Friday, June 27, 2014

जांभळा उंट



माऊला प्रथमच भेटायला येणार्‍या एका आजीने तिला दाबल्यावर वाजणार्‍या प्राण्यांचा एक सेट आणला होता दीड एक वर्षापूर्वी. तसा चांगला होता तो ... पण जांभळ्या रंगाचा उंट किंवा गुलाबी हत्ती म्हणजे यक्क ... असले कसले रंग वापरतात हे लोक खेळण्यांना? काळा हत्ती आणि पिवळसर मळकट राखाडी उंट बनवणं इतकं अवघड आहे का? त्या उंटाचे पाय तर हिप्पोसारखे वाटताहेत!

त्यातलं एक एक खेळणं वापरायला काढतांना सगळ्यात शेवटी, बाकीची वाजेनाशी झाल्यावर नाईलाजाने दोन महिन्यांपूर्वी जांभळा उंट खेळायला बाहेर पडला. आणि पाहिल्याक्षणी माऊला एकदम आवडला.  रस्त्यात बघितलेला उंट आणि हा प्राणी एकच आहे याविषयी जरासुद्धा कन्फ्युजन नाही. सद्ध्या “ओंटो” मंमं, शीशी, आबू सगळीकडे सोबत असतो. 




दीड वर्षाने का होईना पण जांभळा उंट किती मत्त असतो ते समजलं एकदाचं आईला! तिच्या डोक्यातला असला सगळा कचरा दूर करायला बरेच कष्ट पडणार माऊला. तशी थोडी थोडी सुधारते आहे ती ... परवाच आईने माऊला जिराफावर बसलेलं हिरवं माकड आणलंय. :)

Saturday, May 10, 2014

बुप्पा आणि मंबू


सद्ध्या मऊचा आणि माझा दिवस पुस्तक वाचल्याशिवाय पूर्णच होत नाही. तिची सुंदर सुंदर पुस्तकं बघितली की पुन्हा मला तिच्या वयाचं होऊन ही पुस्तकं बघावीशी वाटतात.

आज तिच्या लाडक्या “बुप्पा” आणि “मंबू” विषयी. ही सद्ध्या माऊची सगळ्यात आवडती पुस्तकं.

जंगलातल्या सगळ्या लहान प्राण्यांच्या खोड्या काढणार्‍या, त्यांना त्रास देणार्‍या बुक्का हत्तीला एक दिवस चांगलीच अद्दल घडते. त्याची आई, बाबा, मित्र कुणी सापडत नाहीत, आणि जंगलातलं कुणीच त्याला मदत करायला तयार होत नाही. मग बुक्का शहाणा होतो. सुंदर चित्र, सोप्पी गोष्ट, वाजवी किंमत. नॅशनल बुक ट्रस्टचं पुस्तक.







लंबू जिराफ आणि नॉटी खारुताई यांच्या मैत्रीची गोष्टही एनबीटीचीच. लंबू जिराफ आहे, आपल्यापेक्षा वेगळा आहे मग आपला मित्र कसा होणार असा प्रश्न पडलेल्या नॉटीला लंबू जूंबा हत्ती आणि गप्पू माकड, रंगीला फुलपाखरू आणि फुलं असे मित्र दाखवतो, आणि आपल्यापेक्षा वेगळा असला तरी लंबू आपला मस्त मित्र आहे हे नॉटीला पटतं. 



माऊसाठी आतापर्यंत जी काही पुस्तकं धुंडाळलीत, त्यात मला ज्योत्स्ना प्रकाशन, प्रथम प्रकाशन आणि नॅशनल बुक ट्रस्ट यांची पुस्तकं सगळ्यात आवडली. पुस्तकातली चित्र, गोष्ट, किंमत या सगळ्यात उजवी. बाकी स्लीपिंग ब्युटी आणि सिंडरेला सगळीकडे सहज मिळताहेत, पण कितीही सुंदर कागदावर छापलेली मिळाली तरी छळ करणारी सावत्र आई, दुष्ट सावत्र बहिणी, गरीब बिचारी नायिका आणि सोडवायला येणारा राजपुत्र असल्या भाकड गोष्टी तिला आवर्जून सांगाव्यात असं मला तरी वाटत नाही.  
तुम्ही दीड वर्षाचे असाल तर काय काय वाचाल? अजून कुठली पुस्तकं सुचवाल मनीमाऊला?

Saturday, February 22, 2014

झियाउद्दिन युसफझाई



मलाला युसुफझाईवर तालिबान्यांनी केलेला हल्ला, त्यातून तिचं वाचणं आणि मग जगभर तिचं झालेलं कौतुक हे सगळं मागच्या वर्षी उडत उडत वाचलं. चौदा - पंधरा वर्षांच्या मुलीला अशी कितीशी समज असणार? तिच्यावर तालिबान्यांनी हल्ला केला म्हणून पाश्चात्य मिडियाने तिला हिरो बनवली अशीच काहीशी प्रतिमा झाली होती माझ्या मनात. आज प्रथमच तिचा तो बीबीसीवरचा ब्लॉग वाचला, त्यातुन उत्सुकता चळावली म्हणून जालावर तिच्याविषयी माहिती शोधली. तिच्या बापाविषयी वाचलं, आणि त्याचं धैर्य (का वेडेपणा?) बघून थक्क झाले. 
बाबारे, तुला कुटुंबकबिला घेऊन पळून नाही जावंसं वाटलं? माझ्या देशात तालिबान नसतांनाही मुलांसाठी पुरेश्या संधी नाहीत म्हणून भलेभले देश सोडून जातात, किंवा देश सोडता येत नाही म्हणून हळहळतात. तालिबान्यांच्या गावात राहून अजाण वयाच्या मुलीला तू शाळेत पाठवतोस, शिकून मोठी होण्याचं स्वप्न दाखवतोस. बीबीसीवर ब्लॉग लिहिण्यासाठी तिचं नाव सुचवतोस, तिच्यावर डॉक्युमेंट्री काढू देतोस. तुला, तिला त्यांच्याकडून जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असतांनाही मी स्वातचं काहीतरी देणं लागतो, स्वातच्या अवघड काळात स्वात सोडून जाणार नाही, इथेच राहणार म्हणून हटून बसतोस. आपली लाडकी मुलगी, तिच्याहूनही लहान मुलगे – या सगळ्यांचं कसं होईल म्हणून भीती नाही वाटली तुला? स्वातमध्ये तू उभी केलेली शाळा चालणं इतकं महत्त्वाचं वाटलं? मनात आणलं असतं तर स्वात सोडून जाणं अशक्य नव्हतं तुला. अवघड नक्कीच होतं ... आपलं घर सोडून परमुलुखात वसणं कुणाला सोपं असतं? 
आम्हाला पत्ताही नसतांना तुझ्यासारखे वेडे लोक जगभरातल्या कुठल्या कुठल्या दुर्गम भागात तालिबानशी वेड्यासारखे लढत असतात म्हणून त्यांना जिंकता येत नाही.

***
मलालाविषयी एक माहितीपट इथे आहे.