Tuesday, April 9, 2019

कोडं आणि डोकं

धडपडत पोहोचायला उशीर झाल्यामुळे क्लासमध्ये मागे बसणं भाग असतं. दिवसभर डोक्याचं भजं झालेलं. त्यामुळे तसंही सरांच्या बोलण्याकडे लक्ष लागणं अवघडच. त्यात मागे दाटीवाटीमध्ये बसल्यावर विचारायलाच नको. सरांनी कमीत कमी माहिती सांगावी आणि लवकरात लवकर काहीतरी करायला सुरुवात व्हावी अशी मी मनोमन प्रार्थना करत असते. मन एकाग्र वगैरे करण्याचा प्रयत्नही सोडून दिलाय आता थोड्या वेळापूर्वी. एका लयीत मस्त जांभया पण येताहेत. तेवढ्यात माझं समोर लक्ष जातं. समोर बसलेलीचा कॉटनचा पंजाबी ड्रेस. त्याच्यावर ऑफ व्हाईटवर काळं नजर खिळवून ठेवणारं डिझाईन. आवडलंच एकदम. इतका वेळ इकडे-तिकडे बघत जांभया आवरणारी मी आता नीट लक्ष देऊन ते डिझाईन बघायला लागते. सर बोलत असतात, पूर्वीसारखेच त्यांचे शब्द कानावर पडतात पण आत शिरत नाहीत. पण माझी इकडे समाधी लागली आहे. दहा मिनिटं – पंधरा मिनिटं – अर्धा तास – किती वेळ मी ते डिझाईन निरखत होते माहित नाही. पण आज सरांनी काहीही क्रिया घेतल्या नाहीत, नुसती माहिती सांगितली - जी मी ऐकलीच नाही - तरी क्लास संपल्यावर भारी वाटतंय एकदम.

क्लास संपला तरी डिझाईन डोक्यात फिट्ट बसलेलं जायला तयार नव्हतं. मग म्हटलं हे काढू या. माऊची रंगीत पेनं घेऊन काढायलाही बसले एक दिवस. असलं काहीतरी करताना माझी मस्त तंद्री लागते. मग किती वाजले, काय चाललंय याचं काहीही भान नसतं. आई शेजारी आहे आणि खेळत नाही, बोलत नाही याचा हळुहळू माऊला फारच त्रास व्हायला लागला. तिने पिडायला सुरुवात केली. चित्र अर्धवट ठेवायला नको वाटत होतं म्हणून मग ते घाईघाईने पूर्ण करायचा प्रयत्न केला. आणि लवकर आवरतं घेण्याच्या नादात माझं काढायला चुकलं. आधी जितकी मस्त तंद्री लागली होती तेवढीच मग प्रचंड चिडचिड झाली. इतकं सोपं काढायला चुकतंच कसं म्हणून डोक्यातलं डिझाईन अजून वाकुल्या दाखवायला लागलं. शेवटी पुन्हा काढायला बसले ते. कापडाचा रंग आणि त्याच्यावरचा प्रिंट आठवून साध्या कळ्या बॉलपेनने करायला घेतलं या वेळी. (आणि हीच रंगसंगती जास्त आवडली खरं तर.) मागच्या अनुभवावरून आलेल्या शहाणपणातून सगळं पेनने करण्याऐवजी बाहेरच्या चौकटी पेन्सीलने आखून घेतल्या आणि. अखेरीस चित्र पूर्ण झालं, आणि डोक्यातला भुंगा शांत झाला. काय असावं या पॅटर्नमध्ये इतकं गुंगवून ठेवणारं? ते बघताना जेवढी मी त्यात गुंतून गेले होते त्याच्या कितीतरी पट त्याने मला नंतर चित्र काढताना गुंतवलंय.
फसलेला पहिला प्रयत्न


आणि हा दुसरा.

5 comments:

Dhanashree said...

छान लिहीता तुम्ही, मी वाचते नेहमी.

Gouri said...

धनश्री, आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद! सेटिंग्जमध्ये गडबड झाल्याने मला सध्या प्रतिसाद दिसतच नाहीयेत. त्यामुळे तुमची प्रतिक्रिया इथे दिसायला, त्यावर मी काही लिहायला उशीर झाला, सॉरी!

Trupti said...

Hi Gouri, kaay mhantes? Koad avdale ��

Trupti said...

Hi Gouri, koad mast👍

Gouri said...

तृप्ती, मी एकदम मजेत! किती दिवसांनी आलीस इकडे! सध्या सिंगापूर ना?