“मला दहा मुलं आहेत. एकासारखं दुसरं नाही आणि माणसासारखं
एकही नाही!” असं ज्यांच्याविषयी त्यांच्या आईने म्हटलंय, त्या दाभोळकर “अजबखान्या”तलं
एक आपत्य म्हणजे दत्तप्रसाद. यापूर्वी ‘अंतर्नाद’मध्ये त्यांचे एक – दोन लेख वाचले
होते, आणि अजून माहिती करून घ्यायची उत्सुकता होती. आईने “रंग याचा वेगळा” घेऊन
दिलं आणि गेले तीन –चार दिवस वाचत असलेलं पुस्तक बाजूला ठेवून, सगळी कामं टाकून या
पुस्तकात बुडून गेले होते.
दत्तप्रसाद दाभोळकर यांनी संशोधक म्हणून मोठं काम केलंय.
हौस म्हणून शोधपत्रकारिता केली आहे. एखादा विषय भावला म्हणून त्याचा पाठपुरावा
करून त्याविषयी अभ्यासपूर्ण, सुंदर, मूलगामी असं काही लिहिलंय. त्यांच्या
भावंडांपैकी नरेंद्र दाभोलकरांनी अंनिसच्या कामाला वाहून घेतलं किंवा मुकुंद
दाभोळकरांनी प्रयोग परिवार उभा केला. असं एकाच क्षेत्रात बुडून जाण्याचा दत्तप्रसादांचा
पिंड नाही. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर जत्रेत फिरणार्या मुलाच्या उत्सुकतेने
त्यांनी आयुष्याकडे बघितलंय, वेगवेगळे अनुभव घेतलेत.
भारताच्या अंटार्टिका मोहिमेविषयीचा आणि एकूणातच भारतातल्या
संशोधन क्षेत्राविषयी त्यांचा लेख वाचला आणि मोठ्ठा धक्का बसला. आपल्याकडे
संशोधनाचं फारसं काही चांगलं नाही हे मी बाहेरून ऐकून होते, पण परिस्थिती इतकी
भीषण असेल याची कल्पना नव्हती. सरकारी संशोधन संस्था, आपल्या उद्योगांमधले संशोधन
विभाग या सगळ्या अरेबियन नाईट्समधल्या सुरस कहाण्या इथे वाचायला मिळतात.
सरदार सरोवर, मोठे विकासप्रकल्प, विस्थापितांचे प्रश्न आणि
पर्यावरण याविषयी माझ्या मनात मोठ्ठं कन्फ्यूजन आहे. मला यातल्या सगळ्यांच्याच
बाजू बर्याच अंशी पटतात आणि नेमकं काय चुकतंय ते सांगता येत नाही. “माते नर्मदे”
मी वाचलेलं नाही. (आजवर हे वाचलंच पाहिजे म्हणून कुणी समोर कसं ठेवलं नाही याचं
आता आश्चर्य वाटतंय!) नर्मदा प्रकल्पाविषयी दाभोळकर जे म्हणतात त्यात अभिनिवेश
दिसत नाही तर स्पष्ट विचार आणि ठोस
उपाययोजना आहेत असं वाटतं, त्यामुळे त्यांचं म्हणणं पूर्ण पटतंय. आता “माते नर्मदे”
वाचणं आलं!
एके काळी विवेकानंदांची पारायणं केल्यावर गेली कित्येक
वर्षं मी त्यांच्या वाटेला गेलेले नाही. दाभोळकरांनी विवेकानंदाविषयी लिहिलेलं
वाचून खूप काही नवं हाती सापडल्यासारखं वाटतंय, पुन्हा विवेकानंद वाचावेसे
वाटताहेत, त्यांचं विवेकानंदांवरचं पुस्तक वाचावंसं वाटतंय.
राजधानी दिल्लीची क्षणचित्रं, १८५७ वरची त्यांची टिप्पणी,
१९९० च्या भांबावलेल्या रशियाचा त्यांनी घेतलेला वेध, किंवा त्यांची व्यक्तीचित्रं
... या पुस्तकातले त्यांचे लेख वाचून अजून वाचायच्या पुस्तकांची एक मोठी यादी तयार
झालीये मनात. एवढं दाभोळकरमय होऊन जाण्यासारखं काय आहे या पुस्तकात? दाभोळकरांची
लेखनशैली आवडली, त्यांच्या अभ्यासाला, विचाराला दाद द्यावीशी वाटली हे तर आहेच. पण
याहूनही आवडलंय ते त्यांचं जगणं, त्यांची वेगवेगळ्या प्रांतामधली मुक्त मुशाफिरी.
ज्या वेळी जे भावलं, ते तेंव्हा जीव ओतून करणं आणि नंतर त्यापासून वेगळं होणं.
त्यांना संशोधनक्षेत्र आतून बाहेरून माहित आहे पण त्यातल्या राजकारणात ते नसतात.
दिल्ली कशी चालते ते त्यांनी बघितलंय, पण ते ती चालवायला प्रयत्न करत नाहीत. अनेक
साहित्यिकांचा त्यांचा स्नेह आहे, स्वतःचं लेखन आहे. ज्ञानपीठसारख्या पुरस्काराचं
राजकारण त्यांनी बघितलंय. कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळावं म्हणून ते सर्व प्रयत्न
करतात, पण स्वतः साहित्यातल्या राजकारणापासून दूर राहण्याचं साधतात. हे जाम
आवडलंय!!!
***
रंग याचा वेगळा ... दत्तप्रसाद दाभोळकर लेखन आणि जीवन
संपादन: भानू काळे
कॉंटिनेंटल प्रकाशन
किंमत ४०० रू.
No comments:
Post a Comment