Saturday, March 26, 2011

चकवाचांदण

    मारुती चितमपल्लींचं ‘चकवाचांदण’ वाचलं.

    शाळेत असताना मारुती चितमपल्लींचा धडा होता. बहुतेक रानकुत्र्यांविषयी. त्यात नवेगाव किंवा नागझिर्‍याच्या जंगलातली वर्णनं होती. जंगलच्या बोलीभाषेतले शब्द, अनोळखी वर्णनं यामुळे तेंव्हा काही विशेष गोडी वाटली नव्हती वाचताना.

    अरण्याविषयी मी पहिलं वाचलं होतं ते जिम कॉर्बेटचं. शाळेत आणि कॉलेजात ‘कुमाऊंचे नरभक्षक’, ‘मॅन इटिंग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग’, ‘टेंपल टायगर’ या पुस्तकांची किती पारायणं केली याची गणती नसेल. ही पुस्तकं वाचून वाचून माझ्यात नकळत एक आरामखुर्चीतला वन्यजीवअभ्यासक तयार झाला होता. ‘माझ्या’ जिम कॉर्बेटच्या तोडीची अरण्यविद्या दुसर्‍या कुणाजवळ असू शकत नाही आणि त्याच्याएवढं सुंदर लेखन या विषयावर कुणी करू शकत नाही असा एक गंड हा ‘वन्यजीव अभ्यासक’ उगाचच बाळगून होता. हिमालयाच्या पायथ्याची जंगलं ती खरी जंगलं. जिम कॉर्बेटचं लिखाण ते खरं लिखाण हे डोक्यात बसलं होतं. या फुकटच्या माजामुळे मी आजवर चितमपल्ली वाचले नव्हते.

    ‘नापास मुलांचं प्रगतीपुस्तक’ वाचत होते, त्यात चितमपल्लींची कहाणी होती. त्यांच्या चाचपडण्याच्या,धडपडीच्या दिवसांविषयीचं ते लिखाण वाचून मी वेडी झाले. पाच वर्षांपूर्वी आईने वाढदिवसाला ‘चकवाचांदण’ दिलं होतं, ते अजूनही न वाचण्याचा करंटेपणा आपण केलाय हे आठवलं. पुस्तक वाचायला घेतलं, आणि स्वतःच्याच बनचुकेपणाची लाज वाटली. ही सलग लिहिलेली आत्मकथा नाही. वेळोवेळी प्रकाशित झालेल्या लेखांवर संस्करण करून, काही भर घालून हे पुस्तक बनलं आहे. त्यामुळे सुरुवातीला एक - दोन प्रकराणात जरा कुठे लिंक न लागणं किंवा द्विरुक्ती जाणवली. पण चितमपल्लीं सांगताहेत ती गोष्ट एवढ्या ताकदीची आहे की, काही पानांतच तुम्ही त्यात गुंगून जाता.

    वाचून झाल्यावर एवढंच म्हणेन की हा वनात राहून ज्ञानसाधना करणार्‍या प्राचीन ऋषीमुनींच्या जातकुळीचा माणूस आहे. त्यांचं ज्ञान आणि लिहिण्याची शैली ग्रेट आहेच, पण त्यांची आयुष्यभर नवं शिकण्याची आच आणि जंगलांचं प्रेम त्याहूनही ग्रेट आहे.

Friday, March 18, 2011

जल्दी काहे की भाई...

    गेल्या दिवाळीत माझ्या बागवेडावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं... भाऊबीज म्हणून मला एक मस्त ऑर्कीड मिळालं - Yellow Phalaenopsis. मिळालं तेंव्हा ते असं दिसत होतं:


आता असं दिसतंय:


गेल्या चार महिन्यात त्यात झालेले बदल असे:

नोव्हेंबर - जैसे थे

डिसेंबर - जैसे थे

जानेवारी - एक एक फूल हळुहळू सुकून गळून पडलं.

फेब्रुवारी - त्याच दांड्यावर ४ नव्या कळ्या आल्या. एक एक कळी सावकाश उमलली.
मार्च - जैसे थे.

    याला म्हणतात तब्येतीत जगणं. कुठेही उगाचच घाईगर्दी नाही. अनावश्यक कष्ट नाहीत. एवढ्या महिन्यात पानांमध्ये काहीही बदल नाही. कसलेल्या गवयाच्या रागविस्तारासारखं एक एक पाकाळी फुलवत निवांत एक एक फूल उमलतंय. एकदम ग्वाल्हेर घराणं ... आज खिले सो कल खिले, कल खिले सो परसों, जल्दी काहे की भाई, अभी तो खिलना है बरसों!
 
    ऑर्कीडची निगा राखण्याविषयी मी पूर्ण अनभिज्ञ आहे. ते विकत घेताना त्याची काळजी घेण्याविषयी मिळालेल्या सूचना म्हणजे आठवड्यातून एकदा कपभर पाणी घाला, आणि सोबत दिलेल्या दोन लिक्वीड फर्टिलायझरच्या बाटल्यांपैकी एक घाला. किती? तर १० - १५ थेंब का बाटलीचं झाकण भरून याविषयी आणायला गेलेल्या मंडळींमध्ये मतभेद आहेत. खेरीज बाटल्यांवर नावं नाहीत, तेंव्हा जालावर धुंडाळण्याचा मार्ग खुंटलेला. (त्या संपल्यावर काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा.) पुन्हा एकदा त्या नर्सरीत जाऊन चौकशी केली, तर तिथल्या सुकन्येला असल्या कुठल्या ऑर्कीडविषयी काही माहिती नाही. अजून तरी मी घालते आहे तेवढं पाणी आणि खत त्याला मानवतंय असं दिसतंय. अर्थात एवढा मंद मेटाबॉलिझम असणार्‍या झाडाला ते मानवत नसलं, तरी समजायला वेळ लागेल.

    जालावरून मला इतकंच समजलंय की, हे ऑर्कीड तुलनेने निगा राखायला सोपं असतं. पण आपल्याकडच्या उन्हाळ्यात पाणी, खताचं प्रमाण किती बदलावं? खत बारा महिने कायम इतकंच घालायचं का? वर्षातून कधी याचा विश्रांतीचा काळ असतो का? कुंडी किती काळाने बदलायची? ऑर्कीडचं आयुष्य किती असतं? त्या दोन बाटल्यात नेमकं काय असेल? प्रश्न न संपणारे आहेत. पुण्यात कुणी ऑर्कीडतज्ञ तुम्हाला माहित असेल तर सांगा.

Monday, March 14, 2011

एक से मेरा क्या होगा?

    मोठी माणसं म्हणतात, जे काही कराल, ते भव्य-दिव्य करा. आपण त्याचं अनुसरण करावं. वेंधळेपणा करतानासुद्धा. तर मी कधी लहान सहान फुटकळ गोष्टींपुरता वेंधळेपणा करत नाही. एखादा दिवस म्हणजे वेंधळेपणामागून वेंधळेपणाची मालिका असते.

    म्हणजे फक्त एक लोकल ट्रेन चुकवायची नाही. ती चुकली, नंतर स्टेशनवरून लांबच्या पल्ल्याची गाडी चुकली, मग मोबाईल हरवला अश्या दोन - चार गोष्टी तरी हातासरशी एका दमात उरकून घ्यायच्या. तर परवा असा योग होता. ऑफिसमधल्या कॉलवर बोलता बोलता कुणाशी बोलतोय त्याचं नाव विसरले. मग ज्या डॉक्युमेंटविषयी बोलणं चाललं होतं, त्याचं नाव विसरले. त्यानंतर त्याच कॉलमध्ये बोलता बोलता मध्येच शब्दच न आठवणं अशीही गंमत करून झाली. आजचा दिवस खास आहे हे तेंव्हाच लक्षात आलं.

    घरी जायला निघताना लॅपटॉपचं पेडेस्टल लॉक उघडायला गाडीची किल्ली काढली. या किल्लीने आपल्याला काय करायचं होतं यावर दोन मिनिटं विचार केला. मग शांतपणे दुसरी किल्ली काढली, लॅपटॉप घेतला, धोपटीत टाकला, आणि निघाले. घरापर्यंतचा प्रवास तसा अनइव्हेंटफुल झाला. (आता लिफ्टमध्ये भेटलेल्या माणसाने स्वतःच्या मजल्यावर उतरायचं विसरल्यावर मला ‘सॉरी’ म्हणणं हा त्याचा वेंधळेपणा. माझा नाही. आणि पंपावरच्या माणसाने पेट्रोल भरल्यावर कॅप न लावणं याचंही क्रेडिट मी नाही घेणार.) घरी पोहोचतांना आजच्या सगळ्या वेंधळेपणांवर कडी केली. स्वतःच्या घरी जातांना वळायची विसरले!!!