Monday, December 21, 2015

परत चारकोल पेन्सिल

जुळ्या मैत्रिणीचं स्केच झाल्यावर चारकोल पेन्सिल पुन्हा मागे पडली होती. जवळजवळ महिनाभराने पुन्हा मुहुर्त लागला काही काढायला!


योगी अरविंदांच्या या फोटोच्या मी प्रेमात आहे. तसं बघितलं तर फोटो म्हणून हा फार काही ग्रेट वगैरे नाही. त्यात मुळात फार काही डिटेल्स नाहीतच! आहेत ते फक्त डोळे. पण त्या डोळ्यांमध्ये एक जादू आहे. त्यांना सगळ्या माणसांच्या अंतरंगातलं दिसतंय असं वाटतं मला हा फोटो बघताना! मी तरी या डोळ्यांच्या प्रेमात आहे. आजवर कितीतरी वेळा हे डोळे काढायचा प्रयत्न केलाय मी, पण कधीच जमलेलं नाही. हा या वेळचा प्रयत्न:


Saturday, December 12, 2015

“पारंपारिक” फ्रेंच ओनियन सूप

मामा - मामी भारताबाहेर राहतात. मामी तर मूळची भारतीय नाहीच. पण त्या दोघांशी बोललं तर यातलं कोण भारतीय आहे आणि कोण ‘बाहेरचं’ आहे हे समजू नये इतके ते दोघे एकमेकांच्या संस्कृतीमध्ये रुजले आहेत!  इंटरनेटपूर्वीच्या जगात चार - सहा वर्षांनी कधीतरी त्यांची भेट व्हायची, पण आपण यांना ओळखत नाही असं कधी वाटलंच नाही. तीस – पस्तीस वर्षांपूर्वीच्या एका भारतवारीमध्ये मामीने ही पाककृती आईला दिली होती. तिच्याच अक्षरात आईच्या “रुचिरा” मधल्या शेवटच्या, “व्यक्तिगत टिपणांच्या” पानावर लिहून ठेवलेली. (लग्नानंतर मी एक रुचिराची नवी प्रत विकत घेऊन आईला दिली, आणि तिची जुनी माझ्यासाठी मिळवली. :D )



 सद्ध्या घरात सगळ्यांना आळीपाळीने सर्दी, ताप, खोकला असं चाललंय. त्यामुळे कढी, सूप, रसम असं काहीतरी खावंसं वाटतंय. नवर्‍याला सौम्य चवी आवडत नाहीत त्यामुळे मी आतापर्यंत या सूपच्या वाटेला गेले नव्हते. पण बाहेर कुठेतरी हे सूप खाऊन त्याला आवडलं, त्यामुळे मी लगेच करायला घेतलं.   


सोप्प्यात सोप्पं, आणि चविष्ट!!! आणि शिवाय त्यात इतक्या आठवणींचा स्वाद मिसळलेला आहे, की माझं विशेषंच लाडकं!

Monday, November 30, 2015

लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया ...

डोळ्यात खुपणारे विजेचे दिवे नसणारी रोषणाई मला फार आवडते. सोय, परवडणं हे सगळे भाग बाजूला ठेवले, तर कुठे पणत्यांचा शांत उजेड आणि कुठे दिव्यांच्या माळांची भगभग असं वाटतं.  त्यामुळे दिवाळीची ’खरी’ रोषणाई म्हणजे माझ्या लेखी पणत्याच! अश्या दिव्यांचा मोठा उत्सव अनुभवायची अनेक दिवसांपासून इच्छा होती. शनिवारवाड्याच्या आणि सारसबागेतल्या दीपोत्सवाचे फोटो पेपरमध्ये बघितले होते, पण दीपोत्सव कुठे, कधी असतो त्याची नेमकी तारीख काही माहित नव्हती. दर वर्षी हे फोटो बघून “पुढच्या वेळी तरी हे अनुभवायला मिळावं” असं वाटायचं, आणि पुढचा दीपोत्सव पुन्हा पेपरमध्येच बघायला मिळायचा.

त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सवाला जाऊ या असं मैत्रिणीने (वेळेवर!) सुचवलं, आणि मग नेटवर शोधाशोध केली. शनिवारवाड्याचा दीपोत्सव बहुतेक दिवाळीत असतो. त्रिपुरी पौर्णिमेला सारसबागेजवळच्या महालक्ष्मी मंदिरात आणि पाताळेश्वराला दीपोत्सव असवा असं फोटोंवरून समजलं. एवढ्या माहितीच्या आधारावर पाताळेश्वराला जायचं ठरलं. मंदिरांशी माझा तसा विशेष संबंध नसतो. त्यामुळे पुण्यात भर वस्तीत असणार्‍या या सुंदर ठिकाणी मी आजवर फक्त एकदा गेलेली होते! दीपोत्सव नसला तरी एक छान जागा बघायला मिळेल अशी आशा होती.

संध्याकाळी साडेसातच्या सुमाराला तिथे पोहोचलो, तर संपूर्ण जंगली महाराज मंदिर, पाताळेश्वर मंदिर आणि परिसर पणत्यांच्या प्रकाशात उजळून निघालेला होता. वर पौर्णिमेचा चंद्र आणि खाली लाखो दिवे अशी फोटूवाल्या मंडळींसाठी पर्वणी. बिनकॅमेर्‍याच्या आम्ही आपले मोबाईलवर फोटो काढले.







एवढ्या दिव्यांमध्ये थोडे आमचे पण लावून घेतले.


हे अनुभवण्यासाठी पुढच्या वर्षी पुन्हा इथे येणारच!

Wednesday, November 18, 2015

चित्रदुर्गद कल्लिन कोटे...

टिपू सुलतानाचा त्रिवार निषेध!!!

“आयुष्यात पाहिलेच पाहिजेत”च्या लंब्याचौड्या यादीमध्ये तीन किल्ले बर्‍याच वर्षांपासून वरच्या टोकाला आहेत – सुरजमल जाटाचा अभेद्य असा भरतपूरचा किल्ला, दुसरा असाच केवळ फितुरीनेच जिंकता आलेला चित्रदुर्ग आणि आपल्या महाराष्ट्रातला हरिश्चंद्रगड. या तिघांपैकी एकाचंही दर्शन काही केल्या होत नव्हतं. मग यावेळी दिवाळीला कर्नाटकात जातांना मी नवर्‍याला एकदम अल्टीमेटमच देऊन टाकला ... या ट्रीपमध्ये मला (माझा) चित्रदुर्ग दाखवला नाहीस तर मी परत (तुझ्या) कर्नाटकात येणारच नाही! महाराष्ट्र - कर्नाटकाची सीमा ओलांडली, म्हणजे पुढच्या सगळ्या गोष्टी दाखवणं ही नवर्‍याची जबाबदारी असते. अजूनही मला कर्नाटकाचा भूगोल समजत नाही. त्यामुळे कुठून कुठे जायचं, कुठे रहायचं हे सगळं त्याचं डिपार्टमेंट असतं. आपण फक्त बघायचं काम करायचं! ;) चित्रदुर्गला चालायला खूप आहे, माऊला अजून झेपणार नाही म्हणून नको, तिथे ऊन फार असतं म्हणून नको, लांब आहे म्हणून नको असं करत इतकी वर्षं चित्रदुर्ग राहून गेला होता. 

तर अखेरीस या वेळी चित्रदुर्ग बघायचा मुहुर्त लागला आणि माझी दिवाळी झाली. चित्रदुर्ग पुणे – बंगलोर हायवेवर हुबळीहून २११ किमी आहे. बंगलोरहूनही साधारण तेवढंच अंतर. रस्ता सुंदर आहे, आणि पुणे – मुंबई, पुणे कोल्हापूर किंवा तुमकूर – बंगलोरच्या  मानाने गर्दी नाहीच. घाट प्रकारही नाहीच. सरळ गुळगुळीत मोकळा रस्ता. त्यामुळे बंगलोर किंवा हुबळीहून इथे तीन – साडेतीन तासात आरामात पोहोचता येतं. वाटेत बाजूला सूर्यफुलं फुललेली शेतं होती, मस्त पाण्याची तुंगभद्राही लागली, पण असं कुठेही वाटेत थांबणं नवर्‍याला मान्य नसल्याने या सगळ्यांकडे गाडीतूनच बघावं लागलं. कष्ट न करता चित्रदुर्ग पदरात पाडून घेण्यासाठी एवढी किंमत द्यावी लागणारच ना! 
रस्ता ... मख्खन!

गेस्ट हाऊस मधून दिसणारा किल्ला

किल्ल्याच्या समोरच केटीडीसीचं गेस्ट हाऊस आहे. त्याचं ऑनलाईन बुकिंग आदल्या दिवशी मिळालं होतं. गेस्ट हाऊस स्वच्छ, सर्व्हीस चांगली, खायला मेन्यू मर्यादित पण चव चांगली, किंमत वाजवी.
दोन – अडीचला तिथे जेवून किल्ला बघायला बाहेर पडलो. माऊने आतापर्यंत फक्त दिवाळीला विकत मिळणारे किल्ले पुण्यात बघितले होते, त्यामुळे “आई किल्ल्यावर माणसं पण आहेत का? (म्हणजे मावळे, शिवाजी महाराज वगैरे ठेवतात तशी) असा तिचा प्रश्न आला. आत शिरल्यावर मी तटबंदी वगैरे बघण्यात मग्न, नवरा गाईडच्या शोधात, तर माऊचा प्रश्न, “अग आई, पण किल्ला कुठे आहे इथे?” यालाच किल्ला म्हणतात हे काही फारसं पटलं नाही तिला. :)



हवा ढगाळ होती, पावसाची एक सरही येऊन गेली. त्यामुळे इतकी वर्षं ऐकून असलेल्या तिथल्या प्रसिद्ध उन्हाचा अजिबात त्रास झाला नाही. किल्ल्यावर हिंदी, इंग्रजी गाईड मिळतात. एक दीड तासात गाईडने किल्ला (पळवतच) फिरून दाखवला. त्याची माहिती सांगून झाली होती, पण एक एक जागा नीट बघायला मिळालेली नव्हती. ती परत येताना बघू, किंवा उद्या परत येऊन बघू अशी मनाची समजूत करून घेतली होती. या किल्ल्यावरचा प्रसिद्ध “मंकी मॅन” (कन्नडमध्ये “कोती राजा” म्हणतात त्याला.) आम्ही किल्ल्यात प्रवेश करत होतो तेंव्हाच नेमका बाहेर पडत होता. उद्या परत यायचंच आहे तेंव्हा तो भेटेल अशी आशा ठेवून पुढे निघालो. किल्ला अतिशय स्वच्छ ठेवलेला आहे. आणि तटबंदी, पायर्‍याची फारशी पडझड झालेली नाही. भुईकोट असल्याने बघायला बर्‍यापैकी गर्दी होती, पण कुठे “Vicky loves Pinky” गिरगिटून ठेवलेलं नव्हतं, कचराही नव्हता. किल्ल्यावर भरपूर माकडं आहेत. पक्ष्यांचे कॉलही भरपूर ऐकू येत होते. हंपीसारख्याच प्रचंड शिळा सगळीकडे पसरलेल्या. त्यातूनच चिरे घडवून तटबंदी, जोती वगैरे केलेली. या दगडाला एक सुंदर सोनेरी आभा आहे. वरचं बांधकाम विटांच आणि मातीचा गिलावा. हे फारसं शिल्लक नाही, फक्त कुठेकुठे अवशेष दिसतात.

मातीच्या भिंतीचे अवशेष
 आम्हाला किल्ल्यातली सगळ्यात प्रसिद्ध जागा – ओबव्वाची खिडकी – इथे सोडून, “आलात तसेच, त्या रस्त्यानेच परत जा” म्हणून गाईड गायब झाला. ही ओबव्वाची खिडकी म्हणजे पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी तटात सोडलेली भोकं आहेत. ओबव्वा ही मदकरी नायकाच्या एका सैनिकाची बायको. तिच्या नवर्‍यावर या भोकांच्या बाजूच्या बुरुजावर टेहळणीचं काम सोपवलेलं होतं. नवरा दुपारी जेवायला घरी आला, आणि ओबव्वा पाणी आणायला बाहेर पडली. तिला हैदरच्या सैनिकांची हालचाल जाणवली. पुढे होऊन बघते, तर त्या पाण्याच्या भोकांमधून सरपटत एक सैनिक किल्ल्यात प्रवेश करत होता. ओबव्वाने त्याच्या डोक्यात मुसळ घातलं आणि त्याला मारून टाकला. दुसरा सैनिक आला, त्याचीही तीच गत. नवरा जेवून आला, तेंव्हा ती मेलेल्या सैनिकांच्या मढ्यांच्या गराड्यात, हातात रक्ताने भरलेलं मुसळ घेऊन उभी होती! नवर्‍याने हल्ल्याची वर्दी दिली, आतलं सैन्य सावध झालं, आणि किल्ला वाचला. ही ओबव्वा आपल्या हिरकणीसारखी इतिहासात अमर झाली! तर ती पाण्याची भोकं पाहिल्यावर एवढ्याश्या भोकातून मोठा माणूस आत शिरेल यावर विश्वास बसेना. मग तिथे माऊसकट पूर्ण आत उतरून भोकांपर्यंत जाऊन पाहणं आलंच.  

ओबव्वाची खिडकी- पावसाचं पाणी जाण्यासाठीची जागा

ओबव्वाने शत्रूला बघितलंय! :)

इथे पोहोचेपर्यंत उद्या परत आल्यावर काय काय, कसं कसं बघायचं याची यादी तयार झाली होती मनात. गाईडने नुसत्या लांबून दाखवलेल्या कितीतरी जागा होत्या. भीम – हिडिंबेचा विवाह इथेच झाला अशी समजून आहे, आणि किल्ल्यावर हिडिंबेश्वराचं मंदिर आहे. ते नीट बघायचं होतं. किल्ल्यात एक सुंदर कातळ आहे, तो चढून गेल्यावर वर मंदिर, त्याच्या मागच्या बाजूला तलाव हे फक्त दुरून बघितलं होतं, तिथे माऊला जमत असेल तर चढायचं होतं. आणि मुख्य म्हणजे तटाच्या भिंटींवर माकडं चढतांना बघितली होती, तसाच चढणार्‍या त्या कोतीराजाचं आश्चर्य माऊला दाखवायचं होतं. 

पण इथे नेमका टिपू आडवा आला! टिपू प्रकरणामुळे चित्रदुर्ग गावातलं वातावरण तापलेलं होतं. दुसर्‍या दिवशी हिंदू संघटानांनी कर्नाटक बंद पुकारला होता अशी माहिती परततांना गेटवर आमचा गाईड परत भेटला त्याने सांगितली. मग नंतर बंद मागे घेऊन फक्त रास्ता रोको करण्याची घोषणा झाली. पण सकाळी लवकरात लवकर इथून बाहेर पडा, नाहीतर अडकून पडाल असा सल्ला गेस्ट हाऊसवरही मिळाला. उद्या बघण्याच्या सगळ्या प्लॅनवर पाणी पडलं. दुसर्‍या दिवशी सकाळी साडेसातला परत निघालो. पावणेआठला गावात बाजार भागात पोहोचलो, तर जमावाने दुकानं बंद करायला ऑलरेडी सुरुवात केलेली होती. (पुण्यात कसं, पावणेआठला दुकानं मुळी उघडणारच नाहीत कुणी बंद करायला!!!) मुख्य चौक बंद होता. आजवर कन्नड भाषा विशेष चांगली न येण्याने माझं फारसं काही अडलेलं नव्हतं, पण समोरून संपूर्ण रस्ता आडवून घोषणा देत येणारे लोक काय म्हणताहेत ते न समजल्याने कसं बेचैन वाटतं हे लक्षात आल्यावर आपल्याला शिकली पाहिजे ही भाषा नीट, हे परत जाणवलं. कुठल्या कुठल्या गल्ली बोळातून अखेरीस आम्ही हायवेला लागलो, आणि मग पुढचा प्रवास अगदी निर्विघ्न झाला. तर आता उरलेला चित्रदुर्ग पुढच्या ट्रीपमध्ये ... सगळं या टिपू सुलतानामुळे!!!

***
"चित्रदुर्गद कल्लिन कोटे" म्हणजे चित्रदुर्गचा दगडी किल्ला. एका प्रसिद्ध कन्नड गाण्यातले हे शब्द. बहुधा राजकुमारचं गाणं. पुढचं मागचं काहीही मला आठवत नाहीये, पण गाणं मस्त आहे ते! गाण्याचं चित्रीकरण चित्रदुर्गच्या किल्ल्यात आहे, आणि त्यात ओबव्वाची गोष्ट सांगितलेली आहे. गाणं इथे बघता येईल.

Sunday, November 8, 2015

दिवाळीच्या शुभेच्छा


दिवाळीची सुट्टी लागण्यापूर्वी माऊच्या शाळेचा शेवटचा दिवस. शाळेतून निघून सरळ घरी येणं माऊला कधीच मान्य नसतं. त्यामुळे आम्ही अजून शाळेतल्या घसरगुंडीवर, झोक्यावर आणि बाकीच्या खेळण्यांवर खेळतोय. तोवर शिक्षकांचीही शाळा सुटलीय. तिच्या प्रिन्सिपॉल शाळेतून निघाल्यात. माऊला त्या “हॅप्पी दिवाली!” म्हणतात. माऊ त्यांच्याशी जाऊन गप्पा मारते. तुम्ही कुठे चाललाय, इथे काय करत होता, घरी काय करणार, किती दिवस सुट्टी असे सगळे प्रश्न झाल्यावर “मी सुट्टीत गावाला जाणारे आज्जीकडे” म्हणून माहितीही देऊन होते. मला आमची शाळा आठवते आणि खरोखर हेवा वाटतो माऊचा आणि तिच्या टीचरचा. आमच्या शाळेत मुख्याध्यापक ही फक्त घाबरण्याची आणि लांब राहण्याची गोष्ट होती. त्यांनी तुम्हाला विश करणं, त्यांच्याशी गप्पा हे कल्पनेच्या पलिकडचं. म्हणजे आम्ही चौथीत असताना एकदा मधल्या सुट्टीत मुख्याध्यापक नुसते वर्गात आले तर त्यांना घाबरून एका मुलाची चड्डी ओली झाली होती! या असल्या शिस्तीच्या कल्पनांमुळे आणि फुकाच्या दरार्‍यामुळे मुलं आणि शिक्षक केवढ्या मोठ्या आनंदाला मुकत होती!

त्या टीचर गेल्यावर मग एकेक करून बाहेर पडणार्‍या बाकी सगळ्या टीचर, शाळेतल्या ताई, शिपाईदादा सगळ्यांना “हॅप्पी दिवाळी” म्हणून आणि गप्पा मारून होतात. माऊ जगनची मैत्रीण असल्याने बहुतेक अख्खी शाळा तिला ओळखत असावी. शाळेत सद्ध्या काहीतरी बांधकाम / दुरुस्ती चालू आहे. तिथे रोजंदारीवर काम करणारी एक मावशी तेवढ्यात तिथून जात असते. “मावशी हॅप्पी दिवाळी! तुझी सुट्टी झाली? तुला किती दिवस सुट्टी? तू गावाला जाणार आहेत सुट्टीत?” मावशीला सुट्टी मिळाली तर दिवाळी साजरी करता येत नाही हे अजून माऊला माहित नाहीये. पण इतक्या सहज तिला कुठल्याशी मावशीशी संवाद साधता येत असेल तर हे - आणि अजूनही बरंच काही - समजायला तिला वेळ नाही लागणार. आता मला माझाच हेवा वाटतो. तर तुम्हाला सगळ्यांना, आणि मी माऊ नसल्यामुळे सुट्टी मिळाली तर दिवाळी साजरी करू न शकणार्‍या ज्यांना हे सहज म्हणू शकत नाहीये, त्या सगळ्यांनाही दिवाळीच्या शुभेच्छा!!!

***

या वर्षी कंदील बनवायचा, वेळेवर बनवायचा आणि चांदणीचा बनवायचा एवढं सगळं आधीच ठरलेलं होतं. फक्त साहित्य आणि वेळ या दोन गोष्टी तेवढ्या हाताशी नव्हत्या. पण काल संधी मिळाली तिचा मी ताबडतोब फायदा घेतला.

माऊला एक गिफ्ट मिळाली होती त्यात छोटी चांदणी बनवण्यासाठीचे कागद, रंगवण्याचं साहित्य असं सगळं होतं, त्यामुळे कसा बनवायचा ते माहित होतं. ही आमची चांदणी:


अजून गो-लाईव्ह बाकीआहे, पण हा टेस्टींगचा फोटो:




पातळ कागद अजून थोडे पारदर्शक असायला हवे होते, प्रकाश कमी पडतोय असं यावर नवर्‍याचं मत. अर्थातच हा बग नसून फीचर आहे. टेस्ट एन्व्हायर्न्मेंटमध्ये दिव्याचा प्रकाश पुरेसा नव्हता. तरीही सूचना एन्हान्समेंट म्हणून स्वीकारून पुढच्या रिलीजला विचारात घेण्यात येईल. :)

पाच पाकळ्या करण्यासाठी एक कागद पुरत नव्हता, मग दोन रंगाच्या पाकळ्या केल्यामुळे सहा केल्या. पण सहा पाकळ्यांचा कंदिल तितका चांगला दिसणार नाही असं वाटलं त्यामुळे पाचच जोडल्या. उरलेली पाकळी माऊला. त्यावर कागद चिकटवून हा माऊचा कंदील तयार झाला : :D

Monday, November 2, 2015

जुळी मैत्रीण

माऊची एक जुळी मैत्रीण आहे. दोघींना एकत्र खेळताना पाहून आतापर्यंत इतक्या लोकांनी “या जुळ्या आहेत का?” म्हणून विचारलंय, की आता मी त्या “जुळ्या मैत्रिणी आहेत” म्हणून सांगायला सुरुवात केलीय! :) जुळी म्हणजे जवळजवळ सयामिज जुळ्यांसारखी अवस्था आहे दोघींची – जेवायला एकत्र, खेळायला एकत्र, एकीला रागवलं की दुसरीने सॉरी म्हणायचं. सुट्टीच्या दिवशी उठल्याबरोबर तोंडही धुण्यापूर्वी माऊचा प्रश्न असतो, “सखीकडे जाऊ?” दोघी दिवसभर इकडच्या घरी किंवा “आपल्या घरी” (म्हणजे मैत्रिणीकडे) अश्या फेर्‍याच घालत असतात. थोडा जास्त वेळ इकडे खेळलं की मैत्रीण मला “आई” म्हणते आणि माऊ तिथे खेळून आली की “गौरी मावशी” म्हणून हाक मारते! :D मैत्रिणीचं वकीलपत्र घेऊन जगातल्या कुणाशीही भांडायला माऊ सज्ज असते, आणि मैत्रिणीला पण दुसर्‍या कुणी हात लावलेला चालत नाही पण माऊची दंगामस्ती चालते!

दोघी एकत्र असल्या म्हणजे दुप्पट दंगा करतात. मधुनमधून (काही काही दिवशी सारखीच) भांडण, मारामारी होतेच, आणि दोघींनी दोन घरी खेळावं असं फर्मान मोठ्यांपैकी कुणीतरी काढतं. दोघी एकेकेट्या आपापल्या घरी खेळायची काहीही शक्यता नाही – त्यामुळे आम्ही मुळ्ळीच भांडणार नाही, मारामारी तर करणारच नाही म्हणून दोघी लग्गेच सांगतात. पण तरीही मोठ्यांनी ऐकलंच नाही, अगदीच नाईलाज झाला तर आधी विरहाच्या कल्पनेने रडारड होते, मग काही वेळा तर मैत्रीण आमच्या घरी आणि माऊ मैत्रिणीच्या घरी अश्या खेळायला जातात. :D  दोघी एकाच शाळेत असल्या तरी सुदैवाने एका वर्गात नाहीत, आणि शाळेची वेळ वेगळी असल्याने एका बसमध्येही नाहीत. नाही तर शाळेतल्या शिक्षिकांचं, ताईंचं, बसच्या ड्रायव्हर काकांचं काही खरं नव्हतं.


तर या जिवश्च कंठश्च सखीचं चित्र चारकोल पेन्सिल वापरून काढायचं मनात होतं. (अर्थात फोटोवरून – चित्र काढेपर्यंत या एकाजागी बसणं अशक्य आहे.) पण तिचा फोटो मिळाला तो फारच अवघड निघाला. किती प्रयत्न केले तरी ओठ आणि नाक फोटोसारखं जमत नाहीये. बरेच प्रयत्न करून मी शेवटी हार मानली आहे, आणि सद्ध्यातरी हे “फायनल” चित्र म्हणून जाहीर केलंय!


पेंटिंगपेक्षा स्केचिंग हे पटकन होणारं, कुठेही कधीही करता येणारं म्हणून माझ्या जास्त आवडीचं. त्यातही मागे चारकोल पेन्सिल वापरून बघितली ती पेन, पेन्सिलपेक्षा खूपच आवडली होती.  बर्‍याच वर्षांच्या खंडानंतर गेल्या महिन्यात नवं स्केचबुक, पेन्सिली, रंग हातात मिळाल्यावर पुन्हा चारकोल पेन्सिलची आठवण झाली आणि चित्र काढून बघितलं. रेषेतला आत्मविश्वास, जोमदारपणा पार गेलाय, आणि माध्यमाची ओळखही विसरलेली आहे. पण काढायला मजा येतेय. बघू किती दिवस उत्साह टिकतो आणि किती सुधारणा होते यात अजून ते!

Wednesday, October 28, 2015

I’m a Barbie girl :D

सोसायटीच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी माऊ आणि तिच्या मैत्रिणींचा नाच बसवताहेत. तीन – साडेतीन वर्षांच्या मुलींचा नाच बसवायला गाणं कुठलं निवडावं? … I’m a Barbie girl!!!

माझ्या माहितीच्या / आवडीच्या सगळ्या इंग्रजी गाण्यांप्रमाणेच हेही गाणं मी (कुणीतरी लावलेलं) फक्त ऐकलेलं. व्हिडिओ बघितलेला नाही, स्वतःहून मुद्दाम नीट गाणं ऐकलेलं नाही, त्यामुळे सगळे शब्द माहित नाहीत. पण हे गाणं निवडल्याबरोबर माझी पहिली प्रतिक्रिया होती, “हे नको. यापेक्षा एखादं बालगीत घेऊ या.” (“नाहीतरी या सगळ्या बार्बीच आहेत की!” एका आईची टिप्पणी. माऊला बार्बी म्हणण्याएवढा मोठा अपमान नसेल माझ्या मते! तीन वर्षाच्या सगळ्याच मुली गोड दिसतात हे खरंय. पण बार्बीसारख्या, ओ येईल इतक्या गोड (आणि मठ्ठ)? यक्क!

आजीच्या शब्दात सांगायचं तर माऊ “दांडोबा पांडेकर” आहे. बाहुल्या प्रकारात अजून तरी तिने जवळपास शून्य रस दाखवलाय. त्यामुळे (माझ्या सुदैवाने) अजून बार्बीची (आणि प्रिन्सेसची) आणि माऊची ओळख झालेली नाही, आणि तिला गुलाबी कावीळ झालेली नाही. बार्बीचं रूप, तिचे कपडे आणि एकूणातच तिची सगळी खेळणी, त्यातलं स्टिरियोटायपिंग (आणि तिची किंमत!) या सगळ्याचा मला मनापासून तिटकारा आहे. (एका निरुपद्रवी खेळण्याविषयी केवढा तो राग?!!!) त्यामुळे माऊ आणि बार्बी हे समीकरण मला काही पचलं नसतं. माऊला गाण्याच्या अर्थाशी काहीही देणंघेणं नाही, नाचायला मिळालं की पुरेसं आहे. त्यामुळे माझ्या डोक्यातल्या गुंत्यासाठी तिला मज्जा करण्यापासून वंचित ठेवायचं का हे कळत नव्हतं. आज जरा बार्बी गर्लचा व्हिडिओ, शब्द बघितले, आणि एकटीच खोखो हसत बसले!!! या गाण्यावर नाच बसवू या म्हणताना कुणालाच त्या गाण्याचे शब्द, संदर्भ तपासावेसे वाटले नाहीत? अज्ञानात सुख असतं ते खरंच. पण गाणं आवडलंच मला ते एकदम! माझा विरोध मावळलाय! अजून पंधरा एक वर्षांनी, समजून उमजून, माऊने सोसायटीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात हे गाणं म्हटलं तर मला फार आवडेल!!!

(मधल्या काळात “हे गाणं या मुलांच्या वयाला योग्य नाही + फार फास्ट आहे म्हणून दुसरं गाणं निवडण्याची सूचना पुढे आली आणि ती संमतही झालीय. त्यामुळे सद्ध्या माझी संभाव्य बार्बीविषयक प्रश्नांच्या सरबत्तीमधून सुटका झालीय! :D)

***
हे पोस्ट केलं आणि मग बघितलं ... ही इथली दोनशेवी पोस्ट! आमच्या कासवाने चक्क डब्बलसेंचुरी मारली की हो!!!

Saturday, October 24, 2015

आसमान से टपका ...

सोनचाफा खाली गेल्यापासून त्याची रिकामी जागा फार जाणवतेय. रोज सकाळी पहिल्यांदा बागेत डोकावल्यावर बघायची गोष्ट म्हणजे आज चाफ्याला फुल आहे का? आता नवं झाड येईपर्यंत परत फुलं नाहीत हे अजून पचत नाहीयेत. त्यामुळे मी बागेत जायचं टाळत होते. कसंबसं झाडांना पाणी घातलं की झालं असं चाललं होतं. आज काही झालं तरी जरातरी विचारपूस करायची बाकीच्या झाडांची असं ठरवलं होतं.

आजवर इतक्या रिकाम्या कुंड्या कधी नव्हत्या बागेत! सद्ध्या बागेकडे जास्त लक्ष देता येत नाहीये आणि कबुतरं फार त्रास देताहेत. त्यात बागेत गेल्यावर चाफ्याची फार आठवण येते. त्यामुळे कितीतरी दिवस काही कुंड्या नुसत्याच पडून आहेत. त्या साफ करायला घेतल्या, तर त्यात एक रोप दिसलं. कसलं असावं हे? या चौकोनी कुंडीत अनेक गोष्टी लावून झाल्यात, आणि गेल्या काही महिन्यात कबुतरांनी यात काहीही टिकू दिलेलं नव्हतं. त्यामुळे कसलं रोपटं आहे ते कळेना. शेवटी म्हटलं जरा उकरून बघावं आलं किंवा असा कुठला कंद इथे राहून गेला होता का म्हणून. जरासं उकरल्यावर हे दिसलं:






केरातून पडलेली खजुराची बी रुजून झाड आलंय! आतापर्यंत तरी या रोपट्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलंय. पावसाचं जे काही पाणी मिळालं असेल तेवढंच. आणि अगदी थोडं ऊन. टिकेल का हे रोप? कशी काळजी घ्यायला हवी याची? जगलंच तर मोठं झाल्यावर कुठे लावता येईल बरं हे?

Friday, October 23, 2015

restiscrime: थोडा है थोडे कि जरुरत है…३

restiscrime: थोडा है थोडे कि जरुरत है…३: मंडळी, आपण हातात घेतलेलं हे तिसरं काम. पहिलं काम होतं छोट्या मुलामुलींच्या गणवेषांचं. म्हणजे शिक्षण . दुसरं एका पाड्याच्या पाणी साठव...

Thursday, October 15, 2015

Heidi

माऊच्या एका आज्जीने तिच्यासाठी सुंदर सुंदर पुस्तकं पाठवलीत. यातली सगळीच तीन वर्षाच्या पिल्लाला लगेच वाचता येण्यासारखी नाहीत, पण लहानपणी जे जे वाचायला मिळायलाच हवं असं तिला वाटलं त्यातली सापडतील ती पुस्तकं तिने पाठवलीत. त्यात Winnie the Pooh (डिस्नेचा नाही, मूळ कॅनडाचा) आहे, Anne of the green gables आहे, आणि Heidi पण आहे. अनघाकडून मी हायडीविषयी ऐकलं होतं, पण तिने दाखवलं तश्या सुंदर चित्रांचं पुस्तक मला सापडलं नव्हतं त्यामुळे ते वाचलेलं नव्हतं. आजीच्या पुस्तकात चित्रं नाहीत, पण गोष्ट तर वाचायला मिळाली त्यामुळे. आजीच्या मते युरोपातल्या मुलांचं बालपण ज्या गोष्टींशिवाय पूर्ण होऊच शकत नव्हतं त्यापैकी हायडी एक आहे.



स्वीस आल्प्समधल्या एका डोंगरावर आजोबांसोबत राहणारी छोटीशी हायडी. तिला शहरातल्या एका श्रीमंत घरात रहायची संधी मिळते, पण आपली डोंगरावरची झोपडी, आजोबा, शेळ्या राखणारा पीटर आणि सगळ्या शेळ्या, पीटरची आजी – आणि या सगळ्याहूनही डोंगर, तिथली रानफुलं, कुरणं, सूर्योदय आणि सूर्यास्त – हे सगळं नितांतसुंदर जग हायडी विसरू शकत नाही. या सगळ्यासाठी झुरणार्‍या हायडीला अखेरीस घरी परत येण्याची संधी मिळते. तिची शहरातली श्रीमंत घरातली पंगू मैत्रीण तिला भेटायला येते आणि इतक्या सुंदर आणि आरोग्यपूर्ण वातावरणात एकदम तंदुरुस्त होऊन जाते. हायडीमुळे डोंगराखालच्या गावापासून फटकून राहणारे हायडीचे आजोबा गावकर्‍यांकडे परत जातात. पीटरच्या गरीब आजीच्या झोपडीची डागडुजी होते, तिला चांगलं खायला मिळतं, उबदार बिछाना मिळतो. हायडीमुळे पीटर लिहायला – वाचायला शिकतो. (आणि सगळे सुखाने रहायला लागतात :D) अशी थोडक्यात गोष्ट. एका दृष्टीने परिकथाच. पण आवडली.

लहान मुलांसाठीचं पुस्तक, त्यामुळे यात कुठल्याच पात्राच्या स्वभावात कंगोरे नाहीत. हायडीही  पेठ्यासारखी गोडमिट्ट आहे. तिला हाडामांसाची, जिवंत बनवायला उद्याची चिंता, नसलेल्या आईवडिलांची आठवण, हेवेदावे, एखादं भांडण, भीती, कुठलीच अपरिपूर्णता यात दाखवलेली नाही. पण तरीही आवडलीच ती. तसं बघितलं तर डोंगरावरच्या हायडीच्या आयुष्यात क्वचितच काही घडत असतं. रोजचा सूर्योदय, डोंगरावर फुलणारी रानफुलं, पीटरच्या बकर्‍या हे सगळं तिथे तसं रोजचंच. हे सगळं रोज नव्याने अनुभवणं, त्यात रोज आनंद शोधणं, तो इतरांपर्यंत पोहोचवणं हायडीला जमतं. रोजच्या जगण्याला असं सुंदर बनवण्यासाठी आपल्याला स्वित्झर्लंडमध्ये आल्प्सच्या डोंगरातच रहायला हवं असं नाही. तिथे राहणार्‍या सगळ्यांना तरी ते डोंगर इतके सुंदर कुठे वाटतात! प्रश्न आहे तो सुंदर क्षण टिपण्याची दृष्टी मिळवण्याचा.

Monday, October 12, 2015

पाठवणी


कुंड्यांमधली बाग सुरू केली तेंव्हा पहिल्यांदा जी वीस – बावीस झाडं आणली त्यातला एक माझा सोनचाफा. गेली सहा वर्षं तो माझ्या एवढ्याश्या टेरेसवर भरभरून फुलतोय, सुगंधाची लयलूट करतोय. अगदी सुरुवातीला आमच्या समोरची इमारत झालेली नव्हती आणि टेरेसवर भन्नाट वारं यायचं, आणि अश्या वेड्या वार्‍यात हा कसा टिकेल म्हणून मला शंका वाटायची. पण तो नुसता टिकलाच नाही, तर फुलतही राहिला. टेरेसवर पहिल्यांदाच बाग करत असल्यामुळे तिथे मिळणार्यात सूर्यप्रकाशात उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात किती फरक पडतो याची सुरुवातीला अजिबात कल्पना नव्हती. पाणी, सूर्यप्रकाश, खत सगळंच अजून शिकत होते मी. पण शिकाऊ माळीणबाईंना सांभाळून घेतलं त्यानं. 

त्याला आलेलं पहिलं फूल, त्याची सुरुवातीची पानं, ही “सुवर्णरेखा” जात आहे, हिची पानं अशीच असतात हे माहित नसल्यामुळे त्या पानांच्या वळलेल्या कडा पाहून माझी काळजी, पहिल्यांदा छाटणी करतानाची धाकधूक, खूप दिवस घराबाहेर राहून आल्यावर घरी आल्यावर अर्ध्या रात्रीसुद्धा बागेत काय चाललंय ते बघण्याची धडपड हे सगळं आज आठवतंय.

बागेत सगळ्यात जास्त गप्पा मी त्याच्याशी मारल्यात,  आणि आपण सांगितलेलं – न सांगितलेलं सगळं त्याला समजतंय याचाही अनुभव घेतलाय! अशीच एकदा एका निर्णयाची मोठी जबाबदारी वाटत होती. सगळं नीट होईल ना याची काळजी होती. अस्वस्थ आणि एकटं वाटत होतं. हे सगळं त्याच्याजवळ व्यक्त केलं, आणि भर उन्हाळ्यात, माझं तसं दुर्लक्षच होत असताना माझ्या एवढ्याश्या झाडाला त्या दिवशी तब्बल वीस फुलं आली! माझं झाड माझ्याशी बोलतं यावर त्या दिवशी माझा ठाम विश्वास बसला.

धाकटं भावंड स्वीकारणार्‍या समजूतदार मोठ्यासारखं त्याने माऊ आल्यावर मला बागेसाठी पूर्वीसारखा वेळ न देता येणंही मान्य केलंय. 
या एका झाडाने मला किती आनंद दिलाय ते शब्दात सांगणं शक्य नाही! इथे ब्लॉगवरच त्याच्या किती पोस्ट आहेत हे आज जाणवलं.

असं सगळं मस्त चाललं असताना एकीकडे एक टोचणी लागून होती ... कितीही मोठी कुंडी असली तरी सोनचाफ्याला ती आयुष्यभर पुरणार नाहीये. त्याच्या पूर्ण क्षमतेवढं मोठं होण्यासाठी त्याला मोकळ्या जमिनीत रुजायची संधी मिळायला हवीय. पण झाड मोकळ्या जमिनीत लावताना मला त्याच्याजवळ राहता येणार नाही! त्याला असं घर सोडून दूर पाठवायची मनाची तयारी काही होत नव्हती. दोन – चार ठिकाणी मी झाड लावता येईल का म्हणून चौकशीही केली, पण त्या चौकशीत खरा जीव नव्हताच. आणि एक दिवस अचानक नवर्‍याने सांगितलं – “मी सोसायटीमध्ये विचारलंय. आपल्या इथे खाली झाड लावायला जागा शोधणार आहेत ते.” फार दूर नाही म्हणून आनंद, पण आता खरंच जाणार म्हणून दुःख असं चाललं होतं मग. मग सोसायटीचे लोक येऊन झाड पसंत करून गेले. एक दिवस माळीदादाही झाड बघायला आले. पण तेंव्हा झाडाला भरभरून पालवी आली होती, आणि कळ्याही. हा बहर संपल्यावर झाड हलवू या असं ठरलं, आणि हा बहर कधी संपूच नये असं मला मनाच्या कोपर्‍यात वाटायला लागलं! त्यात त्याच्यासाठी शोधलेली जागा म्हणजे केवडा आणि फणसाचं झाड काढून तिथली मोकळी जागा. मस्त वाढलेला केवडा आणि फणस का तोडायचा? (उद्या असाच माझा सोनचाफा तोडला यांनी तर? सोसायटीचं कुणी सांगावं! :( परत शंका!) तो बहर संपलाच शेवटी, पण मग पावसाची दडी, सोसायटीच्या बागेला पाणी पुरवणारी मोटर जळाली अशा विविध कारणांनी त्याचा मला अजून महिनाभर सहवास मिळाला. मग दोन वेळा झाड घ्यायला आलेले माळीदादा घरात कोणी नाही म्हणून परत गेले, आणि अखेरीस झाडाच्या पाठवणीची वेळ आलीच!
दुपारी माऊ झोपलेली असताना इतक्या झटकन नेलं त्यांनी झाड, की मला नीट निरोपही घेता आला नाही. माऊ उठल्यावर तिला सांगितलं, “आपलं झाड गेलं खाली!”
“खाली कुठे?”
“माहित नाही! मला माळीदादा दिसतच नाहीयेत खिडकीतून. आपण शोधू खाली जाऊन.”
“आई ते बघ माळीदादा झाड लावताहेत तिथे खाली!” माऊला दिसले ते बरोब्बर.

अगदी माझ्या खिडकीच्या खाली जागा मिळाली सोनचाफ्याला - लांबून का होईना, पण रोज दिसणार तो मला. अगदी खाली जाऊन गप्पा सुद्धा मारता येतील! टेरेसवरच्या त्याच्या रिकाम्या जागेकडे बघून रिकामंरिकामं वाटलं की फक्त खिडकीतून एकदा खाली बघायचं! :) जीव भांड्यात पडणं म्हणतात ते हेच!

Monday, October 5, 2015

कारवी फुलली!

लॉंग विकेंडला घराबाहेर पडायचा काहीच प्लॅन ठरत नाहीये म्हणून हळहळ वाटत होती, पण या वर्षी ताम्हिणीच्या वाटेवरची कारवी फुलली आहे हे मायबोलीवर समजलं, आणि लगेच तिथे जाऊन बघण्याची संधी मिळाली. मुळशीचं पाणी बघण्याच्या नादात “क्विक बाईट्स” ची सांगितलेली खूण दिसलीच नाही, आणि अचानक अगदी रस्त्याच्या शेजारी कारवी येऊन भेटली!


कारवीच्या कळ्या
कारवीची फुलं

आणि ही झुडुपं

रस्त्यालगतचा डोंगराचा उतार कारवीनेच भरला आहे!

इथे पांढरी / गुलाबी कारवीसुद्धा फुलली आहे असं समजलं होतं ती काही दिसली नाही.  कारवीसोबत सोनकी आणि दुसरी रानफुलं होतीच.

कुर्डू

सोनकी



(बहुतेक) निसुर्डी

जांभळी चिरायत

रानपावटा
हा पण भेटला - बघा दिसतोय का तुम्हाला ...

दिसतोय का मी?
माऊला कारवीपेक्षा जास्त इंटरेस्ट होता पलिकडे दिसणार्‍या धरणाच्या पाण्यात. म्हणजे फुलं वगैरे ठिक आहे, पण एवढं मोठ्ठं पाणी शेजारी दिसतंय आणि आपण तिथे जात नाही ही कल्पना काही तिला पटत नव्हती :) फुलांना भेटून झाल्यावर मग पाण्याला भेटायला गेलो.





काल अर्धवट पाऊस पडल्याने चांगल्यापैकी उकडत होतं, त्यात सकाळ म्हणण्यापेक्षा दुपारीच बाहेर पडलो होतो. त्यामुळे पाण्यात शिरल्यावर खरंच जीव शांत झाला. सगळं हिंडून झाल्यावर, पाण्यात शिरल्यावर जिवाला अजून शांत करायला शाण्यासारखा मस्त पाऊस पण आला!

फुलांचे फोटो काढेपर्यंत मोबाईल नक्की माझ्याजवळ होता. तो पाण्यात शिरण्यापूर्वी नव्हता. उतरतांना गाडीत राहिला असेल म्हणून मी तशीच पुढे गेले होते. परत येतांना भिजल्यामुळे माऊचे आणि तिच्या मैत्रिणीचे कपडे बदलणे वगैरे सोपस्कार करून घाईनेच गाडीत बसलो आणि निघालो. पाच मिनिटांनी आठवलं, मोबाईल कुठे दिसत नाहीये! कुठल्याच फोनला रेंज नव्हती, त्यामुळे कॉल करून बघणं शक्य नव्हतं. तेवढ्यात माऊच्या मैत्रिणीची आजी म्हणाली, “आपण पाण्यात जाताना गाडी ठेवली होती, तिथे पडला होता एक मोबाईल!”

समोरचं काही दिसत नव्हतं एवढा पाऊस, रस्त्यात चहाचे पाट वहायला लागलेले. रस्ता तसा वर्दळीचा. परत फिरून गाडी लावली होती तिथे पोहोचलो, तर खरंच मोबाईल पडलेला मिळाला! पंधरा मिनिटं गाड्या, पायी चालणारे, गुरं यांच्या कुणाच्या पायदळी न जाता, कुणी न उचलता फोन तिथेच रस्त्यात पडलेला होता. आणि आतपर्यंत चिखल भरलेला असूनही चालू होता!!! त्याचं आणि माझंही नशीब फार चांगलं असावं. मोबाईल मिळाल्यावर आधी स्विच ऑफ केला, जमेल तसा चिखल काढला. घरी आल्यावर ड्रायरखाली वाळवला. जरा वेळ इअरफोन लावल्याचा सिंबॉल दाखवत होता, टचस्क्रीन झोपलेला होता. पण नंतर झाला सुरळीत चालू! या वेळी पहिल्यांदा नोकिया नसलेला फोन  - सॅमसंग - घ्यायचं धाडस केलं होतं मी ... तर नोकियाचा ठोकळा सोडून दुसरा कुठला फोनही मी वापरण्याच्या लायकीचा आहे हे सिद्ध झालं या भटकंतीमधून!!! :)