Monday, February 28, 2011

Good Morning!

    सोमवारची सकाळ. तिला सकाळी उठायला नेमका उशीर झालेला. - एवढा उशीर - म्हणजे अगदी दातसुद्धा घासायच्या आधी डब्याची तयारी करायला हवीय. घासून आलेल्या भांड्यांच्या डोंगराएवढ्या ढीगातून कढई आणि झारा उपसत अर्धवट झोपेत ती मोबाईलचा अलार्म ऐकल्याचं आठवण्याचा एक क्षीण प्रयत्न करून बघते. खरंच आपण अलार्म बंद करून झोपल्याचं काही आठवत नाहीये. कधी वाजला बरं आलार्म? आजच्या सकाळला बहुतेक एक तास कमी होता एवढ्याच निष्कर्षापर्यंत पोहोचता येतंय.

    नवर्‍याच्या बसची वेळ गाठत त्याचा डबा भरल्यावर आपलं आवरायला सुरुवात. म्हणजे ऑफिसला निघायला उशीर, पोहोचायला उशीर, काम संपायला उशीर ... आज नेहेमीपेक्षा जास्तच धावपळ करायला हवीय.

    पार्किंगमध्ये गाडीसमोर दहा बारा माणसं जमलेली दिसतात. सगळी पांढर्‍या कपड्यात. मंदावलेल्या डोक्यात याचा काही अर्थ लागणार, एवढ्यात शेजारी बांबू, मडकं, कापड दिसतं. लोकांची खालच्या आवाजात चर्चा चाललीय. काय करावं हे न सुचून ती नुसतीच उभी. एवढ्यात कुणाचं तरी लक्ष तिच्याकडे जातं. गाडी काढायचीय? ते विचारतात. ती मान डोलवते. सामान बाजूला घ्यायला सुरुवात होते, आणि यांत्रिक सफाईने ती गाडी बाहेर काढते.

    रस्त्याला लागल्यावर डोकं हळुहळू चालायला लागतं. आपल्या सोसायटीमधलं कुणीतरी आज गेलं. दोन अडीचशे फ्लॅट्सच्या सोसायटीमध्ये आठ -दहा घरांपलिकडे आपण फारसं कुणाला ओळखत नाही. तिथे कुठला ओळखीचा चेहेरा दिसला नाही. विचारायला हवं होतं का कोण गेलं म्हणून? विचारून काय प्रकाश पडणार होता तसाही - लगेच उठून सांत्वनाला तर जाता येणार नव्हतं ना? एकदम ‘शीतयुद्ध सदानंद’सारखं काहीतरी वाटायला लागतं.

    कितीही उशीर झाला तरी रस्त्यावर ड्रायव्हिंग करताना घाई नाही ... ती स्वतःलाच बजावते. विनाकारण हॉर्न वाजवणं थांबतं. हळुहळू गर्दीची लय आणि तिची लय एक होते. एफ एमवर आवडतं गाणं लागतं, आणि वेगळ्याच विश्वात घेऊन जातं. सकाळची प्रसन्न हवा जाणवायला लागते. After all, its a fresh new day. अनपेक्षितपणे ऑफिसच्या पार्किंगमध्ये सोयीची जागा मिळते. धडपडत डेस्कवर पोहोचून मेल चेक करताना लक्षात येतं ... आज ऑफिसमध्ये तसा निवांत दिवस आहे. शुक्रवारी दोन डेडलाईन्स होत्या ... आता नुसतं बसून कस्टमर फीडबॅकची वाट बघायचीय. जरा सैलावून श्वास घेणार, एवढ्यात इन्स्टंट मेसेजरवर सहकार्‍याचा मेसेज येतो."Hi, good morning! How are you?"

    काय पण प्रश्न आहे. How should I know? सकाळपासून तपासायला वेळच नाही झाला. थांब जरा बघते आणि मग सांगते.

Wednesday, February 23, 2011

प्रिय विनील,

श्रावण मोडक यांनी प्रसिद्ध केलेलं हे बोलकं पत्र विचार करायला लावणारं आहे. तुमच्याशी ते शेअर करावंसं वाटलं, म्हणून इथे कॉपी - पेस्ट केलंय. तुम्हाला भावलं, तर तुम्हीही आवश्य ब्लॉगवरून, मेलमधून हे अजून पुढे प्रसारित करा !

**************************************


ओरिसातील मलकनगिरीचे जिल्हाधिकारी आर. विनील कृष्णा यांचे, त्यांच्यासमवेत असणारे अभियंता पवित्र माझी यांच्यासह, माओवाद्यांनी अपहरण केले. विनील यांचे मलकनगिरीतील काम असे आहे, की त्यांच्या सुटकेसाठी माओवाद्यांचा प्रभाव असूनही आदिवासीच रस्त्यावर आले आहेत. फक्त आदिवासीच नव्हे, तर सर्वदूर समाजही. नेमकं काय घडतं आहे तिथं? सुरक्षा न घेता विनील जंगलात गेले, हा आता मुद्दा होऊ पाहतोय. खरंच त्यांचं चुकलं? ओरिसातच आयएएस अधिकारी असणारे सचिन जाधव यांनी विनिलला उद्देशून लिहिलेलं हे खुलं पत्र.
-------------------------------------------------------------------------------------------------------

प्रिय विनील,

    परवा मध्यरात्री एका जिल्हाधिकारी मित्राचा फोन आल्यापासून झोप उडालीय. म्हणाले, ‘माओवाद्यांनी विनीलला डिटेन केलंय’. फोन कलेक्टरांचाच असल्यामुळे बातमीची खातरजमा करण्याचा प्रश्नच नव्हता. मग निष्फळ फोनाफोनी सुरु झाली. काय झालंय हे समजून घेण्यासाठी फक्त. तपशील समजले. डिटेन नव्हे तर अपहरणच. पण उपयोग काय?

    रात्री दोन वाजता एका मित्र एसपींचा (पोलीस अधीक्षक) फोन आला. माझ्याकडून त्यांना तपशील पाहिजे होते. मी काय कप्पाळ तपशील देणार? ते पूर्वी मलकनगिरीत एसपी होते. “कशाला असं सिक्युरिटी न घेता नक्षल भागात फिरता रे?” कळवळ्याने ते म्हणाले. त्यांची अस्वस्थता माझ्या लक्षात आली. तुझ्यावर सगळेच पोलीस वैतागले असले तर आश्चर्य नाही रे. तुझ्यावर आख्खी एस्टॅब्लिशमेंटच वैतागली असणार. अस्वस्थ करण्याची शक्ती घेऊनच जन्माला आलायस.

   तू मयूरभंजमध्ये आयएएस प्रोबेशनर असतानाच एखाद्या कार्यकर्त्यासारखं स्वत:ला झोकून दिलं होतंस. मोटरसायकल घेऊन सिमलीपालच्या जंगलात वेळी-अवेळी एकटाच जायचास. आदिवासी पाड्यांवर फिरायचास. त्यांना जवळून बघायचास. त्यांच्यासाठी योजनांमध्ये, नियमांमध्ये अपवाद करण्यासाठी कलेक्टरांशी बोलायचास. आम्हाला सिमलीपाल दोनच गोष्टींसाठी माहीत होतं – पर्यटन स्थळ, आणि नंतर माओवाद्यांचा अड्डा. तू याच्या पलीकडे गेला होतास. वयाच्या पंचविशीतच. ही समज घेऊनच तू जन्माला आला होतास.

    तुला एका ठिकाणी पोस्टिंग मिळालं, आणि त्याचवेळी कंधमाळमध्ये धार्मिक दंगली सुरु झाल्या. या दंगलींना आदिवासी विरुद्ध दलित असा कुठेही न सापडणारा रंग होता. सरकारला एक कलेक्टर, एक एस्पी आणि एक सबकलेक्टर हवा होता. टू फिक्स द थिंग. आणि चारच महिन्यांत तुला डिस्टर्ब करुन कंधमाळला पाठवला. तुम्ही तिघांनी तिथे अजोड कामगिरी केलीत. आंतरराष्ट्रीय निरीक्षकांचा पूर्वग्रहही तुमचे काम झाकोळू शकला नाही.

    मलकनगिरी जिल्हाधिकारी पदासाठी तुझी निवड झाली तेंव्हा बऱ्याच जणांना आश्चर्य वाटले. एवढे चांगले काम करणाऱ्याला ही शिक्षा? हाच अनेकांचा प्रश्न होता. मलकनगिरीमध्ये कुणी पाय ठेऊ धजत नाही. नक्षलवाद्यांची अघोषित राजधानी. पण सुजाण मुख्यमंत्री इथे कर्तव्यकठोर अधिकारीच पाठवतात हे फार थोड्या जणांच्या लक्षात येते. तुझ्याअगोदर इथे नितीन जावळेंनी चांगल्या कामांचा पायंडा पाडून ठेवलेला होताच. तुझे ग्राऊंड बऱ्यापैकी तयार होते. तू त्यावर सुंदर बाग फुलवलीस. मलकनगिरीत आजमितीस तू जेमतेम एक वर्ष पूर्ण केलेस. लाल दिव्याच्या गाडीचे तुला कधीच आकर्षण नव्हते. मलकनगिरीत त्याची गरजही नव्हती तुला. नाडलेल्या आदिवासींना मदत करण्यासाठी तुला कशाचीच गरज नव्हती. मनासारखे काम करता येण्यासाठी तुला फक्त स्वातंत्र्य आणि एक यंत्रणा हवी होती. ती तुला मिळाली.

    तुझ्या मनात या आदिवासींसाठी इतके प्रेम आहे की तुला भीती म्हणून काय ती नाहीच. या भागात दुसरा एखादा अधिकारी काय करेल? एकतर बाहेर पडायचे नाही. पडले तर हेवी सिक्युरिटी असल्याशिवाय नाही. आर ओ पी (रोड ओपनिंग पार्टी) आधी पुढे जाणार. लॅण्डमाइन्स तपासणार. साग्रसंगीत उपचार होणार. अर्धा दिवस त्यातच जाणार. मग आपलं भोज्जाला शिवून अधिकृत भेट उरकून अंधार पडायच्या आत आपल्या सुरक्षित ठिकाणी परत यायचं. पण तुझी रीतच न्यारी. तू आणि तुझा ड्रायव्हर. पीएसओ नाही, आरओपी नाही. हत्यार तर नाहीच नाही. जिथंपर्यंत गाडी जाईल तिथंपर्यंत जायचं. जिथं रस्ता संपेल तिथं तुला घ्यायला एखादा तहसीलदार, एखादा बीडीओ, एखादा इंजिनियर आलेला असायचा. मोटरसायकल घेऊन किंवा चालत. जेवण त्यांच्यासोबतच. सगळं एकदम शिवाजी महाराज स्टाइल. लोकांच्यात बसायचं. बोलायचं. आणि जे करता येण्यासारखं असेल ते लगेच करायचं. जे करता येण्यासारखं नाही, ते त्यांना समजावून सांगायचं.

    हे एवढं आदिवासींसाठी खूप होतं. तू त्यांच्यासाठी वनवासात आलेला रामच जणू.

    आदिवासी गांजलेले. एका बाजूने नक्षल. दुसऱ्या बाजूने पोलीस, सीआरपी. दोन्हीकडून मार. खायची मारामार. नक्षलवाद म्हणजे काय हे त्यांना कुठून समजणार? नक्षलींनी आदिवासींची पोथी बरोबर वाचलेली होती. त्यांची मनं जिंकायची त्यांना गरजच नव्हती. जे त्यांना जरा बरे वाटत, त्यांना ‘रिक्रुट’ करीत. बाकीच्यांचा काही फरक पडत नसे. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी स्वत: त्यांच्या पाड्यावर येत असेल तर त्यांना तुझ्यात देव दिसल्यास नवल नाही.

    हे आम्हाला आज समजलं. तुला नक्षलवाद्यांनी पकडून नेल्यावर ज्या गावातून तुला त्यांनी नेलं, त्याच गावातल्या आदिवासींनी उत्स्फूर्त मोर्चे काढले, तुला सोडावा म्हणून. सगळं मलकनगिरी बंद आहे आज. कुणीही न सांगता. तू याआधी काम केलेला कंधमाळ जिल्हाही बंद आहे. तोही तसाच. उत्स्फूर्तपणे. ज्या आदिवासींसाठी काम करत असल्याचा दावा नक्षल करतात, त्याच आदिवासींनी नक्षलांना ठणकावून सांगितले, आमच्या कल्याणाची काळजी असेल, तर अगोदर कलेक्टरांना सोडा. आम्हाला तेंव्हा कळलं, तू काय आणि कसं काम करतोयस ते. आज सगळ्या राज्यात निदर्शने चालू आहेत. कलेक्टरसाठी नाही, तर विनीलसाठी.

    एक फार मोठा विरोधाभास आज लोकांना पहायला मिळाला.

    कुडमुल्गुमा नावाच्या दुर्गम ब्लॉकमध्ये तू गेला होतास. जनसंपर्क मेळाव्यासाठी. तिथं जाणं सोपंही नाही, आणि शहाणपणाचंही नाही. रस्त्या-रस्त्यावर सुरुंग लागलेले असतात. तू गेलास ते गाव तर भलतंच कुप्रसिद्ध. हे कुडमुल्गुमा त्याच भयावह बालिमेडा जलाशयाच्या जवळ, जिथे दोन वर्षांपूर्वी जवानांनी भरलेली आख्खी बोट नक्षल्यांनी बॉंबहल्ल्याने बुडवली होती. हा ‘त्यांचा’ इलाका. पंधरा ग्रामपंचायती त्यांच्या. या भागात सरकारी माणसानं यायचं नाही. पोलीस, सीआरपी तर लांब.

    तू इथे जायचास. एकदा नाही, दोनदा नाही, नेहेमी. खरं तर तू इथेच, १५१ गावांवर, कट ऑफ गावांवर, तुझं लक्ष केन्द्रित केलंस. तू जाऊ लागलास, आणि लोकांनाही वाटलं इथं काम होतंय. इथल्या लोकांनी एकदा मागणी केली, आम्हाला ब्लॉक ऑफिस लांब होतंय, तर तू थेट त्या गावांमध्ये गेलास, आणि ब्लॉक ऑफिस आठवड्यातून एक दिवस तिथे, असं खरंच चालू केलंस देखील. लोकांमध्ये जसजसा प्रिय होत गेलास, नक्षली वेट अॅण्ड वॉच करत राहिले असावेत बहुदा, तुझा आत्मविश्वास वाढत गेला. तुला सिन्सिअरली वाटत होतं, इथं सरकार पोचलं नाही म्हणून नक्षलवाद आला. आता तो घालवायचा असेल, तर सरकार तिथं गेलं पाहिजे.

    विनील, ज्या दिवशी तू गेलास तो दिवस इदचा होता. सरकारी सुट्टीचा. तू सुट्टी न घेता काम करत होतास. भीतीने सुनसान ओस पडलेले रस्ते पार करून तू सिलेरू नदीच्या काठी गेलास. तिथून बोटीने नदी ओलांडून त्या गावी पोहोचलास. का, तर सरकार गावांत पोचलं पाहिजे यासाठी. शिबिर झालं. लोकांचे समाधान केलंस. वनाधिकाराचे दाखले वाटलेस. पेन्शन दिलीस. आवास योजनेचे लाभ दिलेस. मग एका स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्याने तुला आग्रह केला, “सर, इथे जनतापै गावात विद्युतीकरणाचं काम बघायला चला.” आणि तू विनाविलंब गेलासही. मोटरसायकलवर. सोबत फक्त दोन ज्युनिअर इंजिनियर घेऊन. जंगलात. खोल गुहेत जणू. जिथून परत आलेली पावलं दिसत नाहीत. तुझे एकूणच स्वयंसेवी संघटनांवर भाबडे प्रेम आहे. त्या लोकांनी तुला परत पाठवलेच नाही. एका इंजिनियरला परत पाठवले – असं सांगून की, ‘आम्ही सरांची काळजी घेतो, तू जाऊन सरकारला ही चिठ्ठी दे, सांग अठ्ठेचाळीस तास, आमच्या मागण्या आणि कलेक्टरचे प्राण.’ तुझे डोळे बांधून तुला चालवत सहा जण जंगलात घेऊन गेले.

    आजही तुला चालवलंच जातंय. रोज वेगळ्या ठिकाणी. जागा बदलत. का, तर तुझ्या सुटकेसाठी सारं काही पणाला लावू पाहणाऱ्या आदिवासींनाही ते शक्य होऊ नये. असं म्हणतात की, त्यांनी आता मोर्चेबांधणीही केली आहे.

    विनील, तू म्हणायचास, या लोकांसाठी काम करायला मला पाठवलंय, मी ते करतोय, हे लोक मला कसा काय अपाय करतील? तुझा विश्वासघात झाला दोस्ता.

    आता आज बऱ्याच जणांच्या मनात काय विचार सुरू असतील ठाऊक आहे? ऐक.

    विनिल, वेड्या, तुला कल्पना आहे का तू सरकारला किती मोठ्या काळजीत टाकलंयस त्याची? आम्हाला एकाच वेळी तू उत्तम अधिकारी, प्रशासक वाटतोस, आणि त्याच वेळी अविचारी साहसी आदर्शवादी तरुणही वाटतोस. तुला काय गरज होती तिथं जायची? पकडलेले जे नक्षल आता तुझ्या बदल्यात सोडले जातील त्याबद्दल तुलाच आता सगळे जबाबदार धरणार असं वाटत नाही तुला? एकतर तिथं जायचंच नव्हतंस. किंवा गेलास तर सुरक्षेचा जामानिमा घेऊनच जायचंस. वेडा. बेजबाबदार. अदूरदर्शी. असा कसा रे कलेक्टर तू?

    हे आणि असंच बऱ्याच जणांच्या मनात येत असणार याची मला कल्पना आहे. हे असले प्रसंग तर होतच असतात असंही म्हणणारे महाभाग मला भेटले आहेत. विनायक सेनांच्या मानवी अधिकारांची चिंता वाहणाऱ्यांना तुझ्या मानवी हक्कांचा विचार करावासा वाटणारच नाही, कारण तू तर जालीम सरकारी व्यवस्थेतला बाबू! सरकारचा जावई! चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला वगैरे वगैरे. तुझ्यासाठी सरकार आकाशपाताळ एक करणार याची या विचारवंतांना पक्की खात्रीच. त्यामुळे ते आपली वाफ कशाला दवडतील?

    पण मला काय वाटतं सांगू? तू जिंकलायस विनील. तू हादरवून सोडलंयस या तथाकथित माओवाद्यांना. ज्यांच्या कल्याणाच्या गोष्टी ते करतात, त्या आदिवासींनीच आज त्यांना सणसणीत चपराक मारलीय, ‘आम्हाला तुम्ही नको, विनील हवाय,’ असं ठणकावून सांगून. तुला प्यादं म्हणून वापरायच्या नादात नक्षल्यांनी आपलं थडगं खणून ठेवलं. यू आर देअर नेमेसिस.

    विनील, आम्हाला क्रांतिकारक हवेत. आणि तेही तुझ्यासारखे. यंत्रणेचा योग्य वापर करून लोकांचं आयुष्य बदलवण्यासाठी स्वत:चं आयुष्य पणाला लावणारे. यंत्रणेच्या नावाने खडे फोडणारे विचारवंतही नकोत, आणि यंत्रणाच बदलायला हवी म्हणून अजून एक अन्याय्य यंत्रणा बळजबरीने माथी मारणारेही नकोत. तू हे अशा प्रकारे काम नसतंस केलं तरी तुला कुणी जाब विचारणार नव्हतं. उलट तुला सहानुभूतीच मिळाली असती, बिचारा मलकनगिरीत पोस्टिंग झालंय, याच्या कुटुंबाचं, मुलांचं कसं होणार, याच्या सॉफ्ट पोस्टिंगसाठी कुठे प्रयत्न करायला सांगूयात, इत्यादी.

    तू हिरो आहेस विनील. आय ए एस आहेस म्हणून नाही. जिल्हाधिकारी आहेस म्हणून नाही. जिवाची बाजी लावून जग बदलायला निघालेला शिलेदार आहेस. केवळ स्वप्न न बघता झोकून देणारा कार्यकर्ता आहेस. म्हणूनच तू हवा आहेस आम्हाला.

    तुझा वेडेपणा हवाय विनील आम्हाला. तुझ्यासारखे ‘वेडे’च नक्षलवादाच्या वेडाला मूठमाती देऊ शकतात.

    आय सॅल्यूट यू, सर!

 सचिन जाधव, आयएएस, ओरिसा

Tuesday, February 22, 2011

कोणार्क

    सुट्टीमध्ये थोडा ओरिसाचा फेरफटका झाला. ओरिसामध्ये बघण्यासारखं म्हणजे पुरी आणि कोणार्क. दोन्ही भुवनेश्वरहून जाण्यासारख्या जागा आहेत. आपलं वाहन असेल, तर भुवनेश्वरहून पुरी आणि कोणार्क दोन्ही एका दिवसात बघता येतं.  भुवनेश्वरमध्ये असलेलं लिंगराज मंदिरही पुरीच्या जगन्नाथ  मंदिराच्याच शैलीतलं. खेरीज इतिहासाची आवड असेल, तर भुवनेश्वरजवळ धौलीही बघायला आवडेल. सम्राट अशोकाचा शिलालेख, तिथे नव्याने बांधलेला शांतीस्तूप, कलिंगचं युद्ध जिथे झालं  ती राणभूमी या गोष्टी धौलीला आहेत. भुवनेश्वरजवळ खंडगिरी - उदयगिरी ही प्रसिद्ध जैन लेणीही आहेत. हे सगळं एका दिवसात भुवनेश्वरहून बघता येतं. हे या भटकंतीमधले फोटो. (यातले बरेचसे फोटो आळश्यांच्या राजाने काढलेले आहेत.)

    कोणार्कला जाताना वाटेत - ओरिसाच्या हस्तकला विकणारं रंगीबेरंगी दुकान. गावाचं नाव विसरले :(


    "ही जागा पुरातत्वखात्याच्या मालकीची आहे .... फोटो काढण्यास सक्त मनाई" वगैरे नेहेमी दिसणार्‍या प्रेमळ पाट्यांऐवजी पुरातत्त्व खात्याने इथे छान मंदिराची माहिती दिली आहे. अशी माहिती महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांवरही लिहिण्याची बुद्धी आपल्या पुरातत्त्व खात्याला होवो!


    मंदिराचा संपूर्ण परिसर. समुद्रकिनार्‍यावर, मऊ दगडात बांधकाम केल्यामुळे खूप झीज झालेली आहे. डागडुजी / दुरुस्ती चालू आहे. उत्तरायण - दक्षिणायनाप्रमाणे सूर्याचे किरण गर्भगृहात कसे प्रवेश करतील याचा अभ्यास करून मंदिराची रचना केलेली होती.    हे छोटे खांब एकविसाव्या शतकात मंदिरासमोर फोटो काढता यावा म्हणूनच केले होते गंग राजानी :)

    मंदिराचा side view. या मंदिराच्या बांधकामामध्ये चुन्याचा वापर नाही. लोखंडी सळया वापरून दगड एकमेकांवर बसवलेले आहेत! कळसामध्ये एक शक्तीशाली लोहचुंबक बसवलेलं होतं. सोळाव्या शतकात कळसामधलं लोहचुंबक काढून टाकल्यानंतर गर्भगृहाचा कळस पडला, हळुहळू गर्भगृहाचा फक्त चौथरा उरला. (आमच्या गाईडच्या सांगण्याप्रमाणे या लोहचुंबकामुळे वास्को द गामाचा कंपास नीट दिशा दाखवत नव्हता, म्हणून त्याने ते लोहचुंबक काढून टाकलं :D) आज जे काय उभं आहे, ते लॉर्ड कर्झनच्या (बंगालची फाळणी करणारा हाच लॉर्ड कर्झन) कृपेने. चौथर्‍यावरचा डावीकडे मोकळा दिसणारा भाग म्हणजे मूळ गर्भगृहाची जागा.


    सूर्यमंदिराचं प्रसिद्ध चाक ... अशी एकूण २४ चाकं आहेत - प्रत्येकावरचं कोरीव काम वेगवेगळं. कुठे दिवसाचे आठ प्रहर, तर कुठे ऋतू.


    कोणार्कहून पुरीला जाणार्‍या रस्त्यावरचा हा निवांत समुद्र! अंधारात पुरीचं मंदिर बघण्यापेक्षा इथेच थोडा वेळ निवांत बसावं म्हटलं. जगन्नाथ इथेच भेटला. :)


 

Wednesday, February 16, 2011

तपोभूमी आणि योगायोग

    सुट्टीची सुरुवात नवर्‍याबरोबर वैष्णोदेवी आणि रणथंबोरला जाऊन करायची होती. चार महिने आधीपासून सगळा प्लॅन तयार होता, सगळी कन्फर्म बुकिंग हातात होती. इतक्या सुखासुखी ठरल्यासारखा प्रवास झाला तर त्यात काय मजा ... तर ऐन वेळी नवर्‍याला ऑनसाईट जावं लागलं, आणि ही सगळी बुकिंग कॅन्सल करणं नशीबात आलं. त्यानंतर जाणवलं, आपल्या सुट्टीच्या पहिल्या दहा दिवसांच्या प्लॅनचीच वाट लागली आहे. एवढ्या महिन्यांच्या प्लॅनिंगनंतर घेतलेल्या सुट्टीचे इतके दिवस वाया घालवायचे? तातडीने ‘प्लॅन बी’ बनवायला हवा होता. सुट्टीचा एक उद्देश घरातली आणि मनातली अडगळ काढून टाकणं हा होता... त्यामुळे स्वच्छ कोरी पाटी घेऊन मग पुढे भटकता यावं, म्हणून विपश्यना शिबिराला जाणार होते. आता शिबिराच्या आधी करूनही ज्याचा उपयोग होईल असं काहीतरी हवं होतं. त्यामुळे सुट्टीची सुरुवात पॉंडिचेरीला अरविंदाश्रमापासून करायचं ठरवलं. यापूर्वी शाळेत असताना पुण्यातल्या एका संस्थेच्या गटाचा भाग म्हणून अरविंदाश्रमात गेले होते, आणि आता दुसर्‍यांदा भेट देऊन मी त्या पहिल्या भेटीची जादू तर गमावून बसणार नाही ना अशी शंका मनात होती, तरीही.

   
    कुठल्याही तपोभूमीवर तुम्ही गेलात, तर मन फार लवकर एकाग्र होतं, सहज ध्यान लागतं. तिथे आधी केलेल्या साधनेची व्हायब्रेशन्स असतात असं म्हणतात. अरविंद - माताजींच्या तपोभूमीमध्ये ते पुण्यापेक्षा लवकर भेटतील म्हणून पॉंडिचेरीला जायचं. अरविंदांची समाधी आणि समुद्र एवढ्या दोनच गोष्टींसाठी. जमलंच तर शेजारच्या ‘ऑरोव्हिले’मधलं ‘मातृमंदिर’ बघायचं. एवढंच ठरवून निघाले.

    पॉंडिचेरीला आश्रमात जाणं हा ऐनवेळी ठरलेला प्लॅन - त्यामुळे रेल्वेचं रिझर्वेशन मिळालं नव्हतं. ‘तात्काल’ मध्ये मिळवण्याचे प्रयत्न बुकिंगच्या दिवशी वीज, नेट, रेल्वेची बुकिंग साईट यांनी संगनमताने हाणून पाडले, आणि नाईलाजाने दोन दिवसांनंतरचं फ्लाईटचं बुकिंग करणं भाग पडलं. सुट्टीतले सगळे प्रवास कमीत कमी खर्चात करण्याचा माझा बेत पहिल्याच प्रवासात धुळीला मिळाला.

    निघताना विमान टेक ऑफ घेणार एवढ्यात नवर्‍याचा फोन - "शक्य असेल तर प्रवास कॅन्सल कर - चेन्नई, पॉंडिचेरी आणि जवळपासच्या किनारपट्टीवर गेले दोन दिवस प्रचंड पाऊस पडतोय, इव्हॅक्युएशन चालू आहे. उगाच जाऊन चेन्नईला अडकशील." गेल्या दोन दिवसात बातम्या वाचणे, ऐकणे, बघणे याच्या फंदात मी पडले नव्हते. आता चेन्नईला गेल्यावर जे होईल ते होईल म्हणून शांत बसणं एवढाच पर्याय होता. चेन्नईला विमान पोहोचलं तेंव्हा पावसाचं नमोनिशाण नव्हतं. तिथून पुढचा प्रवास सुरळीत झाला, आणि एकदाची पॉंडीला पोहोचले. आश्रमाच्या गेस्ट हाऊसचा प्रवेश बघून अपेक्षाभंग झाला... मागच्या भेटीत बघितलेल्या ‘फ्रेंच क्वार्टर’मधल्या सुंदर प्रशस्त रस्त्यांवरच्या गेस्ट हाऊसच्या इमारती कुठे, आणि धड प्रकाश नाही, समोरच्या कळकट शेवाळलेल्या भिंतीवरून पाणी वाहतं आहे अश्या जुनाट रस्त्यावरचं हे गेस्ट हाऊस कुठे असं वाटलं. खोलीत सामान टाकायला गेले, तर फक्त एका झिरो पॉवरच्या बापुडवाण्या बल्बचा प्रकाश. म्हणजे पाऊस पडत असला तर खोलीत वाचत बसणंही शक्य नाही. रात्री आठ वाजता तिथे पोहोचूनही ‘रात्रीचं जेवण ऑर्डर करण्याची वेळ संपली, आता जेवण मिळणार नाही’ हे ऐकून तर झक मारली आणि पुन्हा इथे येण्याच्या फंदात पडले असं वाटलं. माझा चेहेरा बघून बहुधा काऊंटरवरच्या माणसाला दया आली असावी. ‘जेवण मिळालं नाही तरी स्नॅक्स मिळतील’ त्याने पुस्ती जोडली. गेस्ट हाऊसच्या कँटीनमध्ये जेवणाच्या दुप्पट ‘स्नॅक्स’ खाऊन रूममध्ये पोहोचल्यावर खोलीत मोठ्या दिव्याचं चालणारं बटन सापडलं आणि मला ब्रह्मानंद झाला.

    दुसर्‍या दिवशी सकाळी नाश्ता करताना काही मराठी मंडळी भेटली. त्यांच्याकडून समजलं,की ते पोहोचले तेंव्हापासून मी पोहोचले त्या दिवशी संध्याकाळपर्यंत धुवांधार पाऊस पडत होता ... काल संध्याकाळी पहिल्यांदा सूर्यदर्शन झालं. म्हणजे मी उगाचच पावसात अडकू नये म्हणून त्या दिवशी रेल्वेने मला तिकिट न मिळण्याची व्यवस्था केली होती तर! ‘तत्काल’ न मिळाल्यावर रेल्वेला दिलेले शिव्याशाप मी परत घेतलेत.:)

    सकाळी जरा स्थिरस्थावर झाल्यावर पॉंडीचा नकाशा घेऊन बाहेर पडाले, आणि भर दुपारी घाम पुसत ब्युरो सेंट्रलमध्ये - आश्रमाच्या माहिती केंद्रामध्ये जाऊन थडकले. ‘डायनिंग हॉलची कूपन संपली, दुसरी जेवणाची व्यावस्था तुमची तुम्हाला करावी लागेल, ऑरोव्हिलेला आज जाता येणार नाही’ असा सगळा नन्नाचा पाढा ऐकून वैतागून बाहेर पडले. आधी पोटोबाची सोय केली, आणि मग उगाचच पुन्हा त्याच माहितीकेंद्रात जाऊन काही माहिती मिळते का ते बघावं म्हणून परत आले. आता एकदम ट्रान्स्फर सीन होता. मनापासून, छान माहिती देणारा भेटला. मातृमंदिराला कसं जायचं ते त्याने सांगितलं, बाकीची माहिती दिली. डायनिंगची कूपन मिळाली नाहीत म्हटल्यावर जेवायला मिळालं ना याची आवर्जून चौकशी केली. सहज त्याला विचारलं, "विमलताईंना मी मागे भेटले होते ... त्यांची भेट होऊ शकेल का?" विमलताई या पुण्यातून अरविंदाश्रमात आलेल्या जुन्या साधिका. "विमलताईंना भेटायला तुम्हाला उशीर झालाय ... त्या तीन महिन्यांपूर्वी गेल्या." त्याच्याकाडून धक्कादायक माहिती मिळाली. "पण मराठी प्रकाशन विभागाचं काम आता जे बघतात, त्या प्रभाकरभाईंना तुम्ही भेटू शकता." त्याने प्रभाकरभाई सापडण्याची जागा आणि वेळ सांगितली. (अजून एक योगायोग - दुसर्‍या दिवशी डायनिंग हॉलजवळ त्याची भेट झाली, आणि त्यानेच प्रभाकरभाईंची गाठ घालून दिली.)

    पॉंडीजवळच ‘ऑरोव्हिले’ नावाचं एक ग्लोबल व्हिलेज उभारलं जातंय. मागच्या भेटीमध्ये इथल्या मातृमंदिराचं बांधकाम चालू असताना बघितलं होतं, आणि तेंव्हा तिथे काम करणार्‍या एका साधकानी "हे काम पूर्ण व्हायला अजून पंचवीस वर्षं लागतील." असं सहज सांगितलं होतं. एकवीस वर्षांनी तिथे परत जाताना हा संवाद आठवला. मातृमंदिराचं काम नियोजनाप्रमाणे चाललंय - आता इमारतीचं काम पूर्ण झालंय, आणि आजुबाजूचं लँडस्केपिंग चालू आहे! पाऊस असला, तर मातृमंदिराला भेट देता येत नाही. अगाऊ बुकिंग असल्याशिवाय आत प्रवेश मिळत नाही. ध्यान करण्यासाठी ही अतिशय सुंदर जागा आहे, त्यामुळे नुसतं ‘बाहेरून एक सुंदर वास्तू बघितली’ यावर समाधान मानण्यापेक्षा अगाऊ बुकिंग करणं (आणि त्या दिवशी पाऊस नसावा अशी प्रार्थना करणं) वर्थ आहे.

    या पूर्ण ट्रीपमध्ये काढलेला हा एकमेव इंटरेस्टिंग फोटो. बाकी आश्रमाच्या वास्तूंमध्ये फोटो काढायला मनाई आहे, आणि समुद्रावर फोटो काढावासाच वाटत नव्हता!

    प्रभाकरभाईंना निवांत वेळ घेऊन भेटले. गेली ६० वर्षं ते आश्रमात राहताहेत ... १९५० साली योगी अरविंदांच्या निधनानंतर काही महिन्यांनी ते इथे आले, आणि तेंव्हापासून इथेच आहेत. आज वयाच्या ८७व्या वर्षीसुद्धा ते काम करतात - रोज सकाळी डायनिंग हॉलमध्ये दोन तास, नंतर आश्रमाच्या मार्बलींग उद्योगामध्ये, आणि दुपारनंतर मराठी प्रकाशन विभागात! अरविंदांच्या, मदरच्या सांगण्यानुसार रोजच्या आयुष्यातलं प्रत्येक काम हे साधना म्हणून करण्याचं हे एक उदाहरण. एक - दोन नाही, गेली साठ वर्षं त्यांची ही साधना चाललीय.आध्यात्मिक बळ असल्याशिवाय असं काम कुणी करू शकणार नाही असं वाटतं. ब्युरो सेंट्रलला दुसर्‍यांदा जायची मला बुद्धी झाली नसती तर त्यांना भेटण्याची ही संधीही हुकली असती!

Friday, February 11, 2011

कार्यरत: रायनर

    आपल्या जवळपास काही माणसं असतात. न बोलता, शांतपणे त्यांचं काम चाललेलं असतं. या माणसाचं केवढं ग्रेट काम आहे, ते आपल्याला नुसतं बोलून भेटून कधी समजणारही नाही. अशीच काही माणसं भटकंतीमध्ये भेटली, तर काही या भटकंतीच्या आधी भेटलेली आता या सगळ्याचा विचार करताना आठवली. सर्च किंवा हेमलकसा इतकं त्यांचं काम मोठं झालेलं नाही, पण आपल्याला जमेल तेवढं, जमेल तसं काम कसं करावं, ते यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. त्यांच्याविषयी लिहिल्याशिवाय या भटकंतीची गोष्ट पूर्ण होणार नाही. - तर या विषयावरची ही पहिली पोस्ट.
*************************************************************
    संगणकक्षेत्रातलं काम म्हणजे दर प्रोजेक्टला नवी विटी, नवं राज्य. दर वेळी नवी टीम, नवे सहकारी. कधी कधी खूप इंटरेस्टिंग माणसं भेटतात, त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं, पण काम संपलं, म्हणजे सगळे इतक्या वेगाने पांगतात, की कितीतरी सुंदर ओळखी मैत्रीमध्ये बदलण्यापूर्वीच संपून जातात. रायनर माझा असाच एका प्रोजेक्टमधला सहकारी. एक ‘दीर्घकालच्या मैत्रीमध्ये बदलू शकली असती तर खूप आवडली असती’ अशी ओळख.

    आमच्या ओळखीची सुरुवात फारशी उत्साह वर्धक नव्हती. खरं तर रायनर एका दुसऱ्या कंपनीचा. आमच्या कंपनीने त्यांना टेकओव्हर केलं, आणि मनात नसताना रायनर या कंपनीत येऊन पोहोचला. त्यात त्याचा प्रोजेक्ट ऑफशोअरिंगसाठी निवडला गेलेला, आणि मी ‘ऑफशोअर’वरून आलेले. गेली दहा वर्षं जे काम मी करतो आहे, ते कोणी भारतात बसून करून दाखवेल यावर त्याचा विश्वास नव्हता, आणि दुर्दैवाने आमची ऑफशोअर टीमसुद्धा त्याचं म्हणणं खरं करून दाखवत होती. त्यामुळे आमच्या पहिल्या भेटीच्या वेळी ‘ही आता आणखी कशाला इथे’ असे भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. पण चार माणसांच्या त्याच खोलीत मला बसायला जागा मिळाली, आणि सहवासातून हळुहळू एकमेकांची ओळख होत गेली. थोडं काम आम्ही एकत्र केलं, आणि "together we make a great team" हे दोघांनाही पटलं. माझा जर्मनचा सराव करण्याचा बेत त्याच्या इंग्रजीच्या सराव करण्याच्या इच्छेपुढे बारगळला.

    रायनरच्या मशीनचा वॉलपेपर म्हणजे आल्प्सच्या पार्श्वभूमीवर एक रेस्क्यू हेलिकॉप्टर असा फोटो. थोडासा धूसर. आवर्जून वॉलपेपर म्हणून निवडावा असं काही मला त्या फोटोविषयी वाटलं नाही, त्यामुळे एकदा सहज त्याला विचारलं. तरूणपणी आल्प्समध्ये गिर्यारोहण करताना त्याला एकदा अपघात झाला, पाय मोडला. हा फोटो त्याच्यासाठी आलेल्या रेस्क्यू हेलिकॉप्टरचा. त्या हेलीकॉप्टरच्या खाली लोंबकळत त्याला हॉस्पिटलपर्यंत आणलं गेलं. त्यानंतर कित्येक महिने तो अंथरुणाला खिळून होता. नंतर सुदैवाने पूर्ण बरा झाला, पण हा फोटो समोर असला, म्हणजे ‘परिस्थिती तितकी वाईट नक्कीच नाही’ याचं स्मरण होतं, म्हणून अजूनही तो फोटो त्याच्या वॉलपेपरला होता.

    युरोपातली झाडं मला अनोळखी. त्यामुळे हिवाळा संपून वसंत सुरू झाला, आणि एका एका खराट्याचं झाडात रूपांतर व्हायला लागलं, तसतसा मी दिसतील त्या झाडांचे फोटो काढून ‘हे कुठलं झाड’ म्हणून रायनरला विचारायचा सपाटा लावला. त्या वर्षी उन्हाळा खूप मोठा, फारसा पाऊस नसलेला होता. दर शनिवार- रविवारी कॅमेरा आणि पाण्याची बाटली घेऊन माझं फुलांचे फोटो काढत भटकणं चाललं होतं. गुलाबी हॉर्स चेस्टनटच्या सुंदर फुलांचा फोटो मग रायनरने मला काढून आणून दिला.

    कितीही काम असलं, तरी रायनर आठवड्याचे तीन दिवस साडेपाचच्या पुढे ऑफिसमध्ये बसत नाही याचं मला आश्चर्य वाटायचं. नंतर समजलं - हे तीन दिवस तो स्वाहेली शिकायला जातो. याला एकदम स्वाहेली का बरं शिकावंसं वाटावं? मी विचार करत होते. तर केनियामधलं एक खेडं याने दत्तक घेतलंय. तिथे शाळा सुरू केलीय, तिथल्या दवाखान्यालाही मदत चालू आहे. बसल्या जागेवरून तिथे पैसे पाठवण्यापुरता त्याचा सहभाग मर्यादित नाही. दर वर्षी सुट्टीमध्ये रायनर आणि क्लाउडिया - त्याची बायको - स्वतः या गावाला भेट देतात. तिथल्या लोकांशी संवाद साधणं सोपं जावं म्हणून हा स्वाहेली शिकत होता! या कामासाठी नवरा- बायको दोघं मिळून एक संस्था चालवतात. रायनरने संस्थेसाठी वेबसाईट तयार केलीय. हे सगळं करताना आपण काही फार मोठं ग्रेट करतोय असा कुठलाच भाव नाही, त्याचं ओझं नाही. आपल्या शाळेविषयी तो जितक्या प्रेमाने बोलतो, तितक्याच प्रेमाने दुपारी ऑफिसमधल्या पोरांबरोबर ‘किका’ (फूसबॉल) खेळणार. ऑफिसच्या खोलीत दंगा करणार, रोज जिन्समध्ये येणार्‍या एका सहकार्‍याला कस्टमर व्हिजिटसाठी कडक फॉर्मलमध्ये यावं लागल्यावर दिवसभर त्याला चिडवून भंडावून सोडणार. एकदा एक सहकारी आमच्या या दंगेखोर खोलीमध्ये काहीतरी डिस्कस करायला आली, आणि दीड तास अखंड एकसूरी बडबडात होती. ती खोलीच्या बाहेर पडल्याबरोबर मी रायनरला म्हटलं, आमच्याकडे हिंदीमध्ये म्हणतात "इतनी बाते करनी होती तो भगवान ने दो मुह और एक कान दिया होता।". रायनरने हे खोलीतल्या व्हाईट बोर्डवर रोमन लिपीत लिहून घेतलं, आणि दुसर्‍या दिवशी ती बाई आल्यावर त्याचा हिंदीचा जोरदार ‘अभ्यास’ सुरू झाला. हे वाक्य गाण्यासारखं चालीवर म्हणून त्याने खोलीतल्या बाकी तिघांना चेहेरे सरळ ठेवणं अवघड करून ठेवलं. यापुढे कधी त्या बाईने आमच्या खोलीत यायची हिंमत केली नाही :)

    आपल्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या तिथल्या अवतारात रायनरची निवड झाली. आमच्या खोलीतल्या दंग्यात केबीसीच्या तयारीची भर पडली. अचानक "भारतामध्ये सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असणारं राज्य कुठलं?" यासारखे प्रश्न आमच्यावर बरसायला लागले. जय्यत तयारीनिशी रायनर शोच्या शूटिंगसाठी गेला. जाताना त्याला विचारलं, जिंकलेल्या पैशांचं काय करणार? "घराची दुरुस्ती आणि शाळेसाठी फर्निचर" रायनरचं शांत उत्तर. सगळे पैसे मलाच हवेत असा हव्यास नाही, आणि सगळे शाळेसाठी वापरून नंतर मग थोडे घराला हवे होते म्हणून हळहळणं नाही. मनात म्हटलं, देवा याला मिळू देत दहा लाख युरो. तो पैसा कसा वापरायचा ते याच्याएवढं कुणाला समजत नसेल. रायनर तिथे शेवटून तिसर्‍या प्रश्नापर्यंत यशस्वीरित्या पोहोचला, आणि ते पैसे त्याने नक्कीच आधी ठरवल्याप्रमाणे वापरले असतील अशी खात्री वाटते.

    ऑनसाईट असाईनमेंट संपवून परतताना रायनरला म्हटलं, तुझा मला हेवा वाटतोय. मला जे करावंसं वाटतं पण अजूनही माझ्या वेळेच्या, पैशाच्या गणितात बसत नाही, ते सगळं तू आज जगतो आहेस!

Thursday, February 10, 2011

राणीच्या बागेत

जिथे सूर जुळतात, अश्या दोस्तांबरोबर पोटभर गप्पा मारायच्या, सकाळ संध्याकाळ गरमगरम आयतं जेवण जेवायचं, मनात आलं की सिनेमे बघायचे, पुस्तकांची, गाण्यांची देवाणघेवाण करायची. मस्त पाहुणचार झोडायचा.याला निव्वळ चैन म्हणतात. अशी चैनही करायला मिळाली सुट्टीत आळश्यांच्या राजाकडे. आळश्यांच्या राजाच्या राणीने मस्त बाग फुलवलीय. हे त्या बागेतले काही आळशी क्षण.
***
जिथे वर्ष - दोन वर्षांपलिकडे कोणी राहात नाही, अशी सरकारी क्वार्टर्स साधारणपणे फार बापुडवाणी दिसतात. त्यांची डागडुजी, निगा यात कोणाला रस नसतो. अश्या क्वार्टरची बाग एवढी सुंदर फुलवणार्‍या सुलभाला दाद द्यायलाच हवी!

Wednesday, February 9, 2011

हेमलकसा

    चंदाताई आठल्ये अमेरिकेत असतात. आनंदवन, हेमलकसा, सर्च या प्रकल्पांना अर्थसहाय्य मिळवून देण्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. शिवाय भारतात सुट्टीसाठी आलं म्हणजे त्या आवर्जून तिथे जातात, कधी हेमलकसाच्या वार्षिक सर्जरी कॅम्पमध्ये मदत, कधी आनंदवनाच्या रोजच्या कामामध्ये मदत असा प्रत्यक्ष कामात सहभागही घेतात. सर्चमधून दोन बस बदलून मी धडपडत हेमलकसाला जाणार म्हटल्यावर त्यांनी सहज म्हटलं, आम्ही उद्या हेमलकसाला जाणारच आहोत, गाडीत भरपूर जागा आहे. तू आमच्याबरोबर आलीस तर तुझा प्रवासाचा वेळ आणि त्रास वाचेल. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मीही त्यांच्याच बरोबर जायचं ठरवलं. त्यांचं बोट धरून हिंडल्यामुळे त्यांच्या पुण्याईचा फायदा आपसुकच मलाही मिळाला.

    तर चंदाताईंबरोबर त्यांची बहिण, लेखिका संध्याताई कर्णिक आणि मी गडाचिरोलीहून शनिवारी सकाळी निघालो. दुपारी आम्ही हेमलकसाला पोहोचलो. गाडीतून उतरून जरा स्थिरस्थावर होतोय, तोवर एक शंभरएक शाळकरी पोरांचा लोंढा तिथे येऊन पोहोचला - प्राणी बघायला. पोरांचा कल्ला चालला होता, आणि शिक्षक फारसं मनावर घेत नव्हते. त्यांची ही दर वर्षीची ‘प्राणीसंग्रहालयाची सहल’ असावी. यापलिकडे जाणून घेण्यासारखं हेमलकसामध्ये काही आहे हे त्यांच्या गावीही नसावं. अश्या ठिकाणी आपण जातो तेंव्हा तिथल्या लोकांना किमान पूर्वसूचना द्यावी, त्यांची अडचण होणार नाही असं बघावं एवढं किमान पथ्य पाळणं अवघड आहे का?

    हेमलकश्याला नागपूरचे रोटरी क्लबचे डॉक्टर दरवर्षी दोन दिवसांचा सर्जरी कॅम्प घेतात. आम्ही गेलो तेंव्हा सर्जरी कॅम्प नुकताच संपलेला होता. इथले पेशंट दूरदूरहून येणारे. प्रवास जिकिरीचा. पैश्याचा प्रश्न. पुन्हा गावात गेल्यावर कुठ्यल्याच वैद्यकीय सेवा नाहीत. त्यामुळे साधं डोळ्यांच मोतीबिंदूचं ऑपरेशन असलं, तरी पेशंट सगळ्या कुटुंबाबरोबर येतात. पेशंटचे नातेवाईक बंदिस्त खोलीत राहण्यापेक्षा रुग्णालयाबाहेरच्या मोकळ्या पटांगणावर राहतात, तिथेच तीन दगडांच्या चुलीवर त्यांचा स्वयंपाक चालतो. चांगलं बरं वाटेपर्यंत त्यांची दावाखान्यातून सुट्टी होत नाही. असे बरेच पेशंट आणि नातेवाईक अजून प्रकल्पावर होते.

    दुपारच्या तळपत्या उन्हात अनिकेत आमटेनी आम्हाला प्रकल्प दाखवला. हेमलकसा हा गडचिरोलीचा अतिशय दुर्गम आणि मागास भाग. अजूनही पवसाळ्यात ओढ्याला पूर आला म्हणजे हेमलकश्याचा बाहेरच्या जगाशी संबंध तुटतो. इथे कामाला सुरुवात केली तेंव्हा फक्त जंगल होतं - वीज नाही, रस्ते नाहीत, डोक्यावर छप्परसुद्धा नाही. डॉक्टर आमटे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अक्षरशः शून्यातून हे सगळं उभं केलेलं आहे. इथल्या आदिवासींना त्या काळात शेती माहित नव्हती. शिकार किंवा जंगलात मिळणारी फळं, कंदमुळं हे त्यांचं खाणं. वाघ, अस्वल, चिमणी, उंदीर जो मिळेल तो प्राणी शिकार करून खायचा ही पद्धत. एवढी शिकार झाली होती, की इथे कामाला सुरुवात झाली तेंव्हा जंगलात चिमणीचा आवाजसुद्धा यायचा नाही - सगळे पक्षी मारून खाल्लेले. कधीकधी शिकार करताना आईबरोबर लहान लहान पिल्लं सापडायची, आदिवासी तीही खाऊन टाकायचे. अन्नाचं दुर्भिक्ष्यही होतं, आणि इतकं लहान पिल्लू एकट्याने जंगलात जगणंही शक्य नसायचं. अशी लहान पिल्लं जर तुम्ही इथे आणून दिली, तर त्यांच्या बदल्यात आम्ही तुम्हाला अन्नधान्य देऊ असं डॉक्टर आमट्यांनी आदिवासींना सांगितलं - आदिवासींनी आणून दिलेली वेगवेगळ्या प्राण्यांची पिल्लं त्यांनी जिवापाड सांभाळली - त्यातून प्रकल्पावरचं प्राण्यांचं अनाथालय उभं राहिलं आहे. त्यामुळे इथल्या प्रत्येक प्राण्याची कथा हीच - आईवेगळं लहान पिल्लू, इथे मोठं झालेलं, जंगलामध्ये आज स्वतंत्रपणे जगू शकणार नाही म्हणून आजही इथेच राहणारं. या प्राण्याचा खर्च भागवण्यासाठी सरकारी अनुदान नाही. सरकारी प्राणीसंग्रहालयं या प्राण्यांची काळजी घेऊ इच्छित नाहीत, उलट कधीकधी तेच इथे प्राणी आणून सोडतात. वन्यप्राणीविषयक कुठले कुठले कायदे लावून प्रकल्पाला धारेवर मात्र धरलं जातं. आजही या प्राण्यांचा खर्च वैयक्तिक देणगीदारांकडून मिळणार्‍या देणग्यांमधून होतो. इतक्या वर्षांच्या प्रयत्नांनंतर आता अश्या शिकारीचं प्रमाण कमी झालंय. एके काळी महिन्याला १०-१२ पिल्लं इथे आणली जायची, आता वर्षाला १०-१२ येतात.

    प्रकल्पावर सुमारे ६०० मुलामुलींची निवासी शाळा आहे. शाळेत शिकून पुढे आलेली इथली आदिवासी मुलं आज उच्चशिक्षणही घेताहेत. मुलींची संध्याकाळची प्रार्थना बघायला आम्ही त्यांच्या वसतीगृहावर गेलो. नव्या वसतीगृहाची इमारत बघितली. प्रत्येक मोठ्या खोलीत १५- २० बंक बेड, आणि फळीवर मुलींच्या ओळीने लावून ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या थैल्या. प्रत्येकीचं सामान बस एवढंच. शहरात शाळेत जाणार्‍या माझ्या भाचरांना एकदा इथे शिकणार्‍या मुलींच्या आयुष्यात डोकवायला मिळालं पाहिजे असं वाटलं. एवढ्या थंडीत स्वेटर नाही, चपला नाहीत म्हणून कुडकुडत मेसला जाणार्‍या वर्गमैत्रिणी त्यांच्या उच्चाभ्रू शाळेत कश्या सापडणार?

    संध्याकाळच्या चहाला पुन्हा चंदाताईंच्या पदराला धरून इथले प्रकल्पावरचे एक जुने कार्यकर्ते बबनभाऊ पांचाळ यांच्या घरी जायला मिळालं. बबनभाऊ इथल्या दवाखान्याचे ‘नारायण’ आहेत. शेजारच्या छोट्या सिद्धीचं या आजोबांशिवाय पान हलत नाही. सूर्यास्त बघायला त्यांच्याबरोबर इंद्रावती नदीच्या संगमावर गेलो होतो, तेंव्हा सिद्धीची कहाणी समजली. सिद्धीचा बाबा हा आश्रमाच्या शाळेत शिकून पुडे आलेला पहिला दंतवैद्य. दुर्दैवाने सिद्धीच्या जन्माआधीच त्याचा साप चावून अपघाती मृत्यू झाला, आणि पोटातल्या बाळासकट बायको उघड्यावर पडली. घरचा फारसा आधार नाही, पदरी येऊ घातलेलं मूल. तीही प्रकल्पावरच्या शाळेचीच विद्यार्थिनी. तिला मग इथल्याच दवाखान्यात काही काम लावून दिलं, आणि बबनभाऊ तिच्या मुलीचे - सिद्धीचे आजोबा झाले. या नात्यातली सहजता खूप भावली. चंदाताईंबरोबर अजून एका जुन्या कार्यकर्त्यांशी बोलताना असंच त्यांच्याकदून ऐकायला मिळालं ... एक मुलगी वाढवायची म्हणते आहे. बाबांनी एक आदिवासी मुलगी मोठी केली, प्रकाशभाऊ - विलासभाऊंनीही एकेक मुलगी दत्तक घेतली. मलाही एका मुलीला मोठं करायचंय! या सगळ्या कार्यकर्त्यांची आपल्याला माहिती नसते. त्यांना कुणी पुरस्कारांनी सन्मानित करत नाही. काम मोठं झालं तरी ते बिनचेहेर्‍याचेच राहतात. मी तर प्रकाशभाऊ-मंदाताई भेटणार नाहीत म्हटल्यावर इथे येऊच नये असा विचार करत होते ... चंदाताईंमुळे हेमलकसाचं अंतरंग थोडंफार बघायला मिळालं.

*************************************************************

    हेमलकश्याच्या शाळेला आज किमान २० संगणकांची गरज आहे. आपण या बाबतीत नक्कीच मदत करू शकतो. हा निधी उभा करण्यासाठी तुमचा सगळ्यांचा सहभाग हवाय. या प्रकल्पाच्या कामातला आपला खारीचा वाटा उचलू या!

प्रकल्पाचा पत्ता आणि अन्य माहिती:

http://lokbiradariprakalp.org/
aniketamte@gmail.com

लोक बिरादारी प्रकल्प, हेमलकसा
मु.पोस्ट भमरागड
जिल्हा गडचिरोली
पिन ४४२ ७१०

फोन नंबर: +९१ ७१३४ २२०००१
फॅक्स: +९१ ७१३४ २२०११२

डॉ. प्रकाश आमटे - 9423121803
श्री. अनिकेत आमटे - 9423208802
डॉ. दिगंत आमटे - 9421782993

*************************************************************
हे हेमलकसाचे काही फोटो ... मंडळी, कालच्या सर्चवरच्या पोष्टीतही खाली फोटू आहेत - मी त्याचा उल्लेख करायची विसरले आहे :(

Tuesday, February 8, 2011

शोधाच्या गावाला जाऊ या

    बिरबलाच्या गोष्टीत एक माणूस असतो. तो एकीकडे अंधारात हरवलेली चीजवस्तू दुसरीकडे उजेड आहे म्हणून तिथे शोधत असतो. खरं तर स्वतःचा शोध घेण्यासाठी भटकणं काहीसं तसंच. पण नवी माणसं भेटल्यावर, नव्या जागा बघितल्यावर कदाचित एखादा नवा पैलू सापडेल. ज्यांच्याकडे बघून काही मार्ग सापडेल अशी ग्रेट माणसं दिसतील या विचाराने सुट्टीत भटकंती करायचं ठरवलं होतं. त्यातलाच एक मुक्काम म्हणजे सर्च शोधग्राम, गडचिरोली.
    डॉक्टर अभय आणि राणी बंग यांचं इथल्या आदिवासींच्या आरोग्यासाठी चालणारं काम आणि त्याच वेळी त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लॅन्सेटसारख्या नियतकालिकातून प्रसिद्ध होणारे शोधनिबंध याविषयी वाचलं होतं, आणि खरोखर "Think globally act locally" चा हा नमुना बघण्याची बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती. अखेरीस तो योग जुळून आला. खरं तर असं काम बघायला हौशे-नवशे-गवशे भरपूर येत असणार. तिथल्या लोकांनी यांना किती एन्टरटेन करायचं? त्यामुळे सर्चशी संपर्क साधताना मनात थोडी धाकधूक होती. पण इथे इतकं मनापासून स्वागत झालं, की सगळ्या शंका दूर झाल्या. पहिल्याच दिवशी संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर राणीताई- अभयभाऊंनी चौकशी केली. आणि अभयभाऊंनी जेंव्हा ‘इथे तुझ्यासारखे अस्वस्थ आत्मे भरपूर आहेत!’ म्हणून सांगितलं, तेंव्हा आपण अगदी योग्य ठिकाणी आलोय याची खात्री झाली. ‘गौरी आपल्याला भेटायला आलीय तिची नीट काळजी घ्या ग’ म्हणून राणीताईंनी सगळ्यांना सांगितलं, आणि मग मी एकटीच इथे आले आहे हे विसरूनच गेले. रात्री माझ्यासारखीच अजून एक पाहुणी तिथे येऊन पोहोचली, आणि मग तर आमची वर्षानुवर्षांची गट्टी असावी अश्या गप्पा सुरू झाल्या.
    दिवसभर तिथल्या वेगवेगळ्या विभागांमध्ये भटकून त्यांच्या कामाची माहिती करून घ्यायची, संध्याकाळी सगळे प्रार्थनेसाठी एकत्र जमतात तेंव्हा दिवसभरातल्या कामांचा आढावा, मनमोकळ्या गप्पा, आणि मग रात्री शेकोटीशेजारी बसून मस्त जेवण. आपण कधी इथले होऊन जातो ते कळतच नाही. स्वतःला शोधणार्‍या, आपल्या आजुबाजूच्या लोकांसाठी काही करू इच्छिणार्‍या तरुणांचा एक vibrant गट इथे भेटतो. कुणी चार आठवडे, कुणी काही महिने, कुणी दोन वर्षं असं काम करायला, वेगवेगळ्या क्षेत्रातले उच्चशिक्षित तरूण इथे त्यांचं स्वप्न घेऊन येतात. कम्युनिटी लाईफ म्हणजे रूक्षच असलं पाहिजे असं नाही - कार्यकर्त्यांमध्ये दिसणारे सहज खेळीमेळीचे संबंध, सर्चच्या परिसरामध्ये वारंवार जाणवणारी सौंदर्यदृष्टी आणि योजकता फार सुखावून जाते. संध्याकाळच्या सूर्यप्रकाशात सर्चच्या आवारातलं छोटं तळं आणि तळ्याकाठची अभ्यासिका बघितल्यावर तर मला थोरोच्या वॉल्डनचीच आठवण झाली. सुसज्ज ग्रंथालय, statistical analysis विभाग, आदिवासी कला संग्रहालय, मॉं दन्तेश्वरी दवाखाना सर्व वास्तूंची बांधणी आदिवासींच्या घरांशी जवळीक सांगणारी.
    सर्चच्या पुढाकाराने जवळपासच्या आदिवासी गावांमध्ये खेळाच्या स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धा बघायला राणीताईंबरोबर ‘वाघभूमी’ गावाला जायची संधी मिळाली. एक गाव स्पर्धा भरवतं, त्यासाठी जवळपासच्या गावांमधून स्पर्धक संघ येतात. स्पर्धा भरवणारं गाव सगळ्या पाहुण्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था, मैदान तयार करणं अशी सगळी कामं वाटून घेतं. गावातल्या प्रत्येकाच्याच हे घरचं कार्य - सगळेच झटून कामाला लागतात. स्पर्धेच्या वेळी येणार्‍या पाहुण्यांच्या जेवणासाठी दोन दोन महिने आधी खास भाज्यांचे वाफे तयार केले जातात. स्पर्धेला लागणार्‍या खर्चासाठी गावातले तरूण ठेक्याने काम घेऊन पैसे साठवतात. प्रत्येक घरी एका गावाचे खेळाडू अशी सगळ्या पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था. मोहाची दारू हा इथल्या आदिवासी जीवनाचा अविभाज्य भाग, पण स्पर्धेच्या काळात गावात कोणी दारू गाळत नाही, बाहेरगावाहूनही आणत नाही. आपल्या गावाला पाहुण्यांनी नावं ठेवायला नकोत, स्पर्धा यशस्वी झाल्या पाहिजेत म्हणून सगळे धडपडतात. व्हॉलीबॉल कबड्डी आणि नेमबाजी अश्या स्पर्धा - त्यात मुलांचे आणि मुलींचे सामने. स्पर्धा चुरशीच्या झाल्या तरी कुठे निकालावरून भांडणं नाहीत, जिंकलेल्या संघाचं खिलाडू वृत्तीने कौतुक. राणीताई म्हणाल्या, अश्या स्पर्धा फक्त आदिवासी भागातच होऊ शकतात. पंचांशी भांडणं नाहीत, प्रतिस्पर्ध्यांविषयी वाईट बोलणं नाही, आयोजनाच्या कामामध्ये भांडणं नाहीत. वीस - तीस उंबरठा असणारी छोटीशी वस्ती बाहेरून कुठलंच अर्थसहाय्य न घेता इतके नेटके सामने घेऊन दाखवते! अख्खं गाव सोडा - पण गल्लीमध्ये, सोसायटीमध्ये अश्या प्रत्येकाचा सहभाग असणार्‍या स्पर्धा आयोजित करून कुठल्याही भांडणाशिवाय तडीस नेता येतील?
    राणीताईंना बघताना जाणवते, ती त्यांची सहज मिसळून जाण्याची वृत्ती. त्यांनी प्रेमाने ‘बेटा’ म्हणून हाक मारली म्हणजे जाणवतं, ही खरंच सगळ्यांची आई आहे ... इथले तरूण कर्यकर्ते त्यांना ‘अम्मा’ म्हणून हाक मारतात, आणि अभयभाऊंना ‘नायना’(तेलुगुमध्ये वडिलांना नायना म्हणतात) म्हणून.
    अभय भांऊशी गप्पा मारायची इच्छा होती. त्यांच्या व्यस्त दिनक्रमामध्ये आपल्यासाठी वेळ काढायला सांगायचा संकोच वाटत होता, पण त्यांना विचारलं - आणि त्यांनी सहज ‘परवा आपण फिरायला बरोबर जाऊ या’म्हटलं. डोक्यातला सगळा गोंधळ त्यांच्यापुढे ओतला, आणि त्यांनी इतक्या प्रेमाने मला समजणार्‍या भाषेत तो गुंता कसा सोडवायचा ते दाखवलं!
    अमेरिकेत राहूनही इथल्या कामांशी नाळ जोडून असणार्‍या चंदाताई आठलेंची सर्चमध्ये भेट झाली, पुढचा मुक्काम - हेमलकसा त्यांच्याबरोबरच गाठला. हेमलकसाविषयी पुढच्या पोस्टमध्ये.
**********************************************************************
सर्चच्या statistical analysis विभागाच्या महेशभाऊंना सध्या VB .Net मध्ये काही मदत हवी आहे. त्यासाठी सर्चला जाण्याची आवश्यकता नाही - स्काईपवरून मर्गदर्शन केलेलंही पुरेसं आहे. तुम्ही काही मदत करू शकत असाल तर नक्की सांगा.
Search - Gadchiroli