Friday, August 26, 2016

नालेसाठी ...

    तर झालं असं, की भावाला एका ब्रँडचा तक्कू हवा होता. त्यांचा माल पुण्यात कुठे मिळतो ते सापडेना, पण त्यांच्या ऑनलाईन दुकानात दिसला. तिथे खरेदी करताना लक्षात आलं, की तक्कूची किंमत दीडशे रुपये आणि घरपोच करण्याचे साडेतीनशे असा काहीतरी हिशोब होतोय. मग तिथे आपल्याला हवं असलेलं दुसरं काही आहे का याचा शोध घेऊन झाला. हा योगाचा ब्रॅंड असल्याने नेती पॉटपासून टॉवेलपर्यंत चित्रविचित्र वस्तू त्यांच्या दुकानात होत्या. शेवटी तिथले दोन कुर्ते विकत घेतले. हात लावून न बघता आणि घालून न बघता कपडा विकत घेणं मला अजूनही पचत नाही. त्यामुळे हे सगळं करतांना माझी एकीकडे कुरकूर चालू होतीच.

    आठ – दहा दिवसांनी सामान घरी आल्यावर ते आयुर्वेदिक चूर्णाच्या वासाचे कुर्ते बघून मी वैतागले. एकाचा साईझ मी नेहेमी घेते त्यापेक्षा लहान घेतला गेला होता नजरचुकीनं, तो त्यातल्यात्यात बरोबर मापाचा निघाला. दुसरा पुढच्या आऊटिंगला तंबू म्हणून वापरायला होईल असा आहे. दुकानात बघून हे मी नक्की विकत घेतलं नसतं. त्यामुळे ऑनलाईन कपडे खरेदी विषयीची माझी नापसंती अजून पक्की झालीये. धुतल्यावर तो चूर्णाचा वास गेला, आणि हे घालण्याची शक्यता निर्माण झाली. पण एक साईझ छोटा घेऊनही एवढा ढगळ एकरंगी कुर्ता घालून ऑथेंटिक दिसायला मला कुठल्यातरी आयुर्वेदिक रिट्रीट किंवा योगशिबिरालाच जायला हवं. तसा इतक्यात तरी काही प्लॅन नाहीये. (माऊला घेऊन अशा ठिकाणी गेलें तर कसली धमाल येईल हे डोळ्यापुढे तरळून गेलं एकदा माझ्या, पण तरीही.) मग म्हटलं, तसंही हे आहे तसं घातलं जाणार नाहीचे, त्यापेक्षा आपला हात तरी साफ करून घ्यावा. लगेच जाऊन रंग, ब्रश आणले. माऊ झोपल्यावर दोन दिवस हा उद्योग केला.

हे कापड अंबाडीच्या ताग्यापासून बनवलेलं, खूप पातळ आहे. त्यामुळे रंग नीट बसत नाहीये तितका ... रंग घट्ट ठेवला तर मधे कोरडे ठिपके राहताहेत, आणि पाणी घातलं तर टिपकागदासारखा पसरतोय रंग :(  फिर भी छोडनेका नही ... एंड प्रॉडक्ट असं दिसतंय:





आता भावाला त्यांचाच तक्कू घ्यायची बुद्धी झाली नसती, तर या कलाकृतीची निर्मिती झाली असती का कधी? :D :D :D

Wednesday, August 17, 2016

फिर मिलेंगे !

    काल संध्याकाळी माऊ खाली बागेत झोपाळ्यावर खेळत होती. मी शेजारीच उभी होते. झोपाळ्यावरून तिने उडी मारली, आणि माझ्या शेजारी काहीतरी छोटं तुटक्या रबरबॅंडसारखं दिसत होतं त्याला हात लावला. क्षणात ती जोरात किंचाळून बाजूला पळाली ... तो छोटा साप होता! इतका वेळ शांत असणारा साप तिने हात लावल्यावर वळवळायला लागला होता. आकार जेमतेम पाच – सहा इंच, रंग चमकदार काळा. मोबाईलचा दिवा लावल्यावर तो परत शांत झाला, आधीसारखाच स्तब्ध पडून राहिला. हा सापच आहे ना अशी शंका वाटत होती आता – डोकं, डोळे ओळखू येत नव्हते, जीभ बाहेत नव्हती. खवले सुद्धा जाणवत नव्हते.  मग पोरांना तिथून हलवलं, वॉचमनना बोलावलं, बर्‍याच वेळाने वॉचमन आले. परत परत सांगूनही त्यांनी तो बाटलीत भरला नाही – कागदावर घेतला आणि बाहेर कुठेतरी टाकून दिला (असं आम्हाला सांगितलं. मारला नसेल अशी आशा आहे.)


    माऊ आणि साप यांची दुसरी भेट. यापूर्वी महाबळेश्वरला हॉटेलच्या खोलीबाहेर ती एकटीच गेली आणि तिथे साप होता म्हणून सांगत आली होती. (तिथल्या वॉचमननी मारला तो साप ... मारू नका, बाहेर घालवा त्याला असं सांगण्यापलिकडे काही करता आलं नव्हतं मला:( ) या वेळी तर तिने चक्क हात लावलाय सापाला. रात्रभर बेचैन होते मी. म्हणजे सापाकडून तिला कधी काही इजा झालेली नाही, पण तिला साप जरा जास्तच भेटताहेत असं वाटतंय. आपल्याकडचे बहुसंख्य साप – म्हणजे अगदी ९०% साप बिनविषारी असतात हे माहित आहे मला. पण मला साप ओळखता येत नाहीत. आणि अशा ठिकाणी अर्धवट ज्ञान काहीही कामाचं नसतं.

    सकाळी गुगलबाबाला विचारलं हा कुठला साप म्हणून. तर त्यानी सांगितलं की हा पूर्ण निरुपद्रवी असा Brahminy Blind Snake / Common worm snake आहे. (याचं मराठी नाव वाळा.) आणि हे पिल्लू नाही, पूर्ण वाढ झालेला साप आहे हा. (काल वॉचमन येण्याची वाट बघत असताना “हे नागाचं पिल्लू असेल का” पर्यंत अकलेचे तारे तोडून झाले होते आमचे!) भारतात सर्वत्र मिळातो हा – विशेषतः पावसाळ्यात. त्याचं मुख्य अन्न म्हणजे वाळवीची आणि मुंग्यांची अंडी. हा जवळपास अंधळा असतो, आणि याचं तोंड इतकं छोटं असतं की त्याला कुठल्याही मोठ्या प्राण्याला चावताच येत नाही. गंमतीची गोष्ट म्हणजे या सापामध्ये फक्त माद्या असतात आणि पुनरुत्पादनासाठी त्यांना दुसर्‍या सापाची गरज नसते. माद्या फलित अंडी घालतात, त्यातून पिल्लं बाहेर पडतात. म्हणजे एक साप असला तर तिथे अजून येणारच. याला नागाचं पिल्लू समजणारे शहाणे फक्त आम्हीच नाही - असे भरपूर साप नागाची पिल्लं समजून मारले जातात, पण सुदैवाने त्यांची संख्या भरपूर आहे, आणि कुंड्यांमधल्या मातीत हे खूप वेळा असतात. कुंड्या, रोपं, बागेची माती या माध्यमातून मूळचे आशिया आणि आफ्रिका खंडामधले हे साप आता जगभर पसरले आहेत. (त्यांना Flowerpot snake असं नाव मिळालंय यामुळे!)

    माऊची आणि सापाची पुन्हा कधी अचानक भेट होईल माहित नाही. तेंव्हा परत एकदा हा साप विषारी आहे का माहित नाही, त्यामुळे वॉचमननी तो मारला तरी काही बोलता येत नाही अशी वेळ येऊ नये असं वाटतंय. पुण्यात, पश्चिम पुण्यात तुमच्या माहितीतले कुणी सर्पमित्र असतील तर सांगता का?

Wednesday, August 10, 2016

Iron Sharmila!!!

    १९९९ ते २०१६. Armed Forces Special Powers Act च्या विरोधात १६ वर्षं चालू असलेलं उपोषण इरोम शर्मिलानी काल संपवलं. मणिपूरमधला AFSPA अजूनही गेलेला नाही, पण इरोम शर्मिलाचा लढाही संपलेला नाही. तिने हार मानलेली नाही, वेगळ्या मार्गाने लढायचं ठरवलंय. इतकी वर्षं उपोषण करणं सोपं नाहीच, पण त्यानंतर या मार्गाने आपला लढा सफल होत नाही हे मान्य करून दुसरा मार्ग स्वीकारणं, त्याप्रमाणे पावलं उचलणंही फार अवघड आहे. विशेषतः संघटनेचं पाठबळ नसतांना. खूप हिंमत लागते याला. Hats off to her will & determination.

    स्वातंत्र्यानंतर पहिल्या निवडणूकांपूर्वीच, १९५१ मध्ये नागा नॅशनल काऊन्सीलने अशी घोषणा केली, की त्यांनी घेतलेल्या सार्वमतानुसार ९९% नागांनी स्वतंत्र नागा राष्ट्राला मत दिलं आहे. पहिल्या सार्वत्रिक निवडणूकांवर बहिष्कार, सरकारी शाळा महाविद्यालये, कार्यालयांवर बहिष्कार असं आंदोलन सुरू झालं, आणि परिस्थिती पोलीस आणि निमलष्करी दलाच्या हाताबाहेर गेली. आसाममध्ये लष्कर तैनात करण्यासाठी १९५८ मध्ये लष्कराला आसाममध्ये विशेष अधिकार देणारा वटहुकूम जारी करण्यात आला, आणि त्याचंच पुढे AFSPA मध्ये रूपांतर झालं. ईशान्येच्या राज्यांमध्ये AFSPA लागू झाला, त्याला आता ५८ वर्षं झाली. गेल्या वर्षी त्रिपुराने राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था स्थिती सुधारल्यामुळे हा कायदा मागे घेतला. पंजाबातही असा कायदा १९८३ पासून १९९७ पर्यंत होता. जम्मू – काश्मीरमध्येही असा कायदा १९९० पासून लागू आहे.

लष्कराचं काम शत्रूशी लढण्याचं. प्रामुख्याने सीमेपलिकडच्या. लष्कराचं प्रशिक्षणही त्यासाठीच झालेलं असतं. अंतर्गत सुरक्षेसाठी किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात लष्कर तैनात करावं लागणं ही तात्पुरती, तातडीची उपाययोजना असते. लष्कराला आंतर्गत सुरक्षिततेसाठी दीर्घकाळ तैनात करावं लागणं त्या भागाच्याही हिताचं नाही, आणि लष्कराच्याही. मुळात हे त्या समस्येवरचं उत्तरच नाही. लष्कराला नीट काम करायचं असेल, तर त्याला विशेष अधिकार लागणार, AFSPA लागणार. ईशान्येच्या राज्यांमध्ये इतका प्रदीर्घ काळ हा कायदा असणं म्हणजे इतकी वर्षं तिथे आणिबाणीची स्थितीच आहे. It is a failure of governance. कशी सुधारेल तिथली परिस्थिती?

दिल्लीला माझी एक मणिपूरची मैत्रीण होती. दिल्लीहून तिच्या गावी पोहोचायला पाच दिवस लागायचे! आधी रेल्वे, मग मिळालं तर विमान (दिवसाला एक!), ते चुकलं तर दुसर्‍या दिवशीपर्यंत वाट बघायची - नाहीतर बस, पुढे अजून एक बस बस असा प्रवास करून घरी पोहोचल्यावर पुढचे चार दिवस तिचे आराम करण्यात जायचे. याला वीस वर्षं झाली. अजूनही  दिल्ली ते इम्फाळ हे २४०० किमी रेल्वेने जाता येत नाही! (दिल्ली ते कन्याकुमारीच्या २८०० किमी अंतराला रेल्वेने साधारण अडीच दिवस लागतात.) हे प्रवासाचं अंतर झालं. मनांचं अंतर यापेक्षा फार दूरचं होतं (आणि आहेही.) सगळ्या ईशान्येकडच्या लोकांना सरसकट चिंकी म्हणायचे होस्टेलवर. ते बाहेरचे, आपले नाहीत. आपल्या “पंजाब सिंधू गुजरात मराठा” आयडेंटिटीमध्ये त्यांना स्थान नाही. सीमेपलिकडची चिथावणी हा एक भाग झाला, फारसा आपल्या हातात नसणारा. पण सीमेच्या या बाजूला आपण ही अंतरं जोवर कमी करू शकत नाही, तोवर ईशान्येत लष्कर राहणार, AFSPA राहणार, इरोम शर्मिलाचा लढा अपयशी ठरत राहणार.

Monday, August 1, 2016

सखी

प्रिय देवकी,

    आपल्याला भेटायलाच नाही मिळालं. तू फार घाई केलीस जायची. माऊला सुद्धा भेटली नाहीस म्हणजे फारच झालं हं. अर्थात तुझाही नाईलाजच होता म्हणा! पण काहीही म्हण, तू दिलेल्या भेटीला तोड नाही!

    तुझ्या ठेव्याकडे बघून वाटतं, कुणावर गेलीय ही? तिच्या जन्मदात्रीवर? तसं असेल तर मी चांगलंच ओळखते बरं का तुला! ज्यातलं मला अज्जिबात काही समजत नाही अशा सगळ्या गोष्टीत किती गती होती तुला! कधीकधी फार इच्छा होते तुला भेटायची. असं वाटतं, तुझ्याशी बोलायला, तुझी मैत्रीण व्हायला किती आवडेल मला. You must have been a very beautiful person!!! ज्यांच्याशी आवर्जून ओळख करून घ्यायला हवी अशातली कुणीतरी. इतकी सुंदर गोष्ट अशी अर्ध्यावरच का संपवली असेल बरं त्याने? May be you were too good to be true!
   
    आजवर माऊशी कितीतरी वेळा बोलले आहे ती कशी इथे आली याविषयी. पण अजूनही तुझ्याविषयी नाही सांगितलं तिला. मलाच काही माहित नाही तर मी काय सांगणार म्हणा! पण मोठेपणी माऊला तुझ्याविषयी जाणून घ्यावंसं वाटलं, तर मी तिला अजिबात तिची स्पेस वगैरे देणार नाहीये सांगून ठेवते. मीही येडी होऊन तिच्यासोबत घुसणार या शोधामध्ये! तिच्याएवढीच उत्सुकता मलाही आहे म्हटलं!!!