Tuesday, January 9, 2018

काळं पाणी, निळं पाणी... १

अठराव्या शतकात आणिबाणीच्या परिस्थितीत जहाज थांबवण्यासाठी सुरक्षित बंदर म्हणून कंपनीने ही बेटं ताब्यात घेतली. उष्ण, दमट हवा, दलदल, दूषित पाणी, नरभक्षक आदिवासी, निबिड जंगलं, त्यात साप, विंचू, अनेक प्रकारच्या जीवघेण्या माश्या, भोवताली हजारो किलोमीटर पसरलेला समुद्र. इथे नेऊन सोडलेला माणूस जिवंत परत येऊ शकत नाही, अशी ही भूमी कुख्यात. १८५७चा उठाव मोडून काढल्यानंतर पकडलेल्या बंडखोरांना भारताबाहेर ठेवणं कंपनीला सोयीचं वाटलं, आणि त्यांची पाठवणी या बेटांवर झाली. नंतर मग कुप्रसिद्ध “चेन गँग” तुरुंग उभा करण्यात आला – यातल्या कैद्यांना पायातल्या बेड्यांनी एकमेकांना जोडून त्यांच्या साखळ्या बनवत. लाकडाचे ओंडके वाहण्यासारखी अतिश्रमाची कामं हे आठ – दहा कैद्यांचे गट एकत्र बांधलेल्या अवस्थेत करत. वाहबी चळवळीतून अटक होऊन आलेल्या शेर अली खान या राजबंदीने अन्याय आणि अत्याचारांमुळे पेटून उठून १८७२ मध्ये व्हाईसराय लॉर्ड मेयोचा वध केला, त्यालाही इथे फाशी देण्यात आलं.  स्त्रियांचाही एक तुरुंग होता इथे.

त्यानंतर मग कुप्रसिद्ध “सेल्युलर जेल” बांधला गेला. इथे सजा भोगणार्‍या क्रांतीकारकांच्या छळाच्या कहाण्यांनी या बेटांच्या जिथे आलेला बंदी काळाच्या उदरात प्रवेश केल्यासारखच, इथून बाहेर पडायचा संभव नाही या दुर्लौकिकात भरच घातली. ज्या पाण्यावरून काळच तुमची सुटका करू शकतो ते हे काळं पाणी!

लहानपणी पारायणं केलेल्या “माझी जन्मठेप” मुळे काळं पाणी म्हटल्यावर एक उदास, रोगट, निराश जागा डोळ्यापुढे होती माझ्या. ट्रॅव्हल कंपन्यांच्या साईटवर बघितल्यावर एक वेगळंच “ट्रॉपिकल पॅरडाईझ – विथ हनिमून पॅकेज ऑफर्स” डोळ्यापुढे आलं. जिथल्या पाण्यात मगरी, सी अर्चिन, शार्क आणि अजून काय काय धोकादायक सागरी जीव आहेत, जंगलांमध्ये साप, “कालखजुरी”, इंगळ्या, जळवा पाय ठेवणं मुश्कील करतात, तिथेच आशियातला सर्वात सुंदर समुद्रकिनारा, जंगलातून पदभ्रमण अशा ऑफर्स पचणं जड जात होतं. कैद्यांच्या छळासाठी कुप्रसिद्ध असलेल्या तुरुंगाला भेट देऊन वैवाहिक जीवनाची रोमॅंटिक सुरुवात करावी असं कुठल्या जोडप्याला वाटेल? नेमकं काय बघायला जाणार आहोत आपण इथे? प्रवासाला निघतांना मनातल्या शंका काही संपत नव्हत्या.
***
पोर्ट ब्लेअरला विमान उतरता उतरता निळंशार पाणी आणि त्यातलं ते हिरवंकंच बेट बघूनच मन हरखून गेलं. त्या दिवशी लगेच सेल्युलर जेल बघायला जायचं होतं. सेल्युलर जेलची इमारत, तिथला इतिहास, त्या इतिहासाचा साक्षीदार असणारा पिंपळ – सगळंच एवढं प्रभावशाली, पण हा सरकारी शो. त्यामुळे नीट ऐकू न येणं, पार्श्वसंगीतामध्ये मुख्य निवेदनाचा आवाज बुडून जाणं, मधेच दोन – तीन वेळा वीज गेल्यावर तेवढं निवेदन / संवाद ऐकायला न मिळणं असे सगळे प्रकार होते. त्यात पुन्हा मोठमोठ्याने गप्पा मारणारे प्रेक्षक.  त्यामुळे या शोला गेलो नसतो तरी फारसं काही बिघडलं नसतं असं वाटलं नंतर.

पुन्हा पुन्हा सांगूनसुद्धा आमची ट्रीप ठरवणार्‍याने जेलमधल्या फक्त लाईट ऍंड साऊंड शोची तिकिटंच बुक केली होती, जेल फिरून बघणं कार्यक्रमात नव्हतंच! (शो संध्याकाळी असतो, जेल बघायची वेळ सकाळ / दुपारची.) जेल बघायला जायचंच आहे म्हणून त्याला परत ठणकावून सांगितल्यावर मग आमच्या कार्यक्रमात त्याने तसा बदल केला. गाईड घेऊन पुन्हा जेल बघायला गेलो. शो मध्ये नीट ऐकायला न आलेली बरीच माहिती गाईड मनापासून सांगत होता. इथे सगळ्याच कैद्यांचे काय प्रकारचे छळ व्हायचे - कोलू फिरवणं, छिलका, रस्सी अशी सगळी तिथली कामं, ती कामं पुरी न केल्यास मिळणार्‍या शिक्षा हे सगळं वर्णन चाललेलं असताना सोबत आलेलं हनिमून कपल सेल्फीमध्ये दंग होतं! (तुरुंगाविषयी बोलणं चालू असताना कान बंद करून घेतले, की इथेसुद्धा रोमॅंटिक ट्रीप करता येते. माझ्या उगाच आपल्या शंका.) अंदमानच्या हवेमध्ये त्या कोलूवर दिवसाला वीस पौंड तेल काढायचं, दोन कटोरापेक्षा जास्त पाणी प्यायला मिळणार नाही – या वर्णनाचा अर्थ ती जागा बघितल्यावरच नीट समजला. नंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांची कोठडी बघायला गेलो. मणी शंकर अय्यरांच्या कृपेने इथल्या घायपाताच्या काट्यांनी लिहिलेल्या भिंतींवर आता चुना फासला गेला आहे. इतिहास पुसून टाकण्यात आपला हात कोणी धरू शकणार नाही मला वाटतं.


सावरकरांची कोठडी होती ती सात नंबरची चाळ

एका टेहळणी मनोर्‍यापासून निघणार्‍या सात चाळी / पाख या तुरुंगात होते




सातवी चाळ, तिसरा मजला, शेवटची कोठडी!


तुरुंगाच्या गच्चीवरून दिसणारं रॉस बेट

निळंभोर आकाश, तसंच निळं पाणी, हिरवीगार झाडं, आणि त्यातच जिथले कैदी अतिकष्ट, निकृष्ट अन्न यामुळे क्षय आणि मलेरिया होऊन खंगून खंगून मरत (नाही तर आत्महत्या करत) असा हा तुरुंग! डाखाऊची छळछावणी बघतांना पडलेला प्रश्न इथे परत एकदा पडला. पकडल्या गेलेल्या माणसाने मरावं अशीच सत्तेची इच्छा असेल, तर त्याला सरळ गोळी घालून किंवा फाशी देऊन मारून का टाकत नाहीत? त्या माणसाचा छळ करण्यासाठी एवढी मोठी यंत्रणा उभारायची, ती डोळ्यात तेल घेऊन चालवायची, त्या व्यक्तीला मारून तर टाकायचं नाही, पण अनन्वित छळ करायचा, यातून कुठल्या प्रकारचं समाधान मिळत असेल? मी तुम्हाला माणसासारखं जगू दिलं नाही, तुमच्या आत्मसन्मानाचा चुथडा केला हा त्या माणसाचं आयुष्य संपवण्यापेक्षा मोठा विजय आहे, म्हणून इतके प्रयत्न? त्यापेक्षा काळ्यापाण्याच्या कैद्यांचं जहाज सरळ जलसमाधी घेतं तर किती माणसांचे पशू व्हायचं वाचलं असतं!

***

पोर्ट ब्लेअरमध्ये अजून आवर्जून बघण्यासारखी जागा म्हणजे समुद्रिका नेव्हल म्युझियम. अंदमान बेटं, इथले आदिवासी, इथल्या जंगलातले आणि समुद्री जीव, शंख, प्रवाळ या सगळ्यांची उत्तम माहिती, आणि खरोखर नीट राखलेलं संग्रहालय.

2 comments:

Bob1806 said...

सुन्दर लेख! हे तीर्थक्षेत्र नक्की पाहणार!
कटू सत्य!

Gouri said...

Bob1806, ब्लॉगवर स्वागत!
आवर्जून बघण्यासारखी जागा आहे ही.