चेंगिझ खानाविषयी खूप उत्सुकता होती. भारताच्या वेशीपर्यंत
तो आला आणि तिथून परत फिरला म्हणून आपण वाचलो – तो नेमका का बरं परत फिरला असेल हे
जाणून घ्यायची इच्छा हे एक कारण, आणि हा बाबराचा पूर्वज होता – मुघल साम्राज्यात
याच्या युद्धनीतीचा, विचाराचा, कर्तृत्वाचा ठसा कुठे दिसतो का हे तपासून बघायची
उत्सुकता हे दुसरं. त्यामुळे ऐतिहासिक कादंबरी असूनही लगेच उचललं हे पुस्तक.
तेराव्या शतकातली मंगोल पठारावरची परिस्थिती माझ्या
कल्पनेच्याही पलिकडली. अतिशय खडतर निसर्ग, शिकार आणि पशूपालन यावर गुजराण करणार्या
भटक्या टोळ्या आणि त्यांच्यामधली न संपणारी वैमनस्य. लढाईत हरलेल्या टोळीतील
पुरुषांची सर्रास कत्तल, त्यातली बायका मुले पळावणे, त्यांना गुलाम बनवणे या
नेहेमीच्या गोष्टी. आज एका सरदाराच्या आधिपत्याखाली लढणारी माणसं उद्या सहज
त्याच्याविरुद्ध लढायला तयार, कारण स्वतःचा आजचा स्वार्थ एवढाच लढण्यामागचा विचार.
लग्न करून नव्या नवरीला आपल्या टोळीकडे घेऊन जाणार्या
नवरदेवाच्या सोबत्याने वाटेतल्या टोळीच्या सरदाराची खोड काढली आणि त्या सरदाराच्या
टोळीने नवरीव्यतिरिक्त सगळ्या प्रवाश्यांना कंठस्नान घातलं. सरदाराने या पळवून
आणलेल्या नवरीशी रीतसर लग्न केलं. या सरदाराचा मुलगा तेमजुंग – म्हणजे भविष्यातला
चेंगिझ खान. मुलगा तीन वर्षांचा झाला की घोड्यावर मांड टाकायला शिकणार आणि शस्त्र
हातात धरता यायला लागलं की शिकारीत आणि लढाईत भाग घेणार ही तिथली परंपरा. शिकार
करणं, वाट काढणं, आग पेटवणं, स्वतःचा तंबू उभारणं हे सगळे मुलाच्या शिक्षणातले
महत्त्वाचे घटक. तेमजुंग जेमतेम नऊ वर्षाचा असताना त्याच्या वडलांचा मृत्यू झाला,
आणि टोळीने त्याच्या आईच्या विवाहाला आक्षेप घेतला आणि तिच्या सगळ्या मुलांना
अनौरस ठरवत वडलांच्या वारश्यापासून दुरावलं. कालपर्यंत २० हजारांच्या टोळीचा भावी
सरदार म्हणून बघितला जाणारा तेमजुंग अन्नाला मोदात झाला. रोज सगळ्या मुलांना जी
काय लहान – मोठी शिकार मिळेल ती आणि आईने दिवसभरात मिळवलेली कंदमुळं यावर गुजराण
करायची वेळ त्याच्यावर आली. टोळीतल्या त्याच्या विरोधकांच्या ताब्यात सापडून मरण
डोळ्यापुढे दिसत असतांना तो शिताफीने निसटला. काही काळ लपत छपत काढल्यावर पुन्हा
त्याच्या शत्रूंना धूळ चारायला उभा ठाकला. या सगळ्या काळात संपूर्ण मंगोल पठार एका
राजाच्या आधिपत्याखाली आल्याशिवाय या कायमच्या लढाया संपणार नाहीत आणि मंगोल राज्य
उभं राहू शकणार नाही हे तेमजिन समजून चुकला. राजकीय व्यवस्थेबरोबरच त्याला तिथेली
टोळ्यांवर आधारित सामाजिक उतरंडही बदलायची होती. हे सगळं बदलण्याचा एकच मार्ग आहे
यावर त्याचा ठाम विश्वास होता – बळाच्या जोरावर!
तेमजिनचा सगळा इतिहास म्हणजे लढाई –> जिंकल्यास अजून
मोठे सैन्य + मालमत्तेत वाढ -> पुढची लढाई -> हरल्यास पूर्ण वाताहात -> पुन्हा
सैन्याची जमवाजमव -> पुढची लढाई असं इन्फायनेट लूप आहे. मंगोल हे कसलेले योद्धे होतेच – दिवसचे दिवस ते घोड्यावर काढू शकत. वर्षानुवर्षं टिकणारं वाळवलेलं गाईचं
मांस हे त्यांचं युद्धातलं अन्न. प्रत्येक सैनिकाकडे त्याचे घोडे, शस्त्र,
पाणी असेच. उपासमारीची वेळ आली तर प्रसंगी स्वतंच्या घोड्याचं रक्त पिऊनसुद्धा
जिवंत राहण्याची आणि लढण्याची त्यांची रीत होती. त्यांचे घोडेही मंगोल पठाराच्या
खडतर निसर्गात टिकाव धरून राहणारे होते – पाणी नसेल तर बर्फ खाऊनही हे घोडे जगू शकत,
बर्फाखालून स्वतःचं अन्न शोधू शकत. मंगोल भटके, त्यांचं घर कायमचं तंबूत, त्यामुळे कुठेही
गेलं तरी काही तासात घर उभं राहू शके. लढण्यासाठीच ही माणसं जिवंत राहत असावीत
असं वाटतं हे सगळं वाचतांना. अश्या योद्द्यांना तेमजिनने युद्धाची अजून नवी तंत्र
शिकवली. उत्तम हेरखातं, जलद निरोप पोहोचवण्याची व्यवस्था आणि निशाण / विशिष्ट बाण
याच्या वापरातून सैन्याला संदेश पोहोचवणं ही तंत्र त्याने अतिशय यशस्वीरित्या
वापरली.
माणसांची पारख आणि त्यांच्या सेवेचं चीझ करणं ही त्याची
खासियत होती. सैन्यासाठी आणि अन्य प्रजेसाठी त्याचे कायदे अतिशय कठोर होते, आणि
चुकीला शिक्षा मिळाल्यावाचून राहणार नाही याची लोकांना खात्री होती. त्याचा वेश,
अन्न, राहणी सामान्य सैनिकांसारखीच असायची. धर्म, टोळी, सामाजिक पत याच्या
निरपेक्ष प्रत्येक माणसाच्या गुणांप्रमाणे त्याला वागणूक देण्यावर त्याचा भर
असायचा. "माणसाला सगळ्यात प्रिय असतं ते त्याचं स्वातंत्र्य. पण ते मिळाल्यावरही त्याला एक रीतेपणा जाणवतो. कुणी तो रीतेपणा विसरण्यासाठी देवाच्या भजनी लागतो, कुणी विलासात स्वतःला विसरू इच्छितं, तर कुणी अजून काही. हे रीतेपण भरून टाकेल असं कारण तुम्ही मिळवून दिलंत, तर माणसं जगाच्या अंतापर्यंत तुमच्या पाठीशी उभी राहतील!" हा चेंगिझ खानाचा त्याच्या मुलांना सल्ला.
साठाव्या वर्षी शिकार करतांना जायबंदी होऊन त्यातून चेंगिझ
खानचा मृत्यू झाला. मरेपर्यंत त्याने मंगोल पठारावर एकछत्री अंमल आणला होताच,
खेरीज चीन, कोरिया, खोरासान, पर्शिया, रशिया एवढे सगळे भाग जिंकलेले होते. मंगोल
पठाराला कायद्याचं राज्य मिळालं होतं. त्याच्या मागे या साम्राज्याची भरभराट होत
जाऊन त्याचा नातू कुबलाई खान याच्या काळात ते परमोच्च शिखरावर पोहोचलं – सयबेरिया
पासून अफगाणिस्तानपर्यंत आणि प्रशांत महासागरापासून ते काळ्या समुद्रापर्यंत
त्याची सत्ता होती!
हे सगळं वाचतांना द्रष्टा नेता, नवी समाज रचना निर्माण
करणारा, उत्तम शास्ता म्हणून कुठेतरी मनात शिवाजी महाराज आठवतात ना? पण फार मोठा
फरक आहे त्यांच्यामध्ये आणि तेमजिनमध्ये. आपण कल्पनाही करू शकणार नाही इतक्या टोकाची
क्रूर कृत्य त्याच्या लढायांमध्ये आणि शांतीकाळातही सहज चालायची. आपल्याला विरोध
करणारं शहर जिंकल्यावर शहरातल्या एकूण एक माणसाची कत्तल करून त्यांच्या
मुंडक्यांचे डोंगर त्याच्या सेनानींनी उभे केलेले आहेत! हेरात जिंकलं तेंव्हा सतरा
लाख – सतरा वर पाच शून्य – इतकी माणसं मारली त्यांनी!!! लढायांनंतरच्या त्यांच्या विध्वंसाची वर्णनं वाचून सुन्न होतं मन.
***
चेंगिझ खान भारतात आला नाही कारण इथलं उष्ण हवामान, अस्वच्छ
पाणी आणि वेगळ्या हवामानातले अनोळखी आजार या सगळ्यामुळे त्याने भारतात येण्याचा
विचार रद्द केला. उत्तरेकडेचे थंड वारे अडवणार्या हिमालयाचे किती उपकार आहेत बघा
अपल्यावर !
***
पुस्तक वाचून झाल्याझाल्या मनात साठलेली अस्वस्थता इथे सांडली आहे सगळी. सगळे संदर्भ परत तपासून मग पोस्ट टाकण्याइतकाही धीर नव्हता माझ्याकडे! हे सगळं आत्ताच लिहायचं होतं!