Monday, March 29, 2010

तृणाचे पाते

अजून एक जालावर न सापडलेली कवितांच्या वहीतली कुसुमाग्रजांची कविता ...

तृणाचे पाते

अश्विन पिऊन तरारलेले एक तृणाचे गोंडस पाते
मला म्हणाले डुलता डुलता जीवित म्हणजे रहस्य मोठे


    कालच रात्री नऊ काजवे आले शिलगावून मशाली
    शोधित फिरती चहूकडे ते इथे तिथे त्या झडाखाली
    विचारले मी शंभर वेळा काय आपले हारवले ते
    मौन सोडिले कुणी न कारण त्यांनाही ते ठाऊक नव्हते!


जाग पहाटे येता दिसला क्षितिजावर एकाकी तारा
पडला होता ढगावरी तो रेलून तंद्रीमध्ये बिचारा
मी म्हटले त्या "घराकडे जा! जागरणाचे व्रत का भलते?"
तो रागाने बघे मजकडे कारण त्यासही माहित नव्हते!


    पलिकडच्या त्या आंब्यावरती कुणी सकाळी आला पक्षी
    खोदित बसला आकाशावर चार सुरांची एकच नक्षी
    मी पुसले त्या "कोणासाठी खुळावल्यागत गाशी गीते?"
    पंख झापुनी उडून गेला कारण त्यासही कळतच नव्हते!

दूर कशाला? मी वार्‍यावर असा अनावर डोलत राही
का डुलतो मी? का हसतो मी? मलाही केंव्हा कळले नाही!
मलाही केंव्हा कळले नाही!!

Thursday, March 25, 2010

दोन घडीचा डाव

    आठवड्याच्या सुट्टीनंतर आलेल्या सोमवारची सकाळ. मनाला शनिवार - रविवारमधून बाहेर काढण्यासाठी धडपड चालू असते. शुक्रवारी रात्री निग्रहाने मिटलेल्या लॅपटॉपवरच्या न वाचलेल्या मेलची संख्या एकीकडे अस्वस्थ करत असते. आणखी तासाभरात ऑफिसमध्ये पोहोचलं, म्हणजे सरळ शुक्रवार रात्रीपर्यंत वेळ काळ काही सुचू नये एवढं काम आहे याचं कुठेतरी दडपण येत असतं. पुढच्या शनिवार रविवारचे बेत मनाच्या एका कोपर्‍यात हळूच आकार घेत असतात. खूप दिवसात न ऐकलेलं ‘म्युझिक ऑफ सीज’आठवणीने लावलेलं असतं. थोडक्यात, नेहेमीसारखाच एक सोमवार. नेहेमीच्याच सरावाने घरून ऑफिसकडे ड्रायव्हिंग. नेहेमीच्याच सुसाट वेगाने हायवेवरून पळणार्‍या गाड्या. आल इझ वेल.
    अचानक गाड्यांच्या रांगेत पुढे कुठेतरी करकचून ब्रेक दाबल्याचा आवाज येतो. मागच्या गाड्याही ब्रेक लावतात, टायर रस्त्यावर घासत गेल्याचे आवाज, कुणी समोरच्या गाडीला धडकलेलं, कुणाला मागच्या गाडीने ठेकलेलं, एखादा नशीबवान कुठला ओरखाडा न उठता त्या गर्दीतून सहीसलामत सुटतो. गाडी शिकताना शिकवलेलं डबल ब्रेकिंगचं तंत्र तिच्याकाडून आपोआप वापरलं जातं. स्किड न होता, समोरच्या गाडीला धक्काही न लागता गाडी थांबते. मागचीही थांबणार, तेवढ्यात मागून त्या गाडीला धक्का बसतो, आणि ती गाडी मागून येऊन धडकते.
    सुदैवाने फार नुकसान नाही झालेलं गाडीचं. थोडक्यात निभावलंय. ऑफिसच्या कामाचा मात्र आज जबरी खोळंबा होणार. गाडी आधी मेकॅनिककडे न्यायची म्हणजे अर्धा दिवस तरी गेलाच ... दोन मिनिटात मनात हिशोब होतो. पुढे रांगेत काय झालंय बघितल्यावर तिला कळतं ... बाकी सगळ्या गाड्यांना लहानसहान पोचे आलेत, दिवे फुटलेत. पण एक गाडी सोडून पुढे टाटा सफारी पुढच्या मिनीट्रकवर जबरदस्त आदळलीय ... सफारीची टाकी फुटून रस्त्यावर तेल पसरलंय, गाडीचं नाकाड ट्रकखालून काढायला क्रेन लागणार.
    पुढ्चे सगळे सोपस्कार पार पडतात, गाडी मेकॅनिककडे पोहोचवायला नवरा येतो. उरलेला दिवस ऑफिसच्या कामाचा ढीग उपसण्यात जातो. रात्री मात्र मनाची बेचैनी जाणवते. काय झालंय आपल्याला ? एक छोटा अपघात. सुदैवाने आपली त्यात काही चूक नव्हती. गाडीलाही मोठं काही झालेलं नाही. अपघाताच्या जागेपासून गॅरेजपर्यंत आपणच गाडी चालवत नेली. मग हे काय वाटतंय आता नेमकं?
    टेल लॅम्प नसणार्‍या त्या मिनीट्रकच्या मागे आपली गाडी असती तर?
    रस्ताभर स्किड झालेल्या चाकांच्या खुणा उमटवत त्या ट्रकवर आदळाणारी टाटा सफारी आपल्या मागे असती तर?
    प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून डबल ब्रेकिंग झालं नसतं तर?
    कधीही ड्रायव्हिंग करताना तो सोबत असतो, तिच्या नकळत तो अपघात टाळत असतो हे खरंय. पण म्हणून मुद्दाम त्याची परीक्षा बघणं बरोबर नाही.
    कधीतरी मरायचंय हे माहित आहे, पण तो कधीतरी नेहेमीच दूरवरच्या भविष्यातला आहे असं आपण समजून चालतो. आपल्याला कसं मरायचंय हे तरी आपण कुणाला सांगितलंय का? कुठलंही क्रियाकर्म करण्यापेक्षा देहदान कर माझं ... आणि एक मस्त वडाचं झाड लाव म्हणून सांगायला पाहिजे नवरोबाला.
   आताशी तर कुठे कसं जगायचं ते उमगायला लागलंय. एवढ्या गोष्टी करायच्या राहिल्यात. आणि कुठली गोष्ट अर्धवट सोडणं तिला आवडत नाही. जास्त जागरूक रहायला हवं तिने. तिची गाडी नकळतच नेहेमी फास्ट लेनमध्ये असते. कुठे पोहोचायचंय इतक्या वेगाने? ठरवून फास्ट लेनमधून बाहेर पडायला हवंय.
    गाडी दुरुस्त झाली, पुन्हा रूटीन सुरू झालं. पण रस्त्यावर त्या जागी गाडी स्किड झालेल्या खुणा बघितल्या, म्हणजे रोज तिला जाणवतं. its just not worth being in the fast lane.

Friday, March 12, 2010

मराठीने केला कानडी भ्रतार …

    नवऱ्याची भेट होईपर्यंत मी कर्नाटकात फारशी कधी गेले नव्हते. बहुसंख्य द्रविडेतरांप्रमाणे मलाही दक्षिणेतल्या सगळ्या जिलब्या सारख्याच अनाकलनीय होत्या. महाराष्ट्राच्या दक्षिणेला राहणारे सगळे ‘मद्राशी’ असा एक सोप्पा समज होता.कानडीशी आलेला संबंध म्हणजे एकदाच गाणगापूरहून सोलापूरला येताना चुकून गुलबर्ग्याऐवजी गाणगापूर रोडला गेल्यावर सोलापूरला परतण्यासाठी झालेले हाल, आणि एकदा विजापूर बघायला जाताना वाटेत गाडीचा अपघात झाल्यावर गाडीबाहेर ऐकलेली कडकड एवढाच. त्यातून हे काही गुजराती किंवा पंजाबी सारखं सहज समजणारं प्रकरण नाही याची मात्र खात्री झाली होती. तर कोथरूडमध्ये भेटलेला, चारचौघांइतपत बरं मराठी बोलणारा नवरोबा मुळचा असं काही वेडवाकडं बोलणारा निघेल याची मला कशी कल्पना असणार?
    लग्न ठरलं तेंव्हा मी पहिल्यांदा कर्नाटकात गेले. आणि नवऱ्याच्या आजी आजोबांसकट निम्म्यापेक्षा जास्त नातेवाईकांना माझ्याशी मराठीत बोलताना ऐकून गार झाले. उत्तर कर्नाटकातल्या बऱ्याच लोकांना कोकणी येतं आणि त्यामुळे मराठी समजतं, तोडकंमोडकं का होईना, पण बोलता येतं हा शोध लागला. त्यात भाषावार प्रांतरचनेपूर्वी धारवाड – हुबळी मुंबई इलाख्यात होते, त्यामुळे जुन्या मंडळींना बंगळूरपेक्षा मुंबई-पुणे जवळची हे ज्ञान प्राप्त झालं.
    नवऱ्याच्या काकूंनी कानडी अंकलीपी भेट दिली, आणि मग रस्त्याने चालताना प्रत्येक दुकानाची पाटी कोड्यासारखी ‘सोडवण्याचा’ नवा खेळ सुरू झाला. (अजूनही जोडाक्षरं आणि आकडे घात करतात, पण एव्हाना हुबळीतल्या नेहेमीच्या रस्त्यावरच्या बहुसंख्य पाट्या माझ्या तोंडपाठ झाल्या आहेत:) ) देशपांडेनगर? हे देशपांडे इथे कर्नाटकात काय करताहेत? तर आजवर अस्सल मराठी समजत असलेली निम्मीअधिक नावं अस्सल कानडीसुद्धा आहेत हे समजलं. या नावांसारखेच हळुहळू अस्सल मराठी शब्दसुद्धा कानडी वेषात भेटायला लागले – अडनिडा, गडबड, किरणा, अडाकित्ता, रजा … परवा तर मामेसासुबाईंनी सुनेचं कौतुक करताना ‘अरभाट’ म्हटलं, आणि मला एकदम जीएंची अरभाट आणि चिल्लर माणसं आठवली.
    नुकतंच लग्न झालं होतं, तेंव्हा एकदा नवऱ्याच्या दोस्तांनी बाहेर जमायचा बेत केला एक दिवस. आणि नवऱ्याने घरी येऊन घोषणा केली,
    “आम्ही आज वैशालीला जाऊ.”
    “म्हणजे ? मला न विचारता ठरवताच कसं तुम्ही सगळे असं?”
    “अगं आम्ही वैशालीला जातोय. .. तुला आवडतं न तिथे जायला?”
    अस्सं. म्हणजे मला तिथे जायला आवडतं, म्हणून मुद्दाम मला वगळून वैशालीमध्ये भेटताय काय? बघून घेईन … हळुहळू तापमान वाढायला लागलं, आणि आमचं लग्नानंतरचं पहिलं कडाक्याचं भांडण झालं. या प्राण्याचा ‘आम्ही’ आणि ‘आपण’ मध्ये हमखास गोंधळ होतो हे माझ्या हळुहळू लक्षात आलं. बेळगावच्या पलिकडून मराठीकडे बघणाऱ्यांची गोची लक्षात यायला लागली. ज्या भाषेत ‘ते’ इंजीन आणि ‘तो’ डबा जोडून ‘ती’ गाडी बनते, ती भाषा शिकणं किती अवघड आहे तुम्हीच बघा!

६ x ८ मधली किमया

आयोवामध्ये एरिन नावाची एक मुलगी आहे. आपल्या मोजून सहा बाय आठ फुटाच्या बाल्कनीमध्ये तिने बाग केलीय. बाग म्हणजे कोपर्‍यात केविलवाणी उभी असणारी एखादी हिरवी कुंडी नव्हे. ती या जागेत रोजच्या वापरातल्या भाज्या, फळं अशी झाडं लावते आहे, आणि त्याच बरोबर नेटकी फुलझाडं सुद्धा. शिवाय ओला कचरा जिरवण्यासाठी कम्पोस्ट बिन, बसायला दोन खुर्च्यासुद्धा तिने या जागेत माववल्या आहेत. आज अपघाताने तिचा हा ब्लॉग सापडला, आणि तो वाचून ... विशेषतः ही  पोस्ट बघून मी थक्क झाले. तिने अगदी बाग करायचं ठरवल्यापासून, झाडांच्या निवडीपासून सगळे टप्पे आपल्या ब्लॉगवर मांडलेत. एवढ्या कमी जागेत, मोजक्या भांडवलावर किती सुंदर बाग फुलू शकते ते एकदा तिच्या ब्लॉगवर बघाच.

माझ्याकडे तर याच्या दुपटीपेक्षा जास्त जागा आहे, आणि आपल्या देशातल्या सुंदर हवामानाची देणगी आहे. यापुढे बागेसाठी जागा नाही ही सबब बंद!

Thursday, March 4, 2010

फटकळाचा फटका आणि बेडकांचे गाणे

    बऱ्याच दिवसांनी कवितांची वही चाळली. त्या सगळ्या आवडत्या कवितांमधून आज सगळ्यात आवडलेल्या या दोन कविता . दोन्ही कविता जालावर कुठे सापडल्या नाहीत, त्यामुळे इथे देते आहे:

फटकळाचा फटका - वसंत बापट

पूर्वज ऐसे पूर्वज तैसे मिजास पोकळ करू नका
मनगट असता मेणाऐसे मशाल हाती धरू नका ॥

सुवर्णभूमी भारतमाता
राव मारता कशास बाता
घरादाराची होळी होता टिमकी बडवत फिरू नका ॥

प्रतिवर्षाला यमुना गंगा
महापुराचा दाविती इंगा
भगिरथाचे कूळ न सांगा नावही त्याचे स्मरू नका ॥

शरण जायचे जर अन्याया
कशास म्हणता ‘जय शिवराया’
अभिमानाचे नाटक वाया करून खळगी भरू नका ॥

विज्ञानाचा जिथे पराभव
तिथे मिरवता पुराणवैभव
ज्ञानरवि नभी येता अभिनव जा सामोरे डरू नका ॥

नव्या युगाची पायाभरणी
करील केवळ तुमची करणी
पराक्रमाने उचला धरणी आता हिंमत हरू नका ॥

*************************************************************
 
बेडकांचे गाणे : विंदा करंदीकर
 
डरांव् डुरूक् डरांव् डुरूक् डरांव् डरांव् डरांव्
आम्ही मोठे राव, डरांव् डरांव् डरांव् ॥

सागर म्हणती उगाच मोठा,
भव्य किती डबक्यांतिल लाटा,
सागर नुसते नाव, डरांव् डरांव् डरांव् ॥

गंगाजळ ना याहुन निर्मळ,
या डबक्याहुन सर्व अमंगळ,
बेडुक तितुके साव, डरांव् डरांव् डरांव् ॥

खोल असे ना याहुन कांही,
अफाट दुसरे जगात नाहीं,
हाच सुखाचा गांव, डरांव् डरांव् डरांव् ॥

चिखल सभोती अमुच्या सुंदर,
शेवाळ कसे दिसे मनोहर,
स्वर्ग न दुसरा राव, डरांव् डरांव् डरांव् ॥

मंत्र आमुचा डरांव आदी,
अनंत आणिक असे ‘अनादी’
अर्थ कसा तो लाव, डरांव् डरांव् डरांव् ॥

*************************************************************