माऊ
माझ्या आयुष्यात आली तेंव्हा जेमतेम पाच आठवड्यांची होती. पहिल्या भेटीतली
सुरुवातीची काही मिनिटं सोडली, तर तिच्या डोळ्यात परकेपणा कधीच नव्हता. घरात –
ओळखीपाळखीमध्ये एवढं छोटुसं पिल्लू अगदी
सहज सामावून गेलं, आणि हिचे जन्मदाते आईबाप दुसरे कोणी होते हेही मी विसरून
गेले. माऊला या घटना अगदी लहानपणापासून माहित आहेत. अजून काही ती फार मोठी नाही
झाली, पण “मग माझी ती आई कुठे गेली?” यासारखे प्रश्न ती केंव्हापासूनच, अगदी सहज
विचारते आहे. दत्तक ही तिला माहिती असलेली (आणि माहित असली पाहिजे अशी) एक मामुली बाब आहे,
यात काहीही वेगळं नाही असंच मला कायम वाटत आलंय. चेष्टेमध्ये अगदी “हे बाळ फार
त्रास देणारं आहे, मी त्या मावशीला म्हणते – “तुला दुसरं, जरा शहाणं बाळ मिळतंय का
ते बघ, हे घेऊन ते दे!”” असं सुद्धा बोललोय आम्ही. आणि मोठ्या भावंडांनी धाकट्याला
छळायला “तुला बाजारातून विकत आणलंय आई-बाबांनी!” असं म्हटल्यावर जितकी चिडचिड
होते, त्यापलिकडे माऊलाही यात काही असुरक्षित वगैरे कधी वाटलेलं नाही. काही मुलं आईबाबांनी
जन्माला घातलेली असतात, काही दत्तक घेतलेली असतात. जन्म कुठे झाला या एका तपशीलाचा
काय तो फरक – असं मी इतके दिवस मानत आलेय.
माऊच्या
वागण्यातल्या काही गोष्टी मला वेगळ्या वाटल्या. पण हा अनुवंशिकतेचा भाग असेल असं मी
समजत होते. इंग्लंड भेटीमध्ये वहिनीने तिथल्या एका चाईल्ड काऊन्सेलिंग क्षेत्रातल्या
मैत्रिणीशी गाठ घालून दिली. तिच्याशी बोलल्यावर बर्याच नव्या गोष्टी समजल्या.
माऊला भेटल्याभेटल्या तिने एखादं पुस्तक वाचावं तसं मला माझंच पिल्लू वाचून दाखवलं.
उदाहरण
सांगायचं तर - तिला सगळ्या गोष्टींना स्पर्श करावासा वाटतो का? हलका, नाजूक स्पर्श
नाही, दाबून स्पर्श. मूल जन्माला येतं तेंव्हा आईचा स्पर्श ही त्याच्यासाठी अगदी आवश्यक
गोष्ट आहे. जन्मदात्रीपासून बाळपणी वेगळं व्हावं लागलेल्या मुलांमध्ये ही स्पर्शाची
भूक पुरेशी भागलेली नसते. त्यामुळे असे स्पर्श ही त्यांची एक गरज असते. ती इतरांना
स्पर्श करतात, इतरांनी आपल्याला असेच, इतकेच स्पर्श करावेत अशी त्यांची इच्छा
असते. इतरांना हे विचित्र वाटू शकतं, काही जण तर यामध्ये लैंगिक अर्थ शोधण्याची शक्यता
असते. पण ही निव्वळ स्पर्शाची भूक आहे. त्यांना खूप जवळ घ्या, कुरवाळा, गुदगुल्या
करा, दंगामस्ती करा, स्लाईम, प्लेडो, चिखल, शेण, अशा “घाणेरड्या” माध्यमांशी
त्यांना मनसोक्त खेळू द्या. हळुहळू मुलांची ही तहान शमेल. शक्यतो अशा मुलांच्या आजूबाजूच्या
लोकांना या गरजेची जाणीव करून द्या. हा तिचा सल्ला.
हे
असं कधी असेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आजपर्यंत जैविक आणि दत्तक यामध्ये काहीही
फरक नाही असं म्हणत होते मी. I was perhaps oversimplifying. यात चांगलं / वाईट म्हणावं असं काहीही नाही, पण वेगळं आहे हे निश्चित. आणि
त्या वेगळेपणाची दखल घ्यायला हवी मी.
3 comments:
आम्हाला माऊच्या गमतीजमती वाचायला खूप खूप आवडतात! लहानपणी मी अन माझा भाऊ ही बाबांना म्हणायचो, 'भांडारातून दुसरी आई आणू! :-) ' अर्थात त्याआधी आम्हीच तिला खूप छळलेलं असायचं!! :-) आम्हाला माऊच्या गोष्टी अशाच सांगत रहा!!! धन्यवाद. -मिलींद
मिलिंद कोलटकर, ब्लॉगवर स्वागत, आणि प्रतिक्रियेसाठी धन्यवाद! माऊच्या गोष्टी येत रहतील इथे, जरूर वाचा! :)
छान आहेत माऊच्या गोष्टी !
Post a Comment