Friday, July 20, 2018

शेतीची शाळा २

शेतीची शाळा १

शेतीच्या शाळेची सुरुवात पाच गुंठे जमीन वापरायला घेऊन करायची असं ठरलं. ही जमीन विज्ञान आश्रमाच्या आवारातलीच. त्यामुळे तिला कुंपण होतं, चोवीस तास कुणीतरी तिथे असणार होतं. रस्ता, वीज, पाणी (मनपाचं!) मिळवण्याची कुठलीच अडचण नव्हती. फक्त पाणी टंचाई झाली तर पाणी वापरावर काही बंधनं निश्चितच असणार होती. जमीन तशी पडीक होती, ती लागवडीयोग्य करण्यापासून सुरुवात करायची होती. त्यामुळे पहिलं काम होतं तिथला कचरा काढण्याचं. बांधकामाचा राडारोडा, दारूच्या बाटल्या असं वाट्टेल ते होतं तिथे. ते आधी साफ करून घेतलं.

त्यानंतर मातीची तपासणी केल्यावर लक्षात आलं, की या जमिनीमध्ये सेंद्रीय कर्ब खूप कमी आहे, नत्राचीही कमतरता आहे. म्हणजे आता जमिनीचा कस सुधारायला हवा. जमिनीचा कस सुधारण्यासाठी म्हणून तिथे कम्पोस्टिंग करता येईल असं वाटलं. कम्पोस्टिंग तसं थोडंफार माहित होतं, पण ते घरच्यापुरतं, किंवा सोसायटीच्या ओल्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यापुरतं. एवढ्या जमिनीचा कस वाढवायचा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर सगळं व्हायला हवं होतं. आणि आम्हाला शेती शिकायची होती, त्यामुळे शेतकर्‍याला परवडतील अशा मार्गानेच कस सुधारायचा होता. शेतीच्या खर्चामध्ये मजूरी हा फार मोठा भाग असतो, त्यामुळे सगळी कामं आपणच करायची, माणसं लावून शक्यतो काहीही करून घ्यायचं नाही असं ठरलं होतं.

आमची एक मैत्रीण काय वाट्टेल ते मिळवून देऊ शकते. कम्पोस्ट करण्यासाठी शेण, गोमुत्र मिळू शकेल, पानगळ मिळू शकेल असं तिने सांगितलं.  मग यात घालण्यासाठी ओला कचरा कुठून आणावा? सोसायटीच्या अनुभवावरून हे माहित होतं, की आपल्याकडे कचर्‍याचं वर्गीकरण फार ढिसाळपणे होतं. घरांमधून आलेल्या ओल्या कचर्‍यामध्ये तर वाट्टेल ते असतं – अगदी डायपर आणि औषधांच्या बाटल्यांपासून काहीही. त्यामुळे घरांचा ओला कचरा घ्यायची इच्छा नव्हती. मग म्हटलं, की भाजी विक्रेत्यांकडचा टाकाऊ माल घेऊन बघू या. जवळपासचे, ओळखीचे असे भाजीविक्रेते गाठले. त्यांचा टाकाऊ माल द्यायला ते तयार झाले. सकाळी “स्वच्छ”च्या गाड्या येण्यापूर्वी मग या भाजीविक्रेत्यांकडचा लूज माल आपण उचलायचा आणि कम्पोस्टसाठी शेतात घेऊन जायचा. हा “ओला खाऊ”. थंडीमध्ये, उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे बर्‍याच झाडांची पानं झडतात. मनपाच्या गाड्या लवकर येत नाहीत, पानगळ टाकण्यासाठी टेम्पोचा खर्च नको म्हणून अनेक सोसायट्यांमध्ये ही पानगळ जाळून टाकतात. अशी पानगळ सोसायट्यांमधून गोळा करायची. हा झाडांचा सुका खाऊ. यावर कल्चर म्हणून शेणाचं पाणी घालायचं. संस्थेच्या आवारात हे प्रयोग करतांना उकिरडा बघून कुणी आक्षेप घेईल का? याचा वास येईल का ?असे प्रश्न होते मनात. पण सुदैवाने कुणी अशी हरकत घेतली नाही. आणि कडक उन्हाने वास, माश्या अशा बाकी सगळ्या चिंताही दूर केल्या.

सुरुवातीला कम्पोस्टसाठी एक खड्डा खणला, त्यात प्लास्टिकचा कागद घातला, आणि वर हा ओला खाऊ – सुका खाऊ घालायला लागलो. भाजीवाल्यांकडच्या ओल्या खाऊमध्ये केळ्यांचे घड, अख्खी कलिंगडं असं काहीही असायचं. त्याचे ३ -४ इंची तुकडे करून घालायचो. एका दिवशी तब्बल आठ पोती ओला खाऊ मिळाला. यासाठी कधी खड्डा खणणार, तुकडे करणार? मग क्रशर / श्रेडरचा शोध सुरू झाला. त्यानिमित्ताने कम्पोस्टिंग मशिनरी तयार करणार्‍यांशी बोलणं झालं, तर तुमचं कम्पोस्टिंग काही ठीक होईल असं दिसत नाही ... खूप वेळ लागणार, कचर्‍याचा वास येणार, माश्या होणार, टोमॅटो वगैरेचा रस जमिनीत जाऊन जमिनीचा ph बिघडणार अशा बर्‍याच शंका वाटल्या त्यांना. खेरीजआम्हाला हवा तसा श्रेडर काही कुठे दिसला नाही. मग लक्षात आलं, की या वेगाने आपल्याला पुरेसं कम्पोस्ट पावसाळ्यापूर्वी होणं शक्य वाटत नाही.

काळजीच वाटायला लागली एकूण. मग प्रिया भिडेंना फोन करून आमचा प्रश्न सांगितला, आणि त्यांनी झटक्यात तो सोडवून टाकला! तसंही आम्हाला सगळ्या शेताचा कस सुधारायचा होता, आत्ता जमीन मोकळीच होती. मग एका खड्ड्यात कम्पोस्ट करून मग पसरण्याची गरजच काय? सगळ्या शेतातच कम्पोस्ट करायचं. जमिनीवर आधी एक पानगळीचा थर द्यायचा, त्यावर ओला खाऊ पसरायचा – तुकडे न करताच – अगदी कलिंगड असलं तर चार भाग इतपत ठीक आहे, पण बाकी भाज्या चिरत बसायच्या नाहीत. – ओल्या खाऊच्या वर परत एकदा पनगळ, आणि पानगळ उडू नये म्हणून वरून थोडीशी माती. अशी “सॅंडविच” बनवायची. वरून जीवामृत फवारायचं. थर पातळ असल्यामुळे पटकन कम्पोस्ट होतं ... पालेभाज्या वगैरे अगदी लगेच होतात, आणि दोन आठवड्यात यातून “ओल्या खाऊ”मधल्या वेगवेगळ्या भाज्यांची रोपं उगवून यायला लागतात. फार बारीक तुकडे केले नाहीत म्हणजे भाज्यांमधला ओलावा टिकून राहतो आणि वरून पाणी कमी मारावं लागतं, कडक उन्हाने सगळं सुकून जायची शक्यता कमी होते. मोठे तुकडे कुजायला वेळ लागतो, पण तोवर थांबायची गरज नसते. कम्पोस्टची धग गेली, म्हणजे त्यात तुम्ही झाडं लावायला सुरुवात करू शकता. मोठे तुकडे हळुहळू कुजत राहतात, आणि झाडांना दीर्घकाळापर्यंत पोषण मिळत राहतं. थेट मातीमध्ये कम्पोस्ट केल्यामुळे मातीमधली गांडुळं आणि बाकी जीवजंतू तिथे गोळा होतात, माती “जिवंत” होते.

हे सगळं ऐकून जीव भांड्यात पडला. दिवसाला शंभर किलो ओला खाऊसुद्धा आम्हाला शेतात वापरता यायला लागला. याला कधी जीवामृत, कधी ताजं शेणाचं पाणी असं घालत होतो. मग एकदा शेणात अळ्या दिसल्या आणि घाबरलोच आम्ही. हुमण्या? या अळीच्या इतक्या कहाण्या ऐकल्या होत्या, की ताजं शेण घालणं ताबडतोब बंद केलं, दर आठवड्याला जीवामृत घालायला सुरुवात केली.

रोज टू व्हीलर वरून / गाडीमधून कितीसा ओला खाऊ आणणार? त्यापेक्षा एखादा दिवस टेम्पो बोलावून मंडईमधून कचरा उचलला तर? एका झटक्यात काम होईल की! मग मंडईचा कचरा गोळा करणार्‍यांशी बोला, टेम्पोवाला शोधा असं सुरू झालं. पण मंडईच्या कचरावाल्यांनी काही दाद लागू दिली नाही, आणि टेम्पो आधी ठरवूनही ऐन वेळी नसणे, एक ट्रीप करून बिघडणे असे सगळे प्रकार झाले. तरीही दोन महिन्यात ८०० किलोच्या वर ओला खाऊ आणि २०० पोती पानगळ असं जमलं आम्हाला. यावर दर आठवड्याला जीवामृत होतंच. गेल्या उन्हाळ्यात मस्त उन्हामध्ये पुण्यात उकिरड्यावर पाणी मारत असतांना तुम्ही कुणाला बघितलं असलं, तर आमच्यापैकीच कुणीतरी असणार ती. पावसापूर्वी कम्पोस्टच्या “सॅंडविच”नी संपूर्ण जमीन झाकण्यात यशस्वी झालो आम्ही सगळ्या जणी. आणि लाल भोपळा, कारली, काकडी, कलिंगडं, टरबूज, मका, चिवळी, टोमॅटो, मिरच्या, चवळी, बटाटे अशा इतक्या भाज्या कम्पोस्टमधून उगवून आल्या, की काही न पेरताच शेती सुरू झाली! 



No comments: