Sunday, November 13, 2016

ताजी ताजी सकाळ

   ताज्या ताज्या सकाळी, फिरायला गेल्यावर आज अशी नागमोडी वाट भेटली.


    मग गवतातली गंमत. आधी इथे गवताला भाले फुटतात.:)


    मग त्या भाल्यांची अशी नाजुक सुबक तोरणं होतात. दोन दिवस दिमाखात मिरवतात, मग त्यातली ती पांढरी पदकं जांभळी होतात, कधीतरी अलगद जमिनीवर उतरतात. मी मुद्दलात ते भालेच इतकी वर्षं बघितलेले नव्हते, मग पुढची ही गंमत कळणार कशी?

    वाटेवरून जातांना एक पाऊलसुद्धा वाकडं न टाकता जरा डोळे उघडे ठेवल्यावर ताजे ताजे पंख सुकवत बसलेली फुलपाखरं भेटली –


याने तर फसवलंच ... त्याचा खोटा डोळा आणि खोट्या मिश्याच आधी खर्‍या वाटल्या होत्या मला!


मोर दिसला नाही पण एक पीस ठेवून गेला होता आमच्यासाठी :)


 ***
    तशा मला वेगवेगळ्या गोष्टी करायला, अनुभवायला आवडतात. पण मला बरं वाटण्यासाठी रोज मी नव्या देशात, नव्या शहरातच (खरं तर नव्या डोंगरावरच) डोळे उघडयला हवेत असं नाही. फक्त डोळे उघडल्यावर नवा थरार अनुभवायला मिळाला पाहिजे एवढं खरं. याला आत्मसंतुष्टता म्हणायचं का?का हे अंथरूण पाहून पाय पसरण्याचं गोड नाव आहे ? महत्त्वाकांक्षेचा आभाव आहे का हा? (खरं म्हणजे आहेच. पण त्याला इलाज नाही. माझं असच्चे!) रोजच्याच आयुष्यात नव्याने गोष्टी दिसणं, नवे अनुभव येणं – being able to see things in new light is the high I yearn for. म्हणजे तुम्ही जगभर हिंडलात, पण मिळाणारे अनुभव टिपून घेऊच शकला नाहीत, तर त्या फिरण्याला काय अर्थ? तर जगभर भटकायचं कधी जमेल ते बघू (पैशे???), पण सध्या दिसतंय ते बघण्याचा सराव करायला काय हरकत आहे म्हणते मी.

    या “बघण्याच्या सरावाची” गुरू म्हणजे हायडी. हायडी मला फार आवडते, कारण तिची नजर मेलेली नाही. रोज सूर्य उगवतांना – मावळतांना बघूनसुद्धा तिला त्याचं अजीर्ण झालेलं नाही. म्हणून रोज ती “त्यात काय बघायचंय?” म्हणत नाही, ती

    “The wonder of the moment
    To be alive, to feel the sun that follows every rain”

    अनुभवू शकते. आपल्या भवतालच्या गोष्टी आपण इतक्या गृहित धरत असतो, की त्यांचं असणं - सुंदर असणं - दुर्मीळ असणं - त्यातलं नाट्य वगैरे गोष्टी आपल्याला जाणवतही नाहीत. बघायला कसं शिकायचं?


Sunday, October 23, 2016

माऊसोबत कंदिल!

या वर्षी कंदिल माऊला सोबत घेऊन करायचा प्लॅन होता. म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा तशी तिला सोबत घेऊनच सुरुवात केलेली होती, पण तिचे कारभार आणि माझा पेशन्स हे दोन्ही बघता लवकरच तिची रवानगी बाबाकडे झाली होती. या वेळी शक्यतो पूर्णवेळ तिला सोबत ठेवून, रागवारागवी होण्याची वेळ न येता (!) हे व्हावं असं वाटत होतं. गेल्या वर्षभरात माझ्या पेशन्समध्ये न झालेली वाढ, आणि तिचे कमी न झालेले उपद्व्याप बघता हा अतीव महत्त्वाकांक्षी बेत होता. पण तरीही. (काशीस जावे, नित्य वदावे :)

तर त्यामुळे कंदिल सोप्यात सोपा हवा. करायला लागणारा वेळ कमीत कमी हवा. तो रंगीबेरंगी असावा म्हणजे माऊला त्यात जास्त रस वाटेल. आणि तिला करण्यासारखं काहीतरी काम त्यात असावं अशी रिक्वायरमेंट लिस्ट घेऊन सुरुवात केली. साधा सोप्पा करंज्यांचा कंदिल करायचा ठरवला. पुन्हा एकदा, पतंगाचे चार रंगांचे कागद घरातच सापडले. (इतक्या वेळा मला कागद घरातच कसे सापडतात? ते बहुतेक घरातच जन्माला येत असावेत. विकत आणल्याचं अजिबात आठवत नाहीये. आणि मागे असे कागद वापरून कंदिल केला त्याला किमान पाच वर्षं झालीत.)

पूर्वतयारी म्हणून या कागदांचे ६”x६” असे प्रत्येक रंगाचे ६ असे एकून २४ चौरस कापून घेतले. तितक्या करंज्या बहुतेक पुरतील असं वाटलं. या चौरसाच्या कडांना काही कोरीव काम करणं / त्यावर रंगवणं टेक्निकली शक्य आहे, पण आजच्या प्रायॉरिटीमध्ये नाही असं ठरवून त्या सगळ्या कल्पना निकराने बाजूला टाकण्यात आल्या!

मग आतला सिलेंडर बनवायला २१”x९” असा कार्डशीट घेतला (हा ही घरातच होता ... पण मला आठवतोय विकत आणलेला!) त्याला रुंदीच्या ९ इंचातले दोन्ही बाजूचे साधारण दीड दीड इंच सोडून मधल्या भागात प्रकाश बाहेर येण्यासाठी मोठे अंडाकृती काप दिले. (यातलं काहीही बाहेरून दिसणारं नाही, त्यामुळे या आकाराने / कागदाच्या रंगाने काही फरक पडणार नव्हता – फक्त भरपूर प्रकाश त्यातून बाहेर आला पाहिजे एवढीच काळजी घेतली. मग त्याची टोकं स्टेपल करून सिलेंडर बनवला. कार्डशीट वापरला तरी या सिलेंडरला फार जीव वाटत नव्हता. कसाबसा वेडावाकडा उभा होता तो. एव्हाना एका जागी बसण्याचा माऊचा पेशन्स संपायला आला होता. त्यामुळे या सिलेंडरला अजून बळकटी आणावी / नवीन बनवावा याचा विचार करायला फुरसत नव्हती.

आता माऊचं काम. तिच्या बरोबर पतंगाच्या कागदाच्या चौरसाच्या करंज्या बनवल्या.

मग त्या सगळ्या करंज्या सिलेंडरला चिकटावल्या.   

वरच्या बाजूने चिकटवायला सोनेरी कागद घरात नव्हता. (कसा काय? हा घरात तयार होत नाही बहुतेक!). मग तिथे केशरी रंगाचा हॅंडमेड पेपर (मागच्या वर्षीच्या कंदिलातला उरलेला :) ) स्टेपल केला. आता सिलेंडरला जरा जीव आला.

खालच्या बाजूने शेपट्यासाठी पतंगाच्या कागदाच्या पट्ट्या कापून तो चिकटवला. त्याच्या वरून केशरी हॅंडमेड कागदाची पट्टी चिकटवली.

कंदिल टांगण्यासाठी वरच्या बाजूला दोन भोकं केली, दोरा ओवला. कंदिल तय्यार! :)

कंदिल करतांना स्टेप बाय स्टेप फोटो वगैरे काढणं सुचलंही नाही.  तो वर करंज्यांचा फोटो आहे त्या उरलेल्या. आम्ही पुरेश्या दाट लावल्या नाहीत बहुतेक. २० पुरल्या, ४ उरल्या. त्यांना माऊ सद्गती  देईल.

साधारण पावणेदोन वाजता मी चौकोन कापायला घेतले, आणि चार वाजता कंदिल तयार झाला. म्हणजे सव्वा माणसांनी कंदिल करायला सव्वा दोन तास लागले.

शेपट्या कापतांना माऊची पाठवणी बाबाकडे झालीच, पण बाकी कंदिल विशेष रागवारागवी (आणि  उपद्व्याप न होता) दोघींनी एकत्र बसून केलाय! कंदिल कसा का दिसेना, या ऍचिव्हमेंटवर मी जाम खूश आहे!!!

Wednesday, September 7, 2016

आयता (आणि सुशिक्षित) बाप्पा

    पुण्यात दर वर्षी पर्यावरण पूरक बाप्पा बनवण्याच्या ढिगाने कार्यशाळा होतात, पण आजवर मला त्यातल्या एकाही ठिकाणी जायची बुद्धी झालेली नाही. माकडाच्या घरासारखं दर वर्षी घाईघाईने बाप्पा बनवतांना मी ठरवते, की पुढच्या वर्षी नक्की कार्यशाळेला जायचं, तंत्र शिकून घ्यायचं, आणि बाप्पाबरोबरच या विचाराचंही विसर्जन होतं. या वर्षी चक्क आमच्या सोसायटीमध्येच कार्यशाळा होती, पण मला यंदाही न जायला सबब होतीच. (अगदी खरं सांगायचं तर मला तितकं मनापासून जावंसंच वाटत नाहीये अशा कार्यशाळेत. मूर्ती बनवण्याचं तंत्र मला माहित नाही, कुणाला कधी बनवतांना पाहिलेलंही नाही. पण आपण जमेल तसा, बनवला – मोडला – परत बनवला असा चुकत माकत बनवलेला बाप्पाच जास्त आवडतोय. दर वेळी मी नव्या चुका करते आणि त्यातून आपण काहीतरी शिकतोय असा समज करून घेते. :) हा उगाचच अडमुठेपणा (आणि त्याहूनही शिकायचा कंटाळा) आहे, हे समजतंय. आपलं अडाणीपणा ग्लोरीफाय करणं चाललंय, हे कळतंय पण तरीही!), पण माऊची आजी जायला उत्सुक होती, वेळ, जागा पण तिच्या सोयीची होती. त्यामुळे तिचं नाव नोंदवलं, आणि या वर्षी आपण आजीने बनवलेला आयता बाप्पा बसवू या असं ठरवलं!

आजी कार्यशाळेला गेल्यामुळे बर्‍याच नव्या गोष्टी कळल्या: त्यांनी माती चाळून घेतली, जी मी नेहेमी घेत नाही. शिवाय, माती नेमकी किती घट्ट भिजवायची हे बघायला मिळालं. (पुरीच्या कणकेसारखी घट्ट!) अजून एक युक्ती म्हणजे हात, डोकं जोडतांना मधे टूथपिक किंवा छोटी काडी घातली म्हणजे ते जास्त पक्कं बसतं. नाही तर हात, डोकं करतांना मला नेहेमी टेन्शन असायचं तुटायला नको म्हणून. खेरीज, बाप्पाची बैठक करतांना पाय आणि धड कसं जोडायचं हा मला नेहेमी पडणारा प्रश्न. बाप्पाच्या गळ्यात रुळणारा मोठा हार, शेला, उपरणं असं करून मी पोट बर्‍यापैकी झाकून टाकते, म्हणजे तिथलं कन्फ्यूजन बघणार्‍याला कळत नाही. ;)  कार्यशाळेच्या पध्दतीत ते आधी नुसते पाय करून घेतात, मग त्यावर एक उभा दंडागोल ठेवतात. नंतर पोट मोठं करण्यासाठी (लंबोदर!) त्याला वरून अजून थर लावतात. हे जास्त सोपं आहे. मी बाप्पा बनवतांना टूथपिक वगळाता काहीही हत्यार वापरत नव्हते. साध्यासाध्या हत्यारांनी मूर्तीमधली सफाई कितीतरी वाढते. मूर्ती पूर्ण वाळेपर्यंत (साधारण ३ दिवस लागतात) रोज गार्डन स्प्रेयरने तिच्यावर पाणी मारायचं म्हणजे तडे जात नाहीत. (गार्डन स्प्रेयर नसेल तर रंगाच्या ब्रशने.)मूर्ती सावलीतच सुकवायची.
    रंगकामाच्या दिवशी मात्र आजी तिथे शिकायला गेली नव्हती. कारण मला विसर्जनानंतर मूर्ती विरघळल्यावर हीच माती पुढच्या वर्षी परत वापरायची होती, आणि तिथे ते नेहेमीचे रंग वापरणार होते. हे रंग पर्यावरणपूरक नाहीत. त्यांचा (विशेषतः सोनेरी रंगाचा) पाण्यावर तवंग येतो, माती परत वापरता येत नाही मग. आजीने मग पोस्टर कलर वापरून बाप्पा घरीच रंगवला.

    बोनस म्हणजे आजीचं पाहून माऊच्या कलाकार ताईला पण स्फूर्ती झाली. तिने पण आजीच्या मार्गदर्शनाखाली एक छोटा बाप्पा बनवला. त्यामुळे आमच्याकडे या वर्षी दोन दोन मस्त आयते आणि शिकलेले बाप्पा आले!


    बाप्पाच्या सजावटीसाठी फुलांची प्रभावळपण आजीने बनवली आहे. हिरव्या रंगासाठी करवंट्यांमध्ये गहू पेरले होते, पणत्यांमध्ये अळीवपण पेरले होते. नेमक्या किती दिवसात गहू येतील याची खात्री नव्हती, आणि अळीव किती दिवस चांगले दिसतील याची. पाच दिवसांमध्ये गव्हाचे अंकूर मस्त दिसायला लागले, ते सजावटीसाठी वापरले. अळीवाला पणत्यांमध्ये जागा थोडी कमी पडली. शिवाय पाच दिवसात ते जास्त मोठे झाले, वेडेवाकडे वाढले. त्यामुळे ते वापरले नाहीत. हे फायनल बाप्पा:
    बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी मला हे सगळं अजून नीट शिकून घेण्याची बुद्धी द्या!!!

***
काल ही पोस्ट टाकली, पण मन भरलं नव्हतं. या वर्षी बाप्पाला नीट, पोटभर भेटायला मिळालंच नव्हतं अजून. आणि फोटो पण सगळे घाईघाईत काढले होते.  त्यामुळे समाधान वाटत नव्हतं. काल दुपारी संधी मिळाली. बाप्पा आणि मी निवांत भेटलो, गप्पा मारल्या, थोडे फोटो पण काढले. मग जरा बरं वाटलं. कालचे फोटो इथे आहेत :

https://goo.gl/photos/NzUkewyMmLtH9itm7Thursday, September 1, 2016

मलाही केंव्हा कळले नाही :)

गेले आठ – दहा दिवस एक चिमुकला सूर्यपक्षी बागेत झोपायला येतोय. खोट्या ब्रह्मकमळाच्या दोन पानांचं अंथरूण – पांघरूण त्याला आवडलंय. संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी तो आपल्या झोपायच्या खोलीत येऊन पोहोचतो. थोडा वेळ शांत निश्चल बसून राहतो, आणि मग चोच पंखात दडवून गाढ झोपून जातो, ते डायरेक्ट सकाळी उजाडायला लागेपर्यंत. वर मस्त दुसर्‍या पानाचं पांघरूण आहे पावसापासून बचावासाठी. एका विशिष्ट कोनातूनच, त्याच्यासमोर अक्षरशः एक फुटावर आपलं नाक येईपर्यंत दिसत नाही इतका बेमालूम लपतो इथे तो.

पण तरीही. रोज त्याला बघून पडणारे प्रश्न वाढत चाललेत. :)

कायम मान इतकी वाकडी करून झोपल्यावर मान अवघडत नाही का याची? (मला तर उशी असल्याने / नसल्याने / बदलल्याने सुद्धा त्रास होतो मानेला! )

ब्रह्मकमळाच्या पानाची उभी कड पायात धरून तो झोपतो – तलवारीच्या पात्यावर झोपावं तसं. रात्री झोपेत पायाची पकड कधी सैल होत नाही? वार्‍याने पान हलल्यामुळे झोक जात नाही? असं सारा वेळ पायात पान घट्ट पकडून ठेवल्यावर पाय भरून येत नाहीत?
रात्री कधीच तहान लागलीय / शू आलीय / उकडतंय / थंडी वाजतेय / भूक लागलीय / पोट जास्त भरलंय / उगाचच स्वप्न पडलं म्हणून जाग येत नाही?

एवढ्या अवघड जागी बसून विश्रांती कशी मिळू शकते जिवाला!!! बागेत दुसर्‍या  कुंड्या आहेत, पानांनी पूर्ण झाकलेने निवांत कोपरेही आहेत एक – दोन. या सगळ्या सुखाच्या जागा सोडून हे “असिधाराव्रत” का बरं घेतलं असेल या सूर्यपक्ष्याने असा प्रश्न सद्ध्या त्याला बघून पडातोय, आणि त्यामुळे कुसुमाग्रजांचं तृणाचं पातं आठवतंय.

रोज रात्री त्याला गुड नाईट म्हणून मग झोपायला जाते सध्या माऊ. :)

Friday, August 26, 2016

नालेसाठी ...

    तर झालं असं, की भावाला एका ब्रँडचा तक्कू हवा होता. त्यांचा माल पुण्यात कुठे मिळतो ते सापडेना, पण त्यांच्या ऑनलाईन दुकानात दिसला. तिथे खरेदी करताना लक्षात आलं, की तक्कूची किंमत दीडशे रुपये आणि घरपोच करण्याचे साडेतीनशे असा काहीतरी हिशोब होतोय. मग तिथे आपल्याला हवं असलेलं दुसरं काही आहे का याचा शोध घेऊन झाला. हा योगाचा ब्रॅंड असल्याने नेती पॉटपासून टॉवेलपर्यंत चित्रविचित्र वस्तू त्यांच्या दुकानात होत्या. शेवटी तिथले दोन कुर्ते विकत घेतले. हात लावून न बघता आणि घालून न बघता कपडा विकत घेणं मला अजूनही पचत नाही. त्यामुळे हे सगळं करतांना माझी एकीकडे कुरकूर चालू होतीच.

    आठ – दहा दिवसांनी सामान घरी आल्यावर ते आयुर्वेदिक चूर्णाच्या वासाचे कुर्ते बघून मी वैतागले. एकाचा साईझ मी नेहेमी घेते त्यापेक्षा लहान घेतला गेला होता नजरचुकीनं, तो त्यातल्यात्यात बरोबर मापाचा निघाला. दुसरा पुढच्या आऊटिंगला तंबू म्हणून वापरायला होईल असा आहे. दुकानात बघून हे मी नक्की विकत घेतलं नसतं. त्यामुळे ऑनलाईन कपडे खरेदी विषयीची माझी नापसंती अजून पक्की झालीये. धुतल्यावर तो चूर्णाचा वास गेला, आणि हे घालण्याची शक्यता निर्माण झाली. पण एक साईझ छोटा घेऊनही एवढा ढगळ एकरंगी कुर्ता घालून ऑथेंटिक दिसायला मला कुठल्यातरी आयुर्वेदिक रिट्रीट किंवा योगशिबिरालाच जायला हवं. तसा इतक्यात तरी काही प्लॅन नाहीये. (माऊला घेऊन अशा ठिकाणी गेलें तर कसली धमाल येईल हे डोळ्यापुढे तरळून गेलं एकदा माझ्या, पण तरीही.) मग म्हटलं, तसंही हे आहे तसं घातलं जाणार नाहीचे, त्यापेक्षा आपला हात तरी साफ करून घ्यावा. लगेच जाऊन रंग, ब्रश आणले. माऊ झोपल्यावर दोन दिवस हा उद्योग केला.

हे कापड अंबाडीच्या ताग्यापासून बनवलेलं, खूप पातळ आहे. त्यामुळे रंग नीट बसत नाहीये तितका ... रंग घट्ट ठेवला तर मधे कोरडे ठिपके राहताहेत, आणि पाणी घातलं तर टिपकागदासारखा पसरतोय रंग :(  फिर भी छोडनेका नही ... एंड प्रॉडक्ट असं दिसतंय:

आता भावाला त्यांचाच तक्कू घ्यायची बुद्धी झाली नसती, तर या कलाकृतीची निर्मिती झाली असती का कधी? :D :D :D

Wednesday, August 17, 2016

फिर मिलेंगे !

    काल संध्याकाळी माऊ खाली बागेत झोपाळ्यावर खेळत होती. मी शेजारीच उभी होते. झोपाळ्यावरून तिने उडी मारली, आणि माझ्या शेजारी काहीतरी छोटं तुटक्या रबरबॅंडसारखं दिसत होतं त्याला हात लावला. क्षणात ती जोरात किंचाळून बाजूला पळाली ... तो छोटा साप होता! इतका वेळ शांत असणारा साप तिने हात लावल्यावर वळवळायला लागला होता. आकार जेमतेम पाच – सहा इंच, रंग चमकदार काळा. मोबाईलचा दिवा लावल्यावर तो परत शांत झाला, आधीसारखाच स्तब्ध पडून राहिला. हा सापच आहे ना अशी शंका वाटत होती आता – डोकं, डोळे ओळखू येत नव्हते, जीभ बाहेत नव्हती. खवले सुद्धा जाणवत नव्हते.  मग पोरांना तिथून हलवलं, वॉचमनना बोलावलं, बर्‍याच वेळाने वॉचमन आले. परत परत सांगूनही त्यांनी तो बाटलीत भरला नाही – कागदावर घेतला आणि बाहेर कुठेतरी टाकून दिला (असं आम्हाला सांगितलं. मारला नसेल अशी आशा आहे.)


    माऊ आणि साप यांची दुसरी भेट. यापूर्वी महाबळेश्वरला हॉटेलच्या खोलीबाहेर ती एकटीच गेली आणि तिथे साप होता म्हणून सांगत आली होती. (तिथल्या वॉचमननी मारला तो साप ... मारू नका, बाहेर घालवा त्याला असं सांगण्यापलिकडे काही करता आलं नव्हतं मला:( ) या वेळी तर तिने चक्क हात लावलाय सापाला. रात्रभर बेचैन होते मी. म्हणजे सापाकडून तिला कधी काही इजा झालेली नाही, पण तिला साप जरा जास्तच भेटताहेत असं वाटतंय. आपल्याकडचे बहुसंख्य साप – म्हणजे अगदी ९०% साप बिनविषारी असतात हे माहित आहे मला. पण मला साप ओळखता येत नाहीत. आणि अशा ठिकाणी अर्धवट ज्ञान काहीही कामाचं नसतं.

    सकाळी गुगलबाबाला विचारलं हा कुठला साप म्हणून. तर त्यानी सांगितलं की हा पूर्ण निरुपद्रवी असा Brahminy Blind Snake / Common worm snake आहे. (मराठी नाव समजलं नाही याचं.) आणि हे पिल्लू नाही, पूर्ण वाढ झालेला साप आहे हा. (काल वॉचमन येण्याची वाट बघत असताना “हे नागाचं पिल्लू असेल का” पर्यंत अकलेचे तारे तोडून झाले होते आमचे!) भारतात सर्वत्र मिळातो हा – विशेषतः पावसाळ्यात. त्याचं मुख्य अन्न म्हणजे वाळवीची आणि मुंग्यांची अंडी. हा जवळपास अंधळा असतो, आणि याचं तोंड इतकं छोटं असतं की त्याला कुठल्याही मोठ्या प्राण्याला चावताच येत नाही. गंमतीची गोष्ट म्हणजे या सापामध्ये फक्त माद्या असतात आणि पुनरुत्पादनासाठी त्यांना दुसर्‍या सापाची गरज नसते. माद्या फलित अंडी घालतात, त्यातून पिल्लं बाहेर पडतात. म्हणजे एक साप असला तर तिथे अजून येणारच. याला नागाचं पिल्लू समजणारे शहाणे फक्त आम्हीच नाही - असे भरपूर साप नागाची पिल्लं समजून मारले जातात, पण सुदैवाने त्यांची संख्या भरपूर आहे, आणि कुंड्यांमधल्या मातीत हे खूप वेळा असतात. कुंड्या, रोपं, बागेची माती या माध्यमातून मूळचे आशिया आणि आफ्रिका खंडामधले हे साप आता जगभर पसरले आहेत. (त्यांना Flowerpot snake असं नाव मिळालंय यामुळे!)

    माऊची आणि सापाची पुन्हा कधी अचानक भेट होईल माहित नाही. तेंव्हा परत एकदा हा साप विषारी आहे का माहित नाही, त्यामुळे वॉचमननी तो मारला तरी काही बोलता येत नाही अशी वेळ येऊ नये असं वाटतंय. पुण्यात, पश्चिम पुण्यात तुमच्या माहितीतले कुणी सर्पमित्र असतील तर सांगता का?

Wednesday, August 10, 2016

Iron Sharmila!!!

    १९९९ ते २०१६. Armed Forces Special Powers Act च्या विरोधात १६ वर्षं चालू असलेलं उपोषण इरोम शर्मिलानी काल संपवलं. मणिपूरमधला AFSPA अजूनही गेलेला नाही, पण इरोम शर्मिलाचा लढाही संपलेला नाही. तिने हार मानलेली नाही, वेगळ्या मार्गाने लढायचं ठरवलंय. इतकी वर्षं उपोषण करणं सोपं नाहीच, पण त्यानंतर या मार्गाने आपला लढा सफल होत नाही हे मान्य करून दुसरा मार्ग स्वीकारणं, त्याप्रमाणे पावलं उचलणंही फार अवघड आहे. विशेषतः संघटनेचं पाठबळ नसतांना. खूप हिंमत लागते याला. Hats off to her will & determination.

    स्वातंत्र्यानंतर पहिल्या निवडणूकांपूर्वीच, १९५१ मध्ये नागा नॅशनल काऊन्सीलने अशी घोषणा केली, की त्यांनी घेतलेल्या सार्वमतानुसार ९९% नागांनी स्वतंत्र नागा राष्ट्राला मत दिलं आहे. पहिल्या सार्वत्रिक निवडणूकांवर बहिष्कार, सरकारी शाळा महाविद्यालये, कार्यालयांवर बहिष्कार असं आंदोलन सुरू झालं, आणि परिस्थिती पोलीस आणि निमलष्करी दलाच्या हाताबाहेर गेली. आसाममध्ये लष्कर तैनात करण्यासाठी १९५८ मध्ये लष्कराला आसाममध्ये विशेष अधिकार देणारा वटहुकूम जारी करण्यात आला, आणि त्याचंच पुढे AFSPA मध्ये रूपांतर झालं. ईशान्येच्या राज्यांमध्ये AFSPA लागू झाला, त्याला आता ५८ वर्षं झाली. गेल्या वर्षी त्रिपुराने राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था स्थिती सुधारल्यामुळे हा कायदा मागे घेतला. पंजाबातही असा कायदा १९८३ पासून १९९७ पर्यंत होता. जम्मू – काश्मीरमध्येही असा कायदा १९९० पासून लागू आहे.

लष्कराचं काम शत्रूशी लढण्याचं. प्रामुख्याने सीमेपलिकडच्या. लष्कराचं प्रशिक्षणही त्यासाठीच झालेलं असतं. अंतर्गत सुरक्षेसाठी किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात लष्कर तैनात करावं लागणं ही तात्पुरती, तातडीची उपाययोजना असते. लष्कराला आंतर्गत सुरक्षिततेसाठी दीर्घकाळ तैनात करावं लागणं त्या भागाच्याही हिताचं नाही, आणि लष्कराच्याही. मुळात हे त्या समस्येवरचं उत्तरच नाही. लष्कराला नीट काम करायचं असेल, तर त्याला विशेष अधिकार लागणार, AFSPA लागणार. ईशान्येच्या राज्यांमध्ये इतका प्रदीर्घ काळ हा कायदा असणं म्हणजे इतकी वर्षं तिथे आणिबाणीची स्थितीच आहे. It is a failure of governance. कशी सुधारेल तिथली परिस्थिती?

दिल्लीला माझी एक मणिपूरची मैत्रीण होती. दिल्लीहून तिच्या गावी पोहोचायला पाच दिवस लागायचे! आधी रेल्वे, मग मिळालं तर विमान (दिवसाला एक!), ते चुकलं तर दुसर्‍या दिवशीपर्यंत वाट बघायची - नाहीतर बस, पुढे अजून एक बस बस असा प्रवास करून घरी पोहोचल्यावर पुढचे चार दिवस तिचे आराम करण्यात जायचे. याला वीस वर्षं झाली. अजूनही  दिल्ली ते इम्फाळ हे २४०० किमी रेल्वेने जाता येत नाही! (दिल्ली ते कन्याकुमारीच्या २८०० किमी अंतराला रेल्वेने साधारण अडीच दिवस लागतात.) हे प्रवासाचं अंतर झालं. मनांचं अंतर यापेक्षा फार दूरचं होतं (आणि आहेही.) सगळ्या ईशान्येकडच्या लोकांना सरसकट चिंकी म्हणायचे होस्टेलवर. ते बाहेरचे, आपले नाहीत. आपल्या “पंजाब सिंधू गुजरात मराठा” आयडेंटिटीमध्ये त्यांना स्थान नाही. सीमेपलिकडची चिथावणी हा एक भाग झाला, फारसा आपल्या हातात नसणारा. पण सीमेच्या या बाजूला आपण ही अंतरं जोवर कमी करू शकत नाही, तोवर ईशान्येत लष्कर राहणार, AFSPA राहणार, इरोम शर्मिलाचा लढा अपयशी ठरत राहणार.

Monday, August 1, 2016

सखी

प्रिय देवकी,

    आपल्याला भेटायलाच नाही मिळालं. तू फार घाई केलीस जायची. माऊला सुद्धा भेटली नाहीस म्हणजे फारच झालं हं. अर्थात तुझाही नाईलाजच होता म्हणा! पण काहीही म्हण, तू दिलेल्या भेटीला तोड नाही!

    तुझ्या ठेव्याकडे बघून वाटतं, कुणावर गेलीय ही? तिच्या जन्मदात्रीवर? तसं असेल तर मी चांगलंच ओळखते बरं का तुला! ज्यातलं मला अज्जिबात काही समजत नाही अशा सगळ्या गोष्टीत किती गती होती तुला! कधीकधी फार इच्छा होते तुला भेटायची. असं वाटतं, तुझ्याशी बोलायला, तुझी मैत्रीण व्हायला किती आवडेल मला. You must have been a very beautiful person!!! ज्यांच्याशी आवर्जून ओळख करून घ्यायला हवी अशातली कुणीतरी. इतकी सुंदर गोष्ट अशी अर्ध्यावरच का संपवली असेल बरं त्याने? May be you were too good to be true!
   
    आजवर माऊशी कितीतरी वेळा बोलले आहे ती कशी इथे आली याविषयी. पण अजूनही तुझ्याविषयी नाही सांगितलं तिला. मलाच काही माहित नाही तर मी काय सांगणार म्हणा! पण मोठेपणी माऊला तुझ्याविषयी जाणून घ्यावंसं वाटलं, तर मी तिला अजिबात तिची स्पेस वगैरे देणार नाहीये सांगून ठेवते. मीही येडी होऊन तिच्यासोबत घुसणार या शोधामध्ये! तिच्याएवढीच उत्सुकता मलाही आहे म्हटलं!!!  

Monday, July 4, 2016

हातचा

टेकडीवर जायची एकदा चटक लागली, म्हणजे भर पावसात, वर चिखल असेल हे माहित असताना सुद्धा जावंच लागतं तुम्हाला! तर असंच काल सकाळी रेनकोट – छत्रीसकट टेकडीवर निघाले. परवापासून एकदाचा पाऊस मनापासून बरसायला लागला होता, आणि लगेचच रस्त्यात तळी झालेली होती. रस्त्यातली सरोवरं, ओढे, कारंजी आणि गर्ता पार करत टेकडीच्या पायथ्याशी पोहोचले तर तिथे दोन उत्साही टेकडीवीर गाडीतून रोपं उतरवत होते.

“वर चाललाय ना? एक रोप घेऊन जाल का मॅडम वर?”

“हो! कुठे लावायचीत ही झाडं?”

“वर खड्डे केलेत आम्ही, आता रोपं न्यायचीत. वर मारुतीपाशी ठेवा!”

टेकडी चढणार्‍या  प्रत्येकाकडे त्यांनी असंच एक एक रोप दिलं वर न्यायला. तसंही आज टेकडीवर फिरता येणार नव्हतं, चांगलाच चिखल होता. अजून एखादं रोप वर पोहोचवता आलं तर बघावं म्हणून मी लगेच खाली उतरले, तर तोवर सगळी रोपं वर पोहोचली सुद्धा!

मला हिशोब किंवा कामाचं नियोजन अर्धवट करायला आवडत नाही. म्हणजे गावाला जायचं असलं तर नेण्याच्या वस्तूंची यादी, कामांची यादी केल्याशिवाय (आणि ती टिक केल्याशिवाय - कोण मोनिका मोनिका ओरडतंय रे तिकडं?! ;) ) मला पुढचं काही करताच येत नाही. ही झाडं मी टेकडीवर लावणार असते तर माझ्या नियोजनामध्ये पंचवीस रोपं वर पोहोचवण्याच्या पंचवीस खेपा, तीन माणसं, अर्धा तास वेळ असं काहीतरी आलं असतं. या तीन माणसांकडे उत्सुकतेने बघणार्‍या तिथल्या पंधरांना हिशोबात धरणं माझ्या डोक्यातही आलं नसतं. नीट ‘हातचा’ धरून हिशोब करायला मी कधी शिकणार कोण जाणे!

Wednesday, June 29, 2016

पुन्हा जिवाचा गोवा!

धो धो पाऊस.
समुद्र.
किनार्‍यावर चक्क फुटभर खोलीची गोड्या पाण्याची तळी झालेली.
सोबत जिवाची सखी, लाडकी मावशी, आवडता काका आणि आई.
पाण्यात, वाळूत मनसोक्त खेळून झालं सगळ्यांचं.
आकाशाकडे तोंड करून पावसाचं पाणी प्यायलं, एकमेकांवर वाळू, पाणी उडवलं, पाण्यात गार्‍या गार्‍या भिंगोर्‍या केलं, अगदी झोपून सुद्धा झालं.
उन्हाळाभर वळिवामध्ये भिजायला तरसलो होतो ती गळाभेट अखेरीस झाली. चिंब.

अशाच धो धो पावसात बस भरून घरचे सगळे कास तलावाला गेलो होतो वीसएक वर्षांपूर्वी. दुसरं कुणीच नव्हतं तिथे. आम्ही, पाऊस, आणि तलावात उचंबळणार्‍या लाटा. अजूनही पाऊस म्हटल्यावर मला हे चित्र आठवतंच आठवतं.

गोव्याची मज्जा आठवेल का माऊला मोठ्ठी झाल्यावर?***

गोव्याला जायचं होतं ते खरं तर फक्त काकाला, ऑफिसच्या कामासाठी. पण तो जाणार असेल तर आम्ही सगळे पण येणार म्हणून मावशीने सांगितलं, आणि बिनदिक्कत त्याच्या सेमिनारच्या पंचतारांकित रिझॉर्टला एकाच्या ऐवजी तीन फुल दोन क्वार्टर जाऊन धडकलो. घरचेच तर आहेत ना सगळे! हे ‘घरचं असणं’ नक्की समजेल तिला ... हे घरपण तिच्यामुळेच आहे!***

माऊ येण्यापूर्वी मला वाटायचं, एकुलतं एक मूल नको, बिचारं किती एकटं पडतं. हा प्रश्न माऊने कधीच निकालात काढलाय. सखीच्या घरात ती अशी जाऊन घुसली आहे, की आता त्यांचं सख्य जुळ्यांच्याही पलिकडे जायला लागलंय!***

(या भटकंतीमधला जो सगळ्यात अविस्मरणीय भाग होता तो समुद्रावरचा. त्याचे अर्थातच फोटो नाहीत! :) )

Monday, June 27, 2016

तोडीस तोड!
काल टेकडीवर गेलो होतो आम्ही. नुकतीच एक जरा मोठी सर येऊन गेली होती पावसाची, आणि जरा उशीरही झाला होता. त्यामुळे टेकडीवर फारसं कुणी नव्हतं. माऊ आणि तिच्या सखीचं डबक्यात खेळून झालं आणि मग खाऊ खायची वेळ झाली. तेवढ्यात माऊला तिथे एक आजोबा दिसले.
“आजोबा तुम्ही काय करताय?”
आजोबा सिमेंटचं रिकामं पोतं निरखून बघत होते.
“सिमेंटची किंमत बघतोय मी!” आजोबांचं उत्तर. अर्थात यावर “कशाला” हा प्रश्न आलाच पाहिजे नाहीतर माऊ कसली! तर या “कशाला?” ने जी गाडी सुरू झाली, ती माऊ आणि सखीचं नाव, यत्ता, शाळा, वय, घर, (फ्लॅट नंबर सकट!) अशी नेहेमीची स्टेशनं घेत आजोबा कुठे राहतात पर्यंत आली. साधारण इथवर समोरच्याचा पेशन्स संपतो, आणि काहीतरी सबब सांगून आपली सुटका कशी करून घ्यायची याची धडपड सुरू होते. पण आजचे आजोबा माऊच्याच जातीचे निघाले. “चल माझ्या घरी, माझ्या नातवाशी ओळख करून देतो तुझी!” ते म्हणाले, आणि माऊ अर्थातच एका पायावर तयार झाली. नेहेमी टेकडी उतरतांना मी माऊचा हात सोडत नाही, कारण उड्या मारत उतरतांना आमचं समोर लक्षच नसतं. आज मात्र आजोबा म्हणाले, “उतरू देत की! फार तर काय होईल? धडपडेल आणि खरचटेल. खरचटू देत!” माऊ लगेल पडत्या फळाची आज्ञा घेऊन बागडायला मोकळी.:) टेकडी उतरल्यावर अर्थातच माऊने आजोबांना आपली गाडी दाखवली, तुम्हीसुद्धा आमच्या गाडीतूनच या म्हणून फर्मान सोडलं. तेही कुठलेही आढेवेढे न घेता गाडीत बसले.
“आजोबा, गाडीत काही पाऊस लागत नाही, रेनकोट काढा!” - आजोबांनी रेनकोट काढला.
आजोबांचं घर आलं. मी माऊला त्यांना टाटा करायला सांगणार, एवढ्यात आजोबा म्हणाले, “चल घरी, माझ्या नातवाला भेटायचंय ना!”
माऊ तर काय एका पायावर तयारच! शेवटी आजोबांचं घर बघायला मावशी त्या दोघींना घेऊन गेली. गाडी पार्क करून बराच वेळ झाला, अजून या का येत नाहीत म्हणून शेवटी मी जाऊन बघते तर आजोबांच्या बेडरूममध्ये यांच्या गप्पा चाललेल्या. (ते चिखलाने माखलेले पाय वगैरे फालतू गोष्टी माऊ, सखी आणि आजोबा तिघांनाही न दिसणार्‍या. आई उगाचंच असली काहीतरी खुस्पटं काढत असते!) मग त्यांच्या हॉलच्या खिडकीतून सोफ्यावर, तिथून खाली अश्या उड्या मारून झाल्या, खाऊ खाऊन झाला, आणि अखेरीस आम्ही जायला निघालो तर आजोबांनी नातवाला विचारलं, “तुला बघायचं ना या तायांचं घर? चल आपण जाऊ यांच्याकडे! अरे चालत नाही, गाडीतून जायचंय!” अर्थातच त्याला घरी येण्यासाठी मनवणं हे माऊचं कर्तव्य. अशा रीतीने मग माऊ – सखी, सखीची आई, आजोबा, नातू आणि मी गाडीच्या दिशेने निघतो. गेटबाहेर आल्यावर आजोबांना आठवतं, आपली छत्री विसरली. ते छत्री घ्यायला मागे फिरल्यावर नातवाचा विचारही फिरतो आणि तो भूर जायला ठाम नकार देतो. आता हे घरी येणार, मग त्यांना सोडायला आपण परत इकडे येणार या विचाराने इकडे मला आणि सखीच्या आईला घाम फुटलेला असतो. अखेर आजोबांचा नातू आमची सुटका करतो :D :D :D

Friday, June 17, 2016

नेति नेति

सॉफ्टवेअरमधलं, सॉफ्टवेअरशी संबंधित काम सोडून मला चार वर्षं झाली.

त्यानंतरचे सहा महिने फक्त तब्येत सुधारण्याच्या प्रयत्नांचे.

पुढचं दीड वर्ष फक्त माऊचं.

मग हळुहळू जरा हातपाय हलवायला सुरुवात केली, काय करता येईल, काय करावं, याचा थोडा अंदाज घेतला, एकीकडे कोर्सेरावर थोडंफार नवं काही शिकत राहिले. एका सेवाभावी संस्थेत थोडं काम केलं. गेल्या आठ नऊ महिन्यांपासून पुन्हा थोडं काम करायला सुरुवात केलीये.

या सगळ्या काळात LinkedInवर मी फिरकलेही नाहीये, कारण तिथे मी अजूनही “IT Specialist” आहे. ज्या कुणी मला “काय करते आहेस / करणार आहेस” म्हणून विचारायचं धाडस केलंय त्यांना मी त्या क्षणी काय मनाला येईल ते सांगितलंय. कारण नेमकं उत्तर मलाच माहित नव्हतं. आज मात्र हे नेमकं उत्तर ठरवायचंच म्हणून बसले आहे.

काय करतेय मी नेमकं? एका social enterprise मध्ये मी संशोधक म्हणून काम करते आहे सद्ध्या. कशातलं संशोधन? नागरी विकास आणि नियोजनातलं. आपली शहरं अजून राहण्याजोगी कशी बनतील, काही मोजकी ओसंडून वाहणारी महानगरं आणि बाकी बकाल, ओस पडत असणारी गावं अशी परिस्थिती निर्माण न होता जिल्ह्याच्या शहरांमध्ये जान कशी आणता येईल - जेणेकरून महानगरांमधला स्थलांतरितांचा लोंढा कमी होईल, विकासातला समतोल साधला जाईल - याचं एक मॉडेल मांडलंय आम्ही. हे मॉडेल विदर्भ / मराठवाड्याला लावून पुढच्या दहा वर्षात भागांचा संतुलित विकास करण्याचा आराखडा तयार करतोय आम्ही सद्ध्या. यासाठी एकीकडे या भागांच्या परिस्थितीचा अभ्यास, तिथल्या लोकांना, विकासातल्या सर्व प्रकारच्या stakeholdersना भेटणं आणि दुसरीकडे आपलं मॉडेल अजून सुस्पष्ट, नेमकं बनवणं, विकास नेमकं कशाला म्हणणार आपण याचा विचार असं चाललंय. माऊला वेळ देणं हे मोठी priority असल्याने या think tank चं काम पूर्णवेळ करणं शक्य नाहीये मला अजून, पण मी freelancing करत जमेल तितका वेळ यासाठी देते आहे. मी पूर्णवेळ असू शकणार नाही, काही वेळा घरून काम करेन, माझ्या अन्य commitments असणार हे स्वातंत्र्य मला इथे मिळतंय.

काम आवडतंय, करायला मज्जा येतेय. इतकी वर्षं ज्या गोष्टी आवड म्हणून वाचत होते, त्या आता कामाचा भाग म्हणून अभ्यासायला मिळताहेत. डोक्याला खाद्य मिळतंय. मी वेळ काढू शकेन तेंव्हा fieldwork चीही संधी मिळेल. आयटीमध्ये शिरतांनाच हे आपण पाच ते दहा वर्षं करणार आहोत (तोवर hopefully आपल्याला काय हवंय हे समजलेलं असेल आणि मनासारखं काम सापडलेलं असेल) असं मनाशी ठरवलं होतं. आणि शिकायच्या / कामाच्या पहिल्या दिवसापासून आपण हे आयुष्यभर करू शकणार नाही याविषयी पूर्ण खात्री होती. आता हाती घेतलेलं काम करत राहू शकेन असा विश्वास वाटतोय. म्हणजे मी हे सोडणारच नाही असं नाही, पण “हे माझं काम नाही” म्हणून नाही, तर यापेक्षा नेमकं “माझं” काम सापडलं तर सोडेन.

हे सगळं छंद – विरंगुळा म्हणून फावल्या वेळापुरतं ठेवायचं नसेल तर त्यातून काही प्रमाणात तरी पैसे मिळायला हवेत असं माझं मत. आयटी क्षेत्राइतके मिळालेच पाहिजेत अशी अपेक्षा अर्थातच नाही, पण आपल्या खर्चासाठी कुणावर अवलंबून रहायची वेळ येऊ नये इतके नक्कीच मिळावेत. खेरीज funding source समजला म्हणजे काम खरं कुणासाठी चालतं हे स्पष्ट होतं. (त्यामुळेच टिपिकल NGO विषयी मनात साशंकता होती.) त्यामुळे या कामाला पैसे कुठून येतात हा प्रश्न माझ्यासाठी पहिल्या भेटीत विचारण्याइतका महत्त्वाचा होता. सुदैवाने हे काम सुरू करणार्‍यांनाही तो तितकाच महत्वाचा वाटला, संतुलित नागरीकरण हे त्यांचं स्वप्न असल्यामुळे त्यांनी संस्थेची उभारणी करताना एक टीम पैसे कमावण्याचे प्रोजेक्ट घेणारी आणि एक टीम मिळवलेले हे पैसे वापरून काम करणारी अशी रचना केली होती. त्यामुळे बाहेरच्या funding चा प्रश्न नव्हता.

आता सगळंच छान छान, गोड गोड चाललंय का म्हणजे? This is more or less a startup. आयटीमधल्या नावाजलेल्या MNC इतका professionalism इथे पहिल्या दिवसापासून कसा येणार? तितके resources कसे मिळणार? अशा काही मर्यादा राहणारच, आणि त्याच वेळी स्टार्टपचं स्वातंत्र्यही असणार. पण इतक्या काळात कॉर्पोरेट क्षेत्रात नसल्याचं खरोखर दुःख मला झालं ते मागच्या आठवड्यात. बाबांना अचानक बरं नव्हतं, दवाखान्यात भरती करायची वेळ आली. आयटीमध्ये होते तोवर त्यांचा health insurance घेता येत होता मला corporate scheme मध्ये. आता तो घेणं शक्य नाही. म्हणजे personal मिळेलही, पण त्यात किती गोष्टींचा coverage नाही आणि premium किती आहे हे बघितलं तर त्यापेक्षा न घेणं परवडेल.

आतापर्यंतची इतकी वर्षं वाया घालवली का म्हणजे मी?

मला नाही वाटत असं. आयटीमध्ये जायचं ठरवलं तेंव्हा हातात तेंव्हा उपयोगी पडेल असं काहीच नव्हतं, आणि काय करावंसं वाटतंय हे फारच धूसर होतं. काहीही पार्श्वभूमी नसतांना या क्षेत्राने मला प्रवेश दिला. (मी कितीही नाकारली तरी) एक ओळख दिली, आत्मविश्वास दिला, काम करायची रीत शिकवली. थोडंफार जग बघायची संधी दिली, जगभरातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांबरोबर काम करायला मिळालं. उत्तम आणि हलकट दोन्ही प्रकारातले सहकारी दिले. Professionalism आणि commitment काय असतात हे शिकवलं. आणि पैसाही दिला. People management, time management शिकवलं, crisis management, handling difficult situations चे धडे दिले, आणि analytical thinking चांगलं पक्कं करून घेतलं. माझ्या नव्या कामाच्या ठिकाणी मी ही सगळी शिदोरी घेऊन जाते तेंव्हा माझं contribution नवशिक्या, अननुभवी व्यक्तीपेक्षा नक्कीच जास्त असेल, आणि माझ्या नव्या क्षेत्रातल्या लोकांपेक्षा वेगळंही.

ही सगळी गंमत “freelance researcher” अशा दोन शब्दात LinkedInवर कशी टाकणार? अजून थोडे दिवस तिथे “IT Specialist”च रहावं हे बरं!

Monday, April 18, 2016

Un-zentangled :D

    सद्ध्या माऊची घरी रोज “ऍक्टिव्हिटी” असते एक तरी. म्हणजे क्रेयॉन, वॉटरकलर अशा कशाने तरी रंगकाम / चिकटवणं / मातीकाम असलं काहीतरी. याचा “जरा सराव करून घ्या” म्हणून शाळेतून सूचना आहे. आणि उड्या / गप्पा मारणं थांबवून माऊने असलं काहीतरी करायचं म्हणजे तिच्या सोबत कुणीतरी बसणं आलंच. माऊ समोरचा कागद सोडून सगळं काही -  हात – तोंड – कपडे रंगवून घेते आहे, पाण्याची सांडलवंड चालली आहे, फरशीवर स्प्रे पेंटिंग होतंय असं सगळं शेजारी बसून स्थितप्रज्ञपणे बघणं मला अर्थातच अशक्य आहे. हे सगळं चाललेलं असताना आपण फक्त तोंड चालवणं हीच माझ्यासाठी पेशन्सची परीक्षा आहे. म्हणजे यात तिच्या हाताने केलेल्या “ऍक्टिव्हिटी”पेक्षा माझ्या तोंडाने केलेली “ऍक्टिव्हिटी”च जास्त होते आहे असं माझ्या लक्षात आलं. तिच्या कागदावर नजर ठेवून बसण्यापेक्षा आपल्या तोंडासमोर दुसरा कागद धरला तर कमी आवाजात आणि तेवढ्याच वेळात काम होईल असं वाटलं. खूप दिवसांपासून झेंटॅंगल प्रकारात काहीतरी करून बघावं असं मनात होतं. त्यामुळे एक कागद घेऊन सुरुवात केली, आणि त्यातून हे तयार झालं:
आईचं पान

आणि माऊचं आईस्क्रीम

तयार झाल्यावर लक्षात आलं, झेंटॅंगलवाले म्हणतात त्यातली एकही गोष्ट या “ऍक्टिव्हिटी”बाबत खरी नाहीये. त्यांची सुरुवात उत्तम कागद, ठराविक मापाचा घेण्यापासून. इथे तर अक्षरशः हाताला लागेल तो कागद वापरलाय. (माऊच्या शाळेच्या सर्क्युलरची मागची बाजू. हे सर्क्यूलर घडी करून बरेच दिवस माझ्या बॅगमध्ये फिरत होतं. मग त्यावर त्या टिकमार्क दिसताहेत ना, ती मागच्या प्रवासात नेण्याच्या सामानाची ’मोनिका’यादी तयार झाली! :D ) काळ्या पेनाने करा म्हटलंय तर मला नेमकं निळंच पेन सापडलं तेंव्हा. मुख्य म्हणजे हे सगळं अगदी एकाग्र होऊन, ध्यान केल्यासारखं करा, कुठलंही एन्ड प्रॉडक्ट मनात न ठेवता होईल ते होऊ देत हे त्यांचं मुख्य सूत्र. इथे माझा एक डोळा माऊ काय करतेय यावर. कान तिच्या बडबडीकडे, तोंडाने तिच्या अखंड प्रश्नांना जमतील तशी उत्तरं. (आणि तोंडाचा पट्टा न सोडण्याचा प्रयत्न.) आणि उरलेलं मन या कागदावर. पानाचा बाहेरचा आकार आधीच काढून घेतलेला, मग मधले भाग भरलेले. त्यामुळे याला “un-zentangle activity” म्हणायला हवं. पण बाकी काहीही असलं तरी मन शांत, रिलॅक्स करणं हा जो झेंटॅंगल चा मुख्य उद्देश आहे तो मात्र नक्कीच साध्य झालाय यातून!

Wednesday, April 6, 2016

इकडच्या नस्त्या उठाठेवी

    “ऑफिसमधल्या एकाच्या द्राक्षाच्या बागा आहेत, तो द्राक्षं देणार आहे मला वाईन बनवायला” अशी एक उडत उडत बातमी आलेली असते ती मी (बाकी अनेक घोषणांप्रमाणेच) कानाआड केलेली असते. आणि एका दिवशी अचानक पाच किलो द्राक्षं घरी येऊन पोहोचतात. आठवड्याच्या मधल्याच दिवशी, पूर्ण पिकलेली पाच किलो द्राक्षं. एरवी शनिवार उजाडल्याशिवाय नवर्‍याला ऑफिसपलिकडे काहीही दिसत नसतं. आता शनिवारपर्यंत थांबणं शक्य नाही. एवढी द्राक्षं फ्रीजमध्येही मावणार नाहीत. “आजच्या दिवस राहू दे अशीच” म्हणून त्या खोक्याची टेबलवर स्थापना होते.

    दुसरा दिवस. रात्रीचे सव्वादहा होत आलेत, रोजपेक्षा झोपायला तासभर उशीर झालाय. माऊला बरं वाटत नाहीये. आज झोपताना पुस्तक नाही वाचलं तर चालेल का म्हणून मी तिला पटवण्याच्या प्रयत्नात. अशा वेळी प्रश्न येतो:
“पोटॅशिअम मेटा बाय सल्फेट कुठंय?” मी इथेच ठेवलं होतं फ्रिझरमध्ये. तू फ्रीज बदलतांना कुठे टाकलंस?”

    फ्रीज बदलल्याला साधारण दहा एक महिने झालेत. मला असं कुठलं पुडकं का काय ते बघितलेलं आठवतही नाहीये, मग “तूच ते कुठेतरी ठेवलंय” ला काय कप्पाळ उत्तर देणार? आमच्याकडे डोळ्यासमोर असणार्‍या वस्तूसुद्धा हातात दिल्याशिवाय दिसत नाहीत. (बायको सुद्धा शोधता आली नाही ... मलाच शोधावं लागलं – हा माझा स्टॅंडर्ड डायलॉग ;) ) तर हे पोटॅशिअय मेटा बाय सल्फेट कुणीही, कुठेही ठेवलेलं असलं किंवा अस्तित्वातच नसलं तरी आपणच शोधण्याला पर्याय नाही याची मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे पुढचा अर्धा -एक तास घराची रणभूमी होऊ द्यायची का त्याआधीच शोधाशोध करायची एवढाच प्रश्न आहे. तसंही एवढं इंटरेस्टिंग काहीतरी चाललेलं असताना माऊ झोपण्याची शक्यता नाहीच. त्यामुळे मी उठते. “पोटॅशिअम मेटा बाय सल्फेट फ्रीझरमध्ये का ठेवलं होतंस तू?” यावर “मी ते यीस्टबरोबर फ्रीझमध्ये ठेवलं होतं.... माझ्या वाईन बनवण्याच्या सगळ्या वस्तू मी नीट एका जागी ठेवतो! तू यीस्ट फ्रीझरमध्ये ठेवलंस तेंव्हा हे पण तूच ठेवलेलं असणार!” असं बाणेदार उत्तर येतं. आणि याचा हिरव्या रंगाचा पुडा आहे कस्टर्ड पावडर एवढा अशी माहिती मिळते. अर्ध्या तासानंतर मला ते वॉश बेसिनखालच्या कपाटात मिन क्रीम वगैरेच्या बरोबर सापडतं. यानंतर नवर्‍याचा वाईन बनवण्यासाठी आणलेला मोठा बुधला, बाकीची यंत्रसामुग्री, द्राक्षं, हात असं सगळं स्टरलाईझ करण्याचा उद्योग सुरू होतो, आणि बाहेरच्या खोलीतली खुडबूड ऐकत माऊ आणि मी झोपायला जातो.

    जरा वेळाने मला जाग येते ती “ही लागत नाही ना तुला?” या प्रश्नाने. नवरा झपाटलेला असताना हा प्रश्न फार धोक्याचा असतो. त्याला हवी असणारी वाट्टेल ती वस्तू तो “ही लागेत नाही ना तुला?” म्हणून ढापू शकतो. त्यामुळे अर्धवट झोपेतसुद्धा मी आधी “लागतेय” म्हणून ओरडते, मग डोळे उघडून बघते. नवरा समोर नवी कोरी ओढणी घेऊन उभा. त्या ओढणीऐवजी धुवट साडीच्या तुकड्याने त्याचं काम जास्त चांगलं कसं होईल म्हणून त्याला पटवून मी झोपते. त्याचा त्या ओढणीपर्यंतचा प्रवास ट्रेस करण्यासाठी दुसर्‍या दिवशी सकाळी शरलॉक होम्स / जिम कॉर्बेटची गरज नसते :)

    आता यीस्टचं काम सुरू झालं, नवर्‍याचं संपलं, तीन आठवडे तरी वाईन प्रकरणात काही घडणे नाही म्हणून मी जरा विसावते. आणि दुसर्‍या दिवशी सकाळी असा शोध लागतो, की घरात साखरेचा एक दाणाही शिल्लक नाहीये. रात्री सगळी साखर वाईनच्या प्रयोगात घातली गेलेली असते. “ हे काय, तू नेहेमी जास्तीची आणून ठेवतेस ना? आता कशी आणली नाहीस? फिरून येताना घेऊन ये!” ऐकल्यावर मी भडकते. एक तर फिरून येताना मला हातात काहीही नको असतं. हातात सामान धरून मला चालताच येत नाही. त्यात चहा तुला हवा, साखर तू न सांगता संपवलीस, आणि मी तडफडत जाऊन ती घेऊन येऊ? “मी मुळीच साखर आणणार नाही आत्ता. हवा तर गुळाचा चहा पी, नाहीतर पिऊ नकोस!” अशी घोषणा करून मी बाहेर पडते. (चहा – कॉफी न पिण्याचे फायदे!) फिरून येईपर्यंत घरी गुमान ३ किलो साखर येऊन पोहोचलेली असते. (त्यातली दोन किलो वाईनसाठी आहे असं स्पष्टीकरण मिळतं.)

    थोड्या दिवसांनी जेवायचं टेबल आणि आजूबाजूची फरशी जाम चिकट लागायला लागते. बिचार्‍या रोहिणीने चार – पाच दिवस पुसल्यावर फरशीचा चिकटपणा जातो. (टेबल पुसण्याचं काम नवर्‍याकडे असल्याने त्याचा चिकटपणा जायला अजून जास्त दिवस लागतात.) वाईन कशी बनते आहे त्याची चव घेण्यात सांडासांडी ही अपरिहार्य स्टेप असतेच असते. असं “चव घेणं” दोन – तीन वेळा होते. त्याप्रमाणे लागेल तशी साखर घालणं, पाणी घालणं हे सगळं झाल्यावर वाईन ८ - १० लिटर होणार नसून चांगली १५ – २० लिटर तरी बनणार आहे असं लक्षात येतं, आणि आपल्याकडे इतक्या बाटल्या नाहीत असा शोध लागतो.

    असतील नसतील तेवढ्या सगळ्या बाटल्या स्टरलाईझ करणं ही पुढची पायरी. अशी कामं नवर्‍यातल्या इन्स्ट्रुमेंटेशन विंजिनेराला मनापासून आवडतात. वाफारा घेण्याचा स्टीमर यासाठी वापरायचा तो ठरवतो. मग त्यावर बाटल्या उपड्या ठेवण्यासाठी काहीतरी फ्रेम बनवणं, कापाकापी, ठोकाठोकी, पसारे, “हे तुला लागत नाही ना?” असं सगळं आलंच. मधेच स्टीमर बंद पडल्यावर स्टीमरची दुरुस्ती पण होते. हजार लटपटी करून बाटल्या, झाकणं स्टरलाईझ होतात (आणि अर्थातच एवढी मस्त रंगीबेरंगी झाकणं बघितल्यावर ती उचलायचा मोह माऊला होतोच ... तिने हात लावल्यावर थोडी (माऊसुद्धा मनावर घेत नाही अशी) रागवारागवी होते, झाकणं परत एकदा स्वच्छ होतात. वाईन फिल्टर करणं, बाटल्या भरणं, त्यानिमित्ताने सांडलवंड असं सगळं यथासांग होतं, आणि मग अखेरीस मस्त चवीची घरी बनवलेली रेड वाईन तयार होते!


Sunday, April 3, 2016

माऊची बाग

    गेले काही दिवस रोज माऊ उत्साहाने माझ्याबरोबर झाडांना पाणी घालते आहे. आज सहज तिला म्हटलं, “आपण तुझी पण एक बाग करू या का? तू झाडं लाव, त्यांना तूच पाणी घाल. आवडेल?” माऊला आवडलीच कल्पना एकदम. मग आज जाऊन तिच्यासाठी तीन सोप्पी, पटकन फुलं येणारी, विशेष (खरं तर काहीच) काळजी न लागणारी  रोपं आणली – तिनेच निवडली ती. “माझी झाडं आहेत ना!” म्हणून रोपं घरी, गॅलरीत आणतांना सुद्धा एक एक करून तिनेच उचलून आणलं, बाबाला किंवा मला हात लावू दिला नाही :) (मातीच्या पोत्याचं वजन बघितल्यावर मात्र बाबाला / आईला ते उचलायची परवानगी देण्यात आली ;) )

मग खास मळवण्याचे कपडे घालून कुंड्या भरणे कार्यक्रम झाला. मातीत खेळायला (दोघींनाही) जाम मज्जा आली. मग “छोट्या बाळाला कसं आपण हळुहळू दूध पाजतो, तसं” छोट्या झाडांना हळुहळू पाणी घालून झालं.
आज तरी मी एकदम हवेत आहे! :) बघू हा उत्साह किती दिवस टिकतोय ते!!!


सदाफुली

chinese pink

chinese pink

कढीपत्त्याच्या कुंडीमध्ये पिंपळाची का पिंपरणीची दोन रोपं आली होती. ती पण दुसर्‍या कुंडीत लावली ... वर्षभर नीट मोठी झाली तर पुढच्या पावसाळ्यात कुठेतरी जमिनीत लावता येतील ही. :)   

पिंपळ (का पिंपरणी? - मोठं झाल्यवर कळेल!)

Friday, April 1, 2016

बळ देणारी भटकंती

माऊ, तिचे आजोबा, माऊचा बाबा आणि मी तीन - चार दिवस महाबळेश्वरला जाऊन आलो. महाबळेश्वरला जाण्यात तसं विशेष काय आहे? पण ही भटकंती विशेष होती माझ्यासाठी.

पहिल्यांदाच "रिलिव्हिंग ड्रायव्हर" ऐवजी मुख्य ड्रायव्हरच्या भूमिकेतून गाडी चालवली. आणि एन्जॉय केलं हे ड्रायव्हिंग. It was liberating.

प्रत्येक ठिकाणी सगळ्यांनी गेलंच पाहिजे असाही आग्रह नव्हता या ट्रीपमध्ये. कधी आम्ही सगळे, कधी मी आणि आजोबा, कधी मी, आजोबा आणि माऊ तर कधी मी एकटी असेही भटकलो. माऊ आणि आजोबा हे एकदम हिट कॉम्बिनेशन आहे. म्हणजे अखंड बडबड करत उड्या मारणार्‍या माऊला एक हात आणि पार वाकून, हळुहळू काठी टेकत चालणर्‍या आजोबांना दुसरा हात देऊन तुम्ही चालत असाल आणि लोकांनी वळून बघितलं नाही असं होणं शक्यच नाही. आजोबांच्या चालण्यामध्ये असं काहीतरी असतं की रस्त्यातला प्रत्येक माणूस त्यांना हात द्यायला पुढे येतो. कुठेही भटकून हॉटेलला परतल्यावर आजोबा आणि / किंवा माऊचं "तुम्हाला बघितलं बोटिंग करतांना. या वयात हा उत्साह म्हणजे मानलंच पाहिजे! " म्हणून अभिनंदन करणारं कुणी ना कुणी भेटणारच हे नक्की!

माऊने तिथे “फॅमिली आऊटिंग”ची नवी व्याख्या बनवली होती – आऊटिंगमध्ये भेटलेले सगळे आपल्या फॅमिलीमधलेच आहेत असं समजून जिथे वागायचे ते “फॅमिली आऊटिंग”. यात बिनदिक्कत कुणाच्याही खोलीत शिरण्यापासून, रस्त्यात भेटलेल्या कुठल्याही बाळाला स्ट्रॉबेरी ऑफर करणं,  ते वेटर आजोबांना “मला जेवायला पुरणपोळी हवी” सांगण्यापर्यंत सगळं आलं. त्यामुळे प्रायव्हसी वगैरे कल्पनांचा आणि आमचा काहीही संबंध नव्हता महाबळेश्वरमध्ये. पुढच्या वेळी आम्ही पुरवलेल्या करमणूकीसाठी काहीतरी डिस्काऊंट मागायला हवा हॉटेलला.

ही भटकंती “taking chances” विषयीही होती. अर्थर सीट पॉईंटला संध्याकाळच्या तुडुंब गर्दीत आजोबांना पॉईंटपाशी सोडून माऊ आणि मी गाडी पार्क करायला गेलो, ते तिथल्या वाहतूक-मुरंब्यामुळे तब्बल वीस – पंचवीस मिनिटांनी परतलो. एवढ्या वेळात आजोबा कुठे गायब झाले नाहीत, धडपडले नाहीत. (अर्थर सीट पाहून परत गाडीकडे येताना तिघं हात धरून चाललो होतो तेंव्हा ते पडता पडता वाचले!) असा त्यांचा तोल एकटे असताना गेला असता तर? या शक्यतेचा आम्ही विचारही केला नव्हता.

एका दिवशी सकाळी माऊ उठल्यावर एकटीच खोलीबाहेर आली, आणि “आई, बाहेर साप आहे!” म्हणून परत आत आली. बाहेर बघितलं तर खरंच दीड - दोन फूट लांब साप होता, खोलीच्या दारापासून चार – पाच फुटांवर. विषारी का बिनविषारी ते माहित नाही, पण दिसेल त्या गोष्टीला कुतुहलाने हात लावणार्‍या माऊला सापापासून दूर रहायचं, आणि परत खोलीत येऊन साप आलेला सांगायचं हे सुचलं नसतं तर? हॉटेलचं कुणीतरी येऊन सापाला हलवेल तोवर सापाचा फोटो काढतांना कुठेतरी हात कापत होता माझा.

महाबळेश्वरहून बामणोलीच्या पुढे मित्राला भेटायला “कॅम्प कोयना” ला जाऊन यायचा प्लॅन होता. दोन एक तासाचा रस्ता असावा असा अंदाज होता. तापोळ्याच्या रस्त्याला लागल्यावर लक्षात आलं, बामणोली इतकं जवळ नाही. तापोळ्याला जाऊन पुढे काय करायचं ते ठरवू असं म्हणून निघालो. तिथे समजलं, की बामणोलीसाठी बार्जमध्ये घालून गाडी नेता येईल, बामणोलीचं अंतर वाचेल. “जाऊन तर बघू” म्हणून निघालो. प्रत्यक्ष बार्जमधून जाऊन अंतर फारसं काही वाचलं नाही, शिवाय कच्चा आणि पूर्ण निर्मनुष्य रस्ता लागला. बामणोलीच्या पुढे तर काही केल्या रस्ता संपेना. बरोबर जेमतेम माऊपुरतं पाणी. आजूबाजूला चिटपाखरू नाही. (वाटेवरच्या देवळात चौकशीला गेले तर फक्त एक काळं कुत्रं भेटलं!) गाडीला काही झालं तर काय करणार होतो तिथे? वाटेत एका मावशीबाईंना लिफ्ट दिली त्यांनी चांगलीच करमणूक केली. मित्राची भेट झाली. परत येतांना सरळ रस्ता पकडायचं ठरवलं. रस्ता तसा चांगला, अगदी बाजूला रिफ्लेक्टर वगैरे लावलेला. फक्त कुठेही मैलाचे दगड नाहीत. (म्हणजे दगड होते, पण नुसताच पांढरा रंग फासलेले. त्यावर जागेचं नाव आणि अंतर दोन्हीचा पत्ता नाही!) पाट्या फक्त “अती घाई, संकटात जाई”, “मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक” वाल्या. कुठे चाललोय आणि किती अंतर आहे सगळं रामभरोसे. जवळपास वस्ती नाहीच. आता अंधारात तर काळं कुत्रं पण नाही वाटेत कुठे. नवरोबा वैतागला ते सोडा, पण मित्राची भेट झाली, मस्त वाटलं. “जाऊन तर बघू” म्हटलं नसतं तर नक्कीच चुटपूट लागून राहिली असती. आणि जराही वेळापत्रकाबाहेर जायचं नसेल, तर रोजचं रूटीन आणि ब्रेक यात फरक तो काय?

शेवटच्या दिवशी सकाळी सगळे उठण्यापूर्वी एकटीच विल्सन पॉईंटला गेले, तेंव्हा जाणवलं, मस्त झालीये ही ट्रीप. एन्जॉय तर केलंच, पण शिकायलाही मिळालंय काहीतरी.

***
गंमत म्हणजे या ट्रीपमध्ये विशेष म्हणण्यासारखा एकही फोटो नाही, असं आत्ता जाणवतंय ... तिथे आठवणही आली नाही कॅमेर्‍याची!

***
आजीने माऊला विचारलं, "काय बघितलं मग महाबळेश्वरला?"
माऊचं उत्तर: "गाढव!"
"काय करत होतं गाढव?"
"शी!"
खरंच, चार पायांची जितकी गाढवं महाबळेश्वरला दिसली तितकी पुण्यात दिसत नाहीत!

Thursday, March 17, 2016

पांढरी सावर

    नुकतीच एका लाडक्या मैत्रिणीची नव्याने ओळख झाली. आपल्या नेहेमीच्या गुलाबी – लाल शेवरीला (काटेसावर / शाल्मली) आणि तिच्या सोनेरी पिवळ्या रूपातल्या सोनसावरीला भेटले होते आतापर्यंत. थंडी संपता संपता सीतेचा अशोक आणि पळस – पांगारा झाले, की मग शेवरीचे फुलण्याचे दिवस येतात. मस्त उंच वाढलेलं शेवरीचं झाड, त्याच्या डौलदार, सिमिट्रिकल, लाल – गुलाबी फुलांनी लगडलेल्या फांद्या, आणि त्यातला मध खायला किडे, माशांचे थवे आणि हा खाऊ टिपायला जमलेले पक्षी अशी सगळ्यांची गर्दी ... अशी गजबजलेली शेवरी माझी लाडकी. फुलं नसतानाही हे झाड देखणंच. टेकडीवर कुणा निसर्गप्रेमींनी जोपासलेल्या झाडांपैकी ही बाळ – शेवरी बरेच दिवस बघत होते., आणि ही मोठी होऊन फुलल्यावर किती सुंदर दिसेल म्हणून स्वप्नही बघत होते. :)

बाळ-शेवरी आहे की नाही ही?
    जेमतेम नऊ दहा फूट उंची असेल या झाडाची. इतकी लहान शेवरी फुलत असेल असं वाटलं नव्हतं मला. त्यामुळे शेवरीच्या फुलायच्या मोसमात इथे एकही फूल दिसत नाहीये म्हणून आश्चर्य नाही वाटलं. मागच्या आठवड्यात या झाडावर पांढरं काहीतरी दिसलं. जवळ जाऊन बघितलं, तर फुलं! नेहेमीच्या शेवरीसारखीच, पण फिक्क्या पिवळ्या, ऑफ व्हाईटच्या जवळ जाणार्‍या रंगाची. ठेवण नेहेमीच्या शेवरीसारखीच, पण आकाराला लहान. आणि शेवरीसारखीच किड्या- माशांची रीघ लागलेली.

बाळ-शेवरी(?)ची रंग विसरून आलेली फुलं! :)
    फुलण्याच्या घाईत रंग विसरून गेली का काय ही? शेवरीच आहे ना म्हणून संध्याकाळी परत नीट बघायला गेले, तर सकाळची फुलं गायब. काही कोमेजून गेली होती, उरलेली मिटलेली. शेवरीची(?) फुलं संध्याकाळी मिटतात हा नवाच शोध लागला. झाड अजून नीट निरखून बघितलं, तर एकही काटा दिसला नाही. काटा नाही अशी सावर कशी असेल? हिला मोठी झाल्यावर फुटतात का काय काटे? काट्यांची जास्त गरज लहान, कोवळं झाड असतानाच असणार ना! पण झाडावर एक हिरवं बोंड दिसलं, ते शेवरीसारखंच वाटत होतं. इतके दिवस हिला मी मैत्रीण समजते आहे, पण खरी ओळखतच नाही की! बाळ-शेवरी(?) का कोण ती फारच खिजवायला लागली.

शेवरीचं(?) बोंड
    मायबोलीवरच्या निसर्गाच्या गप्पांमध्ये चौकशी केली, आणि सापडली! ही शेवरीच. पण लाल नाही, पांढरी.

***

    जरा शोधाशोध केल्यावर कळलं, हिला  पांढरी सावर / white silk cotton tree / Ceiba pentandra म्हणतात. आपल्याकडच्या अनेक देशी भाषांमध्ये नावं असणारी ही मूळची आपल्याकडची नाहीच म्हणे, दक्षिण अमेरिकेतील आहे. (शेवरी परकी कशी असेल? काहीतरीच सांगतात हे लोक!)  फुलांचा वास काही माणसांना विशेष आवडण्यासारखा नसतो कारण तो वटवाघळांसाठी असतो - हिचं परागीभवन वटवाघळांकडून होतं. आता या टेकडीपासून वटवाघळांची माझ्या माहितीतली कॉलनी चांगली दोन किमीतरी लांब. त्यांना कोण जाऊन सांगणार तुमच्यासाठी टेकडीवर खाऊ ठेवलाय म्हणून?

पांढर्‍या शेवरीचं फूल


  टेकडीवर रोज जाणं मला सद्ध्यातरी जमण्यासारखं नाही. मी तिथे जाते ते चालायला म्हणून, किंवा माऊला बरोबर घेऊन. त्यामुळे तिथे झाडं लावणं, त्यांना पाणी घालणं यातही माझा सहभाग शून्य असतो. ज्या कुणी ही पांढरी सावर तिथे जोपासली आहे, त्यांचे इतका आनंद मिळवून दिल्याबद्दल आभार!     


 

Thursday, February 25, 2016

Why I have no political future ...

मी जेएनयूमध्ये शिकले आहे, आणि तिथलं स्वातंत्र्य मनापासून एन्जॉय केलेलं आहे. विशेषतः “खरं सांग, तो तुझा आतेभाऊच होता कशावरून?” अशी उलटतपासणी घेणार्‍या, रात्री आठ वाजता कुलूप लागणार्‍या “भाऊच्या शाळेतल्या” होस्टेलच्या कहाण्या ऐकून तिथे गेल्यावर तर इथे आपल्याला ग्रोन अप म्हणून वागवताहेत आणि वाट्टेल त्या चुका करण्याचं स्वातंत्र्य आहे हा फार सुखद अनुभव होता. रॅगिंग आहे, ड्रग्जचा अड्डा आहे, सेफ नाही असं काहीही मी जेएनयूला जाण्यापूर्वी ऐकून होते. पण दिल्लीसारख्या शहरात एकट्या मुलीने राहण्यासाठी जेएनयू कॅम्पसइतकी सुरक्षित जागा नसेल. And the best part was, you did not have to confirm! तुम्हाला वाटेल ते करा, तुम्हाला रोखणारं कुणीही नाही. The diversity is beautiful. इतकं सुंदर वातावरण मला दुसर्‍या कुठल्याच शैक्षणिक संस्थेत बघायला मिळालं नाही.
तिथे शिकत असताना चुकूनही विद्यार्थी संघटनांच्या वाटेला गेले नव्हते. एक तर राजकारण हे आपलं क्षेत्र नाही असं तेंव्हाही माझं ठाम म्हणणं होतं, आणि दुसरं म्हणजे आजूबाजूला दिसणारी एकही विद्यार्थी संघटना मला जवळची वाटली नव्हती. घोषणाबाजीची ऍलर्जी होतीच. सगळ्या संघटनांची सगळी पत्रकं मात्र आवर्जून वाचायचे, गंगा लॉनवरच्या डिबेट्स बघायचे. आणि हे आपलं क्षेत्र नाही, यातलं कुणीही आपल्या जवळचं नाही हे प्रत्येक वेळी अजून प्रकर्षाने वाटायचं.
आजवर तसे डाव्यांपेक्षा मला उजवेच (त्यातल्यात्यात) जवळचे वाटत आले आहेत. उजव्यांच्या विचारच न करण्याच्या परंपरेपेक्षा डाव्यांच्या ढोंगाचा जास्त तिटकारा वाटत आला आहे. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आले तेंव्हा या सरकारकडून बर्याजच अपेक्षा होत्या, आणि एका माणसाच्या हातात एवढी सत्ता, त्याला कुणीच शहाणा आणि तुल्यबळ विरोधक नाही हे बघून भीतीही वाटत होती. या सरकारला मला ढोंगी डाव्यांच्या बाजूचं करण्यात यश आलंय!
विद्यार्थी नेते फार शहाणे असतात असं मुळीच नाही. त्यांचे बोलविते धनी विद्यापीठाबाहेरच असतात, हे बाकी विद्यार्थ्यांनाही माहित असतं. दहा – बारा विद्यार्थी देशविरोधी घोषणा देत असतील तर त्या ऐकायला जेएनयूतले बाकी विद्यार्थीसुद्धा फिरकले नसते. फार तर कुणीतरी तक्रार केल्यावर विद्यापीठाने या विद्यार्थ्यांवर कारवाई केली असती. मुलांचं हे वागणं समर्थन करण्यासारखं नक्कीच नाही, पण केंद्र सरकारने जातीने लक्ष घालून विद्यार्थी नेत्यांवर कारवाई करावी एवढं मोठं होतं का हे? Sedition म्हणण्याइतकं? काश्मीरमध्ये पीडीपीबरोबर युती चालते आणि इथे एकदम sedition! Don’t we have any real issues to deal with?
त्यानंतर चाललेली समर्थकांची चिखलफेक दोन्ही पक्षांची पातळी दाखवतेय. जेएनयू मध्ये अमूक इतकी कंडोम्स वापरली गेली यावर मोदीसमर्थकांनी टीका करावी? This is about consenting adults. It is none of their business. देशाचे पैसे वापरून (जे एन यूमधलं शिक्षण भरपूर subsidized आहे, म्हणूनच कितीतरी हुशार विद्यार्थी तिथे शिकू शकतात.) इथेले सगळे विद्यार्थी देशद्रोही कारवाया करत आहेत, हे विद्यापीठ बंद करा म्हणायचं? का विरोधकांनी देशात हिटलरशाही आली म्हणायचं? सद्ध्या जे काही चाललंय हे आणिबाणीपेक्षा वाईट आहे? Have we lost all sense of proportion?

Wednesday, February 17, 2016

गोगलगाय आणि पोटात पाय!

    मागे अलिबागच्या पोस्टमध्ये मी म्हटलं होतं की शंख समजून चुकून दोन जिवंत गोगलगायी उचलून घरी आणल्यात. तसे ते शंख फार सुंदर दिसणारे वगैरे नव्हते, पण समुद्रावर जाऊन एकही शंख / शिंपला सापडला नाही यावर माझाच विश्वास बसत नव्हता म्हणून हे शंख उचलले. साडेतीन – चार इंच आकाराचे हे दोन शंख दोन दिवसांनी स्वच्छ करायला पाण्यात टाकले आणि आतल्या काळपट तपकिरी गोगलगायी बाहेर आल्या.

Giant African Land Snail


    आता यांचं काय बरं करायचं? बागेतल्या गोगलगायी झाडांचे कोवळे कोंब खातात, म्हणून त्यांना कटाक्षाने झाडांपासून लांब ठेवावं एवढं ठरवलं. पण कुठे सोडायच्या त्या हे बघावं म्हणून नेटवर जरा शोधाशोध केली. पहिल्यांदाच गोगलगायींविषयी माहिती शोधत होते. तेंव्हा समजलं, की या बहुतेक Giant African Land Snail  प्रकारच्या गोगलगायी आहेत, मूळच्या पूर्व अफ्रिकेतल्या या गोगलगायी आज जगात अनेक ठिकाणी (आपल्या कोकणासकट) आढळतात.

    या जातीच्या गोगलगायी पाच सात वर्षे आरामात जगू शकतात. हवा अती थंड असेल तर hibernate करतात, फार उन्हाळा / पाण्याची कमतरता असेल तर aestivate करतात (हायबरनेशन थंडीमध्ये करतात, तसंच उन्हाळ्याला / पाण्याच्या कमतरतेला तोंड देण्यासाठी inactivity आणि metabolic rate कमी करणे म्हणजे aestivation.) हा aestivation चा कालावधी तीन वर्षांपर्यंत असू शकतो!!! यांचं अन्न म्हणजे सुमारे ५०० प्रकारच्या वनस्पती. जगातल्या सर्वाधिक invasive समजल्या जाणार्या  १०० प्रजांतींमध्ये यांचा समावेश होतो. शेती / बागांचं प्रचंड नुकसान त्या करू शकतात. ऑस्ट्रेलियामध्ये, अमेरिकेच्या काही भागात यांच्या बंदोबस्तासाठी बरेच प्रयत्न केले जातात. (आपल्याकडे शेताला गोगलगायींच्या उपद्रवाविषयी मला काहीही माहित नव्हतं!) आफ्रिकेत त्यांचा फार त्रास नाही, कारण तिथे या खाल्ल्या जातात – त्यांचे मांस अतिशय पौष्टिक आणि रुचकर समजतात!

    गोगलगायी hermaphrodites आहेत. म्हणजे प्रत्येक गोगलगायीत स्त्री आणि पुरुष जननेंद्रिये दोन्ही असतात. दोन गोगलगायींचे मिलन होते, त्यानंतर दोघीही अंडी घालू शकतात, आणि त्यांच्या प्रजननाचा वेग प्रचंड असतो.

    गोगलगायींना दिसतं, वास येतो, पण ऐकू येत नाही. त्या निशाचर असतात, सूर्यप्रकाश टाळतात.

    दिसायला नाजूक वाटल्या तरी गोगलगायी त्यांच्या वजनाच्या १० पट वजन उचलू शकतात!

    हे सगळं समजल्यावर कुठून ते शंख उचलायची बुद्धी झाली म्हणून पहिले कपाळाला हात लावला. मग त्यांना टेकडीवरच्या पाण्याच्या टाकीत किंवा अशा कुठेतरी सोडून देण्याची बुद्धी झाली नाही म्हणून सुटकेचा निश्वास टाकला. आता या कुठे ठेवू / कशा नष्ट करू म्हणून सध्या चिंतेत आहे. तुम्हाला कुणाला चविष्ट गोगलगाय खायची असेल तर घेऊन जा, खास आग्रहाचं निमंत्रण!!!

Monday, February 8, 2016

अजून एक फसलेला प्रयत्न

    माऊबरोबर पुस्तकं तशी बरीच वाचली जातात, आणि गाणी पण ती आवडीने बघते. पण बाकी टीव्ही, जाहिराती आणि कार्टून प्रकारापासून तिला तसं लांबच ठेवलंय आतापर्यंत. अधूनमधून एखादा सिनेमा तिच्याबरोबर बघायचा प्रयत्न असतो. काल माऊबरोबर “Finding Nemo” बघू या म्हटलं. जेमतेम १५ मिनिटं बघितला असेल तो आम्ही.

    “आई, त्या पिल्लाची आई कुठंय?”
    “त्याच्या आईला त्या मोठ्या माश्याने खाऊन टाकलं.”
    “का?”
    “त्याचा खाऊ आहे तो बाळा. मोठा मासा छोट्या माश्याला खातो!”
    “आई, त्याची आई कुठेय? आई हवी!”
    “अग, तो बाबाबरोबर किती छान खेळतोय बघ!”
    “नाही, आई पाहिजे!”

    असं म्हणून पहिल्या मिनिटाला जे रडं सुरू झालं, थांबेचना - “मला पुढची गोष्ट नको. त्याची आई हवी!”

    आतापर्यंत तीन – चार सिनेमे माऊला दाखवायचा प्रयत्न करून झालाय. “मादागास्कर” मध्ये सुरुवातीला सगळं काही ठीक चाललं होतं, पण अलेक्स त्याच्या मित्राला मारणार असं वाटल्यावर रडायला सुरुवात. “अप” मध्ये केव्हिनला पकडल्यावर तेच. आणि “मकडी” तर तिने बघितलाच नाही. हे असं रडणं सुरू झालं, की आपण हे दाखवायच्या फंदात का पडलो म्हणून मला पश्चात्ताप होतो. एरव्ही माऊ अंधाराला, अनोळाखी माणसांना, भूभूला कश्शाला घाबरत नाही. गोष्टीतही कुणीतरी दुष्ट मावशी वगैरे भेटतेच. पण सिनेमात कुणी दुष्टपणा केला किंवा मरून बिरून गेलं की संपलंच. आणि सगळं फक्त गोडगोड अशी गोष्ट कशी सापडणार आणि आवडणार? माऊला उगाच रडायला लावायचं नाहीये, आणि जगाची रीत तर तिला हळुहळू कळायला हवीय. कुठला सिनेमा दाखवावा बरं आता माऊला?

Monday, February 1, 2016

पुन्हा एकदा सर्च ...

    सर्च / डॉक्टर अभय आणि राणी बंग यांच्या कामाविषयी एक थोडक्यात आढावा घ्यायची संधी मिळालीय सद्ध्या. त्या निमित्ताने माझीच जुनी ब्लॉगपोस्ट वाचली, आणि जाणवलं, की मी त्या पोस्टमध्ये फार थोडं, वरवरचं मांडलंय.

    पहिली गोष्ट – डॉक्टर अभय बंगांनी तेंव्हाच्या माझ्या शोधाविषयी जे सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं, ते तेंव्हा अजून पचवणं चाललं होतं. (अजूनही ते पूर्ण झालं म्हणवत नाही.) त्यामुळे त्याविषयी पोस्टमध्ये काहीच उल्लेख नाही. जेंव्हा आपल्याला काय हवंय ते इतकं असतं, शब्दात पकडता येत नसतं, तेंव्हा काय करायचं? कसं शोधायचं? हा माझा प्रश्न होता. डॉक्टर अभय बंग म्हणाले, विनोबांनी मला सांगितलं होतं ... “आपला स्वधर्म आपल्या जागीच सापडतो.” हे ऐकतांना मला पार गीतेतलं, आपण आयुष्यभर आपलं विहित कर्मच करत राहिलं पाहिजे असं deterministic वाटलं होतं. त्यामुळे फारसं पटलंही नव्हतं. पण जितका त्यावर विचार करत गेले तितके याचे अधिकाधिक पदर स्पष्ट होत गेले. आपल्या आजूबाजूला अनेक मोठी माणसं असतात. त्यांच्याकडे बघितलं की आपल्याला वाटतं, “ग्रेट! आयुष्यात असंच काहीतरी करायला हवं माणसाने! नाहीतर काय अर्थ आहे या जगण्याला?” वगैरे वगैरे. त्याच वेळी त्यांचं जगणं खूप अवघड पण वाटतं. हे आपल्याच्याने होणार नाही हेही आतून आपल्याला माहित असतं.
   
    मग या “आतून माहित असण्या”वर आपण अजून जरा जास्त का विसंबत नाही? आपल्याला पेलेल, झेपेल, ज्यात आपल्या क्षमता पुरेपूर वापरल्या जातील आणि आपल्याला आनंदही देईल असं काम कुठलं, ते हे “आतून माहित असणं”च सांगणार आहे ना! आपल्या जागी सापडणार्याम स्वधर्माचा अर्थ आता असा समजतोय मला.

    अजून एक फार मोठी गोष्ट लिहितांना चक्क सुटून गेली होती. डॉक्टर अभय बंग एका आदिवासी बालमृत्यूचा किस्सा सांगतात. न्युमोनिया झालेल्या एका कुपोषित नवजात बाळाने तपासणी करत असतांनाच त्यांच्यापुढ्यात शेवटचा श्वास घेतला. हा बालमृत्यू का झाला याचा विचार करतांना त्यांना तब्बल १८ कारणं सापडली:

    बाळाचं कुपोषण गर्भातच सुरू झालं. त्याची आई स्वतःच कुपोषित होती. तिला पोटभर खायला नव्हतंच, खेरीज गरोदरपणी आई पोटभर जेवली तर बाळ जास्त लठ्ठ होतं आणि बाळंतपण अवघड होतं असा समज. जन्मानंतर बाळाला लगेच दूध मिळालं नाही कारण पहिले तीन दिवस बाळाला पाजायचं नाही ही तिथली समजूत. त्यानंतर आईला दूधच आलं नाही. मग गाईचं दूध खूप पातळ करून अस्वच्छ बाटलीतून पाजलं गेलं. पोट भरायचं नाही म्हणून बाळ सतत रडायचं, रडून रडून त्याचा घसा बसला. त्यात हगवण सुरू झाली. त्यानंतर आरोग्यसेवेऐवजी जादूटोण्याचे उपाय झाले. हे दूधही बंद करून साबुदाण्याचं वरचं पाणी पाजायचा सल्ला मिळाला, तो अंमलातही आणला. बाळाचा बाप सतत दारू पिऊन पडलेला, आईला मलेरिया. तशात बाळाला न्युमोनिया झाला, परत मांत्रिकाकडे नेलं. अखेर एके दिवशी सकाळी बाळ खूपच सिरियस झाल्यावर बाळाला घेऊन आई आणि आजी दवाखान्यात यायला निघाल्या. दवाखाना केवळ चार किमी अंतरावर, पण वाटेत नदी, तिला पूर आलेला. नदीवरचा पूल निकृष्ट बांधकामामुळे खचलेला, त्याचं बांधकाम पूर्णही केलेलं नाही. त्यामुळे पूर ओसरेपर्यंत वाट बघण्याशिवाय पर्याय नाही. संध्याकाळी पूर ओसरल्यावर त्या दवाखान्यात पोहोचल्या तोवर खूप उशीर होऊन गेला होता.

    अशा घटना, ही कारणं आपणही कधीतरी ऐकलेली असतात. हे बदलायचा प्रयत्न करणं म्हणजे आभाळाला ठिगळ लावण्यासारखं वाटायला लागतं मग.  डॉक्टर बंग याविषयी काय म्हणतात हे महत्वाचं. ही सगळी कारणं सुटणं महत्वाचं आहेच. पण आपलं पहिलं उद्दिष्ट बालमृत्यू थांबवणं हे आहे. त्यासाठी ही सगळी कारणं सुटायची गरज नाही. यातलं एक कारण जरी कमी झालं तरी हा बालमृत्यू टळू शकतो! त्यांचं सगळं संशोधन आणि काम हे या दृष्टीकोनातून आहे. काय केल्याने लवकरात लवकर, कमीत कमी खर्चात आपण बालमृत्यू टाळू शकू?

    यासाठी संशोधन करायला हवं. हे संशोधन सुसज्ज प्रयोगशाळांमध्ये व्हावं म्हणून बालमृत्यूपासून पार दूर कुठेतरी व्हायची गरज नाही. जिथल्या लोकांना याची गरज आहे तिथे संशोधन झालं तरच आपल्याला मृत्यूची नेमकी कारणं समजणार आहेत, आणि कमीत कमी खर्चात, लवकरात लवकर बालमृत्यू थांबवता येणार आहेत. आणि हे संशोधन शास्त्रीय कसोट्यांवर स्वीकारलं गेलं तर यातूनच राज्याच्या, देशाच्या आणि जागतिक स्तरावरही धोरणनिश्चितीवर प्रभाव टाकता येणार आहे. हा विचार घेऊन डॉक्टरांनी सर्चचं काम उभं केलेलं आहे. त्यामुळे त्याचं काम एकाच वेळी गडचिरोलीसारख्या महाराष्ट्रातल्या दुर्लक्षित जिल्ह्यासाठीही महत्वाचं आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेसाठीही.

    पुढच्या वेळी सर्चचा शोध घेताना निसटून गेलेलं अजून काय काय सापडेल काय माहित! :)

Sunday, January 31, 2016

अलिबाग - आवास - सासवण्याची भटकंती

    मागच्या आठवड्यात एक कोकणाची छोटीशी भटकंती झाली. अलिबागजवळचं आवास गाव, अलिबागचा कुलाबा किल्ला, सासवण्यांचं शिल्पकार करमरकरांचं संग्रहालय हे बघितलं. अलिबागची कान्होजी आंग्रेंची समाधी संध्याकाळी सहाला बंद होते त्यामुळे ती बघता आली नाही, आणि चढू न शकणार्‍या मेंबरांची संख्या आणि ऊन बघून कनकेश्वरला जायचं कॅन्सल केलं. हे या भटकंतीचे काही फोटो:


आवासचा समुद्रकिनारा
    आवासला "जोगळेकर कॉटेजेस"ला उतरलो होतो त्यांच्या जागेत मुचकुंदाचं झाड होतं. मुचकुंदाची फुलं बघितली होती, पण फळं पहिल्यांदाच बघायला मिळाली.
मुचकुंदाची फळं

आवासचा किनारा
    किनार्‍याच्या जवळंच एका वेलाला मस्त शेंगा होत्या. नाव - गाव काही आठवत नव्हतं, पण हे विषारी किंवा हात न लावण्याजोगं असावं एवढंच आठवलं:

दिसताहेत की नाही मस्त? या खाजकुयलीच्या शेंगा आहेत!
ही आहेत खाजकुयलीची फुलं.

    सासवण्याला शिल्पकार करमरकरांच्या घरचं संग्रहालय छोटंसं पण छान आहे. त्यांच्या पुतळ्यांचे अंधळे - छोट्या बाळांचे - मोठ्यांचे - प्राण्यांचे - घारे - पिंगे - काळे असे वेगवेगळ्या प्रकारचे डोळे फार बोलके असतात. ही त्यांच्या एका प्रसिद्ध शिल्पाची प्रतिकृती:     कुलाब्याचा (अलिबागचा) किल्ला छोटासा, पण बघायला छान आहे.  किल्ल्यात एक माहितीफलक आहे, बाकी गाईड वगैरे चोचले नाहीत. मुंबईचे इंग्रज आणि जंजिर्‍याचा सिद्दी अशा दोन शत्रूंवर मराठ्यांना इथून नजर ठेवता येई. भरती - ओहोटीच्या वेळा नीट बघून इथे जायला हवं. ओहोटीला चालत / घोडागाडी घेऊन आणि भरतीला तरीतून किल्ल्यात जाता येतं.

    आवासहून येतांना गावात (कोरड्या ठिकाणी) दोन मोठे शंख दिसले म्हणून उचलून पुण्याला आणले. पुण्याला आल्यावर धुण्यासाठी ते पाण्यात टाकले. जरा वेळाने बघितलं तर त्यातल्या गोगलगायी फिरायला बाहेर निघाल्या होत्या! आता या शंखांचं काय करायचं हा प्रश्न आहे. :)

***

   या ट्रीपच्या वेळी साहजिकच कोकणाची याच्या आधीची ट्रीप आठवली. असाच जानेवारी महिना. सव्वीस जानेवारी आणि वीकेंडच्या मधला एक दिवस सुट्टी काढून गेले होतो तेंव्हा. तिथे ऑफिसच्या कामासाठी रात्री अकरा – साडेअकराला फोन. तो घेतला नाही म्हणून केवढं रामायण, खोटे आरोप, मनस्ताप! बरंच झालं ... ती उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी होती. आतापर्यंत मी जो विचार करायचा टाळत होते तो या निमित्ताने केला आणि अखेरीस निर्णय घेतला – आता पुरे. ज्यातून आपल्याला काहीही आनंद मिळत नाही अशा कामासाठी यापुढे दिवसरात्र एक करून राबायचं नाही. पुढे काय करणार काहीही ठरलेलं नसताना चक्क राजिनामा देऊन टाकला, आणि एकदम मोकळं मोकळं वाटायला लागलं. थोडे दिवस मनसोक्त भटकंती केली, सुट्टी उपभोगली, कालपर्यंत आपण कंपनीचं आयडी लावून, आयडेंटिटी घेऊन जगत होतो, आता खरी / वरवरची / खोटी कुठली आयडेंटिटी (आणि महिन्याला मिळणारे पैसेही) नाहीत हेही अनुभवलं. मग माऊ आली आणि तिने अजून मोठ्ठी, अर्थपूर्ण आयडेंटिटी देऊ केली. काही दिवस फक्त मी आणि माऊ असेही एन्जॉय केले, आणि मग आपल्याला ज्यातून आनंद मिळेल अशा कामाचा शोध सुरू झाला. सुदैवाने तसं काम सापडलंही! या ट्रीपला जातांनाही थोडं काम मी सोबत घेऊन गेले होते. त्यासाठी मुद्दाम थोडा वेळ काढून ते संपवलं. ते करतांना आपला ट्रीपचा वेळ वाया गेला असं अजिबात वाटलं नाही, आणि मागच्या वेळच्या ट्रीपमुळे आपला केवढा मोठा फायदा झालाय हे जाणवलं!!!