Monday, November 30, 2015

लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया ...

डोळ्यात खुपणारे विजेचे दिवे नसणारी रोषणाई मला फार आवडते. सोय, परवडणं हे सगळे भाग बाजूला ठेवले, तर कुठे पणत्यांचा शांत उजेड आणि कुठे दिव्यांच्या माळांची भगभग असं वाटतं.  त्यामुळे दिवाळीची ’खरी’ रोषणाई म्हणजे माझ्या लेखी पणत्याच! अश्या दिव्यांचा मोठा उत्सव अनुभवायची अनेक दिवसांपासून इच्छा होती. शनिवारवाड्याच्या आणि सारसबागेतल्या दीपोत्सवाचे फोटो पेपरमध्ये बघितले होते, पण दीपोत्सव कुठे, कधी असतो त्याची नेमकी तारीख काही माहित नव्हती. दर वर्षी हे फोटो बघून “पुढच्या वेळी तरी हे अनुभवायला मिळावं” असं वाटायचं, आणि पुढचा दीपोत्सव पुन्हा पेपरमध्येच बघायला मिळायचा.

त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सवाला जाऊ या असं मैत्रिणीने (वेळेवर!) सुचवलं, आणि मग नेटवर शोधाशोध केली. शनिवारवाड्याचा दीपोत्सव बहुतेक दिवाळीत असतो. त्रिपुरी पौर्णिमेला सारसबागेजवळच्या महालक्ष्मी मंदिरात आणि पाताळेश्वराला दीपोत्सव असवा असं फोटोंवरून समजलं. एवढ्या माहितीच्या आधारावर पाताळेश्वराला जायचं ठरलं. मंदिरांशी माझा तसा विशेष संबंध नसतो. त्यामुळे पुण्यात भर वस्तीत असणार्‍या या सुंदर ठिकाणी मी आजवर फक्त एकदा गेलेली होते! दीपोत्सव नसला तरी एक छान जागा बघायला मिळेल अशी आशा होती.

संध्याकाळी साडेसातच्या सुमाराला तिथे पोहोचलो, तर संपूर्ण जंगली महाराज मंदिर, पाताळेश्वर मंदिर आणि परिसर पणत्यांच्या प्रकाशात उजळून निघालेला होता. वर पौर्णिमेचा चंद्र आणि खाली लाखो दिवे अशी फोटूवाल्या मंडळींसाठी पर्वणी. बिनकॅमेर्‍याच्या आम्ही आपले मोबाईलवर फोटो काढले.







एवढ्या दिव्यांमध्ये थोडे आमचे पण लावून घेतले.


हे अनुभवण्यासाठी पुढच्या वर्षी पुन्हा इथे येणारच!

Wednesday, November 18, 2015

चित्रदुर्गद कल्लिन कोटे...

टिपू सुलतानाचा त्रिवार निषेध!!!

“आयुष्यात पाहिलेच पाहिजेत”च्या लंब्याचौड्या यादीमध्ये तीन किल्ले बर्‍याच वर्षांपासून वरच्या टोकाला आहेत – सुरजमल जाटाचा अभेद्य असा भरतपूरचा किल्ला, दुसरा असाच केवळ फितुरीनेच जिंकता आलेला चित्रदुर्ग आणि आपल्या महाराष्ट्रातला हरिश्चंद्रगड. या तिघांपैकी एकाचंही दर्शन काही केल्या होत नव्हतं. मग यावेळी दिवाळीला कर्नाटकात जातांना मी नवर्‍याला एकदम अल्टीमेटमच देऊन टाकला ... या ट्रीपमध्ये मला (माझा) चित्रदुर्ग दाखवला नाहीस तर मी परत (तुझ्या) कर्नाटकात येणारच नाही! महाराष्ट्र - कर्नाटकाची सीमा ओलांडली, म्हणजे पुढच्या सगळ्या गोष्टी दाखवणं ही नवर्‍याची जबाबदारी असते. अजूनही मला कर्नाटकाचा भूगोल समजत नाही. त्यामुळे कुठून कुठे जायचं, कुठे रहायचं हे सगळं त्याचं डिपार्टमेंट असतं. आपण फक्त बघायचं काम करायचं! ;) चित्रदुर्गला चालायला खूप आहे, माऊला अजून झेपणार नाही म्हणून नको, तिथे ऊन फार असतं म्हणून नको, लांब आहे म्हणून नको असं करत इतकी वर्षं चित्रदुर्ग राहून गेला होता. 

तर अखेरीस या वेळी चित्रदुर्ग बघायचा मुहुर्त लागला आणि माझी दिवाळी झाली. चित्रदुर्ग पुणे – बंगलोर हायवेवर हुबळीहून २११ किमी आहे. बंगलोरहूनही साधारण तेवढंच अंतर. रस्ता सुंदर आहे, आणि पुणे – मुंबई, पुणे कोल्हापूर किंवा तुमकूर – बंगलोरच्या  मानाने गर्दी नाहीच. घाट प्रकारही नाहीच. सरळ गुळगुळीत मोकळा रस्ता. त्यामुळे बंगलोर किंवा हुबळीहून इथे तीन – साडेतीन तासात आरामात पोहोचता येतं. वाटेत बाजूला सूर्यफुलं फुललेली शेतं होती, मस्त पाण्याची तुंगभद्राही लागली, पण असं कुठेही वाटेत थांबणं नवर्‍याला मान्य नसल्याने या सगळ्यांकडे गाडीतूनच बघावं लागलं. कष्ट न करता चित्रदुर्ग पदरात पाडून घेण्यासाठी एवढी किंमत द्यावी लागणारच ना! 
रस्ता ... मख्खन!

गेस्ट हाऊस मधून दिसणारा किल्ला

किल्ल्याच्या समोरच केटीडीसीचं गेस्ट हाऊस आहे. त्याचं ऑनलाईन बुकिंग आदल्या दिवशी मिळालं होतं. गेस्ट हाऊस स्वच्छ, सर्व्हीस चांगली, खायला मेन्यू मर्यादित पण चव चांगली, किंमत वाजवी.
दोन – अडीचला तिथे जेवून किल्ला बघायला बाहेर पडलो. माऊने आतापर्यंत फक्त दिवाळीला विकत मिळणारे किल्ले पुण्यात बघितले होते, त्यामुळे “आई किल्ल्यावर माणसं पण आहेत का? (म्हणजे मावळे, शिवाजी महाराज वगैरे ठेवतात तशी) असा तिचा प्रश्न आला. आत शिरल्यावर मी तटबंदी वगैरे बघण्यात मग्न, नवरा गाईडच्या शोधात, तर माऊचा प्रश्न, “अग आई, पण किल्ला कुठे आहे इथे?” यालाच किल्ला म्हणतात हे काही फारसं पटलं नाही तिला. :)



हवा ढगाळ होती, पावसाची एक सरही येऊन गेली. त्यामुळे इतकी वर्षं ऐकून असलेल्या तिथल्या प्रसिद्ध उन्हाचा अजिबात त्रास झाला नाही. किल्ल्यावर हिंदी, इंग्रजी गाईड मिळतात. एक दीड तासात गाईडने किल्ला (पळवतच) फिरून दाखवला. त्याची माहिती सांगून झाली होती, पण एक एक जागा नीट बघायला मिळालेली नव्हती. ती परत येताना बघू, किंवा उद्या परत येऊन बघू अशी मनाची समजूत करून घेतली होती. या किल्ल्यावरचा प्रसिद्ध “मंकी मॅन” (कन्नडमध्ये “कोती राजा” म्हणतात त्याला.) आम्ही किल्ल्यात प्रवेश करत होतो तेंव्हाच नेमका बाहेर पडत होता. उद्या परत यायचंच आहे तेंव्हा तो भेटेल अशी आशा ठेवून पुढे निघालो. किल्ला अतिशय स्वच्छ ठेवलेला आहे. आणि तटबंदी, पायर्‍याची फारशी पडझड झालेली नाही. भुईकोट असल्याने बघायला बर्‍यापैकी गर्दी होती, पण कुठे “Vicky loves Pinky” गिरगिटून ठेवलेलं नव्हतं, कचराही नव्हता. किल्ल्यावर भरपूर माकडं आहेत. पक्ष्यांचे कॉलही भरपूर ऐकू येत होते. हंपीसारख्याच प्रचंड शिळा सगळीकडे पसरलेल्या. त्यातूनच चिरे घडवून तटबंदी, जोती वगैरे केलेली. या दगडाला एक सुंदर सोनेरी आभा आहे. वरचं बांधकाम विटांच आणि मातीचा गिलावा. हे फारसं शिल्लक नाही, फक्त कुठेकुठे अवशेष दिसतात.

मातीच्या भिंतीचे अवशेष
 आम्हाला किल्ल्यातली सगळ्यात प्रसिद्ध जागा – ओबव्वाची खिडकी – इथे सोडून, “आलात तसेच, त्या रस्त्यानेच परत जा” म्हणून गाईड गायब झाला. ही ओबव्वाची खिडकी म्हणजे पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी तटात सोडलेली भोकं आहेत. ओबव्वा ही मदकरी नायकाच्या एका सैनिकाची बायको. तिच्या नवर्‍यावर या भोकांच्या बाजूच्या बुरुजावर टेहळणीचं काम सोपवलेलं होतं. नवरा दुपारी जेवायला घरी आला, आणि ओबव्वा पाणी आणायला बाहेर पडली. तिला हैदरच्या सैनिकांची हालचाल जाणवली. पुढे होऊन बघते, तर त्या पाण्याच्या भोकांमधून सरपटत एक सैनिक किल्ल्यात प्रवेश करत होता. ओबव्वाने त्याच्या डोक्यात मुसळ घातलं आणि त्याला मारून टाकला. दुसरा सैनिक आला, त्याचीही तीच गत. नवरा जेवून आला, तेंव्हा ती मेलेल्या सैनिकांच्या मढ्यांच्या गराड्यात, हातात रक्ताने भरलेलं मुसळ घेऊन उभी होती! नवर्‍याने हल्ल्याची वर्दी दिली, आतलं सैन्य सावध झालं, आणि किल्ला वाचला. ही ओबव्वा आपल्या हिरकणीसारखी इतिहासात अमर झाली! तर ती पाण्याची भोकं पाहिल्यावर एवढ्याश्या भोकातून मोठा माणूस आत शिरेल यावर विश्वास बसेना. मग तिथे माऊसकट पूर्ण आत उतरून भोकांपर्यंत जाऊन पाहणं आलंच.  

ओबव्वाची खिडकी- पावसाचं पाणी जाण्यासाठीची जागा

ओबव्वाने शत्रूला बघितलंय! :)

इथे पोहोचेपर्यंत उद्या परत आल्यावर काय काय, कसं कसं बघायचं याची यादी तयार झाली होती मनात. गाईडने नुसत्या लांबून दाखवलेल्या कितीतरी जागा होत्या. भीम – हिडिंबेचा विवाह इथेच झाला अशी समजून आहे, आणि किल्ल्यावर हिडिंबेश्वराचं मंदिर आहे. ते नीट बघायचं होतं. किल्ल्यात एक सुंदर कातळ आहे, तो चढून गेल्यावर वर मंदिर, त्याच्या मागच्या बाजूला तलाव हे फक्त दुरून बघितलं होतं, तिथे माऊला जमत असेल तर चढायचं होतं. आणि मुख्य म्हणजे तटाच्या भिंटींवर माकडं चढतांना बघितली होती, तसाच चढणार्‍या त्या कोतीराजाचं आश्चर्य माऊला दाखवायचं होतं. 

पण इथे नेमका टिपू आडवा आला! टिपू प्रकरणामुळे चित्रदुर्ग गावातलं वातावरण तापलेलं होतं. दुसर्‍या दिवशी हिंदू संघटानांनी कर्नाटक बंद पुकारला होता अशी माहिती परततांना गेटवर आमचा गाईड परत भेटला त्याने सांगितली. मग नंतर बंद मागे घेऊन फक्त रास्ता रोको करण्याची घोषणा झाली. पण सकाळी लवकरात लवकर इथून बाहेर पडा, नाहीतर अडकून पडाल असा सल्ला गेस्ट हाऊसवरही मिळाला. उद्या बघण्याच्या सगळ्या प्लॅनवर पाणी पडलं. दुसर्‍या दिवशी सकाळी साडेसातला परत निघालो. पावणेआठला गावात बाजार भागात पोहोचलो, तर जमावाने दुकानं बंद करायला ऑलरेडी सुरुवात केलेली होती. (पुण्यात कसं, पावणेआठला दुकानं मुळी उघडणारच नाहीत कुणी बंद करायला!!!) मुख्य चौक बंद होता. आजवर कन्नड भाषा विशेष चांगली न येण्याने माझं फारसं काही अडलेलं नव्हतं, पण समोरून संपूर्ण रस्ता आडवून घोषणा देत येणारे लोक काय म्हणताहेत ते न समजल्याने कसं बेचैन वाटतं हे लक्षात आल्यावर आपल्याला शिकली पाहिजे ही भाषा नीट, हे परत जाणवलं. कुठल्या कुठल्या गल्ली बोळातून अखेरीस आम्ही हायवेला लागलो, आणि मग पुढचा प्रवास अगदी निर्विघ्न झाला. तर आता उरलेला चित्रदुर्ग पुढच्या ट्रीपमध्ये ... सगळं या टिपू सुलतानामुळे!!!

***
"चित्रदुर्गद कल्लिन कोटे" म्हणजे चित्रदुर्गचा दगडी किल्ला. एका प्रसिद्ध कन्नड गाण्यातले हे शब्द. बहुधा राजकुमारचं गाणं. पुढचं मागचं काहीही मला आठवत नाहीये, पण गाणं मस्त आहे ते! गाण्याचं चित्रीकरण चित्रदुर्गच्या किल्ल्यात आहे, आणि त्यात ओबव्वाची गोष्ट सांगितलेली आहे. गाणं इथे बघता येईल.

Sunday, November 8, 2015

दिवाळीच्या शुभेच्छा


दिवाळीची सुट्टी लागण्यापूर्वी माऊच्या शाळेचा शेवटचा दिवस. शाळेतून निघून सरळ घरी येणं माऊला कधीच मान्य नसतं. त्यामुळे आम्ही अजून शाळेतल्या घसरगुंडीवर, झोक्यावर आणि बाकीच्या खेळण्यांवर खेळतोय. तोवर शिक्षकांचीही शाळा सुटलीय. तिच्या प्रिन्सिपॉल शाळेतून निघाल्यात. माऊला त्या “हॅप्पी दिवाली!” म्हणतात. माऊ त्यांच्याशी जाऊन गप्पा मारते. तुम्ही कुठे चाललाय, इथे काय करत होता, घरी काय करणार, किती दिवस सुट्टी असे सगळे प्रश्न झाल्यावर “मी सुट्टीत गावाला जाणारे आज्जीकडे” म्हणून माहितीही देऊन होते. मला आमची शाळा आठवते आणि खरोखर हेवा वाटतो माऊचा आणि तिच्या टीचरचा. आमच्या शाळेत मुख्याध्यापक ही फक्त घाबरण्याची आणि लांब राहण्याची गोष्ट होती. त्यांनी तुम्हाला विश करणं, त्यांच्याशी गप्पा हे कल्पनेच्या पलिकडचं. म्हणजे आम्ही चौथीत असताना एकदा मधल्या सुट्टीत मुख्याध्यापक नुसते वर्गात आले तर त्यांना घाबरून एका मुलाची चड्डी ओली झाली होती! या असल्या शिस्तीच्या कल्पनांमुळे आणि फुकाच्या दरार्‍यामुळे मुलं आणि शिक्षक केवढ्या मोठ्या आनंदाला मुकत होती!

त्या टीचर गेल्यावर मग एकेक करून बाहेर पडणार्‍या बाकी सगळ्या टीचर, शाळेतल्या ताई, शिपाईदादा सगळ्यांना “हॅप्पी दिवाळी” म्हणून आणि गप्पा मारून होतात. माऊ जगनची मैत्रीण असल्याने बहुतेक अख्खी शाळा तिला ओळखत असावी. शाळेत सद्ध्या काहीतरी बांधकाम / दुरुस्ती चालू आहे. तिथे रोजंदारीवर काम करणारी एक मावशी तेवढ्यात तिथून जात असते. “मावशी हॅप्पी दिवाळी! तुझी सुट्टी झाली? तुला किती दिवस सुट्टी? तू गावाला जाणार आहेत सुट्टीत?” मावशीला सुट्टी मिळाली तर दिवाळी साजरी करता येत नाही हे अजून माऊला माहित नाहीये. पण इतक्या सहज तिला कुठल्याशी मावशीशी संवाद साधता येत असेल तर हे - आणि अजूनही बरंच काही - समजायला तिला वेळ नाही लागणार. आता मला माझाच हेवा वाटतो. तर तुम्हाला सगळ्यांना, आणि मी माऊ नसल्यामुळे सुट्टी मिळाली तर दिवाळी साजरी करू न शकणार्‍या ज्यांना हे सहज म्हणू शकत नाहीये, त्या सगळ्यांनाही दिवाळीच्या शुभेच्छा!!!

***

या वर्षी कंदील बनवायचा, वेळेवर बनवायचा आणि चांदणीचा बनवायचा एवढं सगळं आधीच ठरलेलं होतं. फक्त साहित्य आणि वेळ या दोन गोष्टी तेवढ्या हाताशी नव्हत्या. पण काल संधी मिळाली तिचा मी ताबडतोब फायदा घेतला.

माऊला एक गिफ्ट मिळाली होती त्यात छोटी चांदणी बनवण्यासाठीचे कागद, रंगवण्याचं साहित्य असं सगळं होतं, त्यामुळे कसा बनवायचा ते माहित होतं. ही आमची चांदणी:


अजून गो-लाईव्ह बाकीआहे, पण हा टेस्टींगचा फोटो:




पातळ कागद अजून थोडे पारदर्शक असायला हवे होते, प्रकाश कमी पडतोय असं यावर नवर्‍याचं मत. अर्थातच हा बग नसून फीचर आहे. टेस्ट एन्व्हायर्न्मेंटमध्ये दिव्याचा प्रकाश पुरेसा नव्हता. तरीही सूचना एन्हान्समेंट म्हणून स्वीकारून पुढच्या रिलीजला विचारात घेण्यात येईल. :)

पाच पाकळ्या करण्यासाठी एक कागद पुरत नव्हता, मग दोन रंगाच्या पाकळ्या केल्यामुळे सहा केल्या. पण सहा पाकळ्यांचा कंदिल तितका चांगला दिसणार नाही असं वाटलं त्यामुळे पाचच जोडल्या. उरलेली पाकळी माऊला. त्यावर कागद चिकटवून हा माऊचा कंदील तयार झाला : :D

Monday, November 2, 2015

जुळी मैत्रीण

माऊची एक जुळी मैत्रीण आहे. दोघींना एकत्र खेळताना पाहून आतापर्यंत इतक्या लोकांनी “या जुळ्या आहेत का?” म्हणून विचारलंय, की आता मी त्या “जुळ्या मैत्रिणी आहेत” म्हणून सांगायला सुरुवात केलीय! :) जुळी म्हणजे जवळजवळ सयामिज जुळ्यांसारखी अवस्था आहे दोघींची – जेवायला एकत्र, खेळायला एकत्र, एकीला रागवलं की दुसरीने सॉरी म्हणायचं. सुट्टीच्या दिवशी उठल्याबरोबर तोंडही धुण्यापूर्वी माऊचा प्रश्न असतो, “सखीकडे जाऊ?” दोघी दिवसभर इकडच्या घरी किंवा “आपल्या घरी” (म्हणजे मैत्रिणीकडे) अश्या फेर्‍याच घालत असतात. थोडा जास्त वेळ इकडे खेळलं की मैत्रीण मला “आई” म्हणते आणि माऊ तिथे खेळून आली की “गौरी मावशी” म्हणून हाक मारते! :D मैत्रिणीचं वकीलपत्र घेऊन जगातल्या कुणाशीही भांडायला माऊ सज्ज असते, आणि मैत्रिणीला पण दुसर्‍या कुणी हात लावलेला चालत नाही पण माऊची दंगामस्ती चालते!

दोघी एकत्र असल्या म्हणजे दुप्पट दंगा करतात. मधुनमधून (काही काही दिवशी सारखीच) भांडण, मारामारी होतेच, आणि दोघींनी दोन घरी खेळावं असं फर्मान मोठ्यांपैकी कुणीतरी काढतं. दोघी एकेकेट्या आपापल्या घरी खेळायची काहीही शक्यता नाही – त्यामुळे आम्ही मुळ्ळीच भांडणार नाही, मारामारी तर करणारच नाही म्हणून दोघी लग्गेच सांगतात. पण तरीही मोठ्यांनी ऐकलंच नाही, अगदीच नाईलाज झाला तर आधी विरहाच्या कल्पनेने रडारड होते, मग काही वेळा तर मैत्रीण आमच्या घरी आणि माऊ मैत्रिणीच्या घरी अश्या खेळायला जातात. :D  दोघी एकाच शाळेत असल्या तरी सुदैवाने एका वर्गात नाहीत, आणि शाळेची वेळ वेगळी असल्याने एका बसमध्येही नाहीत. नाही तर शाळेतल्या शिक्षिकांचं, ताईंचं, बसच्या ड्रायव्हर काकांचं काही खरं नव्हतं.


तर या जिवश्च कंठश्च सखीचं चित्र चारकोल पेन्सिल वापरून काढायचं मनात होतं. (अर्थात फोटोवरून – चित्र काढेपर्यंत या एकाजागी बसणं अशक्य आहे.) पण तिचा फोटो मिळाला तो फारच अवघड निघाला. किती प्रयत्न केले तरी ओठ आणि नाक फोटोसारखं जमत नाहीये. बरेच प्रयत्न करून मी शेवटी हार मानली आहे, आणि सद्ध्यातरी हे “फायनल” चित्र म्हणून जाहीर केलंय!


पेंटिंगपेक्षा स्केचिंग हे पटकन होणारं, कुठेही कधीही करता येणारं म्हणून माझ्या जास्त आवडीचं. त्यातही मागे चारकोल पेन्सिल वापरून बघितली ती पेन, पेन्सिलपेक्षा खूपच आवडली होती.  बर्‍याच वर्षांच्या खंडानंतर गेल्या महिन्यात नवं स्केचबुक, पेन्सिली, रंग हातात मिळाल्यावर पुन्हा चारकोल पेन्सिलची आठवण झाली आणि चित्र काढून बघितलं. रेषेतला आत्मविश्वास, जोमदारपणा पार गेलाय, आणि माध्यमाची ओळखही विसरलेली आहे. पण काढायला मजा येतेय. बघू किती दिवस उत्साह टिकतो आणि किती सुधारणा होते यात अजून ते!