कोर्सेरावर कोर्सचं हे नाव बघितलं, आणि ताबडतोब माझं नाव नोंदवलं!
“कोर्सेरा” हे माझं मागच्या
वर्षात गवसलेलं ताजंताजं प्रेम. मुक्त शिक्षण असावं तर असं! जगाच्या पाठीवर
कुठूनही, वाट्टेल त्या विषयावर, आपल्याला सोयीच्या वेळी फुकटात शिकायची सोय करून
ठेवलीय त्यांनी. वेगवेगळ्या विद्यापीठांद्वारे इथे ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध करून
दिले जातात. साधारण सहा आठवडे ते बारा
आठवडे असा कालावधी एकेका कोर्सचा. मी आतापर्यंत चार तरी कोर्सेस मनापासून पूर्ण केलेत.
(दोन तीन कोर्स काही तरी विघ्न येऊन अर्धवट टाकावे लागले, ते आता पुढच्या सेशनला.) आतापर्यंत
मी अनुभवलेला तिथे शिकवणार्यांचा दर्जा, सहाध्यायींकडून शिकायला मिळणार्या
गोष्टी आणि ऑनलाईन संवादाची पातळी या सगळ्यानेच मी प्रभावित झाले आहे.
तिथला तेल अवीव
युनिव्हर्सिटीचा हा ऑनलाईन कोर्स. आठवड्याला साधारण ३ -४ तासांचा वेळ इथली व्हिडिओ
लेक्चर्स बघण्यासाठी आणि माहिती वाचण्यासाठी काढला, तर एकदम अलिबाबाची गुहाच उघडली!
झाडांना आपल्यासारखं बघता येतं का, त्यांना ऐकू येतं का, स्पर्शाची संवेदना असते
का ... एक ना दोन अनेक प्रश्न आजवर मनात होते माझ्या. या आणि अजून कितीतरी
प्रश्नांची उत्तरं अतिशय रंजक पद्धतीने या कोर्समध्ये मिळाली. (आणि मनात पुढचे
प्रश्न तयार झाले! ;) ) शाळेनंतर जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्रातही कुठलीही पार्श्वभूमी
नसतांनाही मला समजेल अश्या पद्धतीने हे सांगणं म्हणजे खरंच कौशल्याचं काम आहे.
तुम्हाला झाडांमध्ये रस असेल तर आवर्जून करा हा कोर्स!!! आणि थोडासा मोकळा वेळ असेल, तर तुमच्या आवडीचे कोर्सेस कोर्सेरावर धुंडाळून तर बघा ... केवढातरी खजिना गवसेल!
No comments:
Post a Comment