Monday, July 4, 2016

हातचा

टेकडीवर जायची एकदा चटक लागली, म्हणजे भर पावसात, वर चिखल असेल हे माहित असताना सुद्धा जावंच लागतं तुम्हाला! तर असंच काल सकाळी रेनकोट – छत्रीसकट टेकडीवर निघाले. परवापासून एकदाचा पाऊस मनापासून बरसायला लागला होता, आणि लगेचच रस्त्यात तळी झालेली होती. रस्त्यातली सरोवरं, ओढे, कारंजी आणि गर्ता पार करत टेकडीच्या पायथ्याशी पोहोचले तर तिथे दोन उत्साही टेकडीवीर गाडीतून रोपं उतरवत होते.

“वर चाललाय ना? एक रोप घेऊन जाल का मॅडम वर?”

“हो! कुठे लावायचीत ही झाडं?”

“वर खड्डे केलेत आम्ही, आता रोपं न्यायचीत. वर मारुतीपाशी ठेवा!”

टेकडी चढणार्‍या  प्रत्येकाकडे त्यांनी असंच एक एक रोप दिलं वर न्यायला. तसंही आज टेकडीवर फिरता येणार नव्हतं, चांगलाच चिखल होता. अजून एखादं रोप वर पोहोचवता आलं तर बघावं म्हणून मी लगेच खाली उतरले, तर तोवर सगळी रोपं वर पोहोचली सुद्धा!

मला हिशोब किंवा कामाचं नियोजन अर्धवट करायला आवडत नाही. म्हणजे गावाला जायचं असलं तर नेण्याच्या वस्तूंची यादी, कामांची यादी केल्याशिवाय (आणि ती टिक केल्याशिवाय - कोण मोनिका मोनिका ओरडतंय रे तिकडं?! ;) ) मला पुढचं काही करताच येत नाही. ही झाडं मी टेकडीवर लावणार असते तर माझ्या नियोजनामध्ये पंचवीस रोपं वर पोहोचवण्याच्या पंचवीस खेपा, तीन माणसं, अर्धा तास वेळ असं काहीतरी आलं असतं. या तीन माणसांकडे उत्सुकतेने बघणार्‍या तिथल्या पंधरांना हिशोबात धरणं माझ्या डोक्यातही आलं नसतं. नीट ‘हातचा’ धरून हिशोब करायला मी कधी शिकणार कोण जाणे!