अजून एक ‘समिधा’ मधली लाडकी कविता ...
तपश्चर्या
पारिजातकाच्या झाडास त्या वेळी अशी सुंदर सुगंधी फुले येत नव्हती. कसला तरी गंधहीन आणि सौंदर्यहीन मोहर येई आणि मातीला मिळून जाई.
इतर वृक्षांचे आणि फुलझाडांचे वैभव पाहून पारिजातकाच्या अंतःकरणात आसूया उत्पन्न झाली. तो दुःखी होऊ लागला.
सभोवारची सुंदर झाडे त्याच्या दुःखाची कुचेष्टा करू लागली. त्याच्या विषादाचे विडंबन करू लागली!
पारिजातकाने ठरवले, जगातील कोणत्याही वृक्षाजवळ नसलेले वैभव आपण मिळवले पाहिजे, वाटेल ते करून सर्व वनस्पति-सृष्टीत श्रेष्ठत्व संपादन केले पाहिजे.
त्याने तपश्चर्या करण्यास सुरुवात केली.
त्याच्या नम्र मस्तकावरून कालप्रवाहाच्या असंख्य लाटा गेल्या, अगणित वादळे गेली, अनेक वणवे गेले.
पण त्याचा निर्धार ढळला नाही. तो खाली मान घालून तपश्चर्या करीत राहिला.
अखेर त्याचे तप सफल झाले, परमेश्वर त्याच्यापुढे येऊन उभा राहिला. ‘वर माग’ म्हणून पारिजातकास त्याने आज्ञा केली.
तपाला बसतेवेळी मनात असलेली इच्छा पारिजातकाने, दीर्घ श्रमांच्या ग्लानीमध्ये बोलून दाखवली.
तो म्हणाला - चांदण्यासारखी सुंदर, निशिगंधासारखी शुभ्र, कमलासारखी आरक्त, त्यांचा गंध मधुर आहे, पण उद्दाम नाही अशा फुलांचा विपुल फुलोरा मला लाभावा.
ईश्वराने त्याची इच्छा सफल केली. स्वर्गात शोभण्यासारख्या सुंदर फुलांनी पारिजातक बहरून गेला. जणू असंख्य स्वप्नांचा थवाच त्याच्या फांद्यांवर येऊन बसला होता!
परिमलाच्या द्वारा त्याच्या वैभवाचे वृत्त सार्या रानात पसरले. सर्व वृक्ष त्याच्यापुढे नम्र झाले. त्यांनी पारिजातकाचा जयजयकार केला.
पारिजातकाने डोळे उघडले. आपले अतुल वैभव त्याच्या दृष्टीस पडले. त्याची ग्लानी उतरली. तो आवेशाने उद्गारला, "मी तापसी आहे! मला हे वैभव काय करायचे?"
आपल्या देहावर बहरलेली ती सारी संपदा त्याने खालच्या धुळीत टाकून दिली!
4 comments:
व्वा !
अगं तुझ्यामुळे किती सुंदर काही वाचलं जातंय ! आभार गं ! :)
‘समिधा’ मधल्या अजून काही कविता इथे उतरवून काढायचा विचार आहे ... जालवर कुठे उल्लेखही सापडला नाही अजून मला ‘समिधा’ संग्रहाचा. मला तर तो वाचताना जिब्रानच्या ‘प्रॉफेट’ची आठवण येते.
अप्रतिम! कुसुमाग्रजांनाही हेच लागू आहे ना गं...
अलौकिक तेजपुंज महान व्यक्तिमत्व!
श्रीताई, अगदी. तपाला बसतानाची ईर्ष्या तप पूर्ण होईपर्यंत अशीच गळून जात असेल, नाही का?
Post a Comment