Tuesday, December 29, 2009

गर्दभयोग

हल्ली पुण्यात गाढवं दिसत नाहीत फारशी. खूप दिवसांनी हे गोजिरवाणं पिल्लू बघायला मिळालं ...


पिल्लामुळे आमच्या जुन्या `गळाभेटी'ची आठवण जागी झाली.

मी दुसरी - तिसरीत असतानाची गोष्ट. आमची शाळा सकाळी सातची असायची. मोठा भाऊ तेंव्हा नुकताच स्कुटर चालवायला शिकत होता. एक दिवस शिकाऊ उत्साहाने तो मला शाळेत सोडायला तयार झाला. थोडाफार उशीरही झालेला होता निघायला. अजून त्याच्याकडे लायसन्स नव्हता आणि तेवढा सरावही नव्हता, त्यामुळे गर्दी, मोठे चौक, मामा असं सगळं टाळत आणि ‘शॉर्टकट’ने जायचं होतं. आमच्या ‘शॉर्टकट’ मध्ये एक मोठा मोकळा प्लॉट तिरपा ओलांडून जायला लागायचं. आम्ही रोज शाळेला जाऊन - येऊन तशी पायवाट बनवून टाकली होती.(हा प्लॉट म्हणजे न कसलेलं शेत होतं - खानदेशातली काळीभोर, लोण्यासारखी मऊ माती पावसाळ्यात त्याचं रूपांतर चिखलाच्या मोठ्ठ्या खड्ड्यात करून टाकायची. पण आता पावसाळा संपलेला होता, त्यामुळे तसं इकडनं जाणं सेफ होतं. तर भाऊ आणि मी निघालो स्कुटरवरून. प्लॉटपर्यंत व्यवस्थित पोहोचलो. हवेत सुखद गारवा होता. प्लॉट हिरव्यागार लुसलुशीत गवताने सजलेला होता. गवतावर पडलेलं दव अजूनच रोमॅंटिक मूडमध्ये घेऊन जाणारं. एकूण वातावरण एकदम प्रसन्न होतं.

तिथे चरणाऱ्या गाढवांच्या जोडीलाही सकाळचा हा प्रसन्नपणा जाणवला असावा. फारच खुशीत येऊन त्यांनी एकदम हिंदी सिनेमातल्या हिरो-हिरॉईनप्रमाणे एकमेकांच्या मागे पळायला सुरुवात केली. हिरोईन आमच्या स्कूटरसमोरून धावत पलिकडे गेली. पाठोपाठ येणाऱ्या हिरोला त्याच्या आणि प्रियेच्या मधली स्कूटर बहुतेक दिसलीच नाही. काय होतंय ते समजायच्या आत मी, स्कूटर आणि भाऊ जमिनीवर, आणि आकाशात हिरो अशी कोरिओग्रफी बघायला मिळाली. एक कोलांटी मारून हिरो तडक त्याच्या प्रियेपठोपाठ निघून गेला. स्कूटर चालू कशी होणार म्हणून भाऊ धडपडत उभा राहिला. ‘बजाज सुपर’वर कुठे ओरखाडा सुद्धा नव्हता. भावावरही नव्हता. माझ्यावरही नव्हता. (सायकल डबलसीट चालवायला शिकण्याच्या दुसऱ्या बंधूराजांच्या प्रॅक्टीसमुळे मला वाहनावरून पडण्याची प्रॅक्टीस होती.) दप्तरामधली पाटी फुटलेली होती या पलिकडे या घटनेला पुरावा नव्हता. पण ही‘गाढवांची परस्परभेट’ बरेच दिवस पुरली नंतर चिडवायला.

Tuesday, December 22, 2009

G चा टॅग

एव्हाना G ने आशा सोडून दिली असेल मी या टॅगवर काही लिहिण्याची. पण उशिरा का होईना, उत्तर टाकते आहे मी. (याची माझ्या मागच्या पुस्तकांविषयीच्या टॅगवर कार्यवाही न करणाऱ्यांनी दखल घावी)
एका शब्दात लिहायची आहेत ही उत्तरं, पण G ने मला टॅगलंय, आणि तिनेही थोडंफार स्वातंत्र्य घेतलंय उत्तरं लिहितांना, तर मी थोडं फाSSर स्वातंत्र्य घेतलेलं चालेल तिला असं गृहित धरतेय.


(सूचना ... कंसातले शब्द मोजू नयेत ... ती सर्व प्रकट स्वगतं आहेत)

****************************************************************
1.Where is your cell phone?
टेबलवर

2.Your hair?
घरभर
(प्रचंड गळताहेत सद्ध्या)

3.Your mother?
बेश्ट फ्रेन्ड

4.Your father?
बिच्चारे

5.Your favorite food?
(बरंच काही ... पहिले आठवली ती) गरम गरम भाकरी आणि खानदेशी भरीत.

6.Your dream last night?
रात्रीचं स्वप्न कधी आठवतच नाही मेलं :(
(म्हणून मग मी दिवसा परत स्वप्न बघते :D)

7.Your favorite drink?
ताक (ताजंच, आणि सायीचंच)

8.Your dream/goal?
हम्म ... इंटरेस्टिंग प्रश्न आहे. सद्ध्या तरी मला शेती करायची आहे.

9.What room are you in?
होम ऑफिस :(

10.Your hobby?
एका शब्दात??? वाचन, भटकंती, जमलंच तर फोटो, कधीतरी चित्र काढणं, मस्त संगीत ऐकणं, कोडी (आणि दोऱ्याचा गुंतासुद्धा) सोडवणे, कधीमधी लिहिणे ... ही कायम बदलणारी, मारुतीच्या शेपटासारखी वाढत चाललेली यादी आहे.

11.Your fear?
काही न करताच मरून गेले तर !

12.Where do you want to be in 6 years?
ठरायचंय अजून

13.Where were you last night?
आईकडे
14.Something that you aren’t?
diplomatic

15.Muffins?
ब्लुबेरी
(आंजीने घरी बनवलेले, आणि आवर्जून सगळ्यांसाठी ऑफिसमध्ये आणलेले)
16.Wish list item?
शेती

17.Where did you grow up?
भुसावळ, पुणे

18.Last thing you did?
टेरेसवरची कबुतरं हाकलली
19.What are you wearing?
आईचा ड्रेस

20.Your TV?
(नेहेमीप्रमाणेच) बंद

21.Your pets?
नाहीत :(
(सद्ध्या फक्त नवरा पाळते आहे)

22.Friends?
हायेत ना.
(नशीब लागतं असे मित्रमैत्रिणी मिळायला.)

23.Your life?
full of surprises

24.Your mood?
सुट्टी संपल्याच्या दुःखात

25.Missing someone?
हो ...
(missing + jealous ... नवरोबा माहेरपण + जास्तीची सुट्टी एन्जॉय करतोय आणि मी परत कामावर :( )

26.Vehicle?
वॅगन आर

27.Something you’re not wearing?
दागिने (नसती कटकट)

28.Your favorite store?
    १. व्हिनस (नवे कागद ,पेनं, वह्या, रंग यांची अनोखी दुनिया ... हळूच एक वही उघडून कोऱ्या पानांचा वास घेऊन बघावा. कुणाच्या हातात जाईल ही? हिच्यावर कोण काय लिहिल बरं?)

    २. किंवा मंडई (हसू नका. पण ताज्या भाज्या इतक्या सुंदर लावलेल्या बघणं हे सुद्धा एक सुख असतं. इतका ‘लेटेश्ट’ माल तुम्ही दुसऱ्या कुठल्या दुकानात बघितला आहे कधी? आणि इथे कितीही खरेदी केली, तरी कुणी तुम्हाला विनाकारण खर्चाबद्दल काही म्हणू शकत नाही. आईकडे मी भाज्या घेऊन आल्यावर त्या टेबलभर पसरून नव्या साड्यांकडे बघावं तसं त्यांच्याकडे डोळे भरून बघत बसायचे. :))

Your favorite color?
(सद्ध्या) हिरवा

29.When was the last time you laughed?
काल

30.Last time you cried?
मागच्या आठवड्यात

31.Your best friend?
आई
(सांगितलं की राव मघाशीच)

32.One place that you go to over and over?
आईकडे

33.One person who emails me regularly?
My manager!
(G चं चोरलेलं उत्तर ... सगळे एकाहून एक आळशी आहेत ... नियमित मेल कुणी पाठवेल तर शप्पथ. लग्नानंतर वर्षभराच्या आत तीन महिने परदेशात एकटी होते, तर नवरोबाने मोजून २ मेल पाठवल्या होत्या :( )

34.Favorite place to eat?
आत्ता पुण्यात वैशालीला जायला आवडेल.

****************************************************************

मी सुलभा, अनुक्षरे, तन्वी, महेंद्र, आळशांचा राजा आणि भानसला टॅगते आहे.

Monday, December 21, 2009

बेपत्ता

गेले दहा बारा दिवस मी गायब आहे. नेट, मोबाईल, रोजचा पेपर, टीव्ही या सगळ्यापासून दूर. आता शरीराने रोजच्या जगात परत यावं लागलं, तरी मन अजूनही तिथेच रेंगाळतं आहे. काय बघितलं, अनुभवलं आणि कसं वाटलं, हे सांगण्यासाठी शब्द पुरेसे नाहीयेत, कॅमेऱ्याची चौकट तोकडी पडते आहे. त्यातल्या त्यात, फोटोत बंदिस्त होऊ शकलेली ही एक छोटीशी झलक.

*************************************************************

दिवसाची सुरुवात इतकी मस्त असते का रे भाऊ? आपण तर कधी सक्काळी सूर्याजीला असा बघितलाच नव्हता


कधी शांत, धीरगंभीर



तर कधी अवखळ


काही वाटा संपूच नयेत...



पोटभर दंगा


देवाचिये दारी

 
 
वेगवेगळी फुले उमलली - कुणी रानात, तर कुणी बागेत. काही लहान, तर काही मोठी. कुठे सुगंधी तर कुठे गंधहीन. सगळी आपल्याच मस्तीत, आणि तेवढीच आनंदी! एकेकट्या फुलांचे किती फोटो टाकू ... हा एक कोलाजचा प्रयत्न.



Monday, December 7, 2009

पाणी...

    राजगडाच्या पायथ्याजवळचा एक ओहोळ. जवळपास ही गुरांना पाणी पाजण्याची जागा असावी असं दर्शवणारे गुरांच्या पायांचे ठसे आणि माफक प्रमाणात शेण. डिसेंबरमध्ये असवं तितकंच ... म्हणजे साधारण अर्धा ते एक फू्ट खोल आणि पंधरा - वीस फूट रुंद पाणी. तळाला थोडंफार शेवाळं असणारे गोटे. भर दुपारी बारा साडेबाराची वेळ. थोडक्यात, nothing perticular about the stream. रस्त्यावरून जातांना पाणी दिसलं, सहज पाण्यापर्यंत जाता येईल असं वाटलं, म्हणून नुसतं पाय बुडवायला तिथे थांबावं. परत बूट घालायचेत म्हणून जरा नाखुशीनेच पाण्यात जावं. पाण्यात पाय बुडवावा, आणि सुखं म्हणजे काय असतं, ते अनुभवायला मिळावं. तळपायाची शांती हळुहळू मस्तकापर्यंत जावी. मिठाची बाहुली विरघळून जावी, तसे मनातले सगळे संखार विरघळावेत, आणि अचानक सगळं काही स्पष्ट दिसायला लागावं. इतक्या घाई- गडाबडीने निघून आपल्याला खरं तर कुठेच जायचं नाहीये ... इथेच थांबलो तरी चालणार आहे हा साक्षात्कार व्हावा.





    तळपत्या सूर्याखाली असं डोकं थंड होत असतांना तीर्थक्षेत्रात स्नान करण्याच्या परंपरेमागचं लॉजिक समजायला लागतं. आग ओकणाऱ्या सूर्याखाली, धुळीने भरलेल्या वाटांवरून कोस चे कोस तुडवत येणाऱ्या पांथस्थाला गंगेच्या पाण्यात शिरतांना नेमकं काय वाटत असेल ते कळतं. गंगास्नानाने पापक्षालन होतं का नाही माहित नाही, पण वाटेवरच्या ओहोळात जरा वेळ पाय बुडवल्याने ताण-तणाव क्षालन नक्कीच होतं. शेजारचा साधासुधा ओहोळ हेरणारी नजर मात्र हवी.

Friday, December 4, 2009

राणीसारखी बसून ...

आईकडून ऐकलेली ही खास आमच्या आजीची कन्सेप्ट होती ... कधीतरी सगळं काम उरकलं, म्हणजे ती जाहीर करायची, "आता मी राणीसारखी बसून चहा पिणार आहे." मग छान चहा करून घ्यायचा, आणि तो अगदी निवांत बसून प्यायचा. आपण स्वतःच आपल्यासाठी चहा केला, तरी तो पिण्याची दहा मिनिटं का होईना, पण राणीपण अनुभवायचं!

रोजच्या रामरगाड्यात स्वतःकडे बघायलाही (तिच्याच भाषेत सांगायचं तर "xxx खाजवायला सुद्धा")उसंत मिळाली नाही, तरी कधीतरी दहा मिनिटं का होईना, पण आवर्जून स्वतःसाठी वेळ ठेवायचा. या दहा मिनिटांमध्ये तुमच्या तैनातीला कुणी दासी, हुजरे नसणार, तर त्याची सगळी तयारी आधी करून ठेवायची ... पण आपणच आपल्याला ही दहा मिनिटांची रॉयल ट्रीटमेंट बक्षीस द्यायची. मग तो चहा उरलासुरला, धड गरम नसणारा, टवका उडालेल्या कपातून नाही घ्यायचा - अगदी मनापासून आपल्याला आवडतो तसा करून घ्यायचा. आपलं असं कौतुक दुसरं कोणी करावं, म्हणून वाट बघत न बसता, स्वतःच मस्त एन्जॉय करायचं. या दहा मिनिटांच्या राणीपणाने इतकं मस्त वाटतं म्हणून सांगू?

कधीतरी मनात आलं की कामावरून घरी आल्यावर मस्त आवडतं गाणं लावायचं, फक्कड चहाचा बरोब्बर गरम कप घेऊन टेरेसवर सूर्यास्ताच्या रंगांची उधळण बघत बसायचं ... पुढची दहा पंधरा मिनिटं मी कुणाचंही काहीही देणं लागत नाही, सगळे फोन मेलेले आहेत, अगदी दारावरची बेल वाजलेली सुद्धा मला ऐकू येणार नाहीये ... कुठल्या राणीने एवढं मोठं सुख अनुभवलं असेल?

Saturday, November 21, 2009

सुई, दोरा आणि मी

    आमची शाळा मुलाची आणि मुलींची एकत्र होती. प्रत्येक वर्गात साधारण २५ मुली, आणि ३० मुलं. तर शाळेत आठवीनंतर चित्रकलेऐवजी मुलांसाठी बागकाम आणि मुलींसाठी शिवण असे विषय होते. हा माझ्या मते भयंकर मोठा अन्याय होता. एक तर आवडती चित्रकला सोडून द्यायची, आणि शिवाय मुलं बागकाम करत असतांना मुलींनी शिवण शिकायचं? सगळ्या मुलांना बागकामात गती असते, आणि सगळ्या मुलींना(च) शिवण आलं पाहिजे हे लॉजिक तेंव्हा माझ्या काही पचनी पडलं नव्हतं. पण विद्यार्थांनी प्रश्न विचाराण्याची आणि त्यांच्या असल्या प्रश्नांना उत्तर देण्याची पद्धत शाळेत नव्हती आणि माझ्याखेरीज शाळेतल्या कुणाला - शिक्षकांना, मुलींना किंवा मुलांना यात काही वावगं वाटतही नव्हतं.
   
    हा अन्याय माझ्यावर नववीत होणार असला, तरी पाचवीपासूनच मला याचा भयंकर राग होता, आणि निषेध म्हणून मी चुकूनही शिवण शिकायचा कधी प्रयत्न केला नाही. अगदी आईचा भरतकामाचा सुंदर रेशमाच्या लडींनी भरलेला डबासुद्धा मला मोहवू शकला नाही. आईने कधी जबरदस्ती केली नाही, पण मला अगदी जुजबी का होईना पण शिवण शिकवायचा प्रयत्न नक्कीच केला. पण ज्याला शिकायचंच नाही त्याला कोण शिकवू शकणार? सुदैवाने आठवीनंतर मी ती शाळा सोडली, त्यामुळे ही नावड एवढ्यावरच राहिली.

    पुढे कॉलेजमध्ये कधीतरी जाणवलं - पोहणं, स्वयंपाक यांसारखंच शिवणं हे सुद्धा एक जीवनावश्यक कौशल्य आहे. मुलींनाच नव्हे, सगळ्यांनाच आलं पाहिजे असं. त्यानंतर मग साधं कुठे उसवलं तर चार टाके घालणंच काय, पण अगदी हौसेने ड्रेसवर कर्नाटकी कशिदा भरण्यापर्यंत माझी प्रगती झाली. (त्यासाठी किती वेळ लागला हा भाग वेगळा - कारण प्रत्येक टाका मनासारखा आला पाहिजे ना!) नेटक्या,एकसारख्या टाक्यांमधलं सौंदर्य खुणवायला लागलं. काश्मिरी टाका, कांथा, कर्नाटकी कशिदा अशा आपल्या भरतकामातल्या सांस्कृतिक वारश्याचं महत्त्व जाणवायला लागलं. उत्तम बसणारा, आपल्याला हवा तसा (शिंप्याला नव्हे) कपडा शिवण्यातला सर्जनाचा आनंद आपण इतके दिवस का दूर ठेवला हा प्रश्न पडला. आयुष्यात एकदा तरी हे सगळं आपल्या हाताने करून बघितलं पाहिजे याची खात्री पटली. एवढे दिवस या कलेपासून आपण का फटकून वागत होतो याचा मागोवा घेताना लक्षात आलं, की याचं मूळ त्या (मी कधीच अटेंड न केलेल्या) जबरदस्तीने लादलेल्या शिवणाच्या तासामध्ये आहे!

Wednesday, November 11, 2009

सरहस्यानि जृंभकास्त्राणि ...

कॉलेजमध्ये एक उत्तररामचरितातला वेचा (हा खास अर्जुनवाडकर बाईंचा शब्द) अभ्यासाला होता ... त्यात वासंती वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात वाढणाऱ्या लवकुशांचं कौतुक कुणाला तरी सांगत असते - या दोन तेजस्वी कुमारांना इतर अनेक विद्या, कला आणि शस्त्रास्त्रांबरोबरच सरहस्य - म्हणजे मंत्रासहित - जृंभकास्त्रही अवगत आहे. या अस्त्राच्या प्रयोगाने शत्रूला एकापाठोपाठ एक जांभया यायला लागतात, आणि शेवटी शत्रू हतबल होतो. उत्तररामचरितातलं तेंव्हा शिकलेलं बाकी फारसं काही आठवलं नाही तरी हे जृंभकास्त्र मात्र पक्कं डोक्यात बसलं. फार ओळखीचं वाटतंय ना हे अस्त्र? नुकताच अनुभव घेतला मी त्याच्या सामर्थ्याचा.




पंचतारांकित जेवणानंतर, ‘पोस्ट लंच (टॉर्चर) सेशन’मध्ये पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनसाठी खोलीमध्ये केलेला वातानुकुलित अंधार. ज्याचा तुमच्या कामाशी काडीचाही संबंध नाही असलं कुठलं तरी ट्रेनिंग. वर्षातले नेमून दिलेले ट्रेनिंगचे किमान तास भरण्यासाठी (‘दुसरं ट्रेनिंग शनिवारी येतंय - शनिवार नको वाया घालवायला’ किंवा ‘हे ट्रेनिंग या हॉटेलमध्ये आहे - जेवण चांगलं मिळेल दुसऱ्या ट्रेनिंगपेक्षा’ एवढ्या महान उद्देशाने) जमलेले सहाध्यायी. ‘मोले घातले बोलाया नाही रस नाही अपेक्षा’ तत्त्वावर बोलणारा वक्ता समोर. (याला बोलण्याचे तासावर पैसे मिळतात.) शेजारचे दोघे भारत ऑस्ट्रेलिया वन डे सिरीज नेटवर बघत असतात. पलिकडे ‘वेक अप सिड’ डाऊनलोड होत असतो. कोपऱ्यातल्या चित्रकाराच्या प्रतिभेला बहर आलेला असतो. एक दोन कामाची माणसं जोरजोरात लॅपटॉप बडवत इन्स्टंट मेसेजरवरून शेळ्या हाकत असतात. ट्रेनिंगला उशिरा आल्यामुळे नेटवर्क केबल, लॅपटॉपसाठी पॉवर पॉईंट अशा जीवनावश्यक गोष्टींना मुकलेल्या तुम्हाला ट्रेनरच्या थेट समोर बसून चुळबुळण्याखेरीज गत्यंतर नसते. पुढच्या रांगेतला एखादा महाभाग ‘पोस्ट लंच’ सुरू झाल्या झाल्या पाच मिनिटातच डुलक्या काढायला लागतो. बाकी लोकांची नेत्रपल्लवी सुरू होते. पुढचा बळी कोण याचा अंदाज आपण घ्यायला लागतो. समोरच्या वक्त्याचा आवाज हळुहळू दूरदूर, खोलातून यायला लागतो. पुढची जांभई दाबून टाकण्याचे तुमचे प्रयत्न फोल ठरतात, आणि हळुहळू वातावरणाचा अंमल तुमच्यावर चढायला सुरुवात होते. तब्येतीत गाणाऱ्या गवयाने विलंबित ख्याल आळवावा आणि नंतर छोटा ख्याल संपवून तराण्यावर पोहोचावं, तशी सुरुवातीला पंधरा मिनिटांनी येणारी जांभई आता दर मिनिटाला येऊ लागते. जांभया देऊन देऊन डोळ्यातून गंगाजमुना वहायला लागतात. डोळ्याच्या कोपऱ्यातून तुमच्या आजुबाजूचे एक एक वीर धारातीर्थी पडतांना दिसत असतात, त्याबरोबरच तुमची जबाबदारी मिनिटामिनिटागणिक वाढत असते. बाकी कुठेच बघणं श्रेयस्कर राहिलं नसल्यामुळे वक्ता तुमच्याकडेच बघून बोलायला लागतो. पुढचे तीन तास आता तुम्ही, तुमची जांभई आणि वक्त्याची अंगाई अशी घनघोर लढाई. ट्रेनिंगला उशिरा पोहोचल्याची एवढी मोठी शिक्षा? बहुत नाइन्साफी है! (एक मौलिक शंका: ट्रेनिंगमध्ये जांभया देऊन देऊन जबडा निखळला तर कंपनी कडून नुकसानभरपाई मिळू शकते का?)

Friday, November 6, 2009

आजची गंमत


आता किमान चार पोस्टतरी बागेतला फोटो टाकायचा नाही असं मी ठरवलं होतं. पण असं काही बघितलं, की फोटो काढावाच लागतो, आणि तो मनासारखा आल्यावर पोस्टल्याशिवाय चैन पडत नाही :)



मोठ्या आकाराच्या फोटोसाठी वरच्या फोटोवर टिचकी मारा.

कळीशेजारच्या कवडीसारख्या आकारावरचा तो थेंब बघितलात? तो पाण्याचा थेंब नाही. झाडावरच्या प्रत्येक काळीला अशी एक एक कवडी आहे, आणि प्रत्येक कवडीवर पाण्यासारखा दिसणारा (मधाचा?) एक एक थेंब आहे! किती सुबक कलाकृती निर्माण केलीय त्याने - आज हा थेंब दिसला नसता तर एवढी मोठ्ठी गंमत मला कधी कळलीच नसती! अशी किती गुपितं एकेका कळीमध्ये लपलेली असतील?


देवाची करणी अन कळीवर कवडी!

Monday, October 26, 2009

अबोली बोलते तेंव्हा ...

जूनमध्ये जांभळ्या अबोलीचं एक रोप आणलं. आणल्यापासून ही अबोली गप्प गप्पच होती. आमच्या गच्चीतला वारा सहन झाला नाही का हिला? का ऊन कमी पडतंय? नवं घर काही तिच्या पसंतीला उतरलेलं दिसत नव्हतं. दोन आठवडे झाले तरी अबोली काही हसली नव्हती. उदास उदास, एकटी वाटत होती. अबोलीच्या कुंडीशेजारी मोगरा ठेवला. मोगऱ्याने मायेने अबोलीच्या खांद्यावर हात ठेवला, आणि हळुहळू अबोली हसायला लागली. पावसात छान तरारून वाढली, आणि या आठवड्यात तर अबोलीचा उत्सव चालला आहे ... जांभळ्या फुलांनी झाड डवरलं आहे ...





झाडांनाही अनोळखी जागी पहिल्यांदा बुजायला होतं का? कुणाची तरी सोबत, मैत्री हवीशी वाटते का? माणसांसारखीच झाडंही मनमोकळी, संकोची, बडबडी, खट्याळ अशी वेगवेगळ्या स्वभावाची असतात का?

Thursday, October 15, 2009

दिवाळी




तमसो मा ज्योतिर्गमय ...
अंधारातून प्रकाशाकडे,
असत्यातून सत्याकडे,
मृत्यूतून अमृतत्वाकडे आम्हाला जायचं आहे
असं म्हणताना डोळ्यापुढे येते
दिवाळीमधली पणती

फटाके, कंदील, फराळ, खरेदी
ही सगळी दिवाळीची मजा आपण करूच.
पण त्या बरोबरच

ही दिवाळी आपल्याला सगळ्यांना
अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची आस लावो,
सिनिसिझमकडून आशावादाकडे घेऊन जावो.
जगाचा एखादा अंधारा कोपरा पणतीने उजळण्याचं सुख देऊन जाओ.

Tuesday, October 13, 2009

जावे त्याच्या वंशा

अली माझा कॉम्प्युटर कोर्स मधला मित्र. कॉम्प्युटर कोर्सला मी ऍडमिशन घेतली ती नाईलाजाने, बऱ्याचशा अनिच्छेनेच. त्यात मला कोर्सला जाण्यापूर्वी प्रोग्रॅमिंगच काय साधा कॉम्प्युटर वापरण्याचासुद्धा अनुभव यथातथाच होता. १५ दिवसांच्या अभ्यासाच्या जोरावर मला दिवसभराच्या, तथाकथित ‘competitive’ कोर्सला प्रवेश कसा मिळाला हेच एक नवल होतं. तर वर्गात पहिल्याच दिवशी अलीची ओळख झाली ती ‘the guy with a funny accent’ म्हणून. हळुहळू वर्गात ओळखी वाढल्या, विषयातही थोडीफार रुची निर्माण झाली, आणि नाईलाजाने करायला घेतलेला कोर्स मी एन्जॉय करायला लागले. तरीही कोर्सपेक्षाही जास्त एन्जॉय केला, तो कोर्समध्ये मिळणारा मोकळा वेळ. या मोकळ्या वेळातल्या टवाळक्यांमध्ये लक्षात आलं, अली हे एक फार वेगळं रसायन आहे. वर्गात याचा पहिला नम्बर असला,तरी परीक्षेपलिकडच्या आयुष्यातल्याही बऱ्याच गोष्टी याला कळतात. भटकण्याची आणि निसर्गाची आवड हा एक कॉमन दुवा मला प्रथमच माझ्या ग्रूपमध्ये असणाऱ्या कुणामध्ये मिळाला होता. तर असे दोन भटके एका ग्रूपमध्ये एकत्र आल्याने आमच्या पूर्ण ग्रूपचं भटकणं भलतंच वाढलं होतं. म्हणजे ओरॅकलचं लेक्चर कॅन्सल झालं, चला नरिमन पॉईंटला. लॅबमध्ये प्रोग्रॅम चालत नाहीये - चला दहा मिनिटं समुद्रावर जाऊ या - असं अली आणि मी दिवसाच्या (आणि रात्रीच्याही) कुठल्याही प्रहरी समुद्रावर जायला निघायचो. ग्रूपमधलं निम्म्याहून जास्त पब्लिक या प्रकाराने वैतागायचं - ’आदमी नही, जानवर हो तुम दोनो - बंबई की धूप में कोई २ बजे घूमने के लिये निकलता है क्या?" म्हणून निम्मा ग्रूप वर्गातच टवाळक्या करत बसायचा प्रस्ताव मांडायचा... पण हळुहळू आम्ही ग्रूपच्या बऱ्याच सदस्यांना ‘आदमी’ मधून ‘जानवर’ मध्ये - किमान ‘animal lovers' मध्ये कन्व्हर्ट केलं ... म्हणजे ‘मी एवढ्या उन्हात बाहेर येणार नाही’ म्हणणारे हळुहळू ‘तुम्ही चालत पुढे व्हा ...मी मागून बाईक घेऊन पोहोचतो’ म्हणण्यापर्यंत सुधारले. दुपारी तीन वाजताच्या चांदण्यात अभ्यासाची पुस्तकं घेऊन नरिमन पॉईंटला समुद्रावर ‘अभ्यास' करत बसलेला ग्रूप तुम्ही बघितलाय कधी? आमचंच कर्तृत्व ते .:D

तर असं फिरायला जातांना आम्हाला काय काय गमती दिसायच्या. एकदा रस्त्याच्या कडेला लावलेल्या झाडाच्या फंदीवरून थेट आठ फूट खाली जमिनीपर्यंत जाळं बनवणारा कोळी आम्ही बघितला. नरिमन पॉईंटला समुद्रात केवढे मासे एकदम वर येतात ते बघितलं. मुंबई मला तशी नवीन होती, आणि एवढ्या माणसांच्या गजबजाटात मला फार हरवून गेल्यासारखं वाटायचं. मला बिनचेहेऱ्याच्या वाटणाऱ्या या शहरामध्ये सौंदर्याची बेटं शोधायला अलीने शिकवलं. मुंबईलासुद्धा सुंदर सूर्यास्त होतो, शोधला तर पौर्णिमेचा चंद्रही दिसतो हे त्याच्याबरोबर फिरतांना जाणवलं. एकदा नरिमन पॉईंटला आमच्या नेहेमीच्या अन्नदात्याकडून आम्ही सगळे नेहेमीसारखं ‘सॅंडविच आणि कटिंग’घेत होतो. शेजारच्या फुलवाल्याकडे बघून अली म्हणाला ... ‘see … he is having the best job in the world … he is working with flowers while listening to music all day long!’ मुंबईच्या लोकलमधल्या गर्दीने उबून जाणाऱ्या मला, किती माणसांची स्वप्नं ही नगरी साकार करते याचा साक्षात्कार त्याच्यामुळे झाला. लोकलाच्या प्रवासात खरेदीपासून ते हळदीकुंकवापर्यंत कितीतरी गोष्टी आनंदाने साजऱ्या करणाऱ्या बायांमध्ये मला एवढ्या धावपळीत आणि गर्दीतसुद्धा स्वतःची आवडनिवड जिवंत ठेवणारी, स्वतःची स्पेस निर्माण करणारी बंडखोर ठिणगी दिसायला लागली. मुंबईच्या तिटकाऱ्याची जागा कौतुकाने घेतली.

अली एकदम कट्टर मुस्लीम घरातला - बोहरा. त्याच्याच शव्दात सांगायचं,तर ‘शुद्ध मांसाहारी’. मी कधी एखादा चिकनचा पीस खल्ला, तर तेंव्हा मला जाणवतं ... चिकन टिक्का म्हणून पुढे आलेला छोटा तुकडा खातांना मला छान वाटतं ... हीच जर माझ्यावर ते कोंबडं मारून खाण्याची वेळ आली, तर खाऊ शकेन मी आरामात? माझ्यासाठी ते डिस्टर्ब करणारं काम माझ्या दृष्टीआड कुणीतरी करावं आणि मी ती चव एन्जॉय करावी अशी माझी यात एक दुटप्पीपणाची, बोलून न दाखवलेली वागणूक आहे. मी जर रोज नॉनव्हेज खात असेन, तर कुर्बानीचं बकरं मला स्वतःला कापता आलं पाहिजे हा प्रामाणिकपणा आणि एवढे गट्स मला अलीमध्ये बघायला मिळाले.

कोर्स सुरू असतानाच रमझानचा महिना सुरू झाला. तश्या माझ्या यापूर्वीही मुस्लीम मित्रमैत्रिणी होत्या, पण रमझान ही काय चीज आहे हे मी यापुर्वी कधी एवढ्या जवळून बघितलं नव्हतं. अफाट शरीरक, बौद्धिक आणि मानसिक क्षमता असणारा माझा हा मित्र दिवसभर पाण्याचा थेंबही न पीता नेहेमीइतक्याच एकाग्रतेने सगळे तास अटेंड करायचा, लॅब असाईनमेंट पूर्ण करायचा, नेहेमीप्रमाणे समुद्रावर फिरायलाही यायचा. रोजे पाळणाऱ्या आमच्या इतर मित्रांप्रमाणे त्याच्या चेहेऱ्यावर मरगळ आणि थकवा कधी दिसला नाही. एकदा ग्रूपच्या नेहेमीप्रमाणे टवाळक्या चालल्या होत्या. कुणीतरी अलीला म्हटलं, तू फार चहा पितोस. इतका चहा पिणं चांगलं नाही. अली म्हणाला,ठीक आहे.आता नाही पिणार. त्या दिवसापासून त्याने चहा सोडून दिला! मोठ्या मोठ्या आध्यात्मिक गुरूंना मोहातून बाहेर पडण्यासाठी झगडावं लागतं. एवढा मनोनिग्रह त्याने कुठल्या जन्मात कमावला होता माहित नाही.

एरव्ही रमझानच्या महिन्यातच काय,पण अन्यथाही मी महम्मद अली रोडवरून प्रवास शक्यतो टाळला असता. त्या रमझानमध्ये मी एक दिवस मुद्दम नेहेमीची लोकल सोडून महम्मद अली रोडने येणाऱ्या बसने घरी आले - रमजानचा बाजार बघायला मिळावा म्हणून! त्या रस्त्याने जाताना मला असुरक्षित, ‘त्यांच्या देशात’ असल्यासारखं वाटलं नाही. रस्त्यावरच्या त्या गर्दीत अजूनही काही असे अली असतील. मी जर भारतात किंवा पाकिस्तानात एका मुस्लीम घरात जन्माला आले असते तर? कितीही सुसंस्कृत वागणूक असली, उत्तम काम केलं, तरी माझ्या नावामुळे जग माझ्याकडे साशंकतेने, रागाने, भीतीने बघत असतं तर? त्या बाजूने बघतांना खूप अवघड वाटत होतं सगळंच.

Thursday, September 17, 2009

मन वढाय वढाय

ती आज नेहेमीपेक्षा जरा उशीराच निघाली ऑफिसला. तसं आज एकदम अर्जंट काही काम नाहीये काही - निवांतच दिवस आहे. सगळी साठलेली कामं उरकून टाकता येतील. गाडीमध्ये मस्त भीमसेनचा मल्हार चालू होता. पहिल्याच वळणावर एका हिरोने बाईक मध्ये घुसवली आणि वर गुरकावून बघितलं. दिसत नाही का ... गाडी अंगावर घालता का काय वगैरे वगैरे प्रेमळ संभाषणांची एक छोटीशी फैर झडली. बाईकवाल्याचीच चूक होती असं तिला ठामपणे वाटलं. पण त्या एका मिनिटानी मल्हाराची मजा घालवली ती घालवलीच. पुढे मुख्य रस्त्याला लागल्यावर पुन्हा एक गॅस सिलेंडर भरलेला टेंपो प्रेमाने भेटायला येत होता. तसं तिचं रोजचं गाडी चालवणं बऱ्यापैकी ऑटोपायलटवरच असतं. पण एकाद्या दिवशी तिच्या तंद्रीवर असा ओरखाडा उठतो.

असा एक प्रसंग झाला, तर समोरच्याची चूक आहे. परत दुसरा प्रसंग झाला, तर जरा लक्ष द्यायला हवंय. गाडी चालवतांना सलग तीन वेळा असं झालं, तर अर्थ सरळ आहे - आजचा दिवस आपला नाहीये. आज आपण लोकांना ‘या, या, मला येऊन धडका, तुमचं स्वागत आहे!’ असा मेसेज देतो आहोत आणि आपलं जजमेंट सुट्टीवर आहे. तिचा हिशोब सरळ आहे. आज पूर्ण लक्ष देऊन गाडी चालवायला पाहिजे नाही तर काही खरं नाही.

ती पुढची पाच मिनिटं मनापासून प्रयत्न करते ... फक्त गाडी चालवण्यावरच लक्ष केंद्रित करण्याचा. अगदी भीमसेन सुद्धा बंद. बाहेर मस्त सोनेरी ऊन चमकतं आहे. पलिकडची टेकडी हिरवीगार झालीय. इतके सुंदर तजेलदार रंग कधी मला फोटोत किंवा चित्रात बंदिस्त करता येतील का? हा पिवळा कॅनरी यलो आहे का? व्हॅन गॉने कुठला रंग वापरला असता बरं तो रंगवायला? इतकी मस्त हवा आहे आणि आपलं नुसतं ऑफिस एके ऑफिस चाललं आहे. कुठेतरी बाहेर गेलं पाहिजे आता भटकायला. शू ... लक्ष फक्त ड्रायव्हिंगकडे ... फक्त ड्रायव्हिंगकडे ... ड्रायव्हिंगकडे ... फक्त रस्त्याकडेच बघायचं. रस्त्यावरून जाणाऱ्या विजेच्या तारेवर पर्ससारखं काहीतरी अडकलेलं दिसतंय ते काय आहे म्हणून कल्पनेच्या वारूला मोकाट सोडायचं नाही. ती रिकामी रिक्षा चढावर धापा टाकत बरोबर गाडीच्या पुढे येणार आहे ... तिला आधीच बगल मारायला पाहिजे ...समोरच्या रिक्षाला बगल ... ‘मुकद्दर का सिकंदर’ लिहिलेल्या म्हातऱ्या रिक्षाला बगल ...

‘मुकद्दर का सिकंदर’? नाही तिच्यावर ’मुकदर का सिंकदर’ लिहिलंय.

खिक ... रोज तंद्री लागली म्हणजे गॅसवर ठेवलेलं दूध उतू जातं तसं तिला फसफसून हसू येतंय. ’मुकदर का सिंकदर’ म्हणजे?

बॅंकेतल्या ठेवीवरच्या व्याजदरासारखे मूक-दर, सिंक-दर असे वेगवेगळे दर असतात का?

या पैकी मूक-दर किफायतशीर का सिंक-दर (म्हणजे घराचं कर्ज fix rate ने घ्यायचं का floating ने याचा आपण हिशोब करतो तसं ) असा प्रश्न रिक्षा मालकाला पडला आहे का?

सिंकदर म्हणजे बुडण्याचा वेग?

का दिवसभरात तासाला किती वेळा शिंका आल्या याची सरासरी?

पूर्ण लक्ष गाडी चालवण्याच्या प्रयत्नाला पूर्णविराम. ‘मुकदर का सिंकदर’ला डोक्याबाहेर काढेपर्यंत ऑफिस आलंय.

पांढऱ्यावरचे काळे: २

शाळेतल्या माझ्या वह्या बघितल्या, तर प्रत्येक दिवशी वर्गात बाकावर माझ्या शेजारी कोण बसलं होतं ते सांगता यायचं. कारण माझं अक्षर रोज माझ्या त्या दिवशीच्या शेजारणीसारखं यायचं! म्हणजे कधी किरटं, कधी गोलमटोल, कधी डावीकडे झुकलेलं, कधी उजवीकडे झुकलेलं - रोज नवनवे प्रयोग. मला बाकीच्यांची अक्षरं सुवाच्य वाटायची, आणि आपण सुद्धा त्यांच्यासारखंच अक्षर काढावं असं वाटायचं.
शाळेत आम्हाला वर्गपाठ, गृहपाठ, निबंध अश्या सगळ्या वह्यांना मार्कं असायचे. वर्षाच्या शेवटी सगळ्या वह्या तपासायला द्याव्या लागायच्या. तर वह्या तपासायला द्यायची वेळ आली, म्हणजे मला शोध लागायचा, की आपल्या प्रत्येक वहीमध्ये सर्व प्रकारची पेनं, वेगवेगळ्या शाया, आणि अक्षराची शक्य तेवढी सगळी वळणं यांचं एक मस्त प्रदर्शन भरलं आहे. मग मी वह्याच्या वह्या पुन्हा लिहून काढायचे. एकदा तर स.शा.च्या सरांनी वर्गात सगळ्यांना माझी वही दाखवली - बघा किती एकसारखं, नेटकं लिहिलं आहे म्हणून! आता एका वर्षभराची वही पुन्हा एकटाकी लिहून काढल्यावर एकसारखं अक्षर दिसणारच ना :D

घरातल्यांना सुरुवातीला वाटलं होतं तसा हा लेखनाचा आजार हळुहळू आपोआप बरा होण्याऐवजी जास्तच बळावत गेला. वह्या उतरवून काढण्याची पुढची पायरी होती डायरी लिहिणं, आणि त्याहूनही पुढची अवस्था म्हणजे आवडलेल्या कविता लिहून घेणं. यातून तयार झाली ‘कवितांची वही’. वर्गातही आवडत्या सरांच्या, मॅडमच्या लेक्चरला त्यांचं वाक्य न वाक्य वर्गात उतरवून घेतलं जायला लागलं. नंतर सॉफ्टवेअरच्या कोर्समध्ये तर आमच्या बॅचने मला ‘ऑफिशिअल नोट्स टेकर’ पद बहाल केल्यावर वर्गात कितीही गर्दी असली -अगदी दोन बॅचेस एकत्र असल्या तरी पहिल्या रांगेत बसायला जागा मिळायला लागली. कॉलेजजवळच्या झेरॉक्सवाल्याला माझ्या वह्या ओळखता यायला लागल्या. (इंटरव्हूसाठी तयारी करायला कुणीतरी माझी ओरॅकलची वही नेलेली अजून परत केलेली नाही !)

कवितांच्या वहीमध्ये पहिल्यांदा माझ्या अक्षराचं, खास माझं असं वळण तयार झालं. कविता लिहिण्याची जांभळी शाई, बाकी लेखनाची काळी शाई, डायरी लिहिण्याची पॉईंट फाईव्हची पेन्सील, लाडकं शाईचं पेन, हातकागद असा सगळा सरंजाम हळुहळू गोळा झाला. आप्पा बळवंत चौकात‘व्हिनस’ मध्ये गेल्यावर तर एकदम डिस्नेलॅंडमध्ये गेल्यासारखं वाटायला लागलं... इतक्या प्रकारचं लेखन साहित्य!

पहिलीमध्ये जाण्यापूर्वी मी घराजवळच्या रेल्वेच्या इंग्रजी शाळेत जात होते. इंग्रजांनी त्यांच्या दुष्ट भाषेत ‘b’,‘d’,‘p’,‘q’ अशी एकमेकांची मिरर इमेज असणारी अक्षरं निर्माण केल्यामुळे माझा फार गोंधळ उडायचा. हमखास उलटी सुलटी लिहिण्याची अजून काही अक्षरं म्हणजे ‘t’ आणि ‘j’. त्यात आणि गंमत म्हणजे मी दोन्ही हातांनी लिहायचे. उजव्या हाताने ‘b’ काढला आणि अगदी तसंच डाव्या हाताने लिहिलं म्हणजे नेमका ‘d’ व्हायचा. शेवटी यावर उपाय म्हणून शाळेतल्या टीचर आणि आई यांनी मिळून फतवा काढला, की यापुढे मी एकाच - rather उजव्याच - हाताने लिहावं. पुढे मराठी शाळेत हा गोंधळ आपोआपच संपला, पण डाव्या हाताने लिहिणं थांबलं ते थांबलंच.पुढे केंव्हा तरी लक्षात आलं, की आपली लीपी ही उजव्या हातानी लिहिणाऱ्या माणसांसाठी बनवलेली आहे - डाव्या हाताने ही अक्षरं काढताना जास्त वेळ लागतोय, पण आपण लिहितो त्याच्या उलट - मिरर इमेजसारखं लिहिणं मात्र डाव्या हाताने खूपच सोपं जातंय. (डावखुऱ्या लोकांवर अन्याय!)

हल्ली ‘डेड ट्री फॉर्मॅट’ मध्ये फारसं काही ठेवायची वेळ येत नाही. ऑफिसमध्ये तर नाहीच नाही. ऑफिसबाहेरही बरंचसं लेखन आता ब्लॉगवरच होतं. पण ब्लॉग असला, तरी डायरी मात्र लाडक्या पेन्सीलने, कागदावरच लिहावी लागते. आणि छान कविता दिसली, की पेनात जांभळी शाई भरावीच लागते. परवाच आईकडे साफसफाई करताना माझा जुना कप्पा तिने मोकळा केला ... नव्वद सालापासूनच्या डायऱ्या मिळाल्या तिथे. त्या चाळताना सहजच वीस वर्षांची सफर झाली. हा लिहिण्याचा आजार लवकर बरा न होवो अशी माझी जाम इच्छा आहे.


(खूपखूप वर्षांपूर्वी मी एक याच नावाची पोस्ट भाग १ म्हणून टाकली होती, आणि तिथे क्रमशः म्हणून पण लिहिलं होतं. तर हा अंतीम भाग आहे बरं का)

Sunday, September 13, 2009

सखी

मैत्रीची काही नाती अशी असतात, की वर्षानुवर्ष तुम्ही भेटला नाहीत, तरी काल भेटलो होतो असा सहजपणा पुढच्या भेटीत राहतो. तारा कायम जुळलेल्याच राहतात. अशीच ही सखी. अम्ही गेल्या आठ दहा वर्षात भेटलेलो नाही. फोन नाही, इ-मेल नाही, पत्र नाही. पण जिवश्च कंठश्च मैत्रीण म्हटलं म्हणजे पहिलं नाव आठवतं ते तिचंच. माझी बालपणीची सखी.

तसं बघितलं तर आमचं जगणं आज एकमेकांना कुठेच छेद देत नाही. मला खात्री आहे, मी हे जे खरडते आहे, त्याची तिला आयुष्यात कधी गंधवार्ताही लागणार नाही. त्यामुळे अगदी निश्चिंत होऊन, मोकळेपणाने मी इथे हे लिहिते आहे.

पाच भावंडातली ही चौथी. घरात प्रचंड कर्मठ वातावरण. अगदी विटाळाच्या वेळी शिवलेलं चालत नाही इथपर्यंत. सगळ्या रीतीभाती, सणवार सगळं यथासांग पार पडलंच पाहिजे. आणि कडधान्य विकत आणून घरी जात्यावर डाळी काढण्यापर्यंत सगळी कामं घरी. या धबडग्यामुळेच का काय, पण सखीची आई सारखी आजारी. घरातली ही सगळी कामं करायची ती शाळकरी वयाच्या या सगळ्या भावंडांनी. म्हणजे काका तसे अतिशय सज्जन होते, पण त्यांच्या मते हीच जगायची रीत होती. मला काय भातुकलीसारखी ही पण एक गंमत होती. संध्याकाळभर सखीच्या घरात पडीक असायचे मी. पण खेळून झालं, की जेवायला आणि झोपायला माझ्यासाठी एक खूप वेगळं घर होतं. तिथे मला आजच्या स्वयंपाकाची काळजी करावी लागत नव्हती का रात्रभर जागून दिवाळीचा फराळ करावा लागत नव्हता.

शाळेतल्या पुस्तकी अभ्यासात सखी तशी मागेच असायची काहीशी. म्हणजे काकांच्या मते माझ्या संगतीमुळे ती शाळेत पास होत होती ही चांगली प्रगती होती. पण खरं तर पुस्तकांपलिकडच्या शाळेत मी तिच्या संगतीमुळे केवढं तरी शिकत होते. शाळेतल्या अभ्यासाव्यतिरिक्तच्या सगळ्या गोष्टीत आम्ही बरोबर असायचो - खेळ, चित्रकला, गर्ल गाईड, गाणी, नाच, सबकुछ. शिवाय शाळेबाहेरचे उद्योगही - नदीवर पोहायला जाणं, वॉल-हॅंगिंग, मेंदी असले क्लासही आमचे बरोबर चालायचे. त्याशिवाय आमच्या डोक्यातनं आलेले प्रकल्प सुद्धा असायचे - अगदी दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री निधीसाठी पैसे जमा करायचे, म्हणून रोज चिवडा बनवून तो शाळेत मधल्या सुट्टीत विकण्यापर्यंत। नेतृत्व, स्वतः जबाबदारी घेऊन काही करणं आणि आहे त्या परिस्थितीमधून मार्ग काढणं सखीकडून शिकावं. आम्ही गाव सोडून गेलो त्यानंतर सखीचा पुस्तकी अभ्यास मागे पडला, तर माझा पुस्तकांबाहेरचा.

नंतर असंच काही वर्षांच्या खंडानंतर पुन्हा सखीची निवांत भेट झाली. माझ्या घरातल्या मुक्त वातावरणात आपल्याला आयुष्यात नेमकं काय करायचं आहे हे शोधण्यासाठी मी धडपडत होते. पैशाचं पाठबळ नसणाऱ्या, तीन मुलींची लग्नं कशी जुळवायची याच्या विवंचनेतल्या मारवाडी घरात सखी आपण आईवडिलांना अजून संकटात घालायचं नसेल, तर पदरी पडेल ते दान स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे हे समजून त्यात आपण काय काय करू शकतो याच्या शक्यता पडताळून पाहत होती. काकांची मतं अजूनही बदललेली नव्हती. मुलींनी नोकरी करणं, पैसा कमावणं त्यांना मान्य नव्हतं. क्षमता (आणि खरं तर गरजही) असूनही काम करायचं नाही? एक वेळ नोकरी आणि पैशाचा विचार बाजूला ठेवू - पण पूर्ण स्वातंत्र्याची चटक लागलेल्या माझ्या मनाला, आवडत असलं तरी काहीतरी करायचंच नाही ही कल्पनाच सहन होण्यापलिकडची होती. सखीच्या आयुष्यात चार दिवस डोकावतानाच मला घुसमटायला लागलं. सिद्धेश्वराच्या तलावात दोघींनीच जाऊन रोईंग केल्यावर सखी म्हणाली, तिच्या नव्या मैत्रिणींमध्ये असली यडच्याप गंमत करणारी कोणीच नाहीये. तिच्या जागी असते तर काय केलं असतं मी? जगाशी भांडायला निघाले असते? फ्रस्ट्रेट होऊन माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांचं जगणं हराम करून टाकलं असतं? निघून गेले असते हे सगळं सोडून? हाय खाऊन, मरेपर्यंतचे दिवस ढकलत राहिले असते?

लहानपणी आमचा एकत्र ‘अभ्यास’ चालायचा, खेळ चालायचे, बाकीचे अनंत उद्योग चालायचे. असंच एकदा आम्ही मिळून रोजचं दिवसभराचं ‘वेळापत्रक’ बनवलं होतं. म्हणजे दुपारी दोन ते तीन अभ्यास (?), त्यानंतर अर्धा तास विश्रान्ती वगैरे वगैरे. तर हे वेळापत्रक बनवताना मी सखीला विचारलं ... अगं तुझी सगळी कामं तू यात कुठे बसवणार? त्यासाठी किती वेळ ठेवायचा? सखीचं उत्तर, "ते मी बघून घेईन ... तू सांग आपला दिनक्रम". मी ते वेळापत्रक’ दोन दिवसाच्या वर काही पाळलं नसेल ... ती किमान आठवडाभर तरी पाळत होती ... मला लाज वाटून मी तिला ते बंद करायला सांगेपर्यंत. आज सखीचं लग्न झालंय, तिला दोन मुलं आहेत. मारवाडी घरामध्ये एकत्र कुटुंबामध्ये राहाताना, घरातले सगळे रीतीरिवाज, कामं, मुलांचं सगळं करताना तिने स्वतःचं ब्युटी पर्लर सुरू केलंय. सासू सासऱ्यांची आजारपणं काढता काढता, मुलांचं करता करता, नवरोबाचा इगो जपता जपता तिने लहानपणीच्याच सहजतेने "ते मी बघून घेईन" म्हटलं असणार. नवऱ्याने नवरेशाही गाजवलीच पाहिजे असं बाळकडू घेऊन मोठं झालेला तिचा नवरा आज तिला तिच्या घरकामात मदत करतोय, तिला पार्लर चालवायला पाठिंबा देतोय. सखी, तू जिंकलंस.

Wednesday, August 19, 2009

नातं मातीचं

माझं लहानपण लहान गावात, भरपूर जागा, मोठ्ठं अंगण असणऱ्या घरात गेलं. कित्येक वेळा जेवायला, पाणी प्यायला सोडता आम्ही सगळा दिवस बागेतच घालवत असू. बागेतच आमचे कित्येक प्रयोग चालायचे. लोहचुंबक घेऊन मातीमधून लोखंडाचे कण गोळा करणं आणि त्या लोखंडाच्या कणांपासून वेगवेगळे आकार करणं, पानं, कचरा गोळा करून त्याचं खत बनवण्याचा प्रयत्न करणं, पावसाळ्यात गांडुळं बाहेर आली म्हणजे त्यांना उचलून गुलाबाच्या आळ्यात टाकणं असे अनंत उद्योग असायचे. समोर मंजूकडे गेलं म्हणजे तर जर्सीला खाऊ घालणं, तिची धार काढणं, ताज्या, अजून गरम असणाऱ्या शेणाने सारवणं अशी अजून इंटरेस्टिंग आयटम्सची यात भर पडायची. म्हणजे बागकामातलं काही खूप समजत होतं किंवा आम्ही लावलेली झाडं जगायचीच अशातला काही भाग नव्हता - पण बागेत एकदम ‘घरच्यासारखं’ वाटायचं एवढं मात्र खरं.

पुण्यात आल्यावर खूपच गोष्टी बदलल्या. अंगण नसणारं घर, तेही पहिल्या मजल्यावर. गावातल्या मैत्रिणी, तिथल्या गमती जश्या हळुहळू मागे पडल्या, तशीच बागसुद्धा. गॅलरीच्या टिचभर जागेत कुंड्यांमध्ये झाडं लावणं म्हणजे झाडांवरती अन्याय वाटायचा. त्यामुळे कधी रस्त्यात, कुणच्या बागेत एखादं आनंदी झाड बघितलं म्हणजे ते तेवढ्यापुरतं एन्जॉय करायचं एवढाच या सोयऱ्यांशी संबंध उरला होता.

खूप वर्षे झाडांपासून दूर राहिल्यावर परत एकदा गच्चीत छोटी का होईना, पण बाग करायची असं ठरवलं. पहिल्या दिवशी कुंड्या भरतांनाच मला पहिला धक्का बसला - माती - शेणखतात हात घालताना मला घाण वाटते आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता. माती परकी वाटावी इतकी नागर मी कधी झाले? माती मला कधीपासून ’अस्वच्छ’ वाटायला लागली? शेणा-मातीची घाण वाटल्यावर नोकरी सोडून शेती कशी करणार मी? माझ्या शाळेतल्या मुलांबरोबर बागकाम कसं करणार?

परवा खत घालताना सहजपणे मातीमधली, शेणखतातली ढेकळं हाताने फोडत होते. इतक्या वर्षांच्या विरहाने आलेला दुरावा त्या ढेकळांसारखाच हळुहळू विरघळायला लागला म्हणायचा. गाडं हळुहळू पूर्वपदावर यायला लागलं तर!

आज संध्याकाळी मस्त पाऊस झाला. गच्चीत मोठ्ठं तळं साठलं होतं. ते पाणी काढायला गेले, तर पाण्यात केवढी तरी गांडुळं. पाणी वाहून गेलं की कोरड्या फरशीवर ही मरणार. आणि सातव्या मजल्यावरच्या कुंड्यांमधल्या मातीत परत गांडुळं कुठून येणार? शांतपणे ती गांडुळं पकडून परत कुंड्यांमध्ये सोडली. गेल्या दोन महिन्यात गच्चीमध्ये कुंडीत लावलेल्या चार झाडांनी आपल्याला काय दिलंय, याची एकदम जाणीव झाली. आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात. पण जाणीव तरी ठेवायलाच हवी ना.

Sunday, August 16, 2009

ओळखा मी कोण?

तसं आपण खूप वेळा भेटतो. म्हणजे अगदी ’अतिपरिचयात अवज्ञा’ होण्याइतक्या वेळा. पण तरीही मला वाटलं की या फोटोत तुम्ही मला ओळखूच शकणार नाही ...खालच्या फोटोवर टिचकी मारली म्हणजे मोठा फोटो उघडेल. नीट बघा माझा फोटो ... आणि सांगा बरं माझं नाव ...

Thursday, August 13, 2009

तू सब्र तो कर मेरे यार ...

भक्तांच्या आणि बडव्यांच्या गर्दीच्या महापूरातही आषाढी कार्तिकीला त्याच्या मूर्तीच्या पायावर क्षणभर डोकं टेकतानाही तो भेटावा एवढी श्रद्धा माझ्याजवळ नाही. निरव शांतता, समोर प्रसन्न फुलं वाहिलेली शंकराची पिंड, कुणीही लुडबूड करणारा पुजारी जवळपास नाही, डोळे दिपवून टाकेल असं त्याच्या श्रीमंतीचं प्रदर्शन नाही, भोवताली पाणी पसरलेलं - डोळे मिटले, की क्षणात तो समोर दिसावा अशी कुडलसंगमासारखी देवळं फारच क्वचितच सापडतात. नाही तर तो दिसतो एकटीनेच टेकडी चढत असताना, भरभरून बहरलेल्या एखाद्या सुंदर झाडाखाली, एखादी सुंदर कलाकृती अनुभवताना, एखादं आवडीचं काम मन लावून करताना, कुणीही न वाचण्यासाठी काही लिहिताना. तो सहजच भेटतो - अजून वेगळे काहीच उपचार नको असतात त्याला. नेम, नियम, व्रतवैकल्य, नियमित पूजा, ध्यानधारणा असं काहीच मला येत नाही. कधीतरी त्याची आठवण आली म्हणजे मी त्याला बोलवते, आणि तो ही येतो भेटायला. माझ्या बाजूने ही एक केवळ casual relationship आहे - nothing very serious. यापेक्षा मोठी कमिटमेंट देण्याची माझी तयारी नाही, आणि हे समजून घेण्याइतका तो मॅच्युअर आहे. प्रेम ठरवून करता येत नाही, आपोआप व्हावं लागतं. त्याच्याविषयी अजून काही मला वाटावं, त्याच्या नित्य सहवासाची आस लागावी म्हणून मी फक्त वाट बघू शकते. तो तर जगाच्या अंतापर्यंत वाट बघायला तयार आहे.

Sunday, August 9, 2009

मेजवानी



बागेतल्या सोनचाफ्याला मस्त फूल आलं आहे. ते तोडायला गेले.

नेहेमी सोनचाफ्याच्या झाडावर असणारा पांढरा कोळी आणि एक्झोराच्या फुलांवर कायम बसणारी माशी एकत्र काय करताहेत इथे? माशी उडत का नाहीये?


कशी उडणार? तिचं डोकं कोळ्याच्या तोंडात आहे!

महिनाभराची बेगमी...



लहान तोंडी मोठा घास!

Monday, August 3, 2009

का लिहायचं?

एखादा विषय ‘माझ्याविषयी लिहिलं तरी चालेल’ म्हणून उदार मनाने परवानगी देतो. ब्लॉगवरचं नवं पोस्ट आकार घेऊ लागतं. डोक्यात एक डेमन थ्रेड सुरू झालेला असतो. अजून थोssडासा आकार आला, कि लिहिता येईल. बोटं टायपायला उतावीळ असतात. अशा वेळी नेमकं कुठलं तरी नको तेवढं काम येतं. ऑफिसमध्ये, घरी, गाडी चालवताना, जागेपणी, झोपेत ... पूर्ण वेळ त्या कामाचंच प्रोसेसिंग डोक्यात चालू असतं. शेवटी तो ब्लॉगचा दानव दोरा वेळ संपून मरून जातो. नंतर वेळ मिळतो, पण लिहायची इच्छा नसते / काही सुचत नाही / लॅपटॉप बडवण्यापेक्षा कागदावर रेघोट्या ओढण्यात / मातीत खेळण्यात जास्त रस वाटतो ... थोडक्यात म्हणजे चांगले तीन - चार आठवडे आपण ब्लॉगकडे ढुंकूनही बघत नाही. अचानक ब्लॉगवर नवी कॉमेंट येते / मेलीस का म्हणून कुणीतरी प्रेमाने विचारतं. लिंक उघडून आपण आपलाच ब्लॉग तिऱ्हाईतासारखा वाचत असतो...

हे आपण लिहिलंय? कधी? इतकं वाईट लिहितो आपण? लिहिताना शंभर वेळा वाचलं तरी दिसले नसते असे दोष दिसायला लागतात - फारच त्रोटक ... रटाळ ... आशय काहीच नाही ... सुमार दर्जा ... एका एका पोस्टवर शेरे मिळत जातात, आणि ते पोस्ट डिलिट करायला बोटं शिवशिवायला लागतात.

हे आपण लिहिलेलं नाही. आपण असं काही लिहिणं शक्यच नाही. तसंही महिनाभरापूर्वीची मी आणि आजची मी एक कुठे आहे? नदी तीच आहे असं आपण म्हणतो ... प्रत्यक्षात दर वेळी आपण वेगळं पाणी बघत असतो ना? तीच नदी परत बघितल्यासारखं वाटणं हा तर केवळ आभास! जे मी लिहिलेलं नाही, ते मी का डिलिट करावं?

मला माहित आहे, आणखी एका महिन्याने मला हेही लिहिलेलं उडवून टाकायची अनिवार इच्छा होणार आहे. पण आज लिहिणं भाग आहे. नाईलाज आहे. आज जे काही टाईपते आहे, ते सुद्धा खरं तर मी लिहिलेलं नाहीच.

‘आपण लिहिलेलं’ वाचताना, त्यातला ‘आपण’ दूर झाला, तर केवढा फरक पडतो!

Sunday, June 28, 2009

कु.स.म.प्र.झा.ला.क.पे.

कपडे घ्यायला गेल्यावर जसे एखाद्या दिवशी फक्त ठराविक हिरव्या रंगाचेच कपडे मनात भरतात, तसाच पुस्तकांच्या दुकानात शिरताना सुद्धा आपला एक मूड असतो. त्या दिवशी तीच पुस्तकं ‘दिसतात’. आणि त्या पुस्तकाविषयी, लेखकाविषयी काहीही माहिती नसली, कुणाकडून काही ऐकलेलं नसलं, तरी जनरली ही पुस्तकं छान निघतात.

तर असं एका दिवशी मला दुकानात ते पुस्तक ‘दिसलं’, पण जवळ ऑलरेडी भरपूर सामान होतं / पाऊस होता / घाई होती अशा कुठल्यातरी नतद्रष्ट कारणामुळे ते घ्यायचं राहिलं. नंतर साधारण सहा एक महिन्यांनी अचानक दुसऱ्या एका पुस्तकांच्या दुकानात जायचा योग आला. दुकान नवीनच सुरू झालेलं होतं, आत माफक गर्दी होती. मस्त निवांत पुस्तकं बघत अर्धा एक तास मजेत घालवता येईल अशी सगळी सेटिंग होती. अशा वेळी दुकानातल्या असिस्टंटला दुर्बुद्धी सुचली.

"Mam which book are you looking for?" त्यानं वातानुकूलित इंग्रजीमध्ये प्रश्न केला.

हा प्राणी कुणाला इतक्या तत्परतेने असिस्ट करतो आहे म्हणून मी अजुबाजूला बघितलं. तो आदबीने विचारलेला प्रश्न अजून कुठल्या मॅमना नसून अस्मादिकांनाच विचारण्यात आलेला होता. मी? याला कोणी संगितलं मी कुठलं पुस्तक शोधते आहे म्हणून?

"I am looking for a paperback ... about this big, with red color cover and published more than six months back!" माझं .उत्तर (A stupid question gets an equally stupid answer.).

त्या असिस्टंटाने एकदा माझ्याकडे खुळ्यासारखं बघितलं आणि मग तिथून काढता पाय घेतला.

पुस्तकाच्या दुकानात शिरतांना साधारणपणे नवरा आणि मी एकमेकांना ओळखत नाही असं भासवत दुकानाच्या दोन विरुद्ध टोकांकडून पुस्तकं बघायला सुरुवात करतो. पण माझा आणि त्या असिस्टंटचा एवढा इंटरेस्टिंग संवाद ऐकण्याचं भाग्य नवऱ्यालाही मिळालं होतं. धन्य होऊन त्याने एकदा माझ्याकडे बघितलं.

मी: "मग ... त्या दिवशी मी बघितलं होतं ना ते पुस्तक ... कुत्र्याविषयीचं ... तेच शोधते आहे मी."

नवरा: "अगं पण पुस्तकाला काही नाव गाव असतं. लेखक असतो."

मी: (स्वगत)"पुस्तकाचं नाव माहित असतं तर मी डायरेक्ट काऊंटरवर नसतं घेतलं का ते?"

तर अखेरीस त्या दिवशी कुत्र्याविषयीचं सहा महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झालेलं लाल कव्हरचं पेपरबॅक काही तिथे सापडलं नाही.

नंतरच्या वर्षभरात काही ठिकाणी त्याचं परीक्षण वाचलं, कुणी कुणी ‘आवडतं पुस्तक’ म्हणून त्याचा उल्लेख केलेला वाचला. मला पुस्तकांच्या दुकानात जायची संधी मिळाली नव्हती, आणि पुस्तकांच्या आणि लेखकांच्या नावांशी माझं वाकडं असल्यामुळे अजूनही माझ्यासाठी ते कु.स.म.प्र.झा.ला.क.पे. च होतं.

परवा अचानक कंपनीच्या कृपेने बंगलोरला विमनतळावर दीड तास मोकळा मिळाला. मी तडक पुस्तकांच्या दुकानात शिरून ते कु.स.म.प्र.झा.ला.क.पे. विकत घेतलं. (विमानतळावर ते मला दुप्पट किंमत देऊन घ्यावं लागलं असणार हे मान्य ... पण कंपनीच्या खर्चाने प्रवास करत असतांना per diem मधून विकत घेताना दुप्पट किंमतीकडे काणाडोळा करता येतो ;)). विकत घेतल्यानंतर साधारण १० तासात ते वाचून झालेलं होतं. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार सामान्यजन त्या कु.स.म.प्र.झा.ला.क.पे. ला ‘Marley & me' या नावाने ओळखतात.

'Marley & me' ही मार्लेची त्याच्या मलकाने सांगितलेली अतिशय हृद्य कथा आहे. मार्ले हा ताडमाड उंचीचा आणि ताकदीचा अमेरिकन लॅबरोडॉर. पण इतका मोठा झाला तरी छोट्या पिल्लाएवढाच अवखळ. मुलांचं खाणं चोरणारा, सोन्याच्या साखळीपासून पगाराच्या चेकपर्यंत काहीही नियमितपणे गिळून टाकणारा, कुत्र्यांना शिस्त लावण्याच्या शाळेतून बेशिस्त म्हणून काढून टाकलेला, वादळाला घाबरणारा, घरातल्या वस्तूंची नियमित नासधूस करणारा, घरातल्या माणसांइतकंच प्रेमाने परक्या अनोळखी माणसाचं स्वागत करणारा असा हा ‘जगातला सगळ्यात वाईट कुत्रा’. एवढा वाईट कुत्रा त्याच्या घराला काय देत असतो, हे समजण्यासाठी पुस्तक मुळातूनच वाचायला हवं.

Tuesday, June 2, 2009

अजून एक राबडीदेवी

आमच्या हाऊसिंग सोसायटीची निवडणूक आहे, आणि कार्यकारिणीमध्ये किमान १०% स्त्रीसदस्य असल्या पाहिजेत असा काहीतरी सहकारी सोसायट्यांचा नियम आहे, म्हणून मला लोकांनी मारून मुटकून उभं केलंय निवडणूकीला. म्हणजे तू फक्त उभी रहा, सद्ध्या नवरा जसं काम बघतो, तसंच तू निवडून आल्यावर तुझ्या वतीने बघेल असं म्हणून. म्हणजे चक्क राबडीदेवीच केली की त्यांनी माझी एकदम.

स्त्रियांचा हाऊसिंग सोसायटीच्या कारभारातला सहभाग वाढायला हवा हे नक्की. पण मला सद्ध्या ही जादाची `एंपॉवरमेंट’ नकोय. माझं सद्ध्याचं सबलीकरण मला पुरेसं आहे. नोकरी आणि घरातलं बघताना मला जेमतेम जिवंत राहण्याएवढा वेळ स्वतःपुरता मिळतोय. त्या मौलिक वेळाचा बळी देऊन मला सोसायटीच्या भल्यासाठी काही करण्याची खरंच इच्छा नाही. मी सोसायटीचं काम केलं म्हणून नोकरीवरचं काम कमी होणार आहे का माझं? का घरातल्या कामातला वाटा कमी होणार आहे?

मला खात्री आहे, राजकारणात पडण्याची इच्छा नाही म्हणणाऱ्या सगळ्या जणी हेच आर्ग्युमेंट करतील. एक तर unstructured सेट अप मध्ये काम करणं स्त्रियांना जड जातं - मिटिंगमध्ये एकदम आक्रमक पवित्रा घेऊन हमरीतुमरीवर येणारे पुरूष सहकारी मिटिंग संपल्यावर परत एकमेकांबरोबर सहज खेळीमेळीने कसे वागतात हे बहुसंख्य बायकांना न उलगडलेलं कोडं आहे. आपला मुद्दा पटवून देण्यासाठी एवढा आक्रमक मार्ग अवलंबणाऱ्या स्त्रीला हेच सहकारी बिनधास्त ‘आक्रस्ताळी’ ठरवून मोकळे होतात. म्हणजे तिने मिटिंगमध्ये बसून फक्त तोंड बंद ठेवणं अपेक्षित आहे का? का सईबाई व्हायचं - नुसतं दाखवलेल्या रेषेवर सही करायची निमूटपणे? किंवा सरळ नवऱ्याला सगळा कारभार बघायला द्यायचा ? ऑफिसमधली गोष्ट वेगळी असते - तिथे मिटिंगमध्ये प्रत्येकाला एक designated role असतो. कुरकूर करत का होईना, पण प्रत्येकाने तो स्वीकारलेला असतो. सोसायटीच्या मिटिंगसारखं `free for all' नसतं ते वातावरण.

म्हणजे स्त्रिया सार्वजनिक जीवनात पुढे येतच नाहीत का? नक्कीच येतात. पण अशा सहभागासाठी, आपली लायकी तिथे सिद्ध करून स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी त्यांना नक्कीच जास्त रक्त आटवावं लागतं असं मला वाटतं. आमच्या सोसायटीच्या कामापुरतं बोलायचं, तर जे माझा नवरा सहज जाताजाता करू शकतो, त्याच कामासाठी इतकी मेहनत करायची माझी आज तयारी नाही. आणि जोवर मला असं वाटतं, तोवर राजकारणातल्या स्त्रिया म्हणजे राबडीदेव्याच असणार बहुसंख्येने.

Tuesday, May 26, 2009

माझी लाडकी १५ पुस्तकं

Gने टॅगलं आहे मला.

"Don't take too long to think about it. Fifteen books you've read that will always stick with you. First fifteen you can recall in no more than 15 minutes. Tag up to 15 friends, including me because I'm interested in seeing what books my friends choose."


कायम जवळ ठेवावीशी वाटतील अशी फक्त १५ पुस्तकं सांगायची?

हं. अवघड आहे. ही माझी पहिली यादी ...

* To kill a mocking bird - Harper Lee

* The citadel - A J Cronin

* निशिगंध - मृणालिनी देसाई. (माझ्याकडचं हे सुंदर पुस्तक कुणीतरी वाचायला नेऊन ढापलं / हरवलं आहे. त्याचं प्रकाशन, नवी आवृत्ती याचा मला पत्ता लागत नाहीये. तुम्हाला कुणाला या पुस्तकाविषयी माहिती असेल तर प्लीSSज सांगा.)

* Jonathan Livingston Seagull - Richard Bach

* The prophet - khalil gibran

* Gone with the wind - Margaret Mitchell

* बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर

* 3 cups of tea - Greg Mortenson

* Freedom in exile - The Dalai Lama

* Peony - Pearl S Buck (हो. माझ्या मते हे तिचं 'Good Earth' पेक्षाही चांगलं पुस्तक आहे.)

* स्मृतीचित्रे - लक्ष्मीबाई टिळक

* A tale of two cities - Charles Dickens

* Anne of Green Gables - Lucy Maud Montgomery

* प्रारंभ - गंगाधर गाडगीळ

* The little prince - Antoine de Saint-Exupéry

आता मी कुणाला खो देऊ बरं?

G आणि आळश्यांचा राजा या दोघांना टॅगते आहे मी.


तुम्हाला पुस्तकं वाचायला आवडतात? तुमच्या लाडक्या १५ पुस्तकांविषयी वाचायला आवडेल मला.

माझा हॅप्पीटूयू

काल माझा पैला हॅप्पीटूयू होता. मी चांगला मोठ्ठा एक वर्षाचा झालोय म्हटलं आता. तर हॅप्पीटूयूची भेट पाहिजे म्हणून मी हट्ट करून बघितला, सगळी अपूर्ण पोष्टं पूर्ण करीन असं प्रॉमिस गवराईकडून मिळवायचा, पण तिने काय दाद नाही लागू दिली. रोज भेटत नाही ते ठिकंय, पण म्हणजे आमचा हॅप्पीटूयू पण विसरायचा म्हणजे फारच. आमी नाई जा बोलणार. एकदम कट्टी फू. बारा वरशे बोलू नको म्हणाव. मी चिल्लोय.

चिल्लोय म्हणून डिक्लेयर केलं तरी बघत नाई कोणी आमच्याकडे. खूप खूप चिल्लोय मी. सॉरी म्हटलं तरी कध्धी कध्धी बोलणार नाही तिच्याशी.

नवीन अंगा करणार, सजवणार असं प्रॉमिस केलंय गवराईने. पण मी चिल्लोय.

मी सॉल्लिडच चिल्लो म्हणून मग गवराईने केक बनवला माझ्यासाठी:

सजवणार म्हणजे काय काय करणार ते विचारायला पाहिजे तिला . ही बाई म्हणजे ना ...
काय काय सांगावं बरं हिला ...
तुमच्याकडे काही सॉल्लिड आयडियाची कल्पना आहे मला कसं कसं सजवता येईल म्हणून?

**************************************************************************

संगणकक्षेत्रात असून सुद्धा मी कित्येक वर्षं झोपलेलीच होते ब्लॉग बाबत. रोजच्या कामातल्या बोरिंग तांत्रिक गोष्टींविषयी काही खरडण्याची माझी इच्छा नव्हती, आणि दुसरं काही सुचत नव्हतं. म्हणजे सुरसुरी आली की मी लिहायचे काही तरी, पण ते माझ्या वहीत. एकदा बराहा वापरून बघितलं, आणि देवनागरीमध्ये इतक्या सहज लिहिता येतंय हे बघून खूश झाले. मग उत्साहाने हा ब्लॉग बनवला. ब्लॉगविश्वातल्या दिग्गजांएवढ्या dedication ने, नियमित लिहिणं मला जमत नाही, पण म्हणून काय आम्ही ब्लॉग खरडूच नये?

ब्लॉग सुरू करताना काही गोष्टी डोकयात होत्या. एक म्हणजे ब्लॉग डायरीला पर्याय म्हणून लिहायचा नाही. डायरी ही अगदी मनातल्या गोष्टी लिहिण्याची जागा असते. आपल्याला काय वाटतं आहे, हे नोंदवण्यासाठी. जसं वाटलं तसं, raw उतरवण्यासाठी. कुणाजवळंच बोलता येणार नाही अश्या गोष्टी बिनदिक्कत लिहिण्यासाठी. त्यामुळे ब्लॉगवर वाचकांसाठी डायरी लिहायची नाही हे तर नक्की.

दुसरं म्हणजे रोज नियमित लिहिणाऱ्यांविषयी मला आदर आहे, पण हे आपल्याला झेपणाऱ्यातलं नाही याची खात्री होती. त्यामुळे ब्लॉगवर रतीब घालायचा नाही - रोज / दर आठवड्याला इतके पोस्ट पाडलेच पाहिजेत असं टार्गेट ठेवायचं नाही.

एवढं भव्यदिव्य (!) उद्दिष्ट घेऊन ब्लॉगायला सुरुवात केल्यामुळे आज त्याच्या वाढदिवसाला मी जाम खूश आहे. वर्षभरात एवढी आबाळ सोसून हे बाळ जिवंत राह्यलंय, आणि कुणालातरी इथे खरडलेलं वाचावंसं वाटलंय म्हणजे ग्रेटच.

Tuesday, May 12, 2009

श्रीलंका म्हणजे हत्तीच हत्ती!

श्रीलंकेत फिरायला गेल्यावर पहिला दीड दिवस आम्ही नुसते हत्तीच बघत होतो. लहान हत्ती, मोठे हत्ती, माणसाळलेले हत्ती, रानटी हत्ती, एक आठवड्याच्या पिल्लापासून ते एकवीस वर्षांच्या आजोबांपर्यंत वेगवेगळ्या वयाचे हत्ती. जंगलात हत्ती, रस्त्यावर हत्ती, आणि टीशर्टवर पण हत्तीच!
हत्ती दोन प्रकारचे असतात. आफ्रिकन आणि भारतीय (आशियाई) . श्रीलंकेतला हत्ती म्हणजे भारतीय हत्तीच आहे. आफ्रिकेतल्या नर हत्तींना सुळे असतातच, माद्यांना सुद्धा काही वेळा असतात. भारतीय हत्तींमध्ये नराला काही वेळा सुळे असतात, तर माद्यांमध्ये ते नसतातच. सुळ्यांची लांबीसुद्धा आफ्रिकेतल्या हत्तींपेक्षा कमी असते. भारतीय हत्तीच्या गंडस्थळाचा आकार वेगळा असतो. भारतीय हत्ती आफ्रिकेतल्या हत्तींपेक्षा उंचीला कमी असतात. भारतीय हत्तीचे कान आफ्रिकेतल्या हत्तीपेक्षा छोटे असतात. भारतीय हत्तीच्या सोंडेवर कमी वळ्या असतात,आणि सोंडेच्या टोकाला दोन ‘ओठ’ असतात (आफ्रिकेतल्या हत्तीच्या सोंडेच्या टोकाला एकच ‘ओठ’ असतो. भारतीय हत्तींच्या गंडस्थळावर, सोंडेवर कित्येक वेळा पंढरा रंग असतो - आफ्रिकेतला हत्ती तिथल्या माणसांसारखाच पूर्ण काळा असतो. शिवाय भारतीय आणि आफ्रिकेतल्या हत्तीच्या पायाच्या नखांची संख्या वेगवेगळी असते. (किती ते मी यशस्वीरित्या विसरलेले आहे! :)) ही मौलिक माहिती दिली आमचा तिथला चक्रधर ‘सरथ’ याने. (सारथी म्हणता येईल त्याला, नाही का ? ;) )
थोडं गुगलल्यावर आणखी काही फरक समजले - आफ्रिकेतला हत्ती खांद्यात जास्त उंच असतो, तर भारतीय हत्तीची पाठ त्याच्या शरीरातला सगळ्यात उंच भाग असतो. भारतीय हत्तीपेक्षा आफ्रिकेतल्या हत्तीच्या अंगावर जास्त सुरकुत्या असतात. (असणारच ... एवढ्या उन्हात फिरल्यावर काय होणार?)
आता एवढे हत्ती बघितल्यानंतर मला पण स्फुर्ती झाली एक हत्ती काढायची. आणि मी एकदम सायंटिफिकली शुद्ध भारतीय हत्ती काढलाय तो. नेहेमीसारखे मोठ्ठे आफ्रिकन कान काढून बाकी तपशील लपवले नाहीयेत बरं का :) आता तो जरा पाठीपेक्षा खांद्यात उंच वाटतो आहे तो भाग वेगळा ... त्याला कलाकाराचं स्वातंत्र्य - ’artistic freedom' - म्हणायचं. ;)



Monday, May 11, 2009

पांढऱ्यावरचे काळे: १

प्राथमिक शाळेत असताना आमच्या वर्गात एक मुलगी होती - दीपाली बळेल नावाची. दुसरीमध्ये असताना मोत्यासारखं अक्षर होतं तिचं! इतकं सुंदर अक्षर की आमच्या बोंडे सरांनी मोठ्या शाळेच्या - म्हणजे चौथीपेक्षा सुद्धा मोठ्ठ्या मुलांना तिची वही दाखवून विचारलं होतं ... बघा तुम्ही तरी इतकं सुवाच्य लिहिता का म्हणून! चांगलं अक्षर असलं म्हणजे असं मोठ्या वर्गाच्या शिष्ट मुलांसमोर ‘इम्प’ पाडता येतं हा साक्षात्कार मला तेंव्हा झाला.

तिसरीमध्ये आम्हाला सुलेखन - म्हणजे टाक वापरून पुस्ती काढायची - होती. तिसरीतल्या पोरांच्या शाई सांडून ठेवण्याच्या अपार क्षमतेवर संपूर्ण विश्वास असणाया चौधरी सरांनी सरळ पोरांकडून ती पुस्ती निळ्या स्केचपेनानी भरून घेतली होती, त्यामुळे अक्षर सुधारण्याची एक सुंदर संधी हुकली. पण मग नंतर घरातल्या आमच्या प्रयोगांमध्ये अजितने मला घरी एक मस्त बोरू बनवून दिला, आणि वॉशिंग्टनच्या कुऱ्हाडीसारखा माझा बोरू दिसेल त्या कागदावर चालायला लागला. घरी बाबा सोडून सगळ्यांची अक्षरं सुंदर होती (बाबा आपल्या व्यवसायाला जागून खास डॉक्टरी लीपीमध्ये लिहायचे - त्यांनी लिहिलेलं वाचणं सोडा - हे बाळबोध मराठीमध्ये आहे का इंग्रजीमध्ये हे सुद्धा खात्रीने सांगता येत नाही कुणाला!) पण अक्षर चांगलं असलं तरी एकजात सगळ्यांना लिहिण्याचा मनस्वी कंटाळा होता.(कुणा दुष्टाने लीपीचा शोध लावला त्याची शिक्षा म्हणून आम्हाला गृहपाठ म्हणून धडेच्या धडे उतरवून काढावे लागतात - इति आमचे ज्येष्ठ बंधू.) त्यामुळे हे असलं लिहिण्याचं नतद्रष्ट खूळ माझ्या डोक्यात कुठून शिरलं त्याचा घरच्यांना अंदाज येईना. सुधरेल हळुहळू शेंडेफळ म्हणून त्यांनी सोडून दिलं.

बोरूचा आणि एकंदरीतच लेखनप्रेमाचा परिणाम म्हणून चौथी-पाचवीपर्यंत माझं अक्षर थोडंफार वाचनीय झालं होतं. पण मग शुद्धलेखन नावाचा नवीन शत्रू प्रबळ झाला होता. अक्षर वाचता आलं की शुद्धलेखनाच्या चुका जास्त समजतात, हा बोरू - सरावाचा तोटा नव्यानेच लक्षात आला. पाचवीत एकदा एक तास ऑफ होता, त्यामुळे दुसऱ्या वर्गावरच्या यमुना महाजन टीचर आमच्या वर्गावर (पोरं वळायला) आल्या. त्यांनी सहज म्हणून माझी भूगोलाची वही बघितली. ‘भुगोला’च्या त्या वहीत मी पहिल्याच पानावर ‘दीशां’ची नावे अशी लिहिली होती - पुर्व, पश्चीम, उत्तर (अ ला उकार देऊन उ) आणि दक्षीण. हे वाचून त्या बेशुद्ध पडायच्याच बाकी होत्या. (तेंव्हा मी नुकतंच सावरकरांचा देवनागरी सुलभीकरणाविषयीचा लेख वाचला होता कुठेतरी, त्यामुळे माझ्या मते ‘अ’ ला उकार देऊन लिहिलेलं ’उत्तर’ बरोबरच आहे असा माझा दावा होता. टिळकांनी नाही का संत शब्द तीन प्रकारे लिहून दाखवला होता - पण आमच्या शाळेतले शिक्षक टिळकांच्या शिक्षकांसारखे मोकळ्या मनाचे नसल्यामुळे मी हे मत टीचरना सांगायचं धाडस केलं नाही.)

तशी तेंव्हा वर्गातल्या बहुसंख्य मुलामुलींची शुद्धलेखनाची परिस्थिती माझ्याइतपतच होती. आमच्या वर्गात प्रत्येक शब्द देवनागरीमध्ये कसा लिहायचा हे पाठ करणारे काही महाभाग होते, ते सोडता.

म्हणजे मी वाचायचे भरपूर, त्यामुळे शब्दसंपत्ती चांगली होती - पण प्रत्येक शब्द कसा लिहायचा हे लक्षात राहणं शक्य नव्हतं. त्यापेक्षा कानाला योग्य वाटणारं लिहायचं हे जास्त सोयीचं वाटत होतं, तिथे पंचाईत होती. परत ‘पाणी’ शुद्ध, तर मग ‘आणी’ अशुद्ध कसं असे प्रामाणिक प्रश्न खूपच होते. उच्चार करून बघितला, तर ‘आणी’, आणि, ‘अणी’, ‘अणि’ हे चारही उच्चार बरोबरच वाटायचे.

(क्रमशः)

Wednesday, April 8, 2009

एका शब्दाचा प्रवास

एका भाषेतले शब्द इतके बेमालूमपणे दुसऱ्या भाषेत मिळून जातात, की आपल्याला याचं मूळ कुठलं अशी शंकासुद्धा येणार नाही.

श्रीलंकन एअरलाईन्समध्ये ‘serendip’ नावाचं पुस्तक बघितलं. काय अर्थ असावा बरं ‘सेरेन्डिप’चा? ’सेरेंडिपिटी’चा या ’सेरेन्डिप’शी काही संबंध? उत्सुकता चळावली गेली. थोडंसं गुगलल्यावर काही गमतीशीर माहिती हाताला लागली.

Serendipity म्हणजे काय माहित आहे? सेरेंडिपिटी म्हणजे अपघाताने आणि उत्तम निरीक्षणशक्तीमुळे वेगळीच मौल्यवान गोष्ट सापडणे - विशेषतः दुसरंच काहीतरी शोधत असतांना. (विकिपेडियाच्या मते हा इंग्रजी भाषेतल्या भाषांतराला कठीण अशा पहिल्या दहा शब्दातला एक शब्द आहे.) हे तर माझ्या बाबतीत नेहेमीच होत असतं - चष्मा शोधताना डोळ्याच्या औषधाची बाटली सापडते. गाडीची किल्ली शोधताना आठवडाभरापासून गायब असणारी लाडकी पेन्सील सापडते. अपघाताने सापडणं - उत्तम निरीक्षणशक्ती असल्यामुळे सापडणं - आणि मौल्यवान गोष्ट सापडणं - हे तीनही निकष पूर्ण होतात की या सगळ्या शोधांमध्ये!!! ;) त्यामुळे आपल्या रोजच्या अनुभवाला चपखल बसणारा हा शब्द मला ‘सेरेंडिपिटी’ने सापडला म्हणून मी खूश होते.

आणि हो - हा शब्द ‘सेरेन्डिप’वरूनच आलेला आहे. हा एक फिरत फिरत इंग्रजीमध्ये पोहोचलेला शब्द आहे. ‘सेरेन्डिप‘चे तीन राजपुत्र’ नावाच्या पर्शियन टाईमपास परिकथेमध्ये त्या राजपुत्रांना अपघाताने + त्यांच्या तेज दृष्टीमुळे असे शोध लागत असतात, त्यावरून.

आणि सेरेन्डिप म्हणजे श्री लंका. सेरेन्डिप हे अरबांनी दिलेलं नाव - अपल्या संस्कृतमधल्या ’सिंहलद्वीप’ वरून आलेलं!!! म्हणजे आता ‘सेरेंडिपिटी’ला सरळ ‘सिंहलद्वीपीय न्याय’ म्हणायला हवं. ;)

Tuesday, April 7, 2009

प्रसन्न

सदाफुलीचे काहीही नखरे नाहीत. कुठेही उगवते, कशाही हवेत तग धरून राहते, आणि फुलत राहते. कुणी तिचं कौतुक करत नाही, तिला ‘फुलांचा राजा’ वगैरे मोठी मोठी नावं ठेवत नाही, तिच्यावर कविता करत नाही. पण या सगळ्याचा तिला पत्ताच नसतो. मस्त फुलत राहायचं एवढंच तिला माहित. सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकणारं हे एक सदाफुलीचं आनंदी फूल. उत्तम कॅमेऱ्याच्या कृपेने फोटो छान आलाय. फुल साईझमध्ये, अजून बारकावे बघायला फोटोवर क्लिक करा.




Tuesday, March 17, 2009

The Road Not Taken

Two roads diverged in a yellow wood,
And sorry I could not travel both
And be one traveler, long I stood
And looked down one as long as I could
To where it bent in the undergrowth;

Then took the other as just as fair,
And having perhaps the better claim,
Because it was grassy and wanted wear;
Though as for that the passing there
Had worn them really about the same,

And both that morning equally lay
In leaves no step had trodden black.
Oh, I kept the first for another day!
Yet knowing how way leads to way,
I doubted if I should ever come back.

I shall be telling this with a sigh
Somewhere ages and ages hence:
Two roads diverged in a wood, and I-
I took the one less traveled by,
And that has made all the difference.

- Robert Frost

तुमचं बरं आहे फ्रॉस्टभाऊ, तुम्हाला न मळलेल्या वाटेने जाण्याचा आनंद मिळतोय. आम्हाला रस्ता निवडतांना वाटलं होतं, हाच अनवट आहे, हा जास्त भावेल. पण तो अचानक हमरस्त्यालाच येऊन मिळाला की! आता काय करायचं? आणि हा कितीही छान असला, तरी न घेतलेला कायम खुणावत राहणारच - त्याचं काय? आपला रस्ता आपण शोधायचा असं कितीही म्हटलं, तरी हे बाकी लोकांचे रस्ते का सारखे खिजवतात आम्हाला? आहे काही उत्तर तुमच्याजवळ?

Friday, February 20, 2009

पौडाचा म्हातारा शेकोटीला आला...

माझ्या आनंदासाठी मी काहीतरी करते
दुसऱ्या कुणाच्या तरी आनंदासाठी मी काहीतरी करते
काहीतरी केल्यामुळे कुणालातरी होणाऱ्या आनंदामुळे मला छान वाटतं म्हणून मी ते करते
काहीतरी केल्यामुळे मला होणारा आनंद बघून कुणाला तरी छान वाटतं म्हणून मी त्या माणसाला ते करू देते
काहीतरी केल्यामुळे मला होणारा आनंद बघून कुणाला तरी छान वाटतं ते मला आवडतं म्हणून मी त्या माणसाला ते करू देते
काहीतरी केल्यामुळे कुणाला तरी होणारा आनंद बघून कुणाला तरी छान वाटलेलं मला आवडतं ते त्या माणसाला चांगलं वाटतं म्हणून मी ते करते

थोडक्यात, जगात जे जे काही चांगलं आहे, ते मी केलेलं तरी आहे, किंवा मी दुसऱ्याला करू दिलेलं आहे!!!
:D :D :D :D :D :D