Wednesday, July 13, 2011

कुसुमाग्रज: कारागृह

कुसुमाग्रजांच्या ‘समिधा’ संग्रहातली ही एक लाडकी कविता ... जालावर कुठे दिसली नाही म्हणून इथे टाकते आहे ...

****************************

कारागृह

    या कारागृहातून मी कधी मुक्त होणारच नाही का?
    सोनेरी उन्हाचा कवडसा गवाक्षातून माझ्या अंगावर आला की रोज मला आशा वाटते.
    आज मुक्ततेचा सुवर्णदिन उगवला आहे!
    दिवसाबरोबर ती आशाही क्षणाक्षणाने मावळते.
    आणि रात्रपक्षी गवाक्षाच्या गजांवर फडफडू लागल्यावर माझे अंतःकरण रात्रीप्रमाणे अंधारमय होते.

***

    मुक्त करायचेच नाही तर या बंदिगृहाला हे गवाक्ष तरी का ठेवलेस?
    तासन् तास त्या लोखंडी गजांजवळ मी उभा राहतो आणि बाहेर क्षितिजापर्यंत पसरलेल्या स्वतंत्र जगाचे दर्शन घेतो.
    माझ्या आशा आपले पंख पसरतात.
    आणि त्या अथांग जगाच्या कानाकोपर्‍यांतून विहार करतात.
    लोखंडाच्या हिमस्पर्शाने मी शेवटी भानावर येतो.
    दूर गेलेले माझ्या आशांचे पक्षी
    जखमी होऊन माघारी येतात
    आणि अंतःकरणाच्या घरट्यात रक्तबंबाळ होऊन पडतात!

***

    केव्हा तरी मला मुक्त करणार असशील तर लौकर कर!
    मला आता भीती वाटू लागली आहे.
    या काळ्याकभिन्न चिरेबंदी भिंतींची नव्हे,
    या भयानक एकान्ताची नव्हे,
    नागाप्रमाणे विळखा घालणार्‍या या शृंखलांचीही नव्हे,
    तर या सर्वांसंबंधी मला वाटणारा द्वेष नष्ट होण्याची!
    पारतंत्र्य प्रिय होण्यापूर्वी
    स्वातंत्र्यावरील श्रद्धा नाहीशी होण्यापूर्वी
    माझ्यातील मी मरून जाण्यापूर्वी
    मुक्त करणार असशील तर मला मुक्त कर!

4 comments:

Anagha said...

तुझ्यामुळे वाचली गेली ! त्याबद्दल आभार. :)
ह्या कवितेला काही इतिहास आहे का ? म्हणजे का व कधी लिहिली ?

Gouri said...

अनघा, इतिहास मलाही माहित नाही. पण काही पार्श्वभूमी नसतानाही कविता आवडली.

Anagha said...

अगं, असं वाटलं की ही कविता स्वातंत्र्यवीर सावरकरांशी काही संबंधित आहे की काय...

Gouri said...

अनघा, तुझी प्रतिक्रिया वाचल्यावर मलाही वाटलं ही कविता स्वातंत्र्यवीर सावरकरांवर असू शकेल. त्यांच्या कारावासात बाहेरच्या स्वातंत्र्याचं दर्शन घडवू शकणारं असं गवाक्ष लौकिकार्थाने नव्हतं ... सगळीकडे पारतंत्र्याचंच दर्शन होतं. पण त्यांच्या आशा, कल्पना यांना तेंव्हाही बाहेरचं स्वातंत्र्य बघता येत असणार.