Thursday, March 17, 2016

पांढरी सावर

    नुकतीच एका लाडक्या मैत्रिणीची नव्याने ओळख झाली. आपल्या नेहेमीच्या गुलाबी – लाल शेवरीला (काटेसावर / शाल्मली) आणि तिच्या सोनेरी पिवळ्या रूपातल्या सोनसावरीला भेटले होते आतापर्यंत. थंडी संपता संपता सीतेचा अशोक आणि पळस – पांगारा झाले, की मग शेवरीचे फुलण्याचे दिवस येतात. मस्त उंच वाढलेलं शेवरीचं झाड, त्याच्या डौलदार, सिमिट्रिकल, लाल – गुलाबी फुलांनी लगडलेल्या फांद्या, आणि त्यातला मध खायला किडे, माशांचे थवे आणि हा खाऊ टिपायला जमलेले पक्षी अशी सगळ्यांची गर्दी ... अशी गजबजलेली शेवरी माझी लाडकी. फुलं नसतानाही हे झाड देखणंच. टेकडीवर कुणा निसर्गप्रेमींनी जोपासलेल्या झाडांपैकी ही बाळ – शेवरी बरेच दिवस बघत होते., आणि ही मोठी होऊन फुलल्यावर किती सुंदर दिसेल म्हणून स्वप्नही बघत होते. :)

बाळ-शेवरी आहे की नाही ही?
    जेमतेम नऊ दहा फूट उंची असेल या झाडाची. इतकी लहान शेवरी फुलत असेल असं वाटलं नव्हतं मला. त्यामुळे शेवरीच्या फुलायच्या मोसमात इथे एकही फूल दिसत नाहीये म्हणून आश्चर्य नाही वाटलं. मागच्या आठवड्यात या झाडावर पांढरं काहीतरी दिसलं. जवळ जाऊन बघितलं, तर फुलं! नेहेमीच्या शेवरीसारखीच, पण फिक्क्या पिवळ्या, ऑफ व्हाईटच्या जवळ जाणार्‍या रंगाची. ठेवण नेहेमीच्या शेवरीसारखीच, पण आकाराला लहान. आणि शेवरीसारखीच किड्या- माशांची रीघ लागलेली.

बाळ-शेवरी(?)ची रंग विसरून आलेली फुलं! :)
    फुलण्याच्या घाईत रंग विसरून गेली का काय ही? शेवरीच आहे ना म्हणून संध्याकाळी परत नीट बघायला गेले, तर सकाळची फुलं गायब. काही कोमेजून गेली होती, उरलेली मिटलेली. शेवरीची(?) फुलं संध्याकाळी मिटतात हा नवाच शोध लागला. झाड अजून नीट निरखून बघितलं, तर एकही काटा दिसला नाही. काटा नाही अशी सावर कशी असेल? हिला मोठी झाल्यावर फुटतात का काय काटे? काट्यांची जास्त गरज लहान, कोवळं झाड असतानाच असणार ना! पण झाडावर एक हिरवं बोंड दिसलं, ते शेवरीसारखंच वाटत होतं. इतके दिवस हिला मी मैत्रीण समजते आहे, पण खरी ओळखतच नाही की! बाळ-शेवरी(?) का कोण ती फारच खिजवायला लागली.

शेवरीचं(?) बोंड
    मायबोलीवरच्या निसर्गाच्या गप्पांमध्ये चौकशी केली, आणि सापडली! ही शेवरीच. पण लाल नाही, पांढरी.

***

    जरा शोधाशोध केल्यावर कळलं, हिला  पांढरी सावर / white silk cotton tree / Ceiba pentandra म्हणतात. आपल्याकडच्या अनेक देशी भाषांमध्ये नावं असणारी ही मूळची आपल्याकडची नाहीच म्हणे, दक्षिण अमेरिकेतील आहे. (शेवरी परकी कशी असेल? काहीतरीच सांगतात हे लोक!)  फुलांचा वास काही माणसांना विशेष आवडण्यासारखा नसतो कारण तो वटवाघळांसाठी असतो - हिचं परागीभवन वटवाघळांकडून होतं. आता या टेकडीपासून वटवाघळांची माझ्या माहितीतली कॉलनी चांगली दोन किमीतरी लांब. त्यांना कोण जाऊन सांगणार तुमच्यासाठी टेकडीवर खाऊ ठेवलाय म्हणून?

पांढर्‍या शेवरीचं फूल


  टेकडीवर रोज जाणं मला सद्ध्यातरी जमण्यासारखं नाही. मी तिथे जाते ते चालायला म्हणून, किंवा माऊला बरोबर घेऊन. त्यामुळे तिथे झाडं लावणं, त्यांना पाणी घालणं यातही माझा सहभाग शून्य असतो. ज्या कुणी ही पांढरी सावर तिथे जोपासली आहे, त्यांचे इतका आनंद मिळवून दिल्याबद्दल आभार!