्या तरी सुदैवाने एका वर्गात नाहीत, आणि शाळेची वेळ वेगळी असल्याने एका बसमध्येही नाहीत. नाही तर शाळेतल्या शिक्षिकांचं, ताईंचं, बसच्या ड्रायव्हर काकांचं काही खरं नव्हतं.


तर या जिवश्च कंठश्च सखीचं चित्र चारकोल पेन्सिल वापरून काढायचं मनात होतं. (अर्थात फोटोवरून – चित्र काढेपर्यंत या एकाजागी बसणं अशक्य आहे.) पण तिचा फोटो मिळाला तो फारच अवघड निघाला. किती प्रयत्न केले तरी ओठ आणि नाक फोटोसारखं जमत नाहीये. बरेच प्रयत्न करून मी शेवटी हार मानली आहे, आणि सद्ध्यातरी हे “फायनल” चित्र म्हणून जाहीर केलंय!


पेंटिंगपेक्षा स्केचिंग हे पटकन होणारं, कुठेही कधीही करता येणारं म्हणून माझ्या जास्त आवडीचं. त्यातही मागे चारकोल पेन्सिल वापरून बघितली ती पेन, पेन्सिलपेक्षा खूपच आवडली होती.  बर्‍याच वर्षांच्या खंडानंतर गेल्या महिन्यात नवं स्केचबुक, पेन्सिली, रंग हातात मिळाल्यावर पुन्हा चारकोल पेन्सिलची आठवण झाली आणि चित्र काढून बघितलं. रेषेतला आत्मविश्वास, जोमदारपणा पार गेलाय, आणि माध्यमाची ओळखही विसरलेली आहे. पण काढायला मजा येतेय. बघू किती दिवस उत्साह टिकतो आणि किती सुधारणा होते यात अजून ते!

No comments: