काल कुठून तरी या ब्लॉगवर जाऊन पोहोचले. जगातल्या सगाळ्यात लोकप्रिय ब्लॉगपैकी हा एक आहे, मान्य. पण मला याच शोध काल लागला. आणि शोध लागल्यापासून मी आधाश्यासारखी इथल्या पोस्ट वाचतेच आहे.
**************
नोकरी लागल्यावर वर्षभरात मी केस पुन्हा कापण्याच्या निर्णयाला येऊन पोहोचले होते. लहान केस आवडतात म्हणून नाही, तर मोठे केस मेंटेन करायला वेळ मिळत नाही म्हणून. बदलणारे प्राधान्यक्रम, कित्येक गोष्टी ‘सोडून देण्या’चा निर्णय, या सगळ्याचं हे एक उदाहरण होतं. केस मेंटेन करता आले नाहीत तर फार काही बिघडत नाही, कापून टाकता येतात. जगण्यातल्या कित्येक गोष्टी अश्या ‘कापून टाकण्याचे’ निर्णय आपण घेत असतो, ते आवश्यकच असतं. कळीचा मुद्दा हा आहे, की या गोष्टी काढून टाकून आपण कश्यासाठी जागा करतो आहोत? ज्यासाठी जागा केली, ती खरंच प्रायॉरिटी आहे का? नाही्तर ट्रेकला जाताना सॅकमध्ये जागा नाही म्हणून पाण्याची बाटली काढून टाकून जास्तीचे कपडे भरण्यासारखं चाललंय आपलं. सॅकचं वजन कमी झालं, पण जास्त महत्त्वाची गोष्ट बाहेर राहिली.
सहा आठवड्याच्या कामातून त आपण वर्षभराची पोटापाण्याची सोय करू शकतो असं गणित थोरोने मांडलंय. ही ‘पोटापाण्याची सोय’ माझ्या आयुष्याचा फार मोठा भाग व्यापून टाकते आहे. कारण सहा आठवडे काम = एक वर्षाची सोय एवढं सोपं गणित मला मांडता येत नाही. जेंव्हा हातपाय चालणार नाहीत तेंव्हा काय करायचं? डोक्यावरचं छप्पर मला पुण्यातच, चांगल्या वस्तीत, किमान दोन बेडरूमचं लागतं. चारचाकी लागते, वीज लागते, इंटरनेट लागतं - एक ना दोन हजार गोष्टी येतात माझ्या ‘पोटापाण्याच्या सोयी’मध्ये. वर्षाला सहा आठवडेच काय, वर्षाचे सगळे आठवडे काम केलं तरी मला खात्री नसते पोटापाण्याची सोय झालीय म्हणून. आपलं आयुष्य आपण फार गुंतागुंतीचं करून ठेवलंय. हे सोपं बनवल्याखेरीज मजा नाही हे गेले काही महिने फार प्रकर्षाने जाणवतंय.
सुखाने नोकरी करायची असेल, तर घरातल्या काही गोष्टींकडे काणाडोळा करायला शिकावं लागतं. फक्त घरातल्याच नाही, मनातल्याही. घरातली आणि मनातली ही अडगळ, आपण कितीही दुर्लक्ष करायचं म्हटलं, तरी ताण तणावात भर घालत राहते. आज ना उद्या तिच्याशी दोन हात करावेच लागणार आहेत.
शिस्त लावायची म्हणून सवयी लागत नसतात. आतून ते करायची इच्छा जागी व्हायला लागते. जे आतून करावसं वाटतं ते करणं हा कळीचा मुद्दा आहे.
**************
या आणि अश्या सतराशे साठ गोष्टी. मला फक्त विचाराच्या पातळीवर जाणवताहेत. त्यावर कार्यवाही करण्याची निकड जाणवली नव्हती अजून. झेन हॅबिट्सवाला बाबा हे सगळं प्रत्यक्षात आणतोय. माझा हे करायचा मुहुर्त कधी लागणार?
