Monday, March 9, 2015

जोयानाचे रंग


दोन चार दिवसांपूर्वी "अक्षरधारा" मधून माऊसाठी गोष्टीची ढीगभर पुस्तकं आणलीत ... त्यातलंच हे एक. म्हणजे मला माहित आहे, माऊ अजून लहान आहे हे पुस्तक वाचायला, पण फारच छान वाटलं म्हणून घेतलंच मी ते पुस्तक.

आज ते वाचलं, आणि इतकं आवडलं, की पुस्तकावर माऊचं नाव घातलंय म्हणून ... नाही तर ते चक्क ढापायचा विचार होता माझा. ("माऊची आई" म्हणून नाव बदलावं का त्या पुस्तकावरचं?) माऊची बरीचशी पुस्तकं मला आवडतात. म्हणजे काहीतली चित्र आवडतात, काहीतल्या गोष्टी आवडतात. काहीतलं सगळंच आवडतं!!! हे असंच वाईट्ट आवडलंय. पुस्तकातली चित्र एकदम गोड्ड आहेत. आणि गोष्टी वाचतांना मला थेट बिम्मची आणि लंपनची आठवण झाली ... जोयानाचं विश्व इतकं सुंदर उभं केलं आहे ना इथे ... “आजी काय बोलते हे मला कळत नाही. मिनी मांजर काय बोलते ते आजीला कळत नाही. रंग काय बोलतात ते मांजरीला कळत नाही. झाड काय बोलतं ते आभाळाला कळत असेल का?” असं मावशीला विचारणारी ही जोयाना!
 
आता अडचण एकच आहे. कवितामावशीला विचारायचंय, जोयानाच्या गोष्टी अजून सांगतेस का म्हणून. म्हणजे हे एक पुस्तक माऊच्या आईसाठी ठेवलं तरी बाकीच्या जोयानाच्या गोष्टी माऊला वाचायला मिळतील!!!





***
जोयानाचे रंग
लेखिका कविता महाजन
राजहंस प्रकाशन
किंमत ५० रुपये

Friday, March 6, 2015

India’s Daughter



निर्भयाची घटना घडली, तेंव्हा फक्त धक्का, अविश्वास एवढंच वाटलं होतं, यापलिकडे काही सुचणं शक्यच नव्हतं. त्या घटानेतलं क्रौर्यच इतकं होतं की विचारशक्ती गोठून जावी. हे सगळं घडलं तेंव्हा मी नवी आई होते, लेकीमध्ये पूर्ण बुडून गेलेली. आपल्यासमोरचं हे इवलुसं गाठोडं उद्या मोठं होऊन घराबाहेर पडणार आहे हा विचारही तेंव्हा मनाला शिवलेला नव्हता!

ती दवाखान्यात मृत्यूशी झगडत होती तेंव्हा असंही वाटलं होतं, की हिला लवकर मरण यावं आणि या सगळ्यातून सुटका व्हावी तिची एकदाची. म्हणजे चारित्र्यावर कलंक वगैरे म्हणून नाही, पण यातून ही वाचलीच, तरी काय स्वरूपाचं जगणं वाट्याला येणार तिच्या? अजून एक अरुणा शानभाग म्हणून खितपत पडायचं का हिने? शारीरिक पंगुत्व घेऊन आणि आयुष्यभरासाठी “रेप सर्व्हायव्हर” चा शिक्का घेऊन हिला जगावं लागणार. १६ डिसेंबर २०१२ च्या मागे – पुढे तिला काही अस्तित्वच नाही!

“इंडियाज डॉटर” ही निर्भयाच्या केसची मला तरी अतिशय उत्तम हाताळाणी वाटली. निर्भयाचे आईवडील – सामान्य परिस्थितीतून पुढे आलेल्या त्यांची मुलीच्या भल्यासाठीची धडपड आणि ती गेल्यावरही, तिने काही चूक केलेलं नाही, तिचं नाव का लपवून ठेवावं? हा विचार यामुळे त्यांना खरोखर सलाम करावासा वाटला. त्यांचं बोलणं ऐकल्यावर प्रथमच मनापासून वाटलं, निर्भया जगायला हवी होती. तिला जगायला मिळालं असतं.

सगळ्यात धक्का बसला तो गुन्हेगार (आणि त्यांचे वकील) यांचं बोलणं ऐकून. दिल्लीच्या रस्त्यावर दिसणार्‍या कुठल्याही सर्वसामान्य माणसासारखेच हे दिसतात, बोलतात. विकृत लिंगपिसाटसारखे नाही. त्यांच्या बोलण्यात केल्या गोष्टीचा पश्चात्ताप कुठे दिसला नाही – “दोन्ही हातांनी टाळी वाजते. तिला अद्दल घडवण्यासाठी आम्ही हे केलं. ती निमूट राहिली असती तर ही वेळ आलीच नसती!” असं समर्थनच दिसलं! दिल्लीत शिकत असतांना याच रस्त्यांवरून मी बसने प्रवास केलेला आहे. रात्री आठ वाजताही. फक्त मित्राबरोबरही. फरक इतकाच की बस इतक्या कमी गर्दीची नव्हती, खच्चून भरलेली असायची, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे माझं नशीब बलवत्तर होतं!  

या गुन्ह्यातला तथाकथित बालगुन्हेगार अजून नऊ दहा महिन्यात उजळ माथ्याने पुन्हा दिल्लीत वावरत असेल या कल्पनेने थरकाप उडाला. तिहार जेलचे मानसतत्ज्ञ म्हणतात, तिहारमध्ये दोनशे दोनशे बलात्कार केलेलेही कैदी आहेत. दोनशे हा त्यांना आठवणारा आकडा. खरा आकडा याहून मोठाही असू शकेल! यातल्या जेमतेम हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या बलात्कारांसाठी त्यांना शिक्षा झालीय आजवर. बलात्कार झाल्यावर गुन्हेगार सहीसलामत सुटणं ही नेहेमीची बाब, शिक्षा होणं अपवादात्मक. आणि स्त्री समोर दिसली, तर पुरुषाचा हक्कच आहे हा ही भावना. ज्यांच्याकडे पैसे असतात ते पैसे फेकून मिळवतात, आमच्यात धमक होती म्हणून आम्ही पैसे न फेकता उपभोग घेतो हा माज! फाशीच्या शिक्षेने हे संपणारं नाही, मान्य. वृत्ती बदलायला हवी, मान्य. कुठे, कधी, कसं बदलणार हे सगळं? तोवर मुलींनी मुळात जन्मालाच येऊ नये, आलं तर घराबाहेर पडू नये, बाहेर पडल्यास परिणाम निमूट भोगावेत असं म्हणायचं का?

Sunday, January 25, 2015

जिवाचा गोवा

गेल्या पाच – सहा महिन्यांपासून जमेल तसं एका नावाजलेल्या सेवाभावी संस्थेमध्ये थोडं काम करत होते. त्या कामावर आधारित पेपर मांडायला एका सेमिनारला गोव्याला जायची संधी मिळाली या आठवड्यात. मी गावाला जाणार म्हणजे अर्थातच माऊला घेऊन. तिला घेऊन एकटीने एवढा उद्योग करावा का नाही अशा विचारात होते आधी. पण संस्थेतल्या सहकारी म्हणाल्या, जरूर घेऊन ये तिला. मग ठरवलं, जिवाचा गोवा करूनच यावा!

आजवर माऊला घेऊन केलेले प्रवास तिची गैरसोय होणार नाही असं बघून, शक्यतो तिच्या पेसने असे होते. यावेळी प्रथमच दुसर्‍याने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार, धावपळीचा प्रवास होता, आणि माऊचा बाबा सोबत नसणार होता. त्यामुळे पेपर वाचायच्या तयारीपेक्षा मला माऊच्या तयारीची जास्त काळजी होती!

प्रत्यक्ष कॉन्फरन्स माझ्यापेक्षा माऊने जास्त एन्जॉय केली! पंधरा – वीस कॉलेजवयीन दादा-ताई कौतुक करायला + खेळायला, आणि जरा चेंज हवा असेल तर मग मावशी मंडळी ... दोन दिवस नुसता कल्ला केला माऊने! “दोन वर्षांच्या लेकीला घेऊन एवढा प्रवास म्हणजे धीराची आहेस तू!” पासून ते “कॉन्फरन्सला लहान मुलांना घेऊन यायला परवानगी असते का?” पर्यंत वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या तिथे. (यातल्या बहुसंख्य मी कानाआड केल्यात.) 


आजपर्यंत माऊ आणि काम या गोष्टी एकमेकांपासून पूर्ण वेगळ्या ठेवायचा माझा प्रयत्न होता. त्याची काही गरज नाही असं जाणवलं मला. तिच्या सोबत असण्याने मला नक्कीच फायदा झाला - जनरली अनोळखी घोळक्यामध्ये मी फार तोंड उघडत नाही. इथे माऊची आई म्हटल्यावर तोंड बंद ठेवण्याची संधीच नव्हती. तरीही माझ्या दसपट तरी ’नेटवर्किंग’ माऊने केलं असेल कॉन्फरन्समध्ये. आणि तिलाही यातून नवं काही अनुभवण्याची संधी मिळेल असं वाटतंय. माऊचं रोजचं रूटीन पाळणं नक्कीच जमणार नव्हतं हे दोन दिवस, पण रूटीनचा बाऊ केला तर नव्या ठिकाणी, नवे अनुभव घ्यायला मिळणं आणि जुळवून घेता येणं कसं शिकणार? एखाद्या वेळी असं झोपायची वेळ आली तर फार वाईट वाटून घ्यायचं नाही असं ठरवलंय मी!


कारण त्यानंतर असा दंगा करायची संधी मिळते!