Wednesday, November 12, 2008

एक डोळस मुलगी

साब्रिये टिंबरकेन नावाची एक जर्मन मुलगी आहे. तिने कॉलेजमध्ये तिबेट आणि चीनच्या संस्कृतींचा, भाषांचा अभ्यास करायचं ठरवलं. हा अभ्यास करायला मोठ्ठी अडचण होती. कारण साब्रिये नेत्रहीन आहे, आणि तिबेटी भाषेसाठी आजवर कुणी ब्रेल लीपी तयारच केली नव्हती. अशा वेळी तुम्ही काय कराल? जगात तिबेट सोडून बाकी एवढया संस्कृती पडलेल्या आहेत. दुसरी कुठली तरी संस्कृती निवडयची ना मग अभ्यासासाठी. साब्रियेचं मित्रमंडळ, शिक्षकवर्ग यांनीसुद्धा तिला हाच सल्ला दिला. पण साब्रिये ने वेगळंच काही करायचं ठरवलं. तिने स्वतःच तिबेटी भाषा ब्रेलमध्ये लिहिण्याची पद्धत विकसित केली, आणि तिबेटचा अभ्यास केला.

जी भाषा ब्रेलमध्ये कशी लिहावी याचा आजवर कोणी विचारही केला नव्हता, ती भाषा बोलणाऱ्या अंध लोकांची परिस्थिती काय असेल? त्यांना निश्चितच शिक्षण घेता येत नसणार. काय करत असतील तिबेटमधली अंध मुलं? साब्रियेला प्रश्न पडला. तिने स्वतःच तिबेटला जाऊन हे बघायचं ठरवलं. डोळे नसणारी मुलगी हे सगळं कसं बघणार? तिला तिथे कोण घेऊन जाणार? पण साब्रियेला कुणाबरोबर जायचंच नव्हतं. आजवर आपल्या भोवताली असणारं सुरक्षित, ओळखीचं जग तिला सोनेरी पिंजऱ्यासारखं वाटत होतं. तिथून बाहेर पडून, स्वतःच्या हिंमतीवर नवं जग अनुभवण्याची तिला अनिवार इच्छा होती.

साब्रिये एकटी तिबेटला गेली. तिथल्या अंध मुलांची, मोठ्यांची परिस्थिती तिने स्वतः अनुभवली. सगळे सरकारी अडथळे पार करत, जिथे कुठे शाळेच्या वयाच्या अंधळ्या मुलामुलींची माहिती मिळेल, त्या तिबेटच्या दुर्गम खेड्यापाड्यात ती स्वतः गेली. या मुलांच्या घरच्यांशी बोलली. त्या मुलांना ल्हासाला घेऊन आली, आणि तिने या मुलांसाठी शाळा सुरू केली. पुस्तकी शिक्षणाच्या बरोबरच या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, कुणाच्या दयेवर जगण्याऐवजी स्वतःच्या पायावर उभं राहण्याची उमेद जागी करणं, त्यांना स्वप्नं देणं हे या शाळेने केलेलं काम. शाळेचं उद्दिष्ट आहे एक दिवस या मुलांना शाळेबाहेरच्या जगात स्वतंत्रपणे जगण्याइतकं सक्षम बनवणं.
ज्या सहजतेने साब्रियेने तिबेटला जाण्याचा निर्णय घेतला, तिला साजेशा सोप्या सरळ भाषेत तिने तिचे हे अनुभव शब्दबद्ध केले आहेत, 'Mein Weg führt nach Tibet ' या पुस्तकात. जमेल तसं ते मराठीमध्ये मांडण्याची इच्छा आहे.

Tuesday, November 11, 2008

’क्रिस्टालनाख्त’च्या निमित्ताने

गेल्या १० नोव्हेंबरला ’क्रिस्टालनाख्त’ ला ७० वर्षे पूर्ण झाली. त्या प्रसंगाची आठवण म्हणून बर्लिनमध्ये चॅन्सलर आंगेला मार्केल यांच्या हस्ते एका सिनेगॉगचं उदघाटन होतं. सर्व उपग्रह वाहिन्यांवरच्या बातम्यांमध्ये ती एक ठळक बातमी होती. योगायोग म्हणजे बर्लिनची भिंतसुद्धा १९८९ मध्ये १० नोव्हेंबरलाच पडली. खरं तर हा जर्मनीच्या इतिहासातला एक महत्त्वाचा प्रसंग. पण आज त्याची आठवण म्हणून कुठेही आनंदोत्सव साजरा होतांना दिसत नाही. १० नोव्हेंबरला असलेल्या ‘क्रिस्टालनाख्त’च्या पार्श्वभूमीमुळे जर्मन एकीकरणाचा दिवस सुद्धा १० नोव्हेंबर ऐवजी ३ ऑक्टोबरला साजरा करतात! बर्लिनची भिंत पडण्यापेक्षा जास्त महत्त्व मिळणारा हा ’क्रिस्टालनाख्त’प्रकार आहे तरी काय?

’क्रिस्टालनाख्त’ ही नाझी राजवटीमध्ये म्युनिकमध्ये घडलेली एक ऐतिहासिक घटना. हा प्रसंग म्हणजे जर्मनीमध्ये हिटलरशाहीमधल्या ज्यूंवरच्या उघड अत्याचारांची सुरुवात होती. पोलीश ज्यूंच्या जर्मनीतून हद्दपारीचा परिणाम म्हणून १९३८ साली पॅरिसमधल्या जर्मन राजदूताची एका १७-१८ वर्षांच्या ज्यू विद्यार्थ्याने हत्या केली. या घटनेला नाझी प्रचारतंत्राने ज्यूंच्या जर्मन राष्ट्रविरोधी उठावाचं रूप दिलं, आणि हा ’उठाव शमवण्यासाठी’ हिटलरच्या आमदानीतली जर्मनीमधली पहिली ज्यूंची धरपकड म्युनिकमध्ये झाली. त्यांची घरं, दुकानं जाळली गेली. म्युनिकच्या रस्त्यावर फुटलेल्या काचांचा सडा पडला, आणि लागलेल्या आगीमुळे हे दृष्य कुणा नाझीला ’स्फाटिकांसारखं’ सुंदर दिसलं, म्हणून या रात्रीला नाझींनी अभिमानाने ’क्रिस्टालनाख्त’ (स्फटिकांची रात्र) असं नाव दिलं. या घटनेचे देशात किती पडसाद उमटतात याचा नाझींनी अंदाज घेतला. ज्यूंच्या धरपकडीविरुद्ध विशेष कुठे प्रतिक्रिया उमटली नाही, आणि मग जर्मनीमध्ये राजेरोसपणे, मोठ्या प्रमाणावर ज्यूंची गळचेपी सुरू झाली. आज म्युनिकमध्ये राहताना या साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या इतिहासाकडे इथले लोक कसं बघतात हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती. सगळं जग ज्या कृत्यांकडे सैतनी म्हणून बघतं, ती आपल्या देशात, आपल्या आईवडिलांच्या काळात घडली. आपले आईवडील, आपले काका-मामा या सगळ्यात समील होते, किंवा मूग गिळून बसले होते ही केवढी लाजिरवाणी गोष्ट वाटत असेल त्यांच्या वंशजांना!

इथे राहतांना जर्मन इतिहासाचे आणि वर्तमानाचे काही नवीनच पैलू समजले.

पहिला प्रश्न होता तो छळछावणीमधल्या पहारेकऱ्यांचा. बंद्यांवर इतका प्रदीर्घ काळ इतके अत्याचार सातत्याने करवले तरी कसे? एकादा माणूस दुष्ट असू शकतो. पण एकजात सगळे पहारेकरी इतके आंधळे होते? तर डाखाऊची छळछावणी बघताना समजलं, की छळछावणीमध्ये काम करणाऱ्या नाझी पहारेकऱ्यांचं सरासरी वय होतं १६ ते १८ वर्षे! या मुलांमध्ये काही वेळा आजच्या दिवसात किती ज्यू मारले अशा पैजासुद्धा लागत. मध्ययुगीन युरोपातल्या ‘धर्मयुद्ध’ खेळण्यासाठी तयार केलेल्या बारा-पंधरा वर्ष वयाच्या सैनिकांसारखं किंवा आजच्या अतिरेक्यांसारखं त्यांचं पूर्ण ब्रेनवॉशिंग झालेलं होतं.

आजच्या जर्मनीमधल्या ज्यू आणि ख्रिश्चन समाजाचे परस्पर संबंध कसे आहेत याचाही शोध घ्यावासा वाटला.म्युनिकची दुसऱ्या महायुद्धामधल्या बॉम्बिंगमुळे खूपच पडझड झाली होती. युद्ध संपल्यावर ६०% शहर पुन्हा उभारावं लागलं. म्युनिकमधलं प्रसिद्ध ’मारिएन चर्च’सुद्धा पुन्हा उभं केलं गेलं. या चर्चमध्ये युद्धानंतरच्या पुनर्निमाणासाठी ज्यांनी हातभार लावला, त्या संस्थांची चिन्हं काढलेली आहेत. त्यामध्ये एक ज्युईश कॅंडलस्टॅंडचं चिन्ह आहे. चर्चमध्ये ज्यू कॅंडलस्टॅंडचं चित्रं? म्युनिकच्या ज्यू समाजाने या चर्चच्या बांधणीसाठी देणगी दिली होती. आणि अशीच देणगी म्युनिकच्या कॅथोलिक चर्चनेसुद्धा ज्यूंचं बेचिराख झालेलं सिनेगॉग बांधण्यासाठी तेंव्हा दिली होती. हिटलर जसा ज्यूविरोधी होता, तसाच त्याचा अन्य धर्मांनासुद्धा विरोध होता. ख्रिश्चन धर्मगुरूंनाही त्याने छळछावण्यांमध्ये डांबले होते. तो स्वतःला निधर्मी - atheist - समजत असे. त्यामुळे संघर्ष सर्व धर्म विरुद्ध हिटलर असा होता ... ज्यू विरुद्ध ख्रिश्चन असा नाही.

एकदा आमच्या जर्मन शिक्षिकेने दिल्लीमध्ये भारत - पाकिस्तान क्रिकेट सामना जिंकल्यानंतरचा जल्लोष बघितला. हा खेळातला विजय आहे का युद्धातला असा प्रश्न पडला तिला. आताआतापर्यंत फुटबॉल मॅचमध्ये जर्मन संघ जिंकला तर जर्मनीचं राष्ट्रगीतसुद्धा वाजत नसे. 'Das Lied der Deutschen’ (The song of the Germans) हे १९२२ पासून जर्मन राष्ट्रगीत आहे. वायमार प्रजासत्ताकाच्या काळात ते राष्ट्रगीत झालं, नाझी जर्मनीमध्येही वापरलं गेलं, आणि युद्धानंतर पश्चिम जर्मनीने परत हेच राष्ट्रगीत निवडलं. कित्येकांना हे नाझी वापरामुळे कलंकित झालेलं राष्ट्रगीत बदललं पाहिजे असं वाटतं. प्रसिद्ध जर्मन नाटककार आणि साहित्यिक बेर्टोल्ड ब्रेख्त याचं एक गाणं आहे - Kinderhymne नावाचं. त्याला राष्ट्रगीताचा दर्जा द्यावा अशी एक मागणी होत असते. दर वर्षी ३ ऑक्टोबरला जर्मन एकीकरण दिवसाची सुट्टी असते - पण चुकूनही कुठे मार्चपास्ट, ध्वजवंदन असे काही कार्यक्रम होत नाहीत. आपल्या राष्ट्रीय भावनेचं चुकूनसुद्धा कुठे प्रदर्शन करत नाहीत हे लोक.

आज म्युनिक हे विदेशी पर्यटकांचं एक मोठं आकर्षण आहे - इथला सुंदर निसर्ग, आल्प्सपासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे ट्रेकिंग / स्किईंगला जाण्यासाठी सोयीचा बेस, आणि बाकी जर्मनीपासून हटके असणारी म्युनिकची खास एक वेगळी संस्कृती यामुळे बर्लिनच्या बरोबरीने परदेशी पर्यटक म्युनिकमध्ये येतात. पण म्युनिकला एक अंधारी बाजूसुद्धा आहे - थर्ड राईशच्या काळातली. हिटलर मूळचा ऑस्ट्रियाचा असला, तरी तो राजकीय क्षितिजावर पुढे आला, तो म्युनिकमधून. त्याचा बीअर हॉलमधला फसलेला उठाव इथेच झाला. ’क्रिस्टालनाख्त’ पण म्युनिकमध्येच. पहिली आणि ’आदर्श’ छळछावणी म्युनिकजवळ डाखाऊ मध्ये. विदेशी पर्यटकांपासून म्युनिक हा सगळा काळा इतिहास लपवून ठेवणार का? अनुल्लेखाने किंवा downplay करून त्याचं महत्त्व कमी करायचा प्रयत्न करणार का? हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती. म्युनिकची प्रवासी माहिती देणाऱ्या साईट्स आवर्जून या इतिहासाचा उल्लेख करतात.हे परत घडू नये म्हणून त्याची आठवण ठेवली पाहिजे, त्याचं भीषण स्वरूप लोकांना समजले पाहिजे असा दृष्टीकोन आहे. म्युनिकमध्ये, किंवा हाम्बुर्गसारख्या lively शहरामध्ये फिरताना आपण मध्येच या इतिहासाला ठेचकाळतो.एखाद्या सुंदर भागातून फिरतांना सहज खाली लक्ष गेले तर फुटपाथच्या टाईल्समध्ये मध्येच एक छोटीशी पितळी पाटी असते ... अमुक तमुक ज्यू इथे राहत होता - या या दिवशी नाझींनी त्याला पकडून नेलं,अमुक अमुक छळछावणीमध्ये डांबून ठेवलं, या तारखेला त्याला मृत्यू आला. एकदम दाताखाली खडा आल्यासारखं होतं.बर्लीनमध्ये एक मोठं स्मारक आहे हिटलरशाहीमध्ये भरडल्या गेलेल्या युरोपातल्या सगळ्या ज्यूंचं. पण मोठं स्मारक एखाद्या दिवशी बघितलं जातं, दुसऱ्या दिवशी आपण परत आपल्या विश्वात परत येतो. या छोट्या पाट्या तुमच्या रोजच्या जीवनाचा भाग असतात. त्या तुम्हाला रोज आठवण करून देतात. मला असं वाटतं की अशी स्मारकं उभी करण्यासाठी खूप धैर्य लागतं.

कुठलाही समाज समजून घेणं ही प्रक्रिया न संपणारी असते.ही फक्त त्या प्रक्रियेमधली एका टप्प्यावरची निरिक्षणं.













*******************************
हा लेख मी शब्दबंध २००९ मध्ये वाचला होता.






Saturday, November 8, 2008

परिकथेतला किल्ला बांधणारा वेडा राजा















एक होता राजा. त्याला पुस्तकांच्या राज्यात हरवून जायला आवडायचं. हुजऱ्यांच्या गर्दीमध्ये राहण्यापेक्षा एकान्त आवडायचा. निसर्ग आवडायचा. संगीत वेडावून टाकायचं. सुंदर सुंदर वास्तू बांधण्याची स्वप्नं पडायची. दरबाराची कटकारस्थानं विसरून तो काव्यानंदात बुडून जायचा.

असा राजा काय कामाचा? राजाने राज्य केलं पाहिजे. राज्य वाढवलं पाहिजे. शत्रूंबरोबर लढाया केल्या पाहिजेत. दरबारातल्या कारस्थानी लोकांवर नजर ठेवायला पाहिजे. जमलंच, तर प्रजेच्या भल्यासाठीसुद्धा काहीतरी करायला पाहिजे. एवढा कवीमनाचा, संवेदनाक्षम आणि अंतर्मुख माणूस काय राज्य करणार? मध्ययुगातल्या राजेपणाच्या सगळ्याच निकषांवर पार कुचकामी ठरणारा राजा निपजला हा. त्याला सत्तेपासून दूर करण्याचा सोपा मार्ग शोधला दरबारी मंडळींनी. राजा वेडा आहे म्हणून जाहीर केलं. दूर एकाकी अशा एका वाड्यामध्ये त्याची पाठवणी केली. आणि अगदी मोजक्या दिवसात, या वेड्या राजाने जवळच्या नदीमध्ये ’आत्महत्या केली’. राजाला वेडा घोषित करणाऱ्या मानसोपचारतज्ञाचं पण प्रेत त्याच नदीमध्ये ’योगायोगाने’ सापडलं.

पण त्या राजाने त्याच्या सुंदर वास्तू उभारण्याच्या वेडामुळे काहीतरी जगावेगळं निर्माण करून ठेवलं होतं. आजसुद्धा हे अर्धं पुरं झालेलं स्वप्न बघितलं, म्हणजे वाटतं, बाबा रे, तू राजा का झालास? तुला राज्यकारभारात काडीचाही रस नव्हता. आपल्या प्रजेकडे दुर्लक्षच केलं असणार तू. त्याऐवजी तुला जर एक कलाकार म्हणून जगायची संधी मिळाली असती तर? जितक्या औदार्याने तू तुला सापडलेल्या कलाकारांना राजाश्रय दिलास, तसा तुला कोणी राजाश्रय दिला असता तर?

लुडविग दुसरा हा बव्हेरियाचा राजा. बव्हेरिया म्हणजे तेंव्हाच्या युरोपातलं एक प्रबळ राज्य. लुडविग हा रिचर्ड वागनर या संगीतकाराचा चाहता. नुसता चाहताच नाही, तर त्याच्या संपूर्ण कारकीर्दीमध्ये त्याने वागनरला कधी पैशाची कमतरता पडू दिली नाही. वागनरच्या संगीताच्या सन्मानार्थ राजाने एक सुंदर किल्ला बांधला. या पूर्ण किल्ल्यामध्ये त्या राजाची राजचिन्हं, प्रतिकं कुठेच दिसत नाहीत. हा किल्ला लुडविगने बांधला याचा साधा उल्लेख सुद्धा कुठे नाही. किल्ल्यातली सगळी महत्त्वाची दालनं वागनरच्या प्रसिद्ध रचनांवर आधारित सजावटीने मढलेली आहेत. तिथे वागनरचं संगीत कायम ऐकायला मिळावं अशी लुडविगची इच्छा होती. किल्ल्याची बांधणी खरोखर परिकथेत शोभावी अशी. वॉल्ट डिस्नेने त्याचा परिकथेतला किल्ला या किल्ल्यापसून स्फूर्ती घेऊन बनवला! एवढ्या मोठ्या मनाचा (किंवा अव्यवहारी) राजा जगात दुसरा कोणी नसेल. तर अशा या ’अनफिट’ राजाचं हे संगीतमय स्वप्न म्हणजे नॉयश्वानश्टाईन (Neuschwanstein) चा किल्ला. म्युनिकपासून एका दिवसात बघून येण्यासारखी एक अनोखी जागा. चारही बाजूंनी जंगलाने, डोंगरांनी वेढलेला. बघितल्यावर फक्त एकच मनात आलं, अप्रतिम. बाकी राजा म्हणून, एक माणूस म्हणून लुडविग वेडा, शहाणा कसा का असेना, या एका किल्ल्यासाठीसुद्धा त्याला मानलं पाहिजे. (लुडविगने एकूण सहा किल्ले बांधले बव्हेरियामध्ये. आमच्या ’दहा मार्कांचा ज्ञानेश्वर’ श्टाईल प्रवासामुळे यंदा त्याचा एवढा एकच किल्ला बघितला आम्ही.)

किल्ला कसा दिसतो, ते मी सांगण्यापेक्षा फोटोमधूनच जास्त चांगलं समजेल. वर टाकलाय तो मोठा फोटो मुख्य प्रवेशद्वारामधून काढलेला. प्रवेशद्वाराच्या कमानीमुळे या फोटोला एक वेगळा गेट़अप येतोय असं मला वाटलं, म्हणून काढलेला. नाहीतर नॉयश्वानश्टाईनचे प्रसिद्ध फोटो वेगळ्या ऍंगलमधले असतात. (दोन नंबरचा फोटो आहे तसा.) अजून फोटो पिकासावर नक्की टाकते - सद्ध्या माझा लॅपटॉप मेलाय ... इथे तात्पुरता वापरण्यासाठी दिलाय ऑफिसने. त्याच्यावर पिकासा install नाही करत बसत आता - आठवडाभरात परत सगळं uninstall करून, मिळाला तसा परत करायचा आहे लॅपटॉप. त्यामुळे बाकी फोटो नंतर.)





Friday, November 7, 2008

निरोप

म्युनिक सोडून जायची वेळ आली.
येताना फारशी उत्सुक नव्हते मी बव्हेरियामध्ये यायला. ड्युसेलडोर्फ, कलोन किंवा हाम्बुर्गला राहणं जास्त आवडलं असतं. म्युनिक किंवा एकूणातच दक्षिण जर्मनीमध्ये परक्यांचा द्वेष जास्त आहे, निओनाझी आहेत, फारसं सुरक्षित नाही असं ऐकलं होतं. त्यात सुरुवातीचे तीन आठवडे हाम्बुर्गने जो आपलेपणा, मोकळेपणा दिला, त्यानंतर दुसरं कुठलं शहर आवडणं अवघड होतं. पण म्युनिकची जसजशी ओळाख होत गेली, तसतशी मी या शहराच्या प्रेमात पडत गेले. उंटरफ्योरिंग आणि इथलं घर तर बघताक्षणी आवडलं. इथे कधी आपण परदेशात आहोत, अनोळखी शहरात आहोत असं वाटलंच नाही. MBAच्या सेमिनार्समुळे स्टुटगार्ट, बर्लिन पण थोडंफार बघायला मिळालं. पण हाम्बुर्ग आणि म्युनिकइतकं दुसरं कुठलंच शहर आवडलं नाही जर्मनीमध्ये. आता पुण्याला परत जायची वेळ आली आहे, आणि अजून कितीतरी गोष्टी करायच्या राहूनच गेल्यात.

- उंटरफ्योरिंगच्या लेकपासून इंग्लिश गार्डन पर्यन्त सायकलवर जायचं राहून गेलं.
- वांडेलश्टाईनचा ट्रेक करायचा राहून गेला.
- थोमास मानची म्युनिक युनिव्हर्सिटी बघायची राहून गेली.
- म्युनिकमध्ये जगातलं सर्वात जुनं आणि मोठं टेक्निकल म्युझियम आहे. ते नाही बघता आलं.
- म्युनिकमधली प्रसिद्ध आर्ट म्युझियम्स - जुनी आणि नवी पिनाकोथेक बघितलीच नाही.
- ’सऊंड ऑफ म्युझिक’च्या साल्झबुर्गला कधीही जाता येईल म्हणता म्हणता राहूनच गेलं.
- ऱ्हाईनमध्ये क्रूझ घ्यायची राहून गेली.
- फेरिंगा लेकवर एकदा मस्त पुस्तक घेऊन वाचायला जायचं होतं ते काही झालं नाही.
- टनेल वे च्या कोपऱ्यावरून दूर दिसणाऱ्या आल्प्सच्या बर्फाच्छादित शिखरांचा फोटो घ्यायचा राहून गेला.
- ऍपल / स्ट्रॉबेरी पिकिंग साठी शेतात जाऊन स्वतःच्या हाताने फळं तोडण्याची गंमत राहून गेली.
- एकदा ऑटोबानवरून गाडीतून दूरचा प्रवास करायचा होता, तो जमला नाही.
- फॉल सिझन मधले मेपलचे सुंदर रंग कॅमेऱ्याने टिपायचे राहून गेले.
- स्टार ऑफ बेथेलहेमच्या फुलांचा फोटो काढायचा राहून गेला.
- जर्मन नाटक / सिनेमा बघायचा राहून गेला.
- उंटरफ्योरिंगच्या चर्चमध्ये जाऊन बघायचं राहून गेलं.
...

यादी फारच मोठी होतीये. वर्षभरात मी काही केलं का नाही असं वाटायला लागलं बघता बघता.
पुन्हा कधीतरी माझ्या म्युनिकला राहायला आलं पाहिजे.

Friday, October 31, 2008

आमेली आणि तिचं मोमार्त


पॅरिस बघायला गेल्यावर 'Montmartre' (याचा मी केलेला, माझ्या मते फ्रेंच उच्चार म्हणजे मोsमार्त) हा भाग आवर्जून बघ असं ब्रिजित मामीने सांगितलं होतं. तिथे सुदैवने मोमार्त ची walking tour घ्यायची संधी मिळाली. आईने जितक्या कौतुकाने सदाशिव पेठेतल्या कुठल्या गल्लीत ना. ग. गोरे राहायचे, कुठे वसंतराव देशपांडे राहायचे, भीमसेनचं घर कुठे होतं, एसेम कुठे, दत्तो वामन पोतदार कुठे, भास्करबुवा कुठे, वसुदेव बळवंतांचं नृसिंहमंदिर कुठलं या सगळ्या खुणा पुण्यात राहायला आल्यावर दाखवल्या होत्या त्याची आठवण झाली. व्हॅन गॉ, पिकसो असे नंतर जगप्रसिद्ध झालेले कलाकार त्यांच्या उमेदवारीच्या काळात पॅरिसच्या या भागात राहात होते. इथल्या प्रत्येक गल्लीला, घराला, दुकानाला असा काही इतिहास आहे. कुणीतरी प्रेमाने दाखवल्याशिवाय त्या जागेची जादू समजत नाही. तर आमच्या मोमार्त पदयात्रेचा गाईड होता जॉर्ज. त्याने तीन तासांच्या त्या ट्रिपमध्ये तीस वेळा तरी उल्लेख केला असेल तो ’आमेली’चा. या सिनेमा इतक्या प्रेमाने मोमार्त, किंवा एकूणच पॅरिसचं चित्रण कुणी केलं नसेल असं त्याचं म्हणणं. एवढं काय अहे त्या सिनेमात एकदा बघायला पाहिजे म्हणून मी तेंव्हा ’एकदा करायला पाहिजे’ च्या माझ्या लांबलचक यादीत एका आयटमची भर घातली होती.
मागच्या आठवड्यात प्रसाद हुबळीला होता, त्यामुळे रात्री त्याच्याशी गप्पा शक्य नव्हत्या. इतक्या थंडीत खरेदीला बाहेर पडण्याचा उत्साह नव्हता. काहीतरी छान बघावं असं वाटत होतं. आणि तेंव्हा अचानक आमेलीची आठवण झाली. यूट्युबवर इंग्रजी सबटायटलमध्ये मिळालाही तो लगेच.
आमेली म्हणजे एक परिकथा आहे. 'life is beautiful' किंवा 'Sound of music' सारखी. एवढं रुक्ष, निरस बालपण अनुभवलेली मुलगी इतकं निर्मळ, आनंदी मन घेऊन मोठी होते! ती भावूक आहे, खोडकर आहे, स्वप्नाळू आहे. सिनेमाची गोष्ट इथे सांगण्यात अर्थ नाही. त्यातल्या घटनांइतकंच महत्त्व आहे सिनेमाच्या मांडणीला. छोट्या छोट्या गोष्टी इतक्या सुंदर टिपल्या आहेत दिग्दर्शकाने! नक्की, न विसरता बघा हा सिनेमा. आणि पॅरिसला जाल तेंव्हा डिस्नेलॅंड बघण्याआधी मोमार्त बघा. कारण डिस्नेलॅंड पॅरिसजवळ आहे, पण डिस्नेलॅंडमध्ये पॅरिस नाही सापडणार. ते सापडेल मोमार्तच्या गल्ल्यांमध्ये.
(फोटो: मोमार्तच्या टेकडीवरचं प्रसिद्ध चर्च (sacre coeur). समोर उजवीकडे अंधारात जरा बारकाईने बघितलं, तर आमचा गाईड जॉर्ज दिसेल.)

Sunday, October 26, 2008

Seltsam im Nebel ...

गेल्या वर्षभरात जर्मनीमधली थंडी कशी असते ते बघायला मिळालं, नंतर इथला सुंदर उन्हाळा अनुभवला. आता शेवटचे तीन आठवडे उरलेत - इथला हेमंत अनुभवण्यासाठी. 'Fall season' च्या सौंदर्याविषयी बरंच ऐकलं होतं. मेपलच्या पानांचे सुंदर रंग आता संपले आहेत. सगळा पर्णसंभार उतरवून एक एक झाड अनोळखी होतं आहे. या रंगीत पानांकडे बघून जाणवलं एखादा शेवट सुद्धा किती नयनरम्य असू शकतो ते.

पण या सगळ्यापेक्षा अगदी अनपेक्षित असं एक निसर्गाचं रूप बघायला मिळतं आहे सद्ध्या -प्रचंड धुकं. माथेरानला सकाळी गुलाबी थंडीमध्ये एक लडिवाळ धुकं दिसतं. सूर्य उगवतो आणि मग ते हळुहळू विरून जातं. सकाळच्या दवबिंदूंसारखं थोडा वेळ आपल्याला ते जादुई दुनियेमध्ये घेऊन जातं, आणि म्हणूनच हवंहवंसं वाटतं. हे धुकं तसं नाही. या दिवसभर, सगळीकडे व्यापून राहणा़ऱ्या धुक्यामध्ये एक एकाकीपणा, उदास भाव आहे.

‌कॉलेजमध्ये राजगुरू सरांनी हेरमान हेसंची एक कविता शिकवली होती 'seltsam im Nebel zu wandern...' अशी. पुण्याला शिकतांना ती एवढी भावली नव्हती - धुक्यामध्ये एवढी मजा येते ... इतकं काय निगेटीव्ह लिहिलं आहे याने धुक्याविषयी - असं वाटलं होतं तेंव्हा. आज उठल्यावर बाहेरचं धुकं बघितलं, आणि 'im Nebel ...' ची आठवण झाली. या धुक्यात हेसंची कविता एकदम फिट्ट बसते.



Im Nebel

Seltsam, im Nebel zu wandern!
Einsam ist jeder Busch und Stein,
Kein Baum sieht den andern,
Jeder ist allein.

Voll Freunden war mir die Welt,
Als noch mein Leben licht war;
Nun, da der Nebel fällt,
Ist keiner mehr sichtbar.

Wahrlich, keiner ist weise,
Der nicht das Dunkel kennt,
Das unentrinnbar und leise
Von allen ihn trennt.

Seltsam, im Nebel zu wandern!
Leben ist Einsamsein.
Kein Mensch kennt den andern,
Jeder ist allein.

-Hermann Hesse

हा माझा स्वैर अनुवादाचा प्रयत्न:
(काहीही अभ्यास न करता, चांगली डिक्शनरी न बघता केलेला ’स्वैर अनुवादा’चा प्रयत्न - (म्हणजे खरं तर ’स्वैराचार’, नाही का? ;) ) - त्यामुळे हेरमान हेसं आणि राजगुरू सरांची माफी मागून)

धुक्यामध्ये

धुक्यामध्ये फिरतांना वेगळंच वाटतं!
प्रत्येक झाड आणि दगड एकाकी असतो
एका झाडाला दुसरं दिसत नाही
प्रत्येक जण एकटं असतं.

माझं विश्व सुहृदांनी भरलेलं होतं
अजून माझ्या आयुष्यामध्ये प्रकाश होता
आता धुकं पडल्यावर
कुणीच नजरेला येत नाहीये.

चोरपावलांनी गाठणारा, चुकवता न येणारा
आणि सगळ्यांपासून तुम्हाला दूर नेणारा
अंधार समजून घेतल्याशिवाय
खरोखर कुणालाच शहाणपण येत नाही

धुक्यामध्ये फिरतांना वेगळंच वाटतं!
आयुष्य म्हणजे एकाकीपणाच असतो
एक माणूस दुस़ऱ्याला ओळखत नाही
प्रत्येक जण एकटं असतं.

Monday, June 23, 2008

मंथन-विचार

आईकडे मी कधी लोणी काढायच्या भानगडीत पडले नव्हते. एक तर ते बाबांचं 'designated' काम होतं, आणि मी उठेपर्यंत बहुधा ताक घुसळून झालेलं असायचं. सकाळी (साखरझोपेमध्ये) बाबांचा ताक घुसळण्याचा आवाज ऐकला म्हणजे मनात ’अरे वा आज ताजं ताक मिळणार’ अशी नोंद घ्यायची आणि पुन्हा कुशीवर वळून झोपायचं एवढाच ताक घुसळणे / लोणी काढणे प्रकाराशी नियमित संबंध. भुसावळला कधीतरी मंजूकडे ताक केलं असेल किंवा एखाद्या वेळी बाबांना बरं वगैरे नसल्यामुळे कधी ताक घुसळलं असेल तेवढंच.
लग्नानंतर आम्ही ’चंद्रकांत’चं दूध घ्यायला सुरुवात केली आणि एक नवीन समस्या निर्माण झाली. एवढ्या सायीचं करायचं काय? बाबांसारखं एका दिवसाआड ताक करायला तर परवडणार नव्हतं. प्रसादचा ’साय टाकून दे’ हा पर्याय मी ताबडतोब हाणून पाडला. ’फार साय येते. दूध फार चांगलं आहे’ म्हणून दूध बदलणं फारच गाढवपणाचं वाटत होतं. अखेर आठवडाभराच्या सायीला विरजण न लावताच मिक्सरमध्ये (ताक टाकून देऊन) लोणी करायची वेळ आली.मिक्सरमध्ये ताक मी कधी केलंच काय, झोपेमध्ये ऐकलं सुद्धा नव्हतं. रविवारी तासभर खास या कामासाठी राखून ठेवून, बाई आणि प्रसाद आपले प्रयोग बघायला नाहीत याची खात्री करून घेतली. मनाचा हिय्या करून ती साय मिक्सरमध्ये घातली आणि मिक्सर लावला. त्या सायीला काही दया येईना. सुदैवाने मिक्सर प्रसादच्या ’फिलिप्स’चा होता - त्यामुळे एकीकडे साय लावून मला दुसरे उद्योग करता येत होते. अखेरीस अर्ध्या तासाने कसंतरी लोणी निघालं. विरजण लावलंच नव्हतं,त्यामुळे ताजं ताक मिळण्याचा प्रश्नच नव्हता. एवढे कष्ट करून ताक न मिळणं म्हणजे फारच झालं. पुढच्या रविवारी पुन्हा तोच प्रयोग,विरजण लावून. एक कवकवीत, बेचव रसायन ताक म्हणून उरलं. मागच्या वेळेसारखं ते धड टाकूनही देता येईना - किती झालं तरी ते शेवटी ’ताजं ताक’ होतं ना! पुढच्या वेळी ठरवलं - या मिक्सरच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. आपण आपलं साधं रवी घेउन ताक करावं.(बाबांची आठवण काढत)रवी घेऊन बसले. अर्धा तास घुसळून काही होईना. बाबा नेमके किती वेळ ताक घुसळत असावेत बरं सकाळी? तेवढ्यात कुणाचातरी वेळखाऊ फोन आला. तो संपेपर्यंत प्रसाद आला, आणि कुठेतरी बाहेर जायचं निघालं. आता या अर्धवट झालेल्या ताकाचं मी काय करू? ते तसंच टाकून शेवटी गेले. परत आल्यावर बघितलं तर ताक / साय परत मूळपदाला.
दर आठवड्याचे प्रयोग अयशस्वी होता होता अखेरीस दर रविवारी सायीची भीती वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. लोणी काढणे हे माझी सगळी कल्पकता, एनर्जी आणि वेळ खाऊन टाकणारं एक ’कॄष्णविवर’ दर्जाचं, ’काळ्या यादीमधलं’ काम बनलं. दर रविवारी पुढे ढकलून शेवटी साय काढायला आणि फ्रिजमध्ये ठेवायला घरात एकाही भांड्यात कणभरही जागा शिल्लक नाही अशी परिस्थिती आल्यावर नाईलाजाने मी महिनाभराची साय एका रविवारी दिवसभर घुसळून टाकली आणि बाबांनी केलेल्या ताज्या ताकाच्या आठवणी काढत पुढच्या सायमुक्त रविवारची वाट बघत बसले. महिनाभराच्या(?) सायीसाठी एक मोठ्ठं पातेलं बनवायला सुरुवात केली, आणि महिन्याला तीनच रविवार असतात हे कटु सत्य स्वीकारण्याची मनाची तयारी केली.
असंच एकदा सायीचं ते जंगी पातेलं भरल्यावर मी शनिवारी त्याला विरजण लावून ठेवलं होतं. रविवारी नेमक्या मी घरात नसतांना दुपारी बाई कामाला आल्या. हे कसलं पातेलं आहे ते त्यांना कळेना. अखेरीस त्यांनी आणि प्रसादने "दूध नासलेलं दिसतंय" असा निष्कर्ष काढला, आणि पातेलं रिकामं करून चांगलं स्वच्छ घासून ठेवलं!
अखेर एका रविवारी ती अटळ घटना घडली. माझा साय-प्रयोग करायला एकांतच मिळेना! एवढी तयारी करून मी नेमकं काय करणार अहे, ते बघायला बरोब्बर सासुबाई आल्या. नाईलाजाने मी त्यांच्या समक्ष मिक्सर सुरू केला. त्यांनी २-४ मिनिटं एकंदर रागरंग बघितला, मग हळूच सांगितलं-"मिक्सरचं कुठलं पातं लावलं आहेस तू? फ्लिपर लावत जा. आणि मिक्सर असा फुल स्पीडला नाही चालवायचा लोण्यासाठी." पुढच्या रविवारी (सासुबाई नसतांन अर्थातच - त्या तोवर परत गेल्या होत्या हुबळीला) माझा नवा प्रयोग. दहा मिनिटांत लोणी तयार, आणि शिवाय पिणेबल ताजं ताकसुद्धा!
जवळजवळ वर्षभर चाललेल्या या लोणी प्रकल्पामधून एक ’मंथन थिअरी’ तयार झाली माझ्याजवळ. पहिली गोष्ट म्हणजे, आपण घाईकरून मंथन लवकर संपत नाही. दुसरं म्हणजे, या मंथनातून काहीही निष्पन्न होणं अशक्य आहे असं वाटायला लागेपर्यंत आपल्याला कुठलीच प्रगती दिसत नाही. खूप वेळ तुम्ही नुसतेच प्रयत्न करत राहता, दॄष्य परिणाम काहीच नसतो. या स्थितीमध्ये प्रयत्नांना चिकटून रहावंच लागतं. त्यानंतर जेंव्हा परिणम दिसायला लागतो, तेंव्हा होणारा आनंद खास असतो. या वेळेपर्यंत ’by grace of God things are taking place' असं म्हणण्याची आपल्या मनाची तयारी झालेली असते, कर्ताभाव संपलेला असतो. तिसरा मुद्दा म्हणजे परिणाम दिसायला लागले म्हणून ताबडतोब थांबण्यासारखा गाढवपणा नाही. अजून थोडंसं टिकून राहिलं तर याच्या कितीतरी पट जास्त फळ मिळतं. Take things to their logical conclusion. चौथी गोष्ट म्हणजे,अत्याधुनिक सधनं हा तुमच्या अडाणीपणावरचा उतारा नाही. ती कशी वापरायची हे तुम्हाला कळायला हवं. आणि शेवटचं म्हणजे, ask your mom in law... she also knows something.

Saturday, June 7, 2008

भीती

भीती

काही महिन्यांपूर्वी ’अंतर्नाद’ मध्ये हेमंत जोगळेकरांचा भीतीविषयीचा लेख वाचला. त्यातलं काहीच पटलं नाही somehow. खूप उथळ, वरवरचं वाटलं. शाळकरी मुलांनी लिहिलेला निबंध वाचत असल्यासारखं वाटलं - भाषेची पकड यॆण्यासाठीचा सराव. शब्दांचा फुलोरा. त्यातून व्यक्त काय करायचं आहे त्यांना? ’सगळ्या माणसांच्या मनामध्यॆ, कायम भीती ही असतेच.’ बस एवढंच सार संपूर्ण लेखाचं.

जगातल्या प्रत्येक माणसाने आयुष्यात कधीतरी प्रचंड, तळ नसलेली भीती अनुभवली असेल कदाचित. बहुधा मरणाची भीती. पण मग एखाद्या ध्येयाने वेडे होऊन जे या भीतीच्या पलिकडे जाऊ शकले, ते कसे गेले? का ’Courage is fear that has said its prayers' एवढं साधं, सरळ असतं हे सगळं? माधवराव पेशव्यांबरोबर सती गेलेल्या रमाबाईंना क्षणभरही भीती वाटली नसेल? मुरारबाजी, तानाजी, फिरंगोजी यांच्या लहानपणापासून ऐकलेल्या इतिहासातल्या गोष्टींमध्ये नुसतं "ते खूप शूर होते. मरणाला घाबरणारे नव्हते" म्हणून बोळवण करतात. ही सगळी माणसं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कुठल्याच क्षणी न घाबरण्याचा कुठला तरी "mutant gene" घेऊन जन्माला आली असतील असं मला वाटत नाही.

लहानपणी मला कसलीच भीती वाटायची नाही म्हणून आई टरकून होती. पोहोता येत नसतांनासुद्धा मी बिनधास्त माझ्या डोक्याएवढ्या, त्याहूनही खोल पाण्यामध्यॆ धडाधड उड्या मारायचे. Somehow,आपण पाण्यात बुडू, मरून जाऊ असं मला कधी वाटलंच नाही. पाणी आपल्याशी खेळतंय असं वाटायचं. आणि आपल्याला मुद्दामहून कोणी बुडवण्याचा प्रयत्न करणार नाही अशीही पूर्ण श्रद्धा होती. हा attitude आजही विशेष बदललेला नाही. प्रसाद्ला हा निष्काळजीपणा वाटतो. माझा हा स्वभाव आहे, त्याला इलाज नाही. तो बदलण्याची मला इच्छाही नाही. भीती न वाटणं हे अनैसर्गिक आहे का?

भीती वाटते म्हणजे नेमकं काय होतं? सगळे निर्भय म्हणून नावाजलेले लोक काही मुद्दाम, थ्रील म्हणून धोका पत्करणारे नव्हते - म्हणजे थ्रील अनुभवण्यासाठी मुद्दमहून मृत्यूगोलामध्ये उडी घेणारे नव्हते. पण वेळ आली तेंव्हा त्यांनी तेही केलं. कसं? मला असं काही करण्याची वेळ आली तर? मला प्रथम थोडं शांत बसावंसं वाटेल. (fear saying its prayers ;)) नंतर मग फक्त आल्या क्षणाचा विचार करायचा. एका सीमेपर्यंत तुम्हाला भीती वाटेल. त्यानंतर तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन पोहोचता. तेंव्हा फक्त ’इस पल की सच्चाई’ जाणवते असं मला वाटतं.

‍ऑपरेशन हा एक मला न पचणारा प्रकार आहे. एकूणातच वैद्यकसाम्राज्य आणि त्यांचा तुमच्याकडे ’स्त्री, वय ३१, यापूर्वीचे मोठॆ आजार, आजोबा काय रोगाने गेले...’ केस नंबर १६ म्हणून बघण्याचा दृष्टीकोन पचनी पडणं जडच जातं. एक तर हे लोक तुमच्याकडे फक्त शरीर म्हणून बघत असतात. त्याच्या भविष्याविषयी छातीठोक विधानं करत असतात. पुन्हा treatment विषयी तुम्हाला विश्वासात घेऊन सांगणारे डॉक्टर मोजकेच. त्यमुळे शक्यतो आपलं आरोग्य आपण सांभाळावं, डॉक्टरच्या वाटेला जाऊ नयॆ असं माझं मत. पण ऑपरेशन करायचं ठरल्यावर माझा नाईलाज झाला. (आता कुठे पळून जाणर? ;) ) शेवटी म्हटलं, let me face it. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांवर माझा १००% विश्वास होता. मग आपल्या शरीराला दोन चार तास पूर्णपणे त्यांच्या हवाली करायला काय हरकत आहे? मस्त निर्धास्त, शांत झोप लागली या विचाराने. एवढी निवांत मी कित्येक वर्षात नव्हते. हा विचार मनात येण्यापूर्वी जी अस्वस्थता होती, ती भीती होती का? आणि मग मझ्या विचारांनी भीतीवर मात केली?

बाबा आमटे जिला ’निर्भयतेची साधना’ म्हणतात ती नेमकी कशी असते? जन्मतः भिरू असणारी व्यक्ती ठरवून निर्भय होऊ शकते? कसं बनायचं निर्भय? कशाची भीती, कशामुळे भीती वाटते याचा वस्तुनिष्ठ विचार करून, या विचारांमुळे भावनेच्या पलीकडे जाता येतं? का एखाद्या लहान बाळासारखं निर्धास्त कुणाच्यातरी मांडीवर ’घालू तयावरी भार’ म्हणून झोपणं त्यापेक्षा सोपं आहे? रमाबाई किंवा तानाजीराव वर भेटलॆ म्हणजे त्यांना विचारायला पाहिजे.

Saturday, May 24, 2008

भाषा

काही वर्षांपूर्वीपर्यन्त - म्हणजे नेमकं सांगायचं झालं तर सात वर्षांपूर्वीपर्यन्त - मी असं हिरीरीने म्हणत होते, की माझ्या मुलांचं शिक्षण मराठीमधूनच व्हायला हवं. मतृभाषेमधून शिक्षण घेणं मुलांना सोपं जातंच, शिवाय आपल्या भाषेशी, आपल्या मातीशी नाळ न तुटणं फार महत्त्वाचं आहे.माझ्या मुलांना पुण्यातल्या ’अक्षरनन्दन’ सारख्या शाळेत घालण्याचं - खरं म्हणजे स्वतः अशी शाळा सुरु करण्याचं स्वप्न मी बघत होते.

आजची परिस्थिती खूपच बदललेली आहे. माझ्या मुलांची मातृभाषा कोणती असणार? प्रसाद अणि मी एकमेकांशी मराठीमधून बोलतो, पण प्रसादचं मराठीचं ज्ञान कामचलाऊ म्हणता येईल इतपतच आहे. त्याला मराठी लिहिता - वाचता येत नाही, मराठी नाटक, कविता, वाङ्मयाचा गंध नाही. माझ्या मुलांची ’पितृभाषा’ कन्नड आहे - जिच्यामध्ये मला एक वाक्य सुद्धा धड बोलता येणार नाही. मी मराठीचा हट्ट धरून प्रसादला मुलांच्या शिक्षणापासून दूर ठेवणं हा प्रसादवर अन्याय होईल. आणि मुलांचं दहावीपर्यंतचं शिक्षण होईपर्यंत आम्ही महाराष्ट्रामध्येच राहणार असा निर्णय मी आज कसा घेऊ? महाराष्ट्रामध्ये - दस्तूरखुद्द पुण्यामध्ये आज मराठी शाळांची परिस्थिती दयनीय आहे. माझ्या मुलांना वेगवेगळ्या भाषा बोलणार्‍या, वेगवेगळ्या प्रांतांमधून आलेल्या मित्रमैत्रिणींबरोबर शिकायला मिळायला हवंय. त्यांच्या कानावर लहानपणापासून मराठी, हिन्दी, इंग्रजी, कन्नड, संस्कृत, जर्मन, फ्रेंच, जपानी ... शक्य तेवढ्या सगळ्या भाषा पडायला हव्यात. आपल्या देशामध्ये - खरं तर जगात कुठेही - त्यांना सहज संवाद साधता यायला हवाय. बंगळूरला रहायचं आणि पुण्याची स्वप्नं बघायची अशी त्यांची अवस्था होता कामा नये. Let them become citizens of the world!

पण अशी जडणघडण झाल्यावर मातीशी नातं जडणं त्यांना जड जाईल का? ती कुठल्या भाषेत कविता वाचतील? त्यांचा ब्लॉग, डायरी - जे काही ज्या कुठल्या स्वरूपात असेल, तसं, कुठल्या भाषेत लिहितील? कुठल्या भाषेत संवाद साधतांना त्यांना घरच्यासारखं वाटेल? त्यांना शिवाजी महाराज कसे भावतील? एवढॆ सगळे वेगवेगळे संस्कार घेतल्यानंतर त्यांचं भारतीयपण, मराठीपण / कानडीपण, पुणेकर / मंगळूरकरपण कशामध्ये असेल? तानाजी आणि शेलारमामाची, हिरकणीची गोष्ट ते त्यांच्या मुलांना कुठल्या भाषेमध्ये सांगतील?

सध्या ज्या वेगाने भाषांची, संस्कृतींची सरमिसळ चालू आहे, ती बघून असं वाटतंय की आणखी वीसएक वर्षांनी प्रादेशिक संस्कृती, भाषेची अस्मिता असं काही शिल्लकच राहणार नाही. खरं म्हणजे प्रादेशिक भाषाच आज आहेत तशा शिल्लक राहू शकणार नाहीत. आज माझ्या ऑफिसमध्ये मला मराठीमधून व्यवहार करता येईल का? नाही. महेशशी माझं बोलणं वरकरणी मराठीमधून असलं, तरी आमच्या संवादाची दोन - तीन वाक्यं घेतली तरी जाणवेल - या संवादाचा गाभा मराठी नाही. "या jar साठी E1 वर सर्च मार. नाहीतर google वर सापडेलच. ती FTP ने डाउनलोड करून मला मेल कर, निखिलला cc कर." या भाषेला काय म्हणायचं? ही आजची बोलीभाषा आहे. अन्य प्रांतीय कुणी असतील, तर या वाक्यांमधल्या मराठी शब्दांच्या जागी हिंदी / दुस‍र्‍या भाषेतले शब्द येतात एवढाच फरक. मित्रमंडळींच्या अड्ड्यांवर अशीच चौपाटीवरच्या भेळेसारखी भाषा असते. कॉलेजचीसुद्धा अशीच. आणखी पाच - दहा वर्षांनी नवे लेखक जे पुढे येतील, त्यांची मतृभाषा हीच असेल. त्यांचं ललित लेखन याच भाषेत असेल. या भाषेच्या व्याकरणाचे नियम (?), म्हणी, वाक्प्रचार, शुद्धलेखन यांची पुस्तकं येतील. (:०) ) आणि हो, या भाषेत स्माईली पण असतील. "r u thr?" हे एक प्रमाणभाषेतलं, शुद्ध वाक्य असेल. (डिक्शनरीमध्ये r - from old English 'are' असं स्पष्टीकरण सुद्धा सापडेल बहुतेक :))