दिवाळीची सुट्टी लागण्यापूर्वी माऊच्या शाळेचा शेवटचा दिवस. शाळेतून निघून सरळ घरी येणं माऊला कधीच मान्य नसतं. त्यामुळे आम्ही अजून शाळेतल्या घसरगुंडीवर, झोक्यावर आणि बाकीच्या खेळण्यांवर खेळतोय. तोवर शिक्षकांचीही शाळा सुटलीय. तिच्या प्रिन्सिपॉल शाळेतून निघाल्यात. माऊला त्या “हॅप्पी दिवाली!” म्हणतात. माऊ त्यांच्याशी जाऊन गप्पा मारते. तुम्ही कुठे चाललाय, इथे काय करत होता, घरी काय करणार, किती दिवस सुट्टी असे सगळे प्रश्न झाल्यावर “मी सुट्टीत गावाला जाणारे आज्जीकडे” म्हणून माहितीही देऊन होते. मला आमची शाळा आठवते आणि खरोखर हेवा वाटतो माऊचा आणि तिच्या टीचरचा. आमच्या शाळेत मुख्याध्यापक ही फक्त घाबरण्याची आणि लांब राहण्याची गोष्ट होती. त्यांनी तुम्हाला विश करणं, त्यांच्याशी गप्पा हे कल्पनेच्या पलिकडचं. म्हणजे आम्ही चौथीत असताना एकदा मधल्या सुट्टीत मुख्याध्यापक नुसते वर्गात आले तर त्यांना घाबरून एका मुलाची चड्डी ओली झाली होती! या असल्या शिस्तीच्या कल्पनांमुळे आणि फुकाच्या दरार्यामुळे मुलं आणि शिक्षक केवढ्या मोठ्या आनंदाला मुकत होती!
त्या टीचर गेल्यावर मग एकेक करून बाहेर पडणार्या बाकी सगळ्या टीचर, शाळेतल्या ताई, शिपाईदादा सगळ्यांना “हॅप्पी दिवाळी” म्हणून आणि गप्पा मारून होतात. माऊ जगनची मैत्रीण असल्याने बहुतेक अख्खी शाळा तिला ओळखत असावी. शाळेत सद्ध्या काहीतरी बांधकाम / दुरुस्ती चालू आहे. तिथे रोजंदारीवर काम करणारी एक मावशी तेवढ्यात तिथून जात असते. “मावशी हॅप्पी दिवाळी! तुझी सुट्टी झाली? तुला किती दिवस सुट्टी? तू गावाला जाणार आहेत सुट्टीत?” मावशीला सुट्टी मिळाली तर दिवाळी साजरी करता येत नाही हे अजून माऊला माहित नाहीये. पण इतक्या सहज तिला कुठल्याशी मावशीशी संवाद साधता येत असेल तर हे - आणि अजूनही बरंच काही - समजायला तिला वेळ नाही लागणार. आता मला माझाच हेवा वाटतो. तर तुम्हाला सगळ्यांना, आणि मी माऊ नसल्यामुळे सुट्टी मिळाली तर दिवाळी साजरी करू न शकणार्या ज्यांना हे सहज म्हणू शकत नाहीये, त्या सगळ्यांनाही दिवाळीच्या शुभेच्छा!!!
***
या वर्षी कंदील बनवायचा, वेळेवर बनवायचा आणि चांदणीचा बनवायचा एवढं सगळं आधीच ठरलेलं होतं. फक्त साहित्य आणि वेळ या दोन गोष्टी तेवढ्या हाताशी नव्हत्या. पण काल संधी मिळाली तिचा मी ताबडतोब फायदा घेतला.
माऊला एक गिफ्ट मिळाली होती त्यात छोटी चांदणी बनवण्यासाठीचे कागद, रंगवण्याचं साहित्य असं सगळं होतं, त्यामुळे कसा बनवायचा ते माहित होतं. ही आमची चांदणी:
अजून गो-लाईव्ह बाकीआहे, पण हा टेस्टींगचा फोटो:
पातळ कागद अजून थोडे पारदर्शक असायला हवे होते, प्रकाश कमी पडतोय असं यावर नवर्याचं मत. अर्थातच हा बग नसून फीचर आहे. टेस्ट एन्व्हायर्न्मेंटमध्ये दिव्याचा प्रकाश पुरेसा नव्हता. तरीही सूचना एन्हान्समेंट म्हणून स्वीकारून पुढच्या रिलीजला विचारात घेण्यात येईल. :)
पाच पाकळ्या करण्यासाठी एक कागद पुरत नव्हता, मग दोन रंगाच्या पाकळ्या केल्यामुळे सहा केल्या. पण सहा पाकळ्यांचा कंदिल तितका चांगला दिसणार नाही असं वाटलं त्यामुळे पाचच जोडल्या. उरलेली पाकळी माऊला. त्यावर कागद चिकटवून हा माऊचा कंदील तयार झाला : :D
6 comments:
सही ��
छान लिहिलंय
tujhya ani mauu cha utsahaala majha salaam
अपूर्व ओक, धन्यवाद! आणि ब्लॉगवर स्वागत!
कीर्ती, यावर्षी केला की नाही आकाशकंदील? अग करायला मजा येते म्हणून सगळा खटाटोप! :)
Hello Gauri Thank you very much for your prototype. 2 varshanpurvi to takla hotas blogvar to vaparun me ya varshi kela. Ata chandani shikavshil ka wel milala tula ki? Pudhchya varshi try Karin. Majhe baba itki varshe amha tinhi mulanna Karun det hote. Pan ya varshi tyanna mood nahi aala. Mag mich banavla kandil. Tujhi khoop madat jhali. Majhya navryane bichara taap yet hota tari basun kaapun dile ani mi chiktavle sagle gol.
purnimagk@gmail.com
पौर्णिमा, ब्लॉगवर स्वागत!
तुमचे बाबा कसे बनवायचे कंदिल? आणि बरं नसतानाही नवर्याने कंदिल केलाय म्हणजे ग्रेटच!!! एकदम सोप्पा आहे ना तो कंदिल बनवायला? आणि दिसतोही छान!
ही चांदणी कशी बनवायची त्याची माहिती टाकते लवकरच.
Post a Comment