Sunday, July 15, 2018

The One Straw Revolution – Masanobu Fukuoka

शेतकरी आणि तत्त्वज्ञ मासानोबू फुकुओका हा सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, ZBNF अशा सगळ्या शेतीपद्धतींच्या मुळाशी असणारा बाप माणूस आहे. जपानी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या फुकुओकांचा सूक्षमजीवशास्त्राचा आणि शेतीशास्त्राचा अभ्यास होता. झाडांवरच्या रोगांचा अभ्यास करणारा संशोधक म्हणून त्यांनी करियरची सुरुवात केली. पण पुढे पाश्चात्य / आधुनिक शेतीशास्त्राचा मार्ग चुकतो आहे याविषयी त्यांची खात्री झाली, आणि संशोधकाच्या नोकरीचा राजिनामा देऊन फुकुओका घरच्या शेतीकडे वळले. १९३८ पासून त्यांनी सेंद्रीय लिंबूवर्गीय फळबागांचे प्रयोग आणि निरीक्षणे करायला सुरुवात केली, आणि यातून हळुहळू त्यांचा नैसर्गिक शेतीचा विचार विकसित झाला. दुसर्‍या महायुद्धानंतर १९४७ पासून त्यांची सेंद्रीय भातशेतीही सुरू झाली. त्यांनी “One Straw Revolution” १९७५ मध्ये लिहिलं. डोळस प्रयोग आणि इतका प्रदीर्घ अनुभव या पुस्तकाच्या मागे आहेत, त्यामुळे त्याचं हे पुस्तक म्हणजे जगभरातल्या नैसर्गिक शेतीवाल्यांचं बायबल समजलं जातं.
खरं म्हणजे हे पुस्तक घेऊन कितीतरी वर्षं झाली. ते वाचायलाही सुरुवात केली, पण काहीतरी बोचत होतं वाचतांना, पुस्तक काही मी पूर्ण करू शकत नव्हते. या वेळी पुन्हा एकदा नव्याने वाचायला घेतलं हे पुस्तक. थोरोच्या फार जवळ जाणारे वाटले त्यांचे विचार.

निसर्गाशी एकरूप व्हा, निसर्ग तुम्हाला पोटापुरतं निश्चितच देईल. त्यापलिकडे अपेक्षा ठेवणे ही हाव झाली.

तुमच्या भागात जे पिकतं, तेच खा. तेच तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.

झाडाला त्याच्या नैसर्गिक जीवनक्रमाप्रमाणे वाढू दे. जंगलात ते कसं वाढलं असतं, तसंच वाढलं तर त्याची निकोप वाढ होईल. अशा जोमदार रोपाला तणनाशक, कीटकनाशक अशा कशाचीच गरज पडणार नाही. तुमची जमीन जंगलातल्या जमिनीसारखी होऊ देत, तुम्हाला नांगरणीची गरजच उरणार नाही. तणाचा नायनाट करायची गरज नाही, आपल्याला हव्या त्या झाडांपेक्षा जास्त जोमाने ती तरारणार नाहीत एवढीच काळजी घ्यायची आहे.

एकेका किडीचा नायनाट करून उपयोग नाही - ही एक पूर्ण इकोसिस्टीम आहे. त्यातल्या सगळ्या दुव्यांचा विचार व्हायला हवा. एका एका रोगावर इलाज कामाचा नाही, सगळ्याचा एकत्रित विचार हवा. आधुनिक विज्ञान असा विचार करत नाही, म्हणून फुकुओकांना ते उपयोगाचे वाटत नाही.

नैसर्गिक शेती ही कमीत कमी कष्टात, कमीत कमी खर्चात होणारी आहे. त्यामुळे नैसर्गिक शेतीच्या उत्पादनाची किंमतही रासायनिक शेती उत्पादनापेक्षा कमी हवी.

माणशी पाव एकर शेती करून प्रत्येकाने पोटापुरतं पिकवायला हवं.

रासायनिक शेतीमध्ये एका पिढीमध्ये जमिनीचा कस जातो. पारंपारिक शेतीमध्ये शतकानुशतके तो कायम राहतो. पण नैसर्गिक शेतीमध्ये तो कायम वाढतच जातो.

 हे यातले काही महत्त्वाचे विचार. पुस्तक वाचतांना पुन्हा मागच्या वेळेसारखंच झालं ... जसजशी पुढे वाचत गेले, तसतसं काहीतरी कमी आहे, काहीतरी चुकतंय असं आतून परत वाटायला लागलं. डोक्यातला सगळा गोंधळ बाजूला ठेवून फुकुओका काय म्हणताहेत ते वाचता नाही आलं मला. त्यामुळे हे पुस्तक परीक्षण नाही, पुस्तकाचा गोषवाराही नाही. पुस्तक वाचून मला काय वाटलं, तेच यात प्रामुख्याने आहे.

शेती हा धर्म आहे, जगण्याची पद्धत आहे असं फुकुओका म्हणतात. मला यात आपल्याकडच्या आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांच्या कामाचा सल्ला दिसत नाही कुठे. शेतकर्‍याने गरीबच का असलं पाहिजे? त्याने शहरी माणसासारख्या छानछोकीची इच्छा का नाही ठेवायची? गरीबीचं उदात्तीकरण करतोय का आपण इथे? थोरो किंवा फुकुओकांसारखे काही थोडे अनावश्यक पैशांशिवाय आनंदात जगतील. तीच अपेक्षा सगळ्या शेतकर्‍यांकडून का? मला आध्यात्मिक शेतीमध्ये सध्या तरी रस नाही. शेतकर्‍यांनी लोकांना रसायनं खाऊ घालू नयेत, शेती विषमुक्त हवी, पण व्यापारी तत्त्वावर परवडणारी हवी - शेती हा धर्म नको, व्यवसाय हवाय मला. आधुनिक वैद्यकशास्त्र नसतं तर कदाचित हे लिहायला आज मी जिवंत नसते. विज्ञानाला काही समजत नाही म्हणून मी तरी मोडीत काढू नये. सॉरी, फुकुओका सान. नाही पचलं.

No comments: