Sunday, February 14, 2021

लल्लीची गोष्ट

     लल्ली माझी बालपणीची मैत्रीण म्हणवत नाही, कारण आम्ही एकत्र फक्त भांडलोय, खेळल्याचं काही आठवत नाही. या भांडाभांडीमुळे वैतागून मी तिच्याशी जो अबोला धरला, तो थेट गाव सोडल्यावरच संपला. म्हणजे सगळे मिळून खेळताना ती आणि मी एकत्र असायचो, पण दोघी एकमेकींशी मात्र खेळायचो नाही.

 

    आई वडिलांना नको असताना झालेली, चार पोरांच्या नंतरची ही मुलगी. आपलं कुणाला नको असणं कुठेतरी तिच्या अंतर्मनात मुरलेलं असावं, कारण हिसकावून घेतल्याशिवाय आपल्याला कधी काही मिळणार नाही असं ती वागायची. डोकं खूप तल्लख होतं, आत्मविश्वास, जिगर होती, पण याचा वापर व्हायचा तो इतरांना कारभार वाटणार्‍या गोष्टी बिनदिक्कत करण्यात. ही सगळी बुद्धी, चलाखी शाळेच्या अभ्यासाच्या वेळी गायब व्हायची. पहिलीत, दुसरीत अशी दर वर्षी नापास होत होत ती कासवाच्या गतीने शाळेची शिडी चढत राहिली. घरातल्या बाकीच्या उस्तवारीमध्ये तिच्याकडे विशेष लक्ष द्यायला आईवडिलांना फुरसत नव्हती. खरं तर पोरं आपोआप मोठी होतात, त्यांच्याकडे काय लक्ष द्यायचं असाच साधारण विचार आजुबाजूला दिसायचा. त्यामुळे निकालावरची लाल रेष दिसल्यावर पोटभर मार खाण्यापलिकडे फार काही वेगळी दखल तिच्या अभ्यासातल्या ‘ढ’पणाची घेतली गेली नसावी. एकदा शाळाही बदलून झाली, पण त्याने युनिफॉर्म बदलण्याखेरीज काही फरक पडला नाही.        

 

   आठवीनंतर मी गाव बदललं. तोवर लल्ली चौथीपर्यंत पोहोचली असावी. वयाने साधारण माझ्याएवढीच. टीवायच्या सुट्टीत मी तिच्या गावी गेले तेव्हा ती दहावीचा गड लढवत होती. दहावी पास होईपर्यंत आवडीचं शिवण शिकायला मिळणार नाही, छानछोकीचे कपडे मिळणार नाहीत अशा अटी टेकीला आलेल्या घरच्यांनी घातल्या होत्या. तरीही ही दहावीची कितवी वारी होती कुणास ठाऊक. प्रथमच मला लल्लीविषयी वाईट वाटलं.

 

    पुढे समजलं, की तिचं लग्न झालं. लहानपणी घरकामात तरबेज असणारी लल्ली फार आळशीपणा करते अशी तिच्या सासरच्यांची तक्रार होती. दहा वर्षं वय असताना एकटीने रेल्वेच्या दवाखान्यात जाऊन, केस पेपर काढून आपल्या जखमेला ड्रेसिंग करून घेणारी जिगरबाज लल्ली आयुष्यात काहीच करत नसेल यावर विश्वास बसेना.

 

    आज माऊची आई म्हणून विचार करताना खूप वेगळी वाटते लल्लीची गोष्ट. मी तिला मैत्रीण म्हटलं नाही, तसंच दुसर्‍या कुणीही फारसं म्हटलं नसावं. इतक्या क्षमता असणारी मुलगी कोणीच आपलं म्हटलं नाही म्हणून कोमेजून गेली का? “तू काही चांगलं करू शकतेस” असा विश्वास दाखवणारं कोणीच नव्हतं का? नकळत्या वयात तिच्याशी अबोला धरताना मीही तिला एकटं पाडणार्‍यांपैकीचं एक होते ना! लल्लीच्या या गोष्टीत अजून चांगलं काही होणं शक्यच नव्हतं का?  

No comments: