माऊ ‘वायाम’ करायला जाते तिथला ऍडव्हेंचर कॅम्प
होता पाच दिवस घाटघरला (भंडारदर्याजवळ). आठवडाभर बाहेरगावी जाऊन आम्ही
संध्याकाळी परत पुण्यात पोहोचणार होतो, आणि लगेच दुसर्या दिवशी पहाटे कॅम्पसाठी
निघायचं होतं. कसं जमणार सगळं, दगदग होणार का फार, उन्हाचा त्रास तर नाही ना होणार
– अनेक शंका होत्या मनात. पण सांधण दरी आणि कळसूबाईचा परिसर म्हटल्यावर जाण्याचा
मोह आवरणं शक्यच नव्हतं. (सांधण दरी उतरणं आणि कळसूबाई चढणं दोन्हीसाठी ती अजून
खूप लहान आहे हेही समजत होतं, तरीही.) त्यामुळे या कॅम्पला आम्ही दोघी (आणि तिची
जुळी मैत्रीण आणि तिची आई) गेलोच.
भाग घेणारे चौदा आणि तिघं संयोजक असे सगळे मिळून सतरा जण होतो आम्ही. माऊ आणि
तिची सखी सगळ्यात लहान, पालक आम्ही दोघीच, बाकी बहुतेक मुलं दुसरी ते सातवी आठवी
पर्यंत वयाची. दोघी जरा मोठ्या ताया. असा सगळा गट होता. विशेष म्हणजे या सगळ्यात फक्त
एक मुलगा होता, बाकी सगळ्या मुली! मस्तच
वाटलं एकदम. रॉपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, मल्टीलाईन, सांधण दरीचा ट्रेक, कळसूबाईचा
ट्रेक असा सगळा पाच दिवसांचा कार्यक्रम होता. आणि आमच्या लिंबूटिंबू मेंबरनी पण यातल्या
बहुतेक सगळ्या ऍक्टिव्हिटी खूप एन्जॉय केल्या. इतक्या लहान मुलांना (आणि त्यांच्या
आयांना!) कॅम्पिंगला न्यायला तयार असणार्या संयोजकांना खरोखर मानायला पाहिजे! (आया
सोबत नसल्या तरी माऊ आणि सखीला न्यायची त्यांची तयारी होती!) तिथे पाच दिवस काय
काय मज्जा केली हे सगळं लिहिण्याइतका पेशन्स नाही माझ्याजवळ. पण ही त्याची झलक...
सांधण दरी मध्ये भर उन्हाळ्यात सुद्धा थंडगार पाणी प्यायला मिळालं. तिथून
दिसणारा रतनगड आणि आजोबा, कॅम्पसाईटाच्या दुसर्या बाजूला असणारे अलंग – मदन –
कुलंग, कळसूबाई, खाली कोकणातला माहुली – जरा पलिकडे हरिश्चंद्रगड – हा सगळा परिसरच
इतका सुंदर आहे, की काही न करता नुसतं इथे पाच दिवस राहिलं तरी फ्रेश वाटेल. पुण्याहून
निघतांना ऊन फार लागेल का अशी काळाजी वाटत होती, पण इथे रानात ऊन तितकं जाणवत
नाही. आणि सगळ्यांनी भरपूर पाणी प्यायलं आहे ना याची काळजी सर जातीने घेतात.
कॅम्पसाईटवरची सकाळ
|
दुपारी माऊला (आणि सखीलाही) कधीच झोपायचं नसतं. पण दुपारी झोप झाली नाही, तर
आमची विमानं संध्याकाळी पार आभाळात उडायला लागतात, त्यामुळे आई दामटून झोपवतेच.
असाच दुपारी “टायगर लेक”च्या जवळच्या पारावर माऊला आणि सखीला झोपवायचा दोन्ही
आयांचा प्रयत्न चाललाय. सखी अचानक एकदम खुदुखुदू हसायला लागते. दोन्ही आया वळून
बघतात, तर तिथलं भूभूचं पिल्लू सखीचं तोंड चाटतंय! कसं तरी पिल्लाला दूर घालवून या
दोघींना झोपवतात आया. मग वर बघितलं तर झाडाच्या फांदीवर ओळीचे कोंबड्या बसल्यात यांची
राखण करत! दुसर्या दिवशी भूभूच्या पिल्लाऐवजी एक बकरी चाटून जाते सखीला. “आता उद्या
तुला चाटायला हम्मा येणार!” आम्ही सगळे तिला चिडवतो.
टायगर लेकला चाललेल्या शेळ्या
|
***
व्हॅली क्रॉसिंग साठी सगळे कुलंगच्या पायथ्याच्या दिशेने गेलोय. मस्त दरी
निवडली आहे सरांनी – तिथून क्रॉस करतांना इतकं सुंदर दृष्य दिसतंय! कड्याजवळच्या
माळावर सगळे बसलेत. हळुहळू ऊन चढायला लागलंय, सगळे सावलीच्या दिशेने सरकताहेत. फारशी
सावली नाही. अधून मधून थोडी झुडुपं सोडली, तर माळावर वाळलेलं गवतच जास्त दिसतंय. पण
खाली बसल्यावर एक मस्त वास येतोय. वाळलेल्या गवतात दडलेल्या या फुलांचा:
कसली फुलं आहेत ही? भर मे महिन्यात फुललीत. औषधी आहेत बहुतेक. मला अजून नाव
नाही सापडलं त्यांचं. पण याचा वास पक्का रेकॉर्ड झालाय डोक्यात.
***
आमच्या सोबत वाट दाखवायला येणारे एकनाथ काका आणि कुणाजी काका इथलेच रहिवासी. आदिवासी.
कुणाजी काकांना इथल्या सगळ्या झाडाफुलांची खूप माहिती आहे. त्यांना अंजन फुललाय का
कुठे म्हणून विचारलं. माझी भाषा त्यांना समजत नाही, त्यांची मला. पण झाडाच्या
खोडाला फुलं येतात एवढं मी केलेलं वर्णन त्यांना समजतं, ते आम्हाला असं झाड बघायला
घेऊन जातात. अंजन भेटत नाही, पण किती तरी वर्षं मला “ओळखा मी कोण?” करणार्या एका
झाडाची ओळख होते. मुळशीजवळच्या देवराईमध्ये हे बघितलं तंव्हापासून याचं नाव – गाव मी
शोधत होते. हे पांढरे घोस म्हणजे फुलं, की फळं? आणि तिथल्या झाडांच्या गर्दीमध्ये
या राक्षसी वेलाची पानं कुठली हे समजणंही मुष्कील. त्यामुळे हे पांढरे
द्राक्षारासखे घोस कसलेत हे शोधता आलं नव्हतं तेंव्हा. कुणाजी काका त्याचं
त्यांच्या भाषेतलं “रामरक्षी” हे नाव सांगतात. त्याच्या सुकलेल्या बिया आणि रोपही
दाखवतात. यांच्याबरोबर या जंगलात नुसती झाडं
बघत भटकायला हवं एकदा.
रामरक्षीचे द्राक्षासारखे घोस
|
बिया रुजून आलेला नवा वेल |
रामरक्षीच्या सुकलेल्या बिया |
***
कोकणकड्यावरून दिसणारा सूर्यास्त. ढगाआड दिसेनासा होणारा सूर्य, आणि सोनेरी
प्रकाशात, खालच्या हिरव्या गच्च दाटीमध्ये उठून दिसणारा एकच पिवळा धमक बहावा! Standing out is so beautiful!!!
***
आज माऊ थकली आहे. बाकी सगळे पुढे गेलेत, आम्ही दोघीच मागे राहिलोय.
तिच्या गतीने, रमत गमत, मज्जा करत जमेल तेवढं पुढे जायचंय. पलिकडे कळसूबाईचं टोक
दिसतंय. पण आज तिथवर जाता येणार नाहीये हे निघायच्या आधीपासूनच माहित आहे. कुठे पोहोचायची घाई नाहीये, कुठेच पोहोचलो
नाही तरी चालणार आहे. दुपारची शांतता. ऊन आहे, पण रानात ते जाणवत नाहीये.
आजूबाजूला फक्त मधुनच येणारा मधमाशांचा गुंजारव. तहान – भूक लागलीच, तर जागोजाग
करवंदांच्या जाळ्या. वाटेमध्ये भलं मोठ्ठं आंब्याचं झाड आहे. झाडाखाली सावलीत दहा
पंधरा मोठाल्या शिळा – या, बसा, आजुबाजूचा परिसर निरखा म्हणून बोलावणार्या. गंमत
म्हणजे आम्ही दोघी वाट चुकलोय, पण ते अजून आम्हाला माहित नाहीये. काय फरक पडणार
आहे म्हणा! आणि वाट चुकायचीच असेल तर त्यासाठी याहून सुंदर जागा नाही! जरा पुढे
गेल्यावर एक आदिवासी पाडा येतो. म्हणजे तीन – चार झोपड्या, एखादं शेत. तिथल्या
ताईला वाट विचारल्यावर समजतं, आपण चुकलोय. आम्ही परत फिरतो. परत त्या मायाळू
आंब्याखालून पुढे येतो. पुढे एका झाडाखाली कैर्या पडलेल्या दिसतात. एक उचलून
बघितली, तर ती कैरी नाही, पिकलेला आंबा निघतो. मधासारख गोड. इटुकला गोटी आंबा. एक –
दोन – तीन – चार – आम्ही दोघी यथेच्छ आंबे खातो. मग बाकीच्या “वाट न
चुकलेल्यांसाठी (?)” थोडे सोबत घेऊन परत निघतो. “आई, प्रत्येक झाडाची करवंद
खाल्लीच पाहिजेत का?” म्हणून माऊने विचारावं, इतकी करवंद खाल्लीत आम्ही. मग
करवंदाचा काटा थेट बुटातून पावलापर्यंत पोहोचला तर त्यात आश्चर्य काय?
***
संध्याकाळी घाटघर तलावाच्या पाण्यात सगळे शिरतात. सूर्यास्त व्हायला आलाय,
पलिकडचा शिपनेर त्या किरणांमुळे सोनेरी दिसतोय. पाण्यातही हळुहळू सोनं उतरायला
लागतं. तलावात डुंबून झाल्यावर मग मासे बघून होतात, कुणाजी काकांनी पकडलेला खेकडा
बघून होतो. पुन्हा एकदा करवंदांचा फराळ होतो. अजून एक दिवस सुंदर दिवस संपतो.
घाटघरचं पाणी, मागे शिपनेर
|
***
माऊ आणि सखीचा खेळ म्हणजे वाटेत जातांना कुठेही शेण दिसलं म्हणजे त्यात जोरात
उडी मारून “केक कापायचा”. कुणीही कितीही ओरडलं तरी ही मज्जा त्यांना इतकी आवडलीय,
की त्या अजिबात ऐकत नाहीत. (इतकं सगळं शेण आधीच का सुकलंय अशी माऊची तक्रार आहे.)
एका ठिकाणी शेण बघून माऊ जोरात उडी मारते, आणि धपकन शेणात पडते! आईला पोट धरून
हसतांना हा प्रसंग फोटोत पकडायला सवड मिळत नाही.
***
कॅम्पिंगला जाऊन काय केलं? म्हणून कुणी विचारल्यावर माऊचं उत्तर: “मनिमाऊला भेटलो.
टीटी आणि चमेली ला भेटलो. सशाला हात लावला. बकर्या, म्हशी, गाई भेटल्या. कोंबडी
हातात घेतली. शेणात भरपूर खेळून घेतलं. शेणाने आंगण सारवलं. जात्यावर पीठ दळायला
मदत केली.” यातली एकही “ऍक्टिव्हिटी” कॅम्पिंगच्या नियोजनातली नाही. हा माऊ आणि
तिच्या सखीचा प्रायव्हेट सिक्रेट अजेंडा आहे! :D
चमेलीच्या सख्या |
***
घरी आल्यावर दुसर्या दिवशी माऊ झोपेतून उठते ती रडतंच.
“आई, अलंग – मदन – कुलंग!”
“त्यांचं काय झालं?”
“मला आठवण येतेय त्यांची! आपण परत जाऊ या?”
कॅम्पिंगला गेल्याचं सार्थक झालंय आईसाठी!
***
वाटेतल्या पानाफुलांचे अजून भरपूर फोटो आहेत. ते पुढच्या पोस्टमध्ये.
No comments:
Post a Comment