Thursday, September 17, 2009

मन वढाय वढाय

ती आज नेहेमीपेक्षा जरा उशीराच निघाली ऑफिसला. तसं आज एकदम अर्जंट काही काम नाहीये काही - निवांतच दिवस आहे. सगळी साठलेली कामं उरकून टाकता येतील. गाडीमध्ये मस्त भीमसेनचा मल्हार चालू होता. पहिल्याच वळणावर एका हिरोने बाईक मध्ये घुसवली आणि वर गुरकावून बघितलं. दिसत नाही का ... गाडी अंगावर घालता का काय वगैरे वगैरे प्रेमळ संभाषणांची एक छोटीशी फैर झडली. बाईकवाल्याचीच चूक होती असं तिला ठामपणे वाटलं. पण त्या एका मिनिटानी मल्हाराची मजा घालवली ती घालवलीच. पुढे मुख्य रस्त्याला लागल्यावर पुन्हा एक गॅस सिलेंडर भरलेला टेंपो प्रेमाने भेटायला येत होता. तसं तिचं रोजचं गाडी चालवणं बऱ्यापैकी ऑटोपायलटवरच असतं. पण एकाद्या दिवशी तिच्या तंद्रीवर असा ओरखाडा उठतो.

असा एक प्रसंग झाला, तर समोरच्याची चूक आहे. परत दुसरा प्रसंग झाला, तर जरा लक्ष द्यायला हवंय. गाडी चालवतांना सलग तीन वेळा असं झालं, तर अर्थ सरळ आहे - आजचा दिवस आपला नाहीये. आज आपण लोकांना ‘या, या, मला येऊन धडका, तुमचं स्वागत आहे!’ असा मेसेज देतो आहोत आणि आपलं जजमेंट सुट्टीवर आहे. तिचा हिशोब सरळ आहे. आज पूर्ण लक्ष देऊन गाडी चालवायला पाहिजे नाही तर काही खरं नाही.

ती पुढची पाच मिनिटं मनापासून प्रयत्न करते ... फक्त गाडी चालवण्यावरच लक्ष केंद्रित करण्याचा. अगदी भीमसेन सुद्धा बंद. बाहेर मस्त सोनेरी ऊन चमकतं आहे. पलिकडची टेकडी हिरवीगार झालीय. इतके सुंदर तजेलदार रंग कधी मला फोटोत किंवा चित्रात बंदिस्त करता येतील का? हा पिवळा कॅनरी यलो आहे का? व्हॅन गॉने कुठला रंग वापरला असता बरं तो रंगवायला? इतकी मस्त हवा आहे आणि आपलं नुसतं ऑफिस एके ऑफिस चाललं आहे. कुठेतरी बाहेर गेलं पाहिजे आता भटकायला. शू ... लक्ष फक्त ड्रायव्हिंगकडे ... फक्त ड्रायव्हिंगकडे ... ड्रायव्हिंगकडे ... फक्त रस्त्याकडेच बघायचं. रस्त्यावरून जाणाऱ्या विजेच्या तारेवर पर्ससारखं काहीतरी अडकलेलं दिसतंय ते काय आहे म्हणून कल्पनेच्या वारूला मोकाट सोडायचं नाही. ती रिकामी रिक्षा चढावर धापा टाकत बरोबर गाडीच्या पुढे येणार आहे ... तिला आधीच बगल मारायला पाहिजे ...समोरच्या रिक्षाला बगल ... ‘मुकद्दर का सिकंदर’ लिहिलेल्या म्हातऱ्या रिक्षाला बगल ...

‘मुकद्दर का सिकंदर’? नाही तिच्यावर ’मुकदर का सिंकदर’ लिहिलंय.

खिक ... रोज तंद्री लागली म्हणजे गॅसवर ठेवलेलं दूध उतू जातं तसं तिला फसफसून हसू येतंय. ’मुकदर का सिंकदर’ म्हणजे?

बॅंकेतल्या ठेवीवरच्या व्याजदरासारखे मूक-दर, सिंक-दर असे वेगवेगळे दर असतात का?

या पैकी मूक-दर किफायतशीर का सिंक-दर (म्हणजे घराचं कर्ज fix rate ने घ्यायचं का floating ने याचा आपण हिशोब करतो तसं ) असा प्रश्न रिक्षा मालकाला पडला आहे का?

सिंकदर म्हणजे बुडण्याचा वेग?

का दिवसभरात तासाला किती वेळा शिंका आल्या याची सरासरी?

पूर्ण लक्ष गाडी चालवण्याच्या प्रयत्नाला पूर्णविराम. ‘मुकदर का सिंकदर’ला डोक्याबाहेर काढेपर्यंत ऑफिस आलंय.

पांढऱ्यावरचे काळे: २

शाळेतल्या माझ्या वह्या बघितल्या, तर प्रत्येक दिवशी वर्गात बाकावर माझ्या शेजारी कोण बसलं होतं ते सांगता यायचं. कारण माझं अक्षर रोज माझ्या त्या दिवशीच्या शेजारणीसारखं यायचं! म्हणजे कधी किरटं, कधी गोलमटोल, कधी डावीकडे झुकलेलं, कधी उजवीकडे झुकलेलं - रोज नवनवे प्रयोग. मला बाकीच्यांची अक्षरं सुवाच्य वाटायची, आणि आपण सुद्धा त्यांच्यासारखंच अक्षर काढावं असं वाटायचं.
शाळेत आम्हाला वर्गपाठ, गृहपाठ, निबंध अश्या सगळ्या वह्यांना मार्कं असायचे. वर्षाच्या शेवटी सगळ्या वह्या तपासायला द्याव्या लागायच्या. तर वह्या तपासायला द्यायची वेळ आली, म्हणजे मला शोध लागायचा, की आपल्या प्रत्येक वहीमध्ये सर्व प्रकारची पेनं, वेगवेगळ्या शाया, आणि अक्षराची शक्य तेवढी सगळी वळणं यांचं एक मस्त प्रदर्शन भरलं आहे. मग मी वह्याच्या वह्या पुन्हा लिहून काढायचे. एकदा तर स.शा.च्या सरांनी वर्गात सगळ्यांना माझी वही दाखवली - बघा किती एकसारखं, नेटकं लिहिलं आहे म्हणून! आता एका वर्षभराची वही पुन्हा एकटाकी लिहून काढल्यावर एकसारखं अक्षर दिसणारच ना :D

घरातल्यांना सुरुवातीला वाटलं होतं तसा हा लेखनाचा आजार हळुहळू आपोआप बरा होण्याऐवजी जास्तच बळावत गेला. वह्या उतरवून काढण्याची पुढची पायरी होती डायरी लिहिणं, आणि त्याहूनही पुढची अवस्था म्हणजे आवडलेल्या कविता लिहून घेणं. यातून तयार झाली ‘कवितांची वही’. वर्गातही आवडत्या सरांच्या, मॅडमच्या लेक्चरला त्यांचं वाक्य न वाक्य वर्गात उतरवून घेतलं जायला लागलं. नंतर सॉफ्टवेअरच्या कोर्समध्ये तर आमच्या बॅचने मला ‘ऑफिशिअल नोट्स टेकर’ पद बहाल केल्यावर वर्गात कितीही गर्दी असली -अगदी दोन बॅचेस एकत्र असल्या तरी पहिल्या रांगेत बसायला जागा मिळायला लागली. कॉलेजजवळच्या झेरॉक्सवाल्याला माझ्या वह्या ओळखता यायला लागल्या. (इंटरव्हूसाठी तयारी करायला कुणीतरी माझी ओरॅकलची वही नेलेली अजून परत केलेली नाही !)

कवितांच्या वहीमध्ये पहिल्यांदा माझ्या अक्षराचं, खास माझं असं वळण तयार झालं. कविता लिहिण्याची जांभळी शाई, बाकी लेखनाची काळी शाई, डायरी लिहिण्याची पॉईंट फाईव्हची पेन्सील, लाडकं शाईचं पेन, हातकागद असा सगळा सरंजाम हळुहळू गोळा झाला. आप्पा बळवंत चौकात‘व्हिनस’ मध्ये गेल्यावर तर एकदम डिस्नेलॅंडमध्ये गेल्यासारखं वाटायला लागलं... इतक्या प्रकारचं लेखन साहित्य!

पहिलीमध्ये जाण्यापूर्वी मी घराजवळच्या रेल्वेच्या इंग्रजी शाळेत जात होते. इंग्रजांनी त्यांच्या दुष्ट भाषेत ‘b’,‘d’,‘p’,‘q’ अशी एकमेकांची मिरर इमेज असणारी अक्षरं निर्माण केल्यामुळे माझा फार गोंधळ उडायचा. हमखास उलटी सुलटी लिहिण्याची अजून काही अक्षरं म्हणजे ‘t’ आणि ‘j’. त्यात आणि गंमत म्हणजे मी दोन्ही हातांनी लिहायचे. उजव्या हाताने ‘b’ काढला आणि अगदी तसंच डाव्या हाताने लिहिलं म्हणजे नेमका ‘d’ व्हायचा. शेवटी यावर उपाय म्हणून शाळेतल्या टीचर आणि आई यांनी मिळून फतवा काढला, की यापुढे मी एकाच - rather उजव्याच - हाताने लिहावं. पुढे मराठी शाळेत हा गोंधळ आपोआपच संपला, पण डाव्या हाताने लिहिणं थांबलं ते थांबलंच.पुढे केंव्हा तरी लक्षात आलं, की आपली लीपी ही उजव्या हातानी लिहिणाऱ्या माणसांसाठी बनवलेली आहे - डाव्या हाताने ही अक्षरं काढताना जास्त वेळ लागतोय, पण आपण लिहितो त्याच्या उलट - मिरर इमेजसारखं लिहिणं मात्र डाव्या हाताने खूपच सोपं जातंय. (डावखुऱ्या लोकांवर अन्याय!)

हल्ली ‘डेड ट्री फॉर्मॅट’ मध्ये फारसं काही ठेवायची वेळ येत नाही. ऑफिसमध्ये तर नाहीच नाही. ऑफिसबाहेरही बरंचसं लेखन आता ब्लॉगवरच होतं. पण ब्लॉग असला, तरी डायरी मात्र लाडक्या पेन्सीलने, कागदावरच लिहावी लागते. आणि छान कविता दिसली, की पेनात जांभळी शाई भरावीच लागते. परवाच आईकडे साफसफाई करताना माझा जुना कप्पा तिने मोकळा केला ... नव्वद सालापासूनच्या डायऱ्या मिळाल्या तिथे. त्या चाळताना सहजच वीस वर्षांची सफर झाली. हा लिहिण्याचा आजार लवकर बरा न होवो अशी माझी जाम इच्छा आहे.


(खूपखूप वर्षांपूर्वी मी एक याच नावाची पोस्ट भाग १ म्हणून टाकली होती, आणि तिथे क्रमशः म्हणून पण लिहिलं होतं. तर हा अंतीम भाग आहे बरं का)

Sunday, September 13, 2009

सखी

मैत्रीची काही नाती अशी असतात, की वर्षानुवर्ष तुम्ही भेटला नाहीत, तरी काल भेटलो होतो असा सहजपणा पुढच्या भेटीत राहतो. तारा कायम जुळलेल्याच राहतात. अशीच ही सखी. अम्ही गेल्या आठ दहा वर्षात भेटलेलो नाही. फोन नाही, इ-मेल नाही, पत्र नाही. पण जिवश्च कंठश्च मैत्रीण म्हटलं म्हणजे पहिलं नाव आठवतं ते तिचंच. माझी बालपणीची सखी.

तसं बघितलं तर आमचं जगणं आज एकमेकांना कुठेच छेद देत नाही. मला खात्री आहे, मी हे जे खरडते आहे, त्याची तिला आयुष्यात कधी गंधवार्ताही लागणार नाही. त्यामुळे अगदी निश्चिंत होऊन, मोकळेपणाने मी इथे हे लिहिते आहे.

पाच भावंडातली ही चौथी. घरात प्रचंड कर्मठ वातावरण. अगदी विटाळाच्या वेळी शिवलेलं चालत नाही इथपर्यंत. सगळ्या रीतीभाती, सणवार सगळं यथासांग पार पडलंच पाहिजे. आणि कडधान्य विकत आणून घरी जात्यावर डाळी काढण्यापर्यंत सगळी कामं घरी. या धबडग्यामुळेच का काय, पण सखीची आई सारखी आजारी. घरातली ही सगळी कामं करायची ती शाळकरी वयाच्या या सगळ्या भावंडांनी. म्हणजे काका तसे अतिशय सज्जन होते, पण त्यांच्या मते हीच जगायची रीत होती. मला काय भातुकलीसारखी ही पण एक गंमत होती. संध्याकाळभर सखीच्या घरात पडीक असायचे मी. पण खेळून झालं, की जेवायला आणि झोपायला माझ्यासाठी एक खूप वेगळं घर होतं. तिथे मला आजच्या स्वयंपाकाची काळजी करावी लागत नव्हती का रात्रभर जागून दिवाळीचा फराळ करावा लागत नव्हता.

शाळेतल्या पुस्तकी अभ्यासात सखी तशी मागेच असायची काहीशी. म्हणजे काकांच्या मते माझ्या संगतीमुळे ती शाळेत पास होत होती ही चांगली प्रगती होती. पण खरं तर पुस्तकांपलिकडच्या शाळेत मी तिच्या संगतीमुळे केवढं तरी शिकत होते. शाळेतल्या अभ्यासाव्यतिरिक्तच्या सगळ्या गोष्टीत आम्ही बरोबर असायचो - खेळ, चित्रकला, गर्ल गाईड, गाणी, नाच, सबकुछ. शिवाय शाळेबाहेरचे उद्योगही - नदीवर पोहायला जाणं, वॉल-हॅंगिंग, मेंदी असले क्लासही आमचे बरोबर चालायचे. त्याशिवाय आमच्या डोक्यातनं आलेले प्रकल्प सुद्धा असायचे - अगदी दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री निधीसाठी पैसे जमा करायचे, म्हणून रोज चिवडा बनवून तो शाळेत मधल्या सुट्टीत विकण्यापर्यंत। नेतृत्व, स्वतः जबाबदारी घेऊन काही करणं आणि आहे त्या परिस्थितीमधून मार्ग काढणं सखीकडून शिकावं. आम्ही गाव सोडून गेलो त्यानंतर सखीचा पुस्तकी अभ्यास मागे पडला, तर माझा पुस्तकांबाहेरचा.

नंतर असंच काही वर्षांच्या खंडानंतर पुन्हा सखीची निवांत भेट झाली. माझ्या घरातल्या मुक्त वातावरणात आपल्याला आयुष्यात नेमकं काय करायचं आहे हे शोधण्यासाठी मी धडपडत होते. पैशाचं पाठबळ नसणाऱ्या, तीन मुलींची लग्नं कशी जुळवायची याच्या विवंचनेतल्या मारवाडी घरात सखी आपण आईवडिलांना अजून संकटात घालायचं नसेल, तर पदरी पडेल ते दान स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे हे समजून त्यात आपण काय काय करू शकतो याच्या शक्यता पडताळून पाहत होती. काकांची मतं अजूनही बदललेली नव्हती. मुलींनी नोकरी करणं, पैसा कमावणं त्यांना मान्य नव्हतं. क्षमता (आणि खरं तर गरजही) असूनही काम करायचं नाही? एक वेळ नोकरी आणि पैशाचा विचार बाजूला ठेवू - पण पूर्ण स्वातंत्र्याची चटक लागलेल्या माझ्या मनाला, आवडत असलं तरी काहीतरी करायचंच नाही ही कल्पनाच सहन होण्यापलिकडची होती. सखीच्या आयुष्यात चार दिवस डोकावतानाच मला घुसमटायला लागलं. सिद्धेश्वराच्या तलावात दोघींनीच जाऊन रोईंग केल्यावर सखी म्हणाली, तिच्या नव्या मैत्रिणींमध्ये असली यडच्याप गंमत करणारी कोणीच नाहीये. तिच्या जागी असते तर काय केलं असतं मी? जगाशी भांडायला निघाले असते? फ्रस्ट्रेट होऊन माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांचं जगणं हराम करून टाकलं असतं? निघून गेले असते हे सगळं सोडून? हाय खाऊन, मरेपर्यंतचे दिवस ढकलत राहिले असते?

लहानपणी आमचा एकत्र ‘अभ्यास’ चालायचा, खेळ चालायचे, बाकीचे अनंत उद्योग चालायचे. असंच एकदा आम्ही मिळून रोजचं दिवसभराचं ‘वेळापत्रक’ बनवलं होतं. म्हणजे दुपारी दोन ते तीन अभ्यास (?), त्यानंतर अर्धा तास विश्रान्ती वगैरे वगैरे. तर हे वेळापत्रक बनवताना मी सखीला विचारलं ... अगं तुझी सगळी कामं तू यात कुठे बसवणार? त्यासाठी किती वेळ ठेवायचा? सखीचं उत्तर, "ते मी बघून घेईन ... तू सांग आपला दिनक्रम". मी ते वेळापत्रक’ दोन दिवसाच्या वर काही पाळलं नसेल ... ती किमान आठवडाभर तरी पाळत होती ... मला लाज वाटून मी तिला ते बंद करायला सांगेपर्यंत. आज सखीचं लग्न झालंय, तिला दोन मुलं आहेत. मारवाडी घरामध्ये एकत्र कुटुंबामध्ये राहाताना, घरातले सगळे रीतीरिवाज, कामं, मुलांचं सगळं करताना तिने स्वतःचं ब्युटी पर्लर सुरू केलंय. सासू सासऱ्यांची आजारपणं काढता काढता, मुलांचं करता करता, नवरोबाचा इगो जपता जपता तिने लहानपणीच्याच सहजतेने "ते मी बघून घेईन" म्हटलं असणार. नवऱ्याने नवरेशाही गाजवलीच पाहिजे असं बाळकडू घेऊन मोठं झालेला तिचा नवरा आज तिला तिच्या घरकामात मदत करतोय, तिला पार्लर चालवायला पाठिंबा देतोय. सखी, तू जिंकलंस.