Thursday, August 30, 2012

दूधसागर फॉल्सची भटकंती

दूधसागर फॉल्स म्हणजे गोवा - कर्नाटक सीमा. पश्चिम घाटातला सगळ्यात मोठा धबधबा. बारा महिने, खरोखर दुधासारखं पाणी असतं या धबधब्याला. इथे पोहोचण्यासाठी एकच मार्ग - वास्को - लोंढा मार्गावरून येणार्‍या रेल्वेगाड्या. ऑफिशिअल प्रवासी थांबा नसला, तरी प्रत्येक गाडी इथे थांबतेच. गोव्याहून येणारी गाडी घाट चढल्यावर दम खायला दूधसागरला थांबते, आणि लोंढ्याहून जाणारी घाट उतरण्यापूर्वी इथलं सौंदर्य न्याहाळायला. यंदा मला ऐन पावसाळ्यात दूधसागर बघायची संधी मिळाली. त्या भटकंतीचे हे फोटो:


वळणावळणाची वाट


स्कूल चले हम!


शेतकरीदादा नांगरत होते

शेतीच्या कामाची लगबग

भातखाचरात लावणी चालली होती


यांनी स्वागत केलं
गाडी थांबते तिथून साधारण एक – दीड किलोमीटरवर धबधबा आहे.




अंधारातून प्रकाशाकडे !


खालच्या फोटोत दूर डोंगरात आडवी रेघ दिसते ना पांढरी, ती गाडी आहे!



आणि हा धबधबा! रेल्वेच्या पुलावरून फोटो काढलेत. गाडीतून जातांनाही इतक्या जवळून बघता येतो, त्याचे तुषार अंगावर घ्यायला मिळतात.

दूधसागर

दूधसागर

दूधसागर

या पाण्यात खेळायला पुन्हा दिवाळीच्या सुमाराला यायला हवं. पावसाळ्याच्या दिवसात पाण्याला प्रचंड वेग असतो आणि दगड निसरडे होतात, त्यामुळे पाण्यात जाता येत नाही :(


ही दूधसागर स्पेशल ऑर्किड्स - मला पूर्ण प्रवासात ही फक्त इथेच बघायला मिळाली. रेल्वेच्या बोगद्यांच्या जवळच्या उघड्या कातळावर यांचा मस्त गालीचा होता. मातीत कुठेच दिसली नाहीत ही. एक तर चक्क वडाच्या पारंबीवर  आलेलं सापडलं!
दूधसागरचं ऑर्किड

या भटकंतीचे अजून फोटो इथे आणि इथे आहेत:


Wednesday, August 29, 2012

ओरिसाची भटकंती: इकडचं तिकडचं आणि समारोप



ही माझी ओरिसाच्या भटकंतीवरची शेवटची पोस्ट. सगळं लिहून संपवण्याच्या घाईत बर्‍याच इंटरेस्टिंग गोष्टी सुटून गेल्यात. त्या आठवतील तश्या मांडल्यात इथे.

 नक्षलवादाविषयीच्या ‘रेड सन’ पुस्तकाविषयी ऐकलं होतं. या पुस्तकाचा अतिशय सुंदर
सविस्तर परिचय श्रावण मोडक यांनी इथे करून दिला आहे. पुस्तकाविषयी अजून काही सांगत नाही – परिचय आणि पुस्तक दोन्ही आवश्य वाचा इतकंच म्हणेन.

 कोरापूट आणि पोचमपल्लीजवळचा आन्ध्र हे दोन्ही भाग नक्षलांच्यारेड कॉरिडॉरमध्ये येतात.

नक्षल स्मृतीस्तंभ

संस्थान नारायणपूर, पुट्टुपक्कम भागातून जातांना पोलीस कारवाईत मारल्या गेलेल्या नक्षलांचे स्मृतीस्तंभ जागोजागी दिसतात.

  आन्ध्र प्रदेशने नक्षलांविरुद्ध ठोस कारवाई केल्यानंतर इथले नक्षल ओरिसा, छत्तिसगड, महाराष्ट्रात अधिक सक्रिय झाले. आता इथे सगळं शांत शांत आहे असं समजलं. पण आजही गावातल्या घराघरावर नक्षल ग्राफिटी दिसते.

घरांवरची ग्राफिटी
सहज पुण्यातून बाहेर पडल्यावर सिंहगडावर किंवा ताम्हिणीला जातांना घराघरावर नक्षल घोषणा  लिहिलेल्या दिसल्या तर कसं वाटेल? हा विचार डोक्यात आल्याखेरीज राह्त नाही.

हे सगळं हैद्राबादपासून केवळ एक दीड तासाच्या रस्त्यावर. हा भाग दुर्गम नाही, कोरापूटशी तुलना करता मागास तर नाहीच नाही. ताडाची आणि कपाशीची शेती आहे. पारंपारिक विणकामाचा व्यवसाय आहे. शाळा, कॉलेजं आहेत, दवाखाने आहेत. कित्येक जण कामाला हैद्राबादला जातात. दोन्ही भागातल्या प्रश्नांचं स्वरूप नक्कीच वेगवेगळं असणार. पण तिथेही नक्षल आहेत, इथेही आहेत. नेपाळपासून तामिळानाडूपर्यंत सगळीकडेच हे कसे पसरले? तेंव्हा आम्ही काय करत होतो? मानेसरच्या कामगारांच्या हिंसाचारामागेही त्यांचा हात असतो, आणि दांतेवाडामधल्या पोलिसांच्या हत्यांमध्येही. मोठया शहरांमध्ये त्यांचे स्लीपर सेल आहेतकाय हवंय नेमकं या नक्षलांना? त्यांच्या मते आदिवासींवर अन्याय होतोय. ते फसवले जाताहेत. अगदी खरं आहे हे. इतकी वर्षं त्यांची वंचना झाली आहेच. काय उपाय आहे यावर? नक्षलांच्या आजवरच्या कारवाया बघितल्या, तर हे लोक कुठल्या विचारसरणीसाठी किंवा विकासासाठी लढताहेत असं म्हणवत नाही. मग उरतो फक्त एकच उद्देश – तुम्ही आज जी सत्ता भोगता आहात, ती आम्हाला द्या. त्यासाठी अराजक माजवण्याचीही आमची तयारी आहे. जिथे जिथे सरकारविरोधी असंतोष आहे, तिथे नक्षल आहेत. आणि दुर्दैवाने आपल्याला अतिरेकी कारवायांचा धोका जितका जाणवतो, तितका नक्षलांचा जाणवत नाही. कारण मुंबईच्या ताजवर अतिरेकी हल्याचं लाईव्ह चित्रीकरण आपण बघू शकतो. छत्तीसगढच्या जंगलात नक्षलांच्या कारवाया आपल्या डोळ्यासमोर घडत नाहीत. ते ‘दूर कुठल्यातरी जंगलात’ घडत असतं. पुण्यामुंबईतही त्यांचे स्लीपर सेल आहेत याचा आपल्याला पत्ता नसतो.

    सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे आपल्याकडच्या विचारवंतांच्या वर्तुळांमध्ये अजूनही नक्षलांविषयी रोमॅंटिक कल्पना आहेत. दिल्लीला जेएनयूमध्ये असतांना आयसा (AISA) सारख्या विद्यार्थी संघटनेच्या पत्रकांमध्ये यांचं कौतुक मी स्वतः वाचलंय. ती पत्रकं वाचून तर कधी जाऊन या क्रांतीकारकांना आपण सामील होतो असं वाटेल.

    पोचमपल्ली नावाची दोन गावं आहेत. एक आन्ध्रातलं साड्यांचं पोचमपल्ली, दुसरं तमिळनाडूमधलं. आन्ध्र पोचमपल्लीलाभूदान पोचमपल्लीम्हणतात. विनोबांची भूदान चळवळ इथून सुरू झाली होती म्हणून. भूदान यशस्वी झालं असतं, तर इथे नक्षल इतके प्रभावी होऊ शकले असते का?

*************************************
    ओरिसाच्या भटकंतीच्या कहाणीचा समारोप करायचं मी इतके दिवस पुढे ढकलते आहे. कारण लिहितांना खूप गोष्टी सुटून गेल्यात, बर्‍याच गोष्टी अजून डोक्यात अर्ध्या कच्च्या आहेत, आणि आपल्याला जे वाटतंय, ते लिहिता येणार नाही अशी जवळपास खात्री आहे.

केचला मधली शाळा बघणं हे निमित्त होतं. मला कोरापूटला जायचं होतं, ते सरकारचं काम नेमकं कसं चालतं ते बघायला. यूपीएससीचं स्वप्न मीही कधीतरी बघितलं होतं. त्यामागे अशी समजूत होती, की प्रशासनात जाऊन तुम्ही खरंच देश समजून घेऊ शकता, काही बदल घडवून आणू शकता. काठावर बसून टीका करणं सोपं असतं. त्यात तुम्हाला करावं काहीच लागत नाही. प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारे खरे. ते स्वप्न मागे राहिलं, आणि त्याबरोबरच तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यात काही बदल घडवण्याची मोठी संधीही. आता त्याविषयी हळहळ करण्यात अर्थ नाही. पण ही भेट या हुकलेल्या संधीच्या शक्यता बघण्यासाठी होती.

कोरापूटच्या जगन्नाथाचा रथ

महाराष्ट्राच्या, पुण्याच्या जनजीवनातलं प्रशासनाचं स्थान आणि कोरापूटमधलं कलेक्टरांचं स्थान यांची तुलनाही करणं अवघड आहे. तिथली जनता अजूनही मायबाप सरकारवर पूर्ण अवलंबून आहे. अजूनही तिथला कलेक्टर जिल्ह्याचा राजा आहे. सगळे अधिकारही त्याचेच, आणि जबाबदारीही. अश्या पदावर जेंव्हा शिवाजी महाराजांच्या मुलकी प्रशासनाचा आदर्श ठेवणारा अधिकारी असतो, तेंव्हा त्याला काम करतांना बघणं हे फार मोठं सुख असतं. माझ्या जिल्ह्यातल्या आदिवासी शेतकर्‍याचं अर्थशास्त्र मला समजून घ्यायचंय म्हणून तो रस्त्यात भेटलेल्या शेतकर्‍याशी गप्पा मारतो. कुठल्या गॅझेटमध्ये न लिहिलेल्या गोष्टी या गप्पांमधून उलगडतात. प्रत्येक फील्ड व्हिजिटमध्ये तो किमान एका शाळेला भेट देतो, तिथल्या मुलांशी गप्पा मारतो. यंदा तुमच्या शाळेचा निकाल १००% लागलाच पाहिजे हे उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या पुढे ठेवतो. कलेक्टर सर आपल्याशी वेळ काढून बोलले, याचा केवढा आनंद आणि अभिमान वाटत असेल त्या शाळेच्या मुलांना!

आणि दर्शनासाठी जमलेले भाविक

कोरापूट हा नक्षलग्रस्त जिल्हा. जिल्ह्याचे कित्येक ब्लॉक नक्षलांच्याच प्रभावाखाली आहेत. चार वर्षांपूर्वी थेट जिल्हा पोलीस मुख्यालयावर हल्ला झाला, इतके इथे नक्षल प्रबळ आहेत. आधीच दुर्गम आणि मागास भाग, त्यात नक्षलांचा उपद्रव. त्यामुळे इथे काम करायला सरकारी कर्मचारी तयार नसतात. कित्येक जण इथली बदली संपेपर्यंत कार्यभार स्वीकारतच नाहीत. आज जिल्ह्यातल्या तहसीलदार, बीडीओच्या(कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्षात फील्डवर) एकूण पदांपैकी जवळापास निम्मी पदं रीक्त आहेत. काही महिन्यांपूर्वी इथल्या आमदारांचं नक्षलांनी अपहरण केलं होतं. त्यावरची कलेक्टरांची प्रतिक्रिया म्हणजे “या भागाच्या विकासाच्या मागणीसाठी अपहरण केलं असा नक्षलांचा दावा आहे. माझीसुद्धा तीच मागणी आहे. आता इथल्या तहसीलदार आणि बीडीओच्या पोस्ट भराव्यात म्हणून मी सुद्धा आमदारांचं अपहरण करावं म्हणतो!”

आदिवासी संग्रहालयाचं प्रवेशद्वार
ओरिसाच्या एका कोपर्‍यात इतकं मनापासून काम करत असतांना एकीकडे देशात लाखो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या येत असतात. मानवी अधिकारांच्या नावाखाली नक्षलांची पाठराखण करत सरकारी कर्मचार्‍यांना धारेवर धरणारी एक मोठी लॉबी तुमच्या विरोधात असते. कुणाच्यातरी भ्रष्टाचाराच्या आड आल्यामुळे कोर्टाचे खेटे घालायची वेळ येते. तुमच्या कामाची विशेष दखलही घ्यायला कुणाला वेळ नसतो. कोरापूटच्या पोस्टिंगमध्ये कलेक्टरांबरोबरच घरातल्या सगळ्यांनाही सक्तीची सुरक्षा व्यवस्था असते. अंधार पडल्यावर बाहेर फिरायचं नाही, गाडीशिवाय घराबाहेर पडायचं नाही. एकट्याने फिरायचं नाही. कारण अजून एक नक्षल अपहरण परवडणार नाही. पण जिल्ह्याच्या ठिकाणी नक्षलांचा सामना करणार्‍या या अधिकार्‍याला या प्रश्नाची जी समज आलेली आहे, ती वरून येणार्‍या सरकारी धोरणांमध्ये प्रतिबिंबित होत नाही. या सगळ्या परिस्थेतीत तुला फ्रस्टेशन नाही येत का? गळकी बादली भरण्यासाठी आपण थेंबथेंब टाकतोय याचं वैफल्य नाही वाटत? पुण्याहून निघायच्या वेळेपासून मनात असलेले प्रश्न. “परिस्थिती खरंच भयंकर आहे. आणि आपण प्रश्न जास्त अवघड करून ठेवतोय. हा प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही. पण आश्चर्य म्हणजे माझा कामाचा उत्साह कायम आहे.” हे त्यावर कलेक्टरांकडून मिळालेलं उत्तर.

जर मी झालेच असते आयएएस, तर याहून वेगळं काय करणार होते? आपलं धूसर स्वप्न कुणीतरी जगतंय याचा आभाळाएवढा मोठा आनंद परत येतांना मनात असतो आणि या होपलेसली ऑप्टिमिस्टिक माणसाला असंच काम करत रहायला बळ मिळू दे अशी प्रार्थना.

Monday, August 27, 2012

ड्रीमरनर - ऑस्कर पिस्टोरियस

‘ड्रीमरनर’ ही ऑस्कर पिस्टोरियसने सांगितलेली त्याची स्वतःची कहाणी. साऊथ आफ्रिकेच्या ऑस्करच्या दोन्ही पायांमध्ये जन्मत:च दोष होता, आणि आपल्या पायांवर तो शरीराचा भार तोलू शकणार नाही असं डॉक्टरांचं निदान होतं. आपल्या बाळासाठी सर्वात योग्य उपचार काय असू शकेल हे समजून घेण्यासाठी ऑस्करच्या आईवडिलांनी जगभरातल्या तज्ञांची मत घेतली, सर्व शक्यता पडताळून बघितल्या. आयुष्यभर व्हीलचेअर वापरणं किंवा पाय कापून टाकून कृत्रीम पाय लावणे असे पर्याय समोर होते. ऑस्कर चालायला शिकण्याच्या वयाचा होण्यापूर्वीच पायाच्या शस्त्रक्रिया झाल्या, तर तो कृत्रीम पायांनी चालायला लवकर शिकेल आणि त्याच्या मनात आपल्या ‘वेगळ्या’ पायांविषयी कुठलाही गंड निर्माण होणार नाही असं डॉक्टरांचं मत पडलं. त्याप्रमाणे शस्त्रक्रिया झाल्या, ऑस्करचे दोन्ही पाय गुडघ्याखाली कापण्यात आले, आणि आपल्या वयाच्या बाकी मुलांसारखाच ऑस्करही चालायला लागला - कृत्रीम पाय वापरून.

चालण्यापाठोपाठ सुरू झाली मोठया भावाच्या सोबतीने केलेली दंगामस्ती. ऑस्करच्या आईवडिलांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. बाळ जन्मल्याबरोबर त्याचे पाय पाहून ऑस्करच्या वडिलांनी म्हटलं, "याचे पाय वेगळे दिसताहेत." सदोष नाही, तर फक्त वेगळे. ऑस्करच्या ‘वेगळ्या’ पायांचा त्यांनी कधी बाऊ केला नाही. आवश्यक ते वैद्यकीय निर्णय योग्य वेळी घेतले, पण आपल्या मुलाला कधीही कुठली वेगळी वागणूक दिली नाही. मोठ्या कार्लने बूट घालायचे, तसेच ऑस्करने पाय आणि बूट घालायचे इतक्या सहज या कुटुंबाने ऑस्करचं पाय नसणं स्वीकारलं. इतर मुलांमध्ये त्याला नैसर्गिकपणे मिसळू दिलं, झाडावर चढणं, सायकल चालवणं, पोहणं, धडपडणं सगळं सगळं करू दिलं. वाढीचं वय आणि ऑस्करचा धडपडा स्वभाव, त्यामुळे दर दोन एक महिन्यांनी ऑस्करचे नवे पाय बनवण्याची वेळ यायची. पण त्याचा कुणी बाऊ केला नाही.

ऑस्करला सगळ्याच मैदानी खेळांमध्ये रस होता. शाळेच्या होस्टेलला रहायला गेल्यावर तो रग्बीमध्ये जास्त रमू लागला, या खेळात पुढे येण्यासाठी त्याची कसून तयारी सुरू झाली. पण त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली, रग्बीसाठी पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी त्याला दोन महिने फक्त ऍथलेटिक्सचा सराव करायला सांगितला गेला. ऍथलेटिक्सची ऑस्करला कधीच फारशी आवड नव्हती. रग्बीसाठी म्हणून नाईलाजाने त्याने पळण्याचा सराव सुरू केला, आणि त्याची पळण्यातली गती बघून कोच त्याला अपंगांच्या स्पर्धांसाठी १००, २००, ४०० मीटर पळण्यात तयार करायला लागले. २००४च्या अथेन्सच्या पॅरालिंपिक्समध्ये ऑस्करने १०० आणि २०० मीटर स्पर्धेत पदक मिळवलं. पुढच्याच वर्षी त्याने साऊथ आफ्रिकन चॅम्पियनशीप स्पर्धेत ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत (अपंगाच्या नव्हे, धडधाकट खेळाडूंच्या) उत्तम वेळ नोंदवली. आपण पाय असणार्‍या स्पर्धकांच्या तोडीची कामगिरी करू शकत असू, तर त्यांच्याही स्पर्धांमध्ये भाग का घेऊ नये या विचाराने ऑस्करने अपंगांच्या आणि धडधाकट खेळाडूंच्या दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर धावपटू म्हणून पुढे येण्यासाठी एकीकडे ऑस्करचा कसून सराव चालू होता, तर दुसरीकडे त्याच्या कृत्रीम पायांमुळे त्याला पळतांना धडधाकट खेळाडूंपेक्षा गैरवाजवी फायदा मिळतो म्हणून वादंग सुरू झाला. जानेवारी २००८ मध्ये आयएएएफनी (इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ऍथलेटिल्स फेडरेशन्स) ऑस्करवर धडधाकट खेळाडूंच्या स्पर्धेत खेळण्यास बंदी घातली. ऑस्करने या बंदीविरुद्ध सीएएसकडे (कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट) अपील केलं. त्याला कृत्रीम पायांमुळे जसे फायदे होतात, तसे तोटेही होतात. अन्य अपंग खेळाडू ऑस्करच्या कामगिरीच्या जवळपास पोहोचू शकलेले नाहीत. त्याची कामगिरी सातत्याने सुधारत असतांना त्याने कृत्रीम पायांमध्ये कुठलाच बदल केलेला नाही. हे मुद्दे विचारात घेऊन मे २००८ मध्ये ऑस्करवरची बंदी उठवण्यात आली. २००८च्या बीजिंग ऑलिंपिक्ससाठी ४०० मीटर स्पर्धेसाठीची पात्रता वेळ ऑस्करला नोंदवता आली नाही, आणि त्याने वाईल्ड कार्डवर प्रवेश मिळवण्यास नकार दिला. त्यावर्षीच्या पॅरालिंपिक्समध्ये त्याने १००, २०० आणि ४०० मीटर धावण्यामध्ये सुवर्णपदक आणि ४०० मीटरमध्ये (अपंगांसाठी) विश्वविक्रम आशी चमकदार कामगिरी केली. यंदाच्या लंडन ऑलिंपिक्समध्ये ४०० मीटर्स धावणे आणि ४०० x ४ रिलेमधल्या सहभागानंतर ऑस्कर अपंगांच्या पॅरालिंपिक्समध्ये आपली बीजिंगची तीन सुवर्णपदकं राखण्याचा प्रयत्न तर करेलच, शिवाय ४०० x ४ रिलेमध्येही तो सहभागी होतो आहे. आपली ओळख एक ऍथलिट म्हणून असावी, 'अपंग असूनसुद्धा पळणारा' अशी नको अशी ऑस्करची इच्छा आहे. त्याच्या मनोनिग्रहाने आणि मेहनतीने त्याच्या अपंगत्वावर कधीच मात केलीय. त्याची स्पर्धा आहे ती स्वतःशीच.

धावण्याच्या ट्रॅकवर इतिहास घडवत असतानाच ऑस्कर भूसुरुंगांच्या स्फोटामुळे हात पाय गमवून बसलेल्या लोकांना कृत्रीम हातपाय मिळवून देण्यासाठी काम करतो आहे. या कामात आर्थिक मदतीबरोबरच तो स्वतःचा वेळही देतोय.

ऑस्करची आत्मकथा विशेष भावते, ती त्यातल्या संयत चित्रणामुळे. तसं बघितलं तर दोन्ही पाय नसणं, लहानपणीच आई वडिलांचा डायव्होर्स, आईचा मृत्यू, प्रेमभंग, मोठ्या भावापासून दुरावणं, ऍथलेटिक्स संघटनेने बंदी घालणं आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूला झेलावे लागणारे ताणतणाव असा मेलोड्रामा तयार करायला लागणारा सगळा मालमसाला ऑस्करच्या गोष्टीत आहे. पण ऑस्कर कुठेही स्वतःची कीव करत नाही. कृत्रीम पायांच्या घर्षणामुळे पायावर होणार्‍या जखमा असोत, किंवा पावसात पळतांना येणार्‍या अडचणी असोत, या गोष्टी फक्त जाताजाता सांगण्याच्या ओघात नमूद केल्या जातात. त्यांचं तो भांडवल करत नाही.  माझ्याच वाट्याला हे का हा प्रश्न या गोष्टीत कुठेच येत नाही. तो खरा योद्धा आहे. आहे ती परिस्थिती स्वीकारून आव्हानांना सामोरे जाण्याची त्याची धमक आचंबित करते.

मराठी पुस्तक वाचतांना अनुवाद म्हणून भाषा कुठे बोजड वाटत नाही हे अनुवादकर्तीचं यश. या अनुवादाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सोनाली नवांगुळ यांनी तो केलाय. लहानपणी बैलगाडीचं चाक पाठीवर पडल्यामुळे त्यांचे दोन्ही पाय निकामी झालेत. इस्लामपूरसारख्या लहान गावात अपंगांसाठीच्या सुविधा नसल्यामुळे त्यांना शाळेत जाणंसुद्धा शक्य नव्हतं. पण घरी अभ्यास करून, शिकून त्या आज कोल्हापूरमध्ये पत्रकार म्हणून काम करतात. अपंगांना दया दाखवणाऱ्या पण समानतेची संधी नाकारणाऱ्या आपल्या समाजात त्या आज एकटीने स्वतःच्या फ्लॅटमध्ये स्वावलंबी आयुष्य जगतात. त्यांचं आयुष्यही ऑस्करसारखंच प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्वतःचं जगणं ऑस्करशी खूप जवळ जाणारं आहे.

(फोटो जालावरून साभार)

****************************
DreamRunner Oscar Pistorias Giyanni Meralo
ड्रीमरनर - ऑस्कर पिस्टोरिअस, सहलेखक - गियन्नी मेरलो,
अनुवाद - सोनाली नवांगुळ
मनोविकास प्रकाशन

Friday, August 24, 2012

पोचमपल्ली

ओरिसाहून येतांना थेट पुण्याला येण्याऐवजी हैद्राबादला जाऊन यायचा बेत होता. हैद्राबादहून पोचमपल्ली बघायला जायची संधी मिळाली. पोचमपल्लीच्या वाटेवरल्या रानफुलांचे फोटो मागेच टाकलेत. पोचमपल्ली हैद्राबादहून एक-दीड तासाच्या अंतरावर, एका दिवसात सहज जाऊन येण्यासारखा रस्ता आहे.

पोचमपल्लीजवळ संस्थान नारायणपूर तालुक्यातल्या पुट्टुपक्कम गावात विणकरांना भेटायचीही संधी होती.
प्रथम पुट्टुपक्कमला जाऊन नंतर पोचमपल्ली बघायचं ठरलं. या भागात सगळी ताडाची आणि कपाशीची शेती आहे. ताडापासून गूळही बनवतात. (अमिताभ बच्चनचा ‘सौदागर’ आठवला यावरून.) पण हा गूळ काही बघायला मिळाला नाही कुठे. बरीचशी घरं ताडाच्या झावळ्यांनी शाकारलेली. ही उतरती छपरं जवळजवळ जमिनीला टेकणारी.

ताडाच्या झावळ्यांचं छत
 कोरापूटला सगळीकडे हिरवं बघायची सवय झाल्यावर हा प्रदेश एकदम सपाट, उजाड वाटतो. विणकरांच्या घरात शिरल्यावर हवेतला दमटपणा चांगलाच जाणवतो. घराचं छत ताडाच्याच लाकडाचं. उन्हाळा थोडातरी सह्य करणारं. या भागातलं हवामान बघितलं, तर हैद्राबाद हिल स्टेशन वाटेल!

 इथले हातमाग कोटपाडपेक्षा आधुनिक आहेत. यावर एका वेळी एका नमुन्याचा चार साड्या विणल्या जातात. आम्ही गेलो तेंव्हा कुठल्या तरी तारांकित हॉटेलसाठी पडद्याचं कापड विणणं चाललं होतं.

पुट्टुपक्कमचे हातमाग

  या भागाची खासियत म्हणजे बांधणीमध्ये केलेली सुंदर कलाकुसर. ग्राहक / व्यापारी कागदावर डिझाईन काढून देतात.  त्याप्रमाणे बांधणीचं काम करून इथले कारागीर साड्या बनवून देतात.

कागदावरच्या नमुन्याप्रमाणे साडी विणली जाते आहे

हे डिझाईन प्रत्यक्षात उतरवतांना प्रत्येक रंगाचा प्रत्येक भाग बरोबर रंगवण्यासाठी  किती मेहनत लागते, ते बघितल्याशिवाय समजत नाही. पांढरं रेशीम बंगलोरहून इथे येतं. प्रत्येक रंगासाठी ते रेशीम बांधायचं, रंगवायचं, वाळवायचं, त्यानंतर पुढचा रंग. आणि हे एकदा उभ्या धाग्यांसाठी, एकदा आडव्या धाग्यांसाठी.

बांधणी - रेशीम रंगवणं चालू आहे
याप्रमाणे रेशीम रंगून विणण्यासाठी तयार व्हायलाच तीन आठवडे लागतात. त्यानंतर चार आठवडे विणकामासाठी. साडीचे रंग कधी न विटणारे, रेशीम मजबूत, जर अस्सल.
रंगवून विणण्यासाठी तयार असणारं रेशीम

 एवढ्या कुशल कारागिरांनी, इतक्या मेहनतीने बनवलेली साडी बाजारात येते, तेंव्हा तिची स्पर्धा असते गुजरातच्या यंत्रमागावर बनलेल्या, बांधणीसारख्याच दिसणार्‍या प्रिंटेड साड्यांशी. या स्पर्धेत आपण टिकणं शक्य नाही हे पोचमपल्लीने स्वीकारलंय. दिवसेंदिवस इथले कारागीर रंगकाम, विणकाम सोडून रोजगारासाठी हैद्राबादकडे वळताहेत. अजून काही महिन्यांनी यातले कितीतरी माग दिसणार नाहीत.
नुकत्याच बघितलेल्या कोटपाडबरोबर पोचमपल्लीची तुलना सुरू होते मनात. कोटपाडला नव्या कारागिरांसाठी हातमाग प्रशिक्षण चाललंय. आणि त्याला प्रतिसादही मिळतोय. तिथली एथनिक डिझाईन्स पुढे आणण्यासाठी प्रयत्न चाललेत. पोचमपल्ली बांधणी मरायला टेकली आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्यातली नसेल ही साडी, पण एक समृद्ध परंपरा म्हणून तरी ती टिकून रहावी असं वाटतं.
पोचमपल्ली साडी

संस्थान नारायणपूर, पुट्टुपक्कम हा सगळा नक्षलग्रस्त भाग. नक्षल प्रश्नाविषयी बरंच काही बघायला, वाचायला, ऐकायला मिळालं या भटकंतीमध्ये. पुढची पोस्ट त्याविषयी. 
****************
पोचमपल्लीचे अजून फोटो इथे आहेत.
Pochampalli

Wednesday, August 22, 2012

ओरिसाची भटकंती: परतीच्या वाटेवर

 
तीन वेळा परतीचं तिकीट बदलूनही कोरापूट पोटभर बघून झालंय असं वाटत नाही. दर वर्षी इथे ‘परब’ नावाचा आदिवासी सांस्कृतिक महोत्सव असतो. परब बघायला परत यायचं असा बेत करतच कोरापूट सोडलं. येतांना विशाखापट्टण - कोरापूट रस्त्याच्या सृष्टीसौंदर्याला न्याय देता आला नव्हता. त्यामुळे परत जातांना रस्त्याचे मनसोक्त फोटो काढले.


या डोंगराळ  भागात आदिवासी वस्ती विखुरलेली आहे. जेमतेम आठ - दहा घरांचा एक पाडा - आजूबाजूला फक्त डोंगर. अश्या एकेका वस्तीपर्यंत रस्ते - वीज - पाणी - आरोग्यकेंद्र - आंगणवाडी - शाळा पोहोचवायची, म्हणजे जितका खर्च येईल, तितकाच खर्च अन्यत्र एखाद्या पाचशे - हजार लोकवस्तीच्या खेड्यासाठी येईल. नुसत्या रिपोर्टमध्ये वाचून कदाचित ही मागणी अवास्तव वाटेल,पण  प्रत्यक्ष बघितल्यावर मात्र इथे विकासासाठी जास्त पैसा का घालायला हवा हे अगदी पटतं.
आदिवासी पाडा
 कोरापूट जिल्हा संपतो, आपण आंध्रात प्रवेश करतो. या सीमेवर एक सुंदर वडाचं झाड आपलं स्वागत करतं.

आंध्र - ओडिशा सीमा
 स्वप्नातले डोंगर अजून थोडा वेळ सोबत करतात.


पंधरा दिवस दिवस रात्र संधी मिळेल तेंव्हा गप्पा मारूनही गप्पा संपलेल्या नसतात. त्यामुळे आमचा प्रवास एकाच गाडीतून चाललेला असतो - कलेक्टरांची लाल दिव्याची गाडी मागून रिकामी येत असते. :) 
आमच्या मागून येणारी लाल दिव्याची एस्कॉर्ट कार :)





  हा प्रवास एखाद्या टाईम मशीनमध्ये बसून केल्यासारखा वाटतो. शतकानुशतकं गोठल्यासारखे एकाच स्थितीत राहिलेलं कोरापूटचं आदिवासी जनजीवन, घनदाट जंगलं, डोंगरदर्‍या संपून अचानक आपण एकविसाव्या शतकात पोहोचतो.  जणू काही हा  बदल ठळक करण्यासाठीच आंध्र किनारपट्टीलगतच्या या भागात नजर जाईल तिथपर्यंत फक्त सपाट शेतं आणि बांधावर ताडाची झाडं नजरेला पडतात.

डोंगर संपले, ताडाची झाडं आली, आंध्रात पोहोचलो.


परततांना थेट पुण्याला येण्याऐवजी हैद्राबादला उतरून पोचमपल्ली बघून परत येण्याचा बेत असतो. कोरापूट आणि पोचमपल्ली दोन्ही नक्षलग्रस्त भाग. कलेक्टरांकडून घेतलेलं ‘रेड सन’ वाचता वाचता दोन्ही भागांची तुलना करायची संधी असते.

Tuesday, August 21, 2012

ओरिसाची भटकंती: कॉफी प्लांटेशन


कॉफी प्लांटेशन? आणि ओरिसामध्ये? आश्चर्यच वाटलं मला. मग समजलं, की कोरापूटच्या कलेक्टरांच्या बंगल्याच्या आवारातच दोन किलो कॉफी होते! इथली हवा आणि जमीन कॉफीला अगदी योग्य आहे. तिथलं एक कॉफी प्लांटेशन बघायची संधी मिळाली.

प्लांटेशनचं गूढरम्य वातावरण
 खाली हिरवीगार कॉफीची झाडं, त्यांच्यावर सावली धरणारे सिल्व्हर ओक, त्यावर चढवलेले मिरीचे वेल, धुकं आणि हलका पाऊस. इथल्या वातावरणात एकदम अचानक ब्रेव्हहार्टमधला मेल गिब्सन घोड्यावरून जातांना दिसेल  असं वाटतं. :)
ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा ...
ओरिसात स्थायिक झालेल्या एका तेलुगु कुटुंबाचा आहे हा मळा. नवरा बायको आणि त्यांचा कुत्रा असं तिघांचं कुटुंबं इथे राहतं. मुलं कधीतरी सुट्टीला येतात. नवरा बाहेरची सगळी कामं बघतो, आणि ही बाई एकटी प्लांटेशनचं काम बघते. कामाला येणारे मजूर वस्तीला नसतात. एवढ्या मोठ्या प्लांटेशनमध्ये सोबत फक्त कुत्र्याची. (केतकर वहिनांची आठवण झाली ऐकताना.) प्लांटेशनमध्ये त्यांनी हौसेने भरपूर वेगवेगळी झाडं लावली आहेत. पावसात भिजत, चिखलात ती सगळी झाडं बघायला आम्ही सगळ्या प्लांटेशनमध्ये हिंडलो. त्यांना फक्त तेलुगू आणि ओडिया भाषा  येते, मला दोन्ही समजत नाहीत. पण थोड्या वेळाने दोघींचा झाडांच्या भाषेत संवाद सुरू झाला. :)

आम्ही गेलो तेंव्हा कॉफीची फुलं गळून हिरवी फळं धरलेली होती. इथे पारंपारिक भारतीय कॉफीमळ्याबरोबरच त्यांनी ऑस्ट्रेलियन पद्धतीने (सावली न करता) कॉफी लावण्याचाही प्रयोग केलाय. सावलीला झाडं ठेवली नाहीत, तर कॉफीला बारा महिने पाणी घालावं लागतं. 

प्लांटेशनवर चंदनाची बरीच झाडं आहेत.

चंदन
 रक्तचंदनाचं झाड मी प्रथमच बघितलं.
रक्तचंदन
महोगनीचं झाड
मोहोगनी
तमालपत्राची कोवळी गुलाबी पानं
तमालपत्र
आणि हा शिसव / रोझवुड
शिसव
व्हॅनिलाचा वेल

व्हॅनिलाचा वेल
 खास ऑस्ट्रेलियाहून आणलेला ऑक्टोपस ट्री
ऑक्टोपस ट्री
झाडाखालची मश्रूम्स

भूछत्र
त्यांच्या मळ्यातलं, त्यांना ओळखू न आलेलं एक झाड आम्ही ओळखलं :)

नागकेसर
तंदूरी चिकनचा लाल रंग कृत्रीम असतो असा माझा समज होता. जाफ्रा नावाच्या झाडाच्या बिया पाण्यात टाकून हा रंग बनतो ही नवीनच माहिती मिळाली. या झाडाला आपल्याकडे कोकणात रंगराज म्हणतात हेही नव्यानेच समजलं. हे जाफ्राचं झाड:
जाफ्रा किंवा ’रंगराज’

आणि ही त्याची वाळलेली फळं:

जाफ्राची वाळलेली फळं

कापूर झाडापासून मिळतो याचाही मला गंध नव्हता. हे त्यांच्याकडचं कापराचं झाड:

कापूर
इथे कॉफी इतकी चांगली होऊनही कॉफीचे मळे फारसे नाहीत असं का? इथली जमीन प्रामुख्याने आदिवासींच्या मालकीची आहे. त्यांच्याकडच्या जमिनीचे तुकडे आकाराने इतके लहान आहेत, की कॉफी प्लांटेशन परवडणार नाही. (इकॉनॉमिकली व्हायेबल नाही.) कॉफीला खूप लक्ष द्यावं लागतं, आणि कुशल मनुष्यबळ लागतं. ते उपलब्ध नाही. आदिवासींच्या जमिनी बिगरआदिवासींना  विकता येत नाहीत. सरकारने सहकारी कॉफी मळ्यांची एक योजना आणली, पण ती यशस्वी झाली नाही.