ओरिसाची भटकंती: मिशन शक्ती
ओरिसाची भटकंती: केचला
ओरिसाची भटकंती: प्रथमग्रासे ...
कोरापूट जिल्ह्यात साठपेक्षा जास्त आदिवासी जमाती आहेत, त्यांच्या पन्नासाहून जास्त बोलीभाषा आहेत. कोटपाड हा जिल्ह्याचा छत्तीसगडच्या बस्तरलगतचा भाग. याची ओळख म्हणजे सोनिया गांधी इथल्या आदिवासींनी व्हेजिटेबल डाय वापरून बनवलेल्या हातमागावर विणलेल्या सुती साड्या वापरतात. यांचा निळा रंग निळीपासून बनवलेला, तर तपकिरी रंग एका आल नावाच्या झाडापासून. त्या रंगातच शेण मिसळून काळा रंग बनवतात – आणि कापडावर चढलेले हे रंग अजिबात जात नाहीत. पाच सहा घरं आहेत कोटपाडमध्ये अश्या पद्धतीचं कापड विणणारी. इथे कोटपाडच्या विणकरांविषयी अधिक माहिती आहे. याखेरीज या भागात बांबूकाम, टेराकोटा, रॉट आयर्नमधल्या कलाकृतीही बनतात.
कोरापूटहून कोटपाड दोन – अडीच तासांचा रस्ता. गावात शिरल्या शिरल्या जाणवतात ते स्वच्छ रस्ते, सारवलेल्या नेटक्या भिंती, गवताने शाकारलेली छपरं. प्रत्येक घराभोवती दीड -दोन फूट उंचीचा ओटा. तिथे या शबर्या दिसल्या:
|
कोटपाडच्या शबर्या |
(हा सगळा भाग दण्डकारण्याचा भाग आहे .शबरी इथलीच होती असा इथल्या लोकांचा समज आहे. )
एका घरासमोर घातलेली छोटी पत्र्याची शेड. तिथेच लाकडातलं कोरीवकाम आणि लोखंडाचं काम चालू होतं:
|
लाकडातलं कोरीव काम |
|
दगडातलं आणि लाकडातलं कोरीव काम |
|
रॉट आयर्नचं काम |
|
लोखंडातून साकारलेला शेतकरी आणि बैलजोडी |
ही सगळी कौशल्य इथल्या जेमतेम सात आठ कुटुंबांकडे आहेत. आज बाहेरच्या बाजारात या वस्तूंच्या एथनिक लुकला मोठी किंमत आहे. त्यामुळे नवीन तरुणांसाठी हातमाग चालवण्याचं प्रशिक्षण गावात एकीकडे चालू आहे. हे कौशल्य त्यांना या भागात दुर्मिळ असणारा रोजगार मिळवून देऊ शकेल. प्रशिक्षणाच्या जागेवरची अस्वच्छता, गर्दी बघून तिथून बाहेर पडायची सगळ्यांना घाई होते.
|
हातमाग प्रशिक्षण |
थोडीफार खरेदी, कारागीरांची भेट, एका बचतगटाला भेट असं उरकून कोरापूटसाठी परत निघायचंय. जिल्हा नक्षलग्रस्त आहे, अंधार पडण्यापूर्वी प्रवास शक्यतो पूर्ण करायचाय. रस्ता स्टेट हायवे असला तरी यथातथाच आहे, आणि पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे जगदालपूरची भेट रद्द करून आम्ही परत निघालो.
कोरापूटला परतल्यावर कोटपाडमध्ये काय काय बघितलं, तिथे आपण काय करू शकतो यावर लगेच कलेक्टरना फिडबॅक मिळतो, आणि या सूचना उपलब्ध निधीमध्ये कश्या बसवता येतील याचाही विचार सुरू होतो. हातमाग प्रशिक्षणासाठी चांगली प्रशस्त जागा हवीय. या सगळ्या मालाला खाजगी एम्पोरियममध्ये कमी पैसे मिळतात. सरकारी एम्पोरियमने हा माल विकण्यासाठी जास्त प्रयत्न करायला हवेत. सद्ध्या कपड्याचे रंग बाहेरून येतात. या झाडांची लागवड याच भागात करता येऊ शकेल.
आपण नुसतंच आपली हौस म्हणून काहीतरी बघायला गेलो असं नाही, तर आपल्या तिथे जाऊन येण्याने काही उपयोग होतोय, आपल्या सूचनेने लोकांच्या आयुष्यात काही बदल होऊ शकतो आहे ही भावना सुखावणारी असते.
**********************
कोटपाडचे अजून फोटो इथे आहेत:
8 comments:
ही ह्या प्रकारची अभ्यासपूर्ण तुझी भटकंती, नेहेमीच भारी असते. :)
अनघा, अभ्यास नाही ग ... नुसतीच भटकंती. जातीच्या भटक्यांना नोकरीतून विमुक्त केलं की असं होतं :D
कोरापुटच्या कलेक्टरांच्या मुलीचे नावही त्यांनी "शबरी" ठेवले आहे हे नाही लिहिलेस! (विथ द लोकल एथनिक व्हेरिएशन - साबेरी!)
वेल; गौरी, मला वाटते तू अजून थोडे डिटेलमध्ये लिहू शकली असतीस.
आ.रा., अजून कॉफी प्लांटेशन, पोचमपल्ली आणि रेड सन असे भाग राहिलेत. बरेच दिवस झालेत, सगळं लिहून होईपर्यंत विसरून जाईन अशी भीती वाटतेय आता. त्यामुळे लवकरात लवकर लिहायची घाई आहे. कोरापूटच्या कलेक्टरांचं कौतुक पुढे येईल अजून :)
सगळं लिहून झाल्यावर अजून भर घालू का कुठे?
तुझं (नेहमीप्रमाणे) हटके सुरू आहे गौरी...वाचतेय जमेल तसं सगळंच...प्रतिक्रियांच्या बाबतीत सध्या काळाच्या बर्याच मागे आहे गं...:)
असो...यांची कला खूपच लोभसवाणी आहे गं....तू तुझ्या गच्चीतल्या बागेत ठेवायला काय घेतलंस... :)
अपर्णा, सवड मिळेल तेंव्हा दे प्रतिक्रिया ... आवर्जून वाचते आहेस ते महत्त्वाचं.
कोटपाडच्या कारागिरांचं काम बघायला मजा आली खूप. पण मी (नेहेमीप्रमाणेच) फारशी खरेदी नाही केली. तिथल्या कापडाचे नमुने म्हणून स्टोल्स घेतलेत फक्त.
जातीच्या भटक्यांना नोकरीतून विमुक्त केलं की असं होतं :D
मेरा नंबर कब आयेगा?
पंकज, जरूर आयेगा. :) पुन्हा भटकायचा बेत करीन तेंव्हा तुला नक्की सांगेन.
Post a Comment