Thursday, October 12, 2017

सोप्पा कंदिल

मागच्या वर्षी माऊसोबत केलेल्या आकाशकंदिलाच्या प्रयोगानंतर यंदा असंच सोप्पं माऊला जमेल असं काहीतरी करायचं मनात होतं. माऊ आणि सखी दोघींना एकत्र घेऊन कंदिल करायचे होते. वेळही जास्त नव्हता हाताशी. तेंव्हा मग एक पिवळा टिंटेड पेपर (कार्डशीटपेक्षा पातळ) आणि एक बटर पेपरसारखा (ट्रेसिंग पेपर पेक्षा कडक पण बऱ्यापैकी पारदर्शक कागद घेऊन आले. (याला काय म्हणतात ते विसरले!)

कागदाच्या आकाराचा अंदाज घेण्यासाठी आधी साध्या A4 कागदाचा प्रोटोटाईप बनवून घेतला. 




टिंटेड पेपरचा १८ इंच * १३ इंचाचा चौरस कापून घेतला. त्याला लांबीच्या बाजूने मधे घडी घातली. आणि पट्ट्या कापण्यासाठी साधारण एक एक सेंटीमीटरवर रेषा काढून घेतल्या. वरच्या – खालच्या दोन्ही टोकांना साधारण दीड इंच जागा (दुमडून) मधल्या सिलेंडरला जोडायला सोडली. 
माऊने मग या कागदावर फिंगर पेंटिंग केलं.

तोवर मी खालच्या झिरमिळ्यांसाठी १३ इंच * ११ इंचाचा टिंटेड पेपर कापून घेतला, त्याच्या १३ इंची बाजूला दीड इंच जागा सोडली आणि झिरमिळ्यांच्या पट्ट्या कापून घेतल्या.

मधल्या सिलेंडरसाठी ९ इंच * १३ इंचाचा बटर पेपर सदृश कागदाचा आयत कापून त्याचा ९ इंच उंचीचा सिलेंडर सेलोटेपने चिकटवला.

आता माऊची “कलाकृती” वाळली होती, त्यावर अधीच आखून ठेवलं होतं तशा पट्ट्या (अर्ध्या घडीवर दुमडून)  कापल्या. वरचे आणि खालचे दीड – दीड इंच सिलेंडरला जोडण्यासाठी ठेवलेले भाग दुमडून पाऊण इंचाचे केले (म्हणजे फ्रेमला जरा जीव येईल) आणि सिलेंडरला स्टेपलरने स्टेपल केले. खालच्या बाजूने त्यावरून खालच्या झिरमिळ्या स्टेपल केल्या. दीड – दोन तासात कंदिल तय्यार!!!  




***
यंदाच्या कंदिलामध्ये माऊला करण्याजोगं मागच्या वेळेपेक्षा बरंच जास्त होतं. पण “प्रोटोटाईप” बनून कागदाचा आकार ठरेपर्यंत तिचा उत्साह मावळायला आला होता. :) तरी फिंगर पेंटिंग आणि थोडीफार कापाकापी केली तिने. या वेळची तिची आणि माझी ऍचिव्हमेंट म्हणजे कंदिल पूर्ण होईपर्यंत माऊ सोबत होती!

Tuesday, October 3, 2017

कजा कजा मरू... २ :)

गेल्या आठवड्यात माऊचा वाढदिवस झाला. मागच्या वाढदिवसाला सगळी विकतची सजावट होती, या वेळी आज्जी आणि मी काहीतरी छान करावं असं ठरवत होतो.

माऊकडे दादाने दिलेली खूप छान छान गोष्टींची पुस्तकं आहेत. आमचा दादा पुस्तकं इतकी जपून वापरतो, की हे वापरलेलं पुस्तक आहे यावर सांगूनही विश्वास बसणार नाही. अगदी पुस्तक खराब व्हायला नको म्हणून त्याला पुस्तकावर नाव सुद्धा घालायचं नसतं! (मी लहान असताना मला पण दादा मंडळींनी वापरलेली गोष्टीची पुस्तकं मिळायची. ही पुस्तकं वाचणं म्हणजे creativity, problem solving आणि वाचन असं सगळं एकत्र होतं. बहुतेक पुस्तकातली पानं गायब असायची. कव्हर आणि पुस्तकाची फारकत तर नेहेमीचीच. त्यामुळे आधी एका पुस्तकाचे भाग जमवायचे, मग ते वाचायचं, त्यात एखादं पान नसेल तर आपल्या कल्पनाशक्तीने भर घालायची असं सगळं चालायचं. सगळे दादा लोक माऊच्या दादासारखे असते तर!)  तर या पुस्तकांमध्ये एक पांडा, फुलपाखरं आणि माकडाच्या गोष्टीचं गोडुलं पुस्तक आहे. त्यातलं एक चित्र माऊला, आज्जीला आणि मला इतकं आवडलं, की या वेळी माऊच्या वाढदिवसाला या मंडळींनाच बोलवावं असं ठरलं:




मग आज्जीने मस्तपैकी पांडा आणि माकडाचं चित्र रंगवून दिलं. त्यावर पानांनीच लिहायचं ठरलं. वरून रंगीबेरंगी कागदांची फुलपाखरं ठेवली. (चित्र माऊंट बोर्डवर पोस्टर, ऍक्रिलिक आणि वॉटर कलरने काढलं, फुलपाखरं घरात सापडलेल्या कागदांची. पेपर टेपने हे सगळं भिंतीला चिकटवलं, फुलपाखरं पण पेपर टेपनेच लावली.) “रिटर्न गिफ्ट्स” साठी ताईने अजून काही फुलपाखरं बनवून ठेवली. आणि माऊच्या वाढदिवसाची तय्यारी झाली!



हे सगळं करायला इतकी मज्जा आली, की सखीच्या वाढदिवसाला पण आपण असं काहीतरी करू या असं आज्जी आणि मी ठरवून टाकलंय! :)