Friday, February 26, 2021

लक्ष्मी आज्जी

‘स्मृतिचित्रे’ पहिल्यांदा वाचलं ते दहावी - बारावीत असताना. तेव्हा मला पुस्तकांचा भस्म्या रोग होता. हातात घेतलेलं पुस्तक संपण्यापूर्वी खाली ठेवणं म्हणजे नामुष्की वाटायची. इंग्रजीचा वेग अजून कमी होता, तरी ‘Complete Short Stories of Sherlock Holmes’चा ठोकळा आठवडाभरात संपायचा. स्मृतिचित्रंही या अचरट वेगानेच वाचली आणि विस्मृतीत ढकलून दिली, अजिबात वेळ न दवडता पुढच्या पुस्तकाकडे वळले.

 

माऊसोबत पुस्तकं वाचताना तिला मराठी पुस्तकांचीही ओळख करून द्यायचा माझा प्रयत्न असतो. तिचा पुस्तक वाचण्याचा कंटाळा याबाबत माझ्या पथ्यावरच पडतो. स्वतः काही वाचण्यापेक्षा बाईसाहेबांना श्रवणभक्ती करायला आवडते. त्यामुळे मग मला माझ्या आवडीची पुस्तकं निवडायची संधी असते.      

 

असंच मी एकदा तिच्यासोबत ‘स्मृतिचित्रे’ वाचायला घेतलं, आणि तिला ते आवडलं. एवढं मोठं पुस्तक म्हणजे थोडं वाचल्यावर बहुतेक ही कंटाळेल, मग दुसरं पुस्तक बघू असं मला वाटलं होतं. पण पूर्ण पुस्तकातले टिळकांचे अभंग आणि कविता (या तिला अवघड होत्या, समजल्या नाहीत) वगळता बाकी सगळं पुस्तक तिने चवीने ऐकलं. ‘लक्ष्मी आज्जीच्या गोष्टी’ आम्हाला इतक्या आवडल्या, की पुस्तक वाचून झाल्यावर परत एकदा त्यातला काही भाग तिला ऐकायचा होता. दहावीत वाचून मला ते फारसं खोलवर पोहोचलं नव्हतं, तिला किती लक्षात राहील माहित नाही. पण माऊनिमित्त हे परत वाचताना मला खूप मज्जा आलीय. १८५७ ते १९२० एवढा मोठा कालखंड या कहाणीचा आहे. परीक्षा पाहणारे इतके प्रसंग, भोवतालची विक्षिप्त माणसं असं सगळं असताना ही बाई किती सहजतेने ते सांगते! तिला जेमतेम लिहायला येतंय असं ती म्हणते ... पण “लग्न करताना मी बेफिकिरीची माळ टिळकांच्या गळ्यात घातली, त्यांनी फिकिरीची माळ माझ्या गळ्यात घातली”, “माझं सोवळं महाबळेश्वरीच हवा खायला राहिलं” असा सहज सोप्या भाषेतला नर्मविनोद लिहिण्यात जागोजागी दिसतो. आजीजवळ बसून गोष्टी ऐकल्याचं सुख आहे हे वाचण्यात.  

 

‘सोवळं लागलेल्या’ गोखल्य़ांची मुलगी एके दिवशी एका भिकारी मुलीला सहज आपली मुलगी म्हणून स्वीकारते आणि प्लेगच्या साथीत रोग्यांचं ‘सोनं’ही मनोभावे साफ करते. एकदा मनाला पटलं, की ‘टिळकांच्या इंजिनाने गती दिलेली ही आगगाडी’ धडाक्यात स्वतःच्या बळावर चालू लागते. हे आयुष्याला, बदलाला सामोरं जाणं मला फार आवडलं.

 

टिळकांविषयी माझं मत फारसं चांगलं नव्हतं. ‘उत्तम कविगुण असणारा एक चक्कर माणूस’ असा काहीतरी माझा समज होता. त्यांचं ख्रिस्ती होणं हा असाच एक चक्करपणा. पण या वेळी वाचताना जाणवला तो एक हळवा, प्रेमळ भक्त. आपला तापटपणा जावा म्हणून देवाची करुणा भाकणारा, अखेरीस संतापावर विजय मिळवणारा संत. हिंदी ख्रिस्त्यांनी मिशनर्‍यांचे मिंधे राहू नये, चर्चची सत्ता राहू नये म्हणून धडपडणारा धर्मसुधारक. दुष्काळात माझे बांधव उपाशी आहेत म्हणून ज्याच्या घशात घास अडकतो असा ख्रिस्तबुद्धाच्या जातीकुळीचा माणूस. प्रेमळ बाप आणि नवरा.

लक्ष्मीबाई आणि टिळाकांचा संसार म्हणजे त्यात घरचे आणि दारचे असा भेदच कुठे नाही. बाकी हजार बाबतीत त्यांची भांडणं झाली तरी कुणाला मदत करण्याबाबत कायम एकमत असतं. उत्तम कविता करणार्‍या ‘ठोंबरे’ला – म्हणजे बालकवींना त्यांच्याकडे आसरा मिळतो, टिळकांच्या भ्रमंतीत सापडलेल्या कुणाही गरजूला हे हक्काचं घर असतं, दुष्काळाच्या काळात स्वतःच्या ऐपतीचा विचार न करता वसतीगृहाच्या सगळ्या मुलांना सांभाळणं ते आपला धर्म समजतात. फार समृद्ध घर आहे हे!

माऊमुळे हे सगळं चवीचवीने वाचायला मिळालं. रोज एक प्रकरण वाचायचं, मग त्यावर भरपूर गप्पा मारायच्या, त्यामुळे चघळायला, पचायलाही वेळ मिळाला भरपूर. भसाभसा वाचण्यापेक्षा खूप जास्त मजा आहे यात!

 

4 comments:

Unknown said...

उत्तम लिहिलंस👌

Meghana Bhuskute said...

मलापण आठवण आली सरसरून! आता मीपण वाचते परत. थ्यांक्यू!

Devendra said...

Kya bat hain! :)

It is on my reading list at the moment, got the hard copy during my last India trip.

Thanks for the short review.

Gouri said...

देवेंद्र, अगदी आवर्जुन वाचण्यासारखं पुस्तक आहे हे. कसं वाटलं ते नक्की लिहा.