द्विदल धान्यांच्या मुळांवर गाठी असतात. या गाठींमध्ये र्हायझोबियम जिवाणू
असतात. या जिवाणूंचं आणि झाडाचं symbiotic परस्परावलंबन आहे. झाडं या
जिवाणूंना कर्ब पुरवतात, तर हे जिवाणू हवेतल्या नायट्रोजनचं स्थिरीकरण करून
झाडांच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असणारा नत्र जमिनीमध्ये उपलब्ध करून
देतात, आणि ही झाडं जमिनीतच कुजवल्यामुळे जमिनीतला सेंद्रीय कर्बही वाढतो. त्यामुळे जमिनीचा कस सुधारतो. अशा प्रकारे जमिनीचा कस सुधारण्यासाठी
मुद्दाम झाडं लावण्याला हिरवळीचं खत म्हणतात. कम्पोस्ट करून झाल्यावर
चांगला पाऊस झाला आणि जमिनीमध्ये ओलावा आला, म्हणजे हिरवळीचं खत म्हणून ताग
पेरा असा सल्ला आम्हाला जाणकारांनी दिला होता. इतके दिवस नुसतं ओल्या –
कोरड्या कचर्यावर पाणी मारल्यावर खरोखरच काही पेरायचं ही कल्पनाच
सुखावणारी होती. त्यामुळे पाऊस सुरू झाल्यावर जरा घाईनेच तागाची पेरणी
केली.
तागाचं बियाणं पेरलं, आणि पावसाने दडी मारली. पावसाची वाट बघणं हा
आपल्याकडे शेतकरी होण्यातला अविभाज्य भाग आहे, तर ते काम आमचं सुरू झालं.
कम्पोस्ट सॅंडविचवरची जमीन चांगली तयार झालेली होती आणि ओलावा धरून
ठेवणारीही. त्यामुळे तिथला ताग चांगला उगवून आला. उघड्या राहिलेल्या
पायवाटांवरचा ताग मात्र आलाच नाही. कितीही पाणी घातलं, तरी पाऊस तो पाऊसच.
ताग किती वाढवायचा, आणि ताग वाढल्यावर जमिनीवर झोपवून पिकांसाठी वाफे कसे
तयार करायचे याचा विचार एकीकडे सुरू झाला. दुसरीकडे आपल्याकडे जागा आणि वेळ
दोन्ही मर्यादित आहे, त्याचा चांगल्यात चांगला उपयोग करून घेण्यासाठी
वेलवर्गीय भाज्या “ग्रो बॅग्ज” बनवून त्यात लावाव्यात असं ठरलं.
ग्रो बॅग म्हणजे कुंडीची सुधारित आवृत्ती. पोतं किंवा पिशवी घेऊन त्याची
ग्रो बॅग बनवली, म्हणजे कुंडीपेक्षा हवा जास्त चांगली खेळती राहते, आणि
कुंडीप्रमाणे हलवणेही सोपे जाते. ५०-५० किलोची पोती घेऊन त्यात पडवळ,
दोडका, घोसाळी, दुधी, कारली, काकडी या सगळ्यांसाठी ग्रोबॅग्ज बनवायच्या असं
ठरलं. प्रिया भिडेंकडून कुंडी कशी भरायची त्याची काही माहिती घेतली होती,
त्याप्रमाणे खालचा ५०% भाग पालापाचोळा भरला. पाचोळा दबण्यासाठी एक – दोन
दिवस ही पोती बसायला वापरली. त्याच्या वर घालायला एक भाग नीम पेंड, एक भाग
भाताचं तूस, एक भाग कोकोपीट, तीन भाग शेणखत आणि चार भाग माती अशी “भेळ”
तयार केली. पाचोळ्याच्या वर भेळ घालून या सगळ्याचं लवकर कम्पोस्ट बनावं
म्हणून त्याला जीवामृत घातलं. प्लॅस्टिकची पोती खराब झाल्यावर त्याचे तुकडे
पडतात, तसं नको म्हणून गोणपाटाची पोती घेतली होती – गोणपाट पाण्याने खराब
होईल, टिकणार नाही हे दोन मैत्रिणींनी सुचवलं, पण प्लॅस्टिक नको म्हणून
गोणपाटच वापरले. (गोणपाट महिनाभरात कुजले, महिनाभराने ग्रोबॅग्ज हलवायची
वेळ आली तेंव्हा हे लक्षात आलं. पण ते पुढे.) आठवडाभरात असं वाटलं, की
पाचोळा सगळा खाली घालण्यापेक्षा भेळेमध्येच मिसळला, तर लवकर कुजेल. पुन्हा
एकदा ग्रोबॅग्ज रिकाम्या केल्या, पालापाचोळा मिसळून परत भरल्या. अजून एक
सुचलं म्हणजे यात खालपर्यंत पाणी नीट पोहोचावं आणि हळुहळू झिरपावं, म्हणून
प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या भोकं पाडून खोचून ठेवाव्यात का? तेही
करून टाकलं मग. एकीकडे पडवळ, दुधी, घोसाळे, दोडका, कारले, काकडी अशी सगळी
रोपं तयार करायला ठेवली.
अखेर पाऊस आला, आणि शेत एकदम हिरवंगार झालं. पिकामुळे नाही, तणामुळे. त्याची गंमत आता पुढच्या भागामध्ये.
2 comments:
खूप छान! आणि सरळ, साध्या भाषेत असल्याने मला समजायला पण सोप्पं गेलं !!
अनघा, अग सॉरी मला कॉमेंट नोटिफिकेशन मिळालंच नाही, आज बघितली मी तुझी कॉमेंट! तुला पेणला असं काय काय करून बघता येईल बघ!
Post a Comment