Sunday, March 19, 2017

महुआ महुआ महका महका ...

काल अचानक या झाडाने मोहात पाडलं ...


    नेहेमीची टेकडी, नेहेमीचीच पायवाट. तरीही तिथे नवं काहीतरी सापडत राहतं! आजुबाजूला बहर संपलेले भुंडे ग्लिरिसिडिया (गिरिपुष्प) आणि वाळलेलं गवत. याही झाडाखाली वाळालेल्या पानांचा खच, झाडावर एकही पान नाही. फक्त कळ्या. खाली झुकलेल्या या कळ्या कसल्या असतील म्हणून मी बघत होते, तर कुणीतरी खुडून तिथेच टाकलेल्या काही डहाळ्या दिसल्या.





दोन्ही डहाळ्यांवर एकेक फुललेलं फूल, बाकी अस्फुट कळ्या. फुलाचा वास बघितला, आणि उडालेच! हे मोहाचं फूल होतं.

मग अजून शोधल्यावर खाली पडलेल्या पानांमध्ये दडलेली अजून काही फुलं सापडली.  


अर्थातच हे फूल चाखून बघितलं. फुलात मध नाही, फुलालाच गुळमट गोड चव होती. (माऊला नाही आवडलं!) दोन फुलं खाल्ल्यावर दिवसभर मला आपल्या अंगाला मोहाच्या फुलांचा वास येतोय हे जाणवत होतं. :) (दिवसभर प्रचंड झोप पण येत होती - पण ती परवा रात्री नीट न झोपल्यामुळे असावी मोहाच्या फुलांमुळे नाही असं मी ठरवलंय. याची खात्री करायला आज परत दोन मोहाची फुलं खाल्लीत त्यामुळे परत एकदा महुआ महुआ महका महका :D)

***

काही झाडं संस्कृतीमध्ये अगदी खोल रुजलेली असतात, लोकांच्या जगण्याचा फार मोठा भाग त्यांनी व्यापलेला असतो. मोहाचं झाड अशा झाडांपैकी एक. मध्य भारतातल्या आदिवासी जीवनात मोहाचं खूप  मोठं स्थान आहे. मोहाची फुलं ते गोळा करतात, खातात, वाळवून त्या पिठाच्या भाकरी करतात, मोहाची दारू बनवतात. कविताताईंनी मोहाच्या पदार्थांविषयी - अगदी पुरणपोळीविषयीसुद्धा लिहिलं होतं त्यांच्या ‘घुमक्कडी’मध्ये. त्या पोस्टमध्येच पहिल्यांदा मोहाच्या फुलांचा फोटो बघितला त्यामुळे काल हे झाड ओळखता आलं. (मला तोवर उगाचच मोहाची फुलं लाल रंगाची असतील असं वाटत होतं.) यापूर्वी मोहाचं झाड पाहिलं होतं ते थंडीच्या दिवसत. तेंव्हा मोहाच्या बहराच्या काळ नसतो, त्यामुळे फुलं बघायला, चाखायला मिळाली नव्हती. सह्याद्रीमध्ये मोहाची झाडं फारशी नाहीत असा माझा समज. त्यामुळे पुण्यातल्या (माझ्या!) टेकडीवर मोहाचं झाड! खूशच झाले मी एकदम. अर्थात रानात या फुलांच्या स्वागताची जशी राजेशाही तयारी होते – झाडाखालची जमीन स्वच्छ करून, तिथे पंचा अंथरून त्यावर आदिवासी फुलं गोळा करतात – ते भाग्य पुण्यातल्या मोहाच्या झाडाला कसं लाभणार? शहरातल्या लोकांना हा मोह ओळखीचा नाही, त्यांना वेगळ्या मोहांच्या मागे धावायचं असतं!



Friday, March 10, 2017

भरतपूर

भटकंतीमध्ये मला अगदी पहायचंच होतं असं ठिकाण म्हणजे भरतपूर. भरतपूरमध्ये २ आकर्षणं होती माझ्यासाठी – केवलादेव घाना पक्षी अभयारण्य, आणि जाट राजा सुरजमल याचा लोहागड किल्ला.

सतराव्या शतकाची अखेर – अठराव्या शतकाची सुरुवात हा उत्तर भारतात धामधुमीचा काळ होता. मराठे, मुघल, राजपूत या महत्त्वाच्या सत्ता होत्या. त्यांच्यामध्ये सत्तेसाठी रस्सीखेच चालू होती. जाट हा शेतकरी समाज. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला बदनसिंग जाट यानी जाटांना एकत्र आणून आपल्या भूमीच्या रक्षणासाठी त्यांच्या हातात शस्त्र दिलं. सुरजमल हा बदनसिंहाचा मुलगा आणि वारस. हा अतिशय कुशल योद्धा, रणनीतीचा जाणकार आणि मुत्सुद्दी. त्याने जाट सैन्याला शिस्त लावली, भरतपूर वसवलं, लोहागड, कुम्हेर हे किल्ले बांधले. त्याच्या राजवटीमध्ये जाट सत्ता उत्तर भारतातली नाव घेण्याएवढी महत्त्वाची सत्ता बनली. त्यानी बांधलेला भरतपूरचा किल्ला “लोहागड” हा खरोखरच अभेद्य होता. (१८०५ मध्ये इंग्रजांनी या किल्ल्यावर हल्ला करून ६ आठवड्यांहून जास्त काळ वेढा दिला, पण ते हा किल्ला जिंकू शकले नाहीत.)

दिल्लीतला मुघल बादशाह या काळात दरबार्‍यांच्या हातातलं खेळणं बनलेला होता. मल्हारराव होळकर दिल्लीला पोहोचून दिल्लीच्या सरदारांमधला संघर्ष संपवण्यापूर्वी सुरजमलनेही तिथे शिष्टाई केली होती. मुघल सरदारांनी सुरजमलविरुद्ध मराठ्यांकडे मदत मागितली. मरठ्यांनी १७५४ मध्ये सुरजमलच्या कुम्हेरगड किल्ल्याला वेढा घातला, पण तो जिंकू शकले नाहीत. १७५७ मध्ये पानिपतावर अब्दालीशी सामना करायला जातांनाही मराठ्यांची आणि सुरजमलची कुरबूर झाली, दुखावला गेलेला सुरजमल मराठ्यांना सामील झाला नाही. पण, तो अब्दालीलाही जाऊन मिळाला नाही. उलट युद्धानंतर नि:शस्त्र, अनवाणी, अन्नपाण्याविना परतणार्‍या पराभूत मराठी सैन्याला या राजाने पदरमोड करून आधार दिला. 

लोहागड किल्ला इंग्रजांना जिंकता आला नाही, पण आपल्या बेपर्वाईने आज त्याला हरवलं आहे. आता किल्ल्यात बघण्यासारखं फारसं काही उरलेलं नाही. किल्ला, त्याच्या आतला भाग आज भरतपूर गावाचे भाग आहेत. किल्ल्याच्या आत शाळा, दुकानं, ऑफिसं, रस्ते सगळं काही आहे. त्यामुळे किल्ला म्हणून बघायला फारसं काही मिळणार नाहीये हे आधीच माहित होतं, पण सुरजमल राजाला नमस्कार करायला किल्ल्याचा दरवाजा तरी मला बघायचाच होता. बराच वेळ "आता थोडं राहिलं, इथेच आहे!" असं ऐकत गावातल्या न संपणार्‍या अरुंद, पुढचं काहीच दिसू नये अशा वळतवळत जाणार्‍या गल्लीने चालत होतो. ती मधेमधे एवढी अरुंद वाटत होती, की पुढे गाडी जाईल का, वळवायला तरी जागा मिळेल का अशी शंका वाटत होती, त्यामुळे गाडी मागेच ठेवलेली. एकदाची ही संपली आणि किल्ल्याचा दरवाजा बघायला मिळाला. एव्हाना आमचा वेळही संपत आला होता, आणि “फक्त दरवाजा आणि तट” बघणार म्हणून मी आश्वासन दिलेलं असल्याने सोबतचे घाई करायला लागले होते. तेंव्हा आत पडझड म्हणजे नक्की काय आहे हे नीट न बघताच जड मनाने लोहागडाचा निरोप घेतला. :(





भरतपूरचं पक्षी अभयारण्य तसं खूप मोठं नाही. केवलादेव शिवमंदिराच्या जवळपासचा हा खोलगट भाग. सुरजमल राजाने अजान बांध बांधल्यावर इथे पाणथळ भाग निर्माण झाला. भरतपूरच्या संस्थानिकांनी पक्ष्यांच्या शिकारीसाठी राखलेलं हे जंगल होतं. आता याला नॅशनल पार्कचा दर्जा आहे. युरोप, रशिया, चीन आणि दक्षिण भारतातून येणारे स्थलांतरित पक्षी आणि इथले पक्षी असे मिळून इथे ३००च्या वर जातीचे पक्षी बघायला मिळतात. पक्षीनिरीक्षणासाठी सर्वोत्तम जागांपैकी हे एक मानलं जातं. आम्ही गेलो होतो ते पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी नाही, तर माऊला पक्षी दाखवायला. (सोबत दुर्बिण होती, मोठा कॅमेरा अर्थातच नव्हता. तसंही माऊ आणि कॅमेरा हे कॉम्बीनेशन अवघडच असतं.) त्यामुळे दोन – तीन तास भटकंती करायच्या विचाराने गेलो होतो. इथल्या तळ्यामध्ये बोटीतून जाऊनही पक्षी बघता येतात, पण ते सगळे पक्षी काठावरूनही दिसले.

‘पिलू’ची गोड फळं. पोपट खात होते, आम्हीही चाखली!

Painted Stork, purple moorhen, Coot, Glazed Ibis, Egret

Painted Stork (चित्रबलाक) घरटे. इथे भरपूर घरटी होती, पिल्लांचा उडण्याचा सराव चालला होता.
पार्कमध्ये सायकलरिक्शा घेऊन जाता येतं, सायकली भाड्याने मिळतात, चालत हिंडता येतं, किंवा विजेवरच्या रिक्शाने जाता येतं. विजेच्या रिक्शा भरभर जातात, फार बघायला मिळात नाही. सायकल किंवा सायकलरिक्षाचा वेग पक्षी बघायला एकदम बरोबर होतो. वेडा राघू, पोपट, सातभाई, मोर, अशा नेहेमीच्याच भिडूंनी सुरुवात झाली, पण पुढे बरंच काही बघायला मिळालं. गरूड, घुबड, हुप्पू, चित्रबलाक (painted stork), Coot, Black Cormorant, Snake Bird,  Glazed Ibis, Spoonbill, Purple moorhen, Pelican, Flamingo, Herons, Common Kingfisher ही आठवणारी नावं. खेरीज कोल्हे, चितळं, नीलगायी भरपूर. इथली हरणं एकदम सुस्त झालीत, कारण त्यांना पळायला लावणारे मोठे मांसाहारी प्राणी नाहीतच. सद्ध्या इथे एक बिबट्या आलाय त्यामुळे जरा तरी फरक पडलाय. पार्कमध्येच राहणार्‍या गायी पण भरपूर आहेत.

एकूणात, आग्रा – फतेहपूर सिक्रीला न जाता थेट इथेच दोन दिवस घालवले असते तर जास्त मजा आली असती. पण भरतपूर आमच्या भटकंतीमधलं शेवटचं नाव होतं. यानंतर दिल्लीला जाऊन पुण्याची गाडी पकडणं एवढाच वेळ होता. माऊ मोठी झाल्यावर पुन्हा भरतपूरला निवांत जाणार मी!

Thursday, March 9, 2017

आग्रा

तसं आग्रा पूर्वी बरेच वेळा बघितलेलं आहे. ताज महाल बघून माऊला फार काही ग्रेट वगैरे वाटणार नाही या वयात. त्यात तिथे गर्दी असली तर माऊला कितपत मजा येईल शंका होती. ताज महालाच्या मुख्य घुमटाच्या सफाईचं / restoration चं काम मार्चमध्ये सुरू होणार आहे आणि कदाचित mud pack मधला घुमट बघायला लागेल असंही समजलं होतं. त्यामुळे आग्र्याला जायला मी फारशी उत्सुक नव्हते. पण इतक्या जवळ येतो आहोत, भरतपूरच्या वाटेवरच आहे तर जाऊन येऊ, नाही आवडलं तर लवकर पुढे निघता येईल अशा विचाराने निघालो. आग्र्याला माझा दिल्लीचा मित्र येणार होता, त्याच्याबरोबर गाडीतून आग्रा आणि भरतपूर फिरायचं होतं. पहिले लाल किल्ला बघायला गेलो. माऊ सोबत असतांना गाईड करणं, किल्ल्याची माहिती समजावून घेणं शक्य नव्हतंच. तरी मी ऑडिओ गाईड तरी घेऊ म्हटलं, पण तिच्या प्रश्नोपनिषदापुढे मला त्यातलं काहीही ऐकता आलं नाही. त्यामुळे किल्ला बघणं म्हणजे फक्त समोर दिसेल तेवढं बघणं झालं. किल्ल्यात खेळवलेलं पाणी वगैरे ईंजिनियरिंगची करामत, जहांगीराची साखळी वगैरे बाकी कहाण्या ऐकायची संधीच नव्हती. किल्ल्यात प्रवेश करतांनाच दरवाजासमोर पहिले शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा माऊने पाहिला आणि खूश झाली. (खरं तर मी पण!) मग सगळा किल्ला बघतांना आम्ही शिवाजी महाराज औरंगझेबाला भेटायला इथे कसे आले होते, औरंगझेबाने त्यांना कसं नजरकैदेत ठेवलं, मग महाराज सगळ्यांची नजर चुकवून कसे पळून गेले अशी महाराजांची गोष्टंच आठवत होतो. बाकी अकबर - जहांगीर – शाहजहान वगैरे मंडळींच्या या किल्ल्यातल्या गोष्टींशी आम्हाला काहीच देणंघेणं नव्हतं! :)
किल्ल्याच्या कित्येक झरोक्यांमधून, सज्जांमधून यमुनेपलिकडचा ताज दिसतो

इथून अकबर जनतेला दर्शन द्यायचा

दीवान-ए-आमचा परिसर

किल्ला बघून मग ताज महाल बघायला गेलो. ताजच्या तीन मिनारांची सफाई पूर्ण झाली होती, चौथ्याची चालू होती. सुदैवाने मुख्य घुमटाचं काही काम चाललेलं नव्हतं त्यामुळे ताजचा घुमट काळा बघायची वेळ आली नाही.




भरतपूरला जातांना फतेहपूर – सिक्री वाटेवरच होतं, हाताशी वेळ होता म्हणून बुलंद दरवाजा बघायला गेलो. फतेहपूर – सिक्री हे अकबराने वसवलेलं गाव. चितोड, रणथंबोरच्या विजयानंतर त्याला आपली राजधानी इथे वसवायची होती. त्याचा प्रसिद्ध “इबादतखाना” – धार्मिक चर्चांची जागासुद्धा फतेहपूर सिक्रीलाच होती. (इबादतखाना नेमका कुठे होता ते माहित नाही.) इथला बुलंद दरवाजा हा अकबराने गुजरातवरच्या विजयाप्रित्यर्थ बांधलेला उंचच उंच दरवाजा. बुलंद दरवाजामधून आत गेलं, की सूफी संत आणि अकबराचा गुरू सलीम चिस्ती याची कबर आहे. (अकबराला याच्या कृपेने मुलगा झाला, त्याचं नाव सलीम ठवलं असं म्हणतात.) संगमरवरी दगडामध्ये बांधलेली ही कबर हा मुस्लीम स्थापत्याचा उत्तम नमुना समजला जातो. विशेषतः त्याच्या संगमरवरी जाळ्या. अतिशय नाजुक आणि सुंदर असं हे कोरीवकाम आहे. (इथे पोहोचेपर्यंत मी इतकी वैतागले होते की जाळ्यांचा फोटो काढलाच नाही!) १५ - २० वर्ष राजधानी वसवण्यासाठी काम केल्यावर फतेहपूर सिक्रीला पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आणि अकबराने हा विचार सोडून दिला.

लहानपणी अग्रा – फतेहपूर सिक्री बघितलं होतं तेंव्हा दोन्ही यूपीमधली जुनाट, बकाल गावं होती. आता आग्रा बरंच बदललंय - किमान पर्यटकांसाठीतरी. त्यांच्यासाठी पुरेशा सोयी केल्यात, ठिकठिकाणी माहिती लिहिलेली आहे, गाईड लोकांचे ठरलेले दर आहेत, माहितीपुस्तिका मिळतात. थोडं जागरूक असाल तर फसवणूक न होता तुम्ही आपले आपण आग्रा बघू शकता. फतेहपूर सिक्री मात्र अजूनही अंधारयुगातच राहिलंय. आत दर्गा असल्यामुळे बुलंद दरवाजा / कबर बघायला तिकिट नाही, सिक्युरिटी नाही, खरं सांगायचं तर कुणी वालीच नाही. गावाच्या वेशीच्या आत प्रवेश करता करताच गाईड मंडळींनी भंडावून सोडलं. चार चार लोक रस्त्यात गाडीसमोर येऊन, गाडीच्या काचेवर टकटक करून गाडी थांबवायला लागली, तर कुणीही भांबावून जाईल. “यहा से आगे गाडी नही जायेगी, यही टिकिट कटवा लो।“ म्हणून ते पटवायला लागले. कसलं तिकीट ते ही धड सांगेनात. आम्ही जेवायला चाललोय म्हणून त्यांना कटवलं. पुढे पुन्हा तीच गत. जेवण झाल्यावर अजून पुढे आलो आणि एका पार्किंगमध्ये गाडी लावली. (एवढ्याशा गावातल्या पार्किंगचं तिकीट आग्र्यापेक्षा जास्त!) १२-१३ वर्षांचा वाटणारा एक मुलगा आम्हाला बुलंद दरवाजापर्यंत ऑटोरिक्षाने सोडायला तयार झाला. (गाईड न घेता.). “आई, हा दादा तर छोटा आहे, त्याला गाडी चालवायचा कागद पोलीस काकानी कसा दिला?” माऊचा प्रश्न. पोलीस काकाला या गावात कुणीच विचारत नाही हे तिला कसं सांगणार?

रिक्षा बुलंद दरवाजाच्या अलिकडे चढाला लागणार तेवढ्यात दोन तीन गाईड पुन्हा रिक्षावर तुटून पडले, माझं गिर्‍हाईक – माझं गिर्‍हाईक म्हणून त्यांची वादावादी सुरू झाली. एक दोघं जण ऑटोमध्ये बसले सुद्धा. “आम्ही कुठल्याही गाईडला एक पैसाही देणार नाहीये, तू ठरल्याप्रमाणे आम्हाला दरवाजापाशी सोड” मित्राने ऑटोवाल्याला निक्षून सांगितलं. यावर त्याने “मग ऑटो अजून पुढे जाऊ शकणार नाही!” म्हणून आम्हाला तिथेच उतरवलं. दरवाजामध्ये पोहोचलो, तिथे काय ते बघितलं आणि परत निघालो तोपर्यंत गाईड लोकांचं पीडणं चालूच होतं. वर दरवाजाजवळ अर्थातच काहीही माहिती लिहिलेली नाही. (नाहीतर गाईड लोकांचं कसं फावणार?) थेट दरवाजामध्ये सुद्धा लोक पथारी पसरून काहीबाही विकायला बसलेले, बकर्‍या चरताहेत, कचरा. दरवाजामधून आत शिरल्यावर गाईड लोकांसोबतच दुसरी पीडा मागे लागली – आठ - दहा वर्षांची पोरं “शायरी सुनाऊ?” म्हणून भंडावून सोडत होती. कसं बसं सलीम चिस्तीची कबर, त्याच्या अप्रतिम कलाकुसर केलेल्या जाळ्या असं सगळं पाहिलं, आणि कडू तोंड घेऊन तिथून बाहेर पडलो. बाहेर पडतांना बघितलं, तर थेट दरवाजाच्या पायर्‍या सुरू होतात तिथे ऑटोरिक्षा उभ्या होत्या लोकांना परत घेऊन जायला. आणि दरवाजा जवळूनच पुढे दुसर्‍या  गावाला रस्ता जातो, म्हणजे तिथे गाडी नेता येत नाही असं काहीही नाही. गाव लहान आहे, गरिबी आहे, दुसरं काही उत्पन्नाचं साधन नाही हे सगळं मला मान्य आहे. पण तरीही प्रचंड चीड आली या गोचीड प्रवृत्तीची. मी पूर्वी हे बघितलेलं होतं, इथला इतिहास मला माहित होता, कितपत बघण्यासारखं आहे याची कल्पना होती. मित्र दिल्लीचा म्हणजे तसा लोकल म्हणण्यासारखाच. एवढं सगळं असताना आम्हालाच या लोकांनी इतका त्रास दिला, मग आग्र्याहून येणार्‍या  परदेशातल्या पाहुण्यांना किती लुटत असतील हे?

बुलंद दरवाजा - त्याच्या उंचीची कल्पना नाही येत फोटोत. (तसा ऍंगल मिळतच नाही!)

सलीम चिस्ती कबर
फतेहपूर सिक्रीहून जेमतेम पन्नस किमीवर भरतपूर असेल. पण राजस्थानात प्रवेश केल्याबरोबर इथला बकालपणा मागे पडला. गावातले सगळे लफंगे आपल्याला फसवण्यासाठीच जमलेत अशी जी भावना होते फतेहपूर सिक्रीमध्ये, ती एकदम गेली. भरतपूर जिल्ह्याचं ठिकाण आहे, पण तसं छोटंच. इथे बर्‍यापैकी हॉटेल बघितलं आणि आजचा भटकंतीमधला फारसा लक्षात न ठेवण्यासारखा दिवस संपवला.

Wednesday, March 8, 2017

ग्वाल्हेर

भटकंतीचा प्लॅन करतांना तसं बघायचं होतं ते खजुराहो आणि भरतपूर, मग ग्वाल्हेरला थांबायचं काय कारण? बाबांचा जन्म ग्वाल्हेरचा. त्यांचं लहानपण तिथेच गेलेलं. काका, आत्या तिथेच रहायचे. अजूनही आतेभाऊ – वहिनी तिथे आहेत. त्यामुळे त्यांना, त्यांच्या कुत्र्याला आणि बागेला भेटणं हे पण भटकंतीमधले महत्त्वाचे आयटम होते. वैनीने जुने फोटो दाखवल्यामुळे अजूनच मजा आली.
आजोबा
ग्वाल्हेरचा गावाशेजारी छोट्या टेकडीवर वसलेला किल्ला गवळ्यांच्या राजाने बांधला असं म्हणतात. किल्ला बराच जुना – म्हणजे किमान १०व्या शतकाइतका तरी जुना आहे. किल्ल्याचा विस्तार भरपूर मोठा - म्हणजे अगदी अवाढव्य म्हणण्यासारखा -  आहे. किल्ल्यावर एक बरीच जुनी आणि प्रसिद्ध शाळा (सिंदिया स्कूल) आहे, लोकवस्ती आहे. किल्ल्यावर येण्यासाठी उरवाई दरवाजा आणि हाथी पोल असे दोन मार्ग आहेत. उरवाई दरवाजाकडून चढताना वाटेत जैन लेणी कोरलेली आहेत. गाडी वरपर्यंत जाते, वरही बर्‍याच भागात फिरू शकते.

किल्ला तसा पूर्वी अनेक वेळा बघितलेला. पण दर वेळी पायी फिरताना किल्ला अर्धाच बघून झाला होता. आजवर किल्ला बघितला होता म्हणजे मानमंदिर, गुजरी महाल आणि तेली का मंदिर, सास-बहू मंदिर. जुना किल्ला बघायचा राहूनच गेला होता. या वेळी किल्ल्याचा सगळा जुना भाग बघितला. (अजूनही पूर्ण किल्ला बघून झालेला नाही!)

हा किल्ल्याचा सगळ्यात प्रसिद्ध भाग – मानसिंग तोमर राजाचा राजवाडा, (मृगनयनी वाला राजा मानसिंग) म्हणजे मानमंदिर:








इथल्या सजावटीचे रंग अजूनही ताजे आहेत. सँडस्टोनमध्ये सुंदर नक्षी कोरलेली आहे. सकाळच्या कोवळ्या उन्हात या दगडाचा रंग सुंदर सोनेरी दिसतो. सोळाव्या शतकातलं बांधकाम असूनही विशेष पडझड झालेली नाही. (हा किल्ला कधी लढलाच नाही – जो कुणी शत्रू येईल त्याच्या आधीन झाला. मग पडझड कशी होणार?)

मानमंदिराकडून खाली ग्वाल्हेर दरवाजाकडे गेलं म्हणजे गुजरी महाल येतो. हा मानसिंग राजाच्या लाडक्या गुजरी राणीचा (म्हणजे मृगनयनीचा) महाल. या महालात स्थापत्य म्हणून विशेष काही बघण्यासारखं नाही, पण इथे पुरातत्व संग्रहालय आहे – अनेक जुन्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. हे सगळं पूर्वी बघितलेलं असल्यामुळे या वेळी तिकडे गेलोच नाही. त्या ऐवजी जुना किल्ला बघायला गेलो.

जुना किल्ला म्हणजे कर्ण महाल, विक्रम महाल, भीमसिंगची छत्री, जोहार कुंड हे भाग. (खरं तर कर्ण सिंग आणि विक्रम सिंग हे दोन्ही राजे मानसिंगच्या नंतरचे. मग या भागाला जुना किल्ला का म्हणत असावेत?) या भागांविषयी अगदी कमी माहिती इथे लिहिलेली आहे. (मागे गाईड घेऊन फिरलो होतो, गाईडनेही काही सांगितलं नव्हतं.) एवढं मोठं जोहार कुंड या किल्ल्यावर आहे – कुणी, कधी जोहार केला इथे? याविषयी अवाक्षर नाही. गुगल केल्यावर समजलं, की तेराव्या शतकात अल्तमशने किल्ल्यावर हल्ला केला तेंव्हा इथे जोहार झाला होता. तेंव्हाचा राजा, जोहार करणार्‍या राण्यांची नावं सापडली नाहीत.
 
कर्ण महाल


विक्रम महाल




भीमसिंहाची छत्री आणि समोर जोहार कुंड

जहांगीर महल
हे सगळं पाहून किल्ल्याच्या दुसर्‍या टोकाला असणारं सास-बहू मंदिर (सहस्रबाहू मंदिर) बघायला गेलो. हे सुंदर मंदिर मला मानमंदिरापेक्षाही आवडतं. (गुगलल्यावर मिळालेल्या माहितीप्रमाणे हे मंदिर ११व्या शतकात कच्छवाह राजा महिपालाने बांधलं. हे सहस्रबाहू विष्णूचं मंदिर आहे. मंदिरावर आतून बाहेरून सुंदर कोरीवकाम आहे. मोठया मंदिराशेजारी एक छोटं याच शैलीमधलं मंदिर आहे. अशी दंतकथा सांगतात की राजाने पत्नीसाठी मोठं विष्णूमंदिर बांधलं तर छोटं शंकराचं मंदिर शिवभक्त सुनेसाठी बांधलं, म्हणून या मंदिरांना सास-बहू मंदिर म्हणतात.)
हे मोठं (सासूचं!) मंदिर





छतावरचं कोरीवकाम

छोटं (बहू) मंदिर

सास बहू मंदिराच्या जवळच किल्ल्यावरचं सगळ्यात प्राचीन आणि उंच असं तेली का मंदिर (तेली की लाट) नावाचं विष्णू मंदिर आहे. मिहिरभोज राजाच्या राजवटीमध्ये (९ वं शतक?) हे मंदिर बांधलं होतं. वेळेआभावी या भेटीत हे मंदिर बघायचं राहून गेलं. शिख गुरू हरगोबिंद यांच्या नावाचं एक गुरुद्वाराही (गुरुद्वारा दाता बंदी छोड साहिब) मंदिरावर आहे. गुरू हरगोविंद यांना ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर जहांगीरने कैदेत ठेवलं होतं. जहांगिर खूप आजारी पडला, पण गुरू हरगोबिंद यांनी प्रार्थना केल्यावर तो बरा झाला. जहांगीराने गुरूंची आणि त्यांच्या सोबत असणार्‍यांची मुक्तता करायचं ठरवलं. तेंव्हा गुरूंनी ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर बंदी असणार्‍या ५२ राजांना आपल्यासोबत सोडवण्यासाठी ५२ बंद असणारा अंगरखा घातला, आणि हे राजे एक एक बंद धरून गुरूंच्या सोबत तुरुंगातून बाहेर पडले! गुरुद्वारामध्ये अर्थातच मस्त लंगर मिळतं. वेळेआभावी इथेही जाता आलं नाही, हेही पुढल्या भेटीत.

ग्वाल्हेरला झाशीच्या राणीची समाधी आहे, ती माऊला बघायची होती. (पुण्याहून निघाल्यापासून गाडीत सारखं “रे हिंदबांधवा” आणि “बुंदेले हरबोलों के मुह” चाललं होतं!) झाशीला सर ह्यू रोझचा वेढा पडल्यावर राणीने किल्ल्याच्या तटावरून तिच्या बादल घोड्यासकट उडी मारली. घोडा दगावला, राणी वाचली. तिथून राणी काल्पीला गेली. काल्पीला पुन्हा इंग्रजांकडून पराभव झाल्यावर राणी, तात्या टोपे आणि इतर सेनानी ग्वाल्हेरला गेले. ग्वाल्हेरहून शिंदे आग्र्याला पळून गेले होते. ग्वाल्हेर स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या सैनिकांच्या ताब्यात होतं. ग्वाल्हेर ताब्यात आल्यावर बंडखोरांनी नानासाहेबांना पेशवे जाहीर केलं आणि शांत बसले. इंग्रजांच्या होऊ घातलेल्या हल्ल्यासाठी त्यांना तयार करण्यात राणीला अपयश आलं. अपेक्षेप्रमाणे इंग्रजांचा हल्ला झाला, ग्वाल्हेरच्या फूल बाग भागामध्ये राणीच्या नेतृत्वाखालच्या सैन्याला इंग्रज सेनेने हरवलं, या लढाईत “भारतीय सेनानींपैकी सर्वात धोकादायक” अशा राणीला वीरगती प्राप्त झाली. फूल बागमध्ये राणीचं स्मारक बघितलं. इथे राणीचा अश्वारूढ पुतळा आहे. (बालगंधर्व चौकात आहे तसाच, तेवढाच.) स्मारकावरही “रे हिंदबांधवा ... “ कोरलेली आहे. (या कवितेचे कवी भा रा तांबे हे ग्वाल्हेरचे राजकवी होते.) या स्मारकाच्या समोरच्या मोकळ्या मैदानावर दर वर्षी राणीचा स्मृतीदिन साजरा केला जातो. (स्मारक रात्री बघितलं, त्यामुळे तिथले फोटो नाहीत.)

जयविलास पॅलेसमध्ये शिंदे सरकारचं संग्रहालय आहे. पॅलेस, आवार भव्य आणि उत्तम निगा राखलेलं आहे. संस्थानिकांचे आजचे वारस या पॅलेसच्या भागातच राहतात. इथे माऊला शिंद्यांच्या जेवणाच्या टेबलावरची सुकामेव्याची रेल्वेगाडी दाखवायची होती. त्यामुळे पॅलेस म्युझियमला जायचं ठरलं होतं. पण बाहेरून जितकं भव्य आणि नेटकं वाटलं, त्या मानाने आतल्या संग्रहालयाने निराशा केली. संग्रहालयामध्ये कुठेही माहिती लिहिलेली नाही – तुम्ही हवं तर गाईड घेऊन बघावं अशी अपेक्षा आहे. तसंही माऊला घेऊन सगळं संग्रहालय बारकाईने बघणार नव्हतोच, पण तिला दाखवायच्या रेल्वेगाडीने पण निराशा केली. एकीकडे डायनिंग टेबलवर गाडीचे रूळ घातलेले, दुसरीकडे गाडी काचेच्या कपाटात बंद करून ठेवलेली. ती कशी चालायची आणि त्यावरच्या वस्तू उचलल्यावर कशी थांबायची हे नुसतं स्क्रीनवर बघायचं! हे तर तिला घरी बसूनही बघता आलं असतं.
जयविलास पॅलेस


पॅलेसच्या आवारातलं नारिंगीचं झाड

कुंती सगळीकडे फुललेली होती.
ग्वाल्हेरला आल्यावर बघण्याइतकंच महत्त्वाचं काम म्हणजे खाणं – पिणं. चाट, कुल्फी – फालुदा – रबडी, गजक ही इथली खासियत. त्यामुळे भरपूर पेटपूजा झाली. पुढच्या भेटीत काय काय बघायचं आणि काय काय खायचं हे ठरवून झालं, आणि मग उरलेल्या भटकंतीसाठी निघालो.

Tuesday, March 7, 2017

खजुराहो

मध्य प्रदेशमधे तशी थोडीफार भटकंती केलीय, पण खजुराहो बघायचं राहिलं होतं नेहेमीच. या वेळी खजुराहो बघायचंच असं ठरवलं होतं. त्या प्रमाणे एक संध्याकाळ आणि पुढचा संपूर्ण दिवस खजुराहोसाठी राखीव होता ट्रीपचा. पण भारतीय रेलच्या कृपेने आमची गाडी संध्याकाळऐवजी रात्री खजुराहोला पोहोचली, आणि हाताशी एकच दिवस उरला. खजुराहो हे दहा – बारा हजार लोकवस्तीचं बुंदेलखंडातलं गाव. भरपूर पाणी आहे, चांगली शेती आहे, पण सगळी अर्थव्यवस्था पर्यटनावर. आमचा ड्रायव्हर म्हणजे माऊशी स्पर्धा करू शकेल इतका बोलका होता. त्याच्या भाषेत सांगायचं, तर गावात ‘लपके’ भरलेले आहेत. म्हणजे पर्यटकांना चिकटणारे. स्वतःची भरपूर शेती असतांना देवळाबाहेर भीक मागतील (विदेशी पर्यटकांकडून डॉलरमध्ये भीक मिळते!), त्यांना बाईकवरून ट्रिपलसीट हिंडवतील, त्यांच्या पुढे पुढे करतील. त्यांच्याशी लग्न जमवायचा प्रयत्न करतील. कुठल्याही मार्गाने पर्यटकांकडून पैसा मिळवून त्यावर जगणारा तो लपका!

पर्यटक प्रामुख्याने विदेशी – राजस्थान, आग्रा किंवा वाराणसी याबरोबर खजुराहोला येणारे. देशी पर्यटक म्हणजे थोडीफार नवं लग्न झालेली जोडपी, नाहीतर फक्त पुरुष. लहान मुलं सोबत असणारे, कौटुंबिक सहली फारशा नाहीत. माऊला सोबत घेऊन तिथे जातांना मनात थोडी शंका होती. कारण खजुराहोच्या मंदिरांची “तसली” प्रसिद्धी. खरं तर खजुराहो इतकीच मैथुनशिल्पं कोणार्कच्या सूर्यमंदिरावर किंवा कर्नाटकात बेलूरच्या मंदिरावरसुद्धा आहेत. पण तिथे कोणी कामशास्त्राची शिल्पं बघायला म्हणून जात नाही, तिथले गाईडही मुद्दाम या शिल्पांविषयी सविस्तर बोलत नाहीत. इथेसुद्धा एकूण शिल्पांच्या फार तर १०% शिल्पं ही मैथुनशिल्पं असतील. इतक्या शिल्पांच्या गर्दीमध्ये गाईडने मुद्दाम दाखवल्याशिवाय त्यातली बहुसंख्य आपल्या लक्षातही येणार नाहीत. पण कामशास्त्रात वर्णन केलेल्या अनेक स्थिती, अगदी bestialityचं सुद्धा चित्रीकरण इथे आहे. समाजजीवनाच्या विविध अंगांचं चित्रीकरण या मंदिरांवर आहे – त्यात लढाया आहेत, राजाचे दरबार आहेत, खेळ आहेत, तशाच कामलीलाही. ही मंदिरं बांधणारा समाज आजच्यासारखा ढोंगी झालेला नव्हता असं वाटलं हे बघून. (सुदैवाने माऊला मन रमवायला तिथे भरपूर दुसर्‍या गोष्टी मिळाल्या. ती कंटाळलीही नाही आणि तिला सोबत घेऊन आपण पॉर्न बघतोय असंही कुठे वाटलं नाही.)







ही मंदिरं बांधली गेली इसवी सन ९०० ते १२०० या काळामध्ये. तेंव्हा इथे चंदेल राजपूत राजवट होती. मंदिरं नागर पद्धतीची, मोठ्या, उंच जोत्यावर बांधलेली आणि अतिशय प्रमाणबद्ध. Interlocking पद्धतीने, कुठल्याही binding material शिवाय चिर्‍यावर चिरा रचून बांधलेली. गुलाबी – पिवळ्या सॅंडस्टोनमधली. हा दगड इथे सापडत नाही, ४० – ५० किमी अंतरावरच्या पन्ना गावाजवळ मिळतो. तिथून सगळे दगड वाहून आणलेले. देवळं आतून बाहेरून शिल्पांनी नटलेली. सगळीच शिल्पं अतिशय आखीवरेखीव, जिवंत वाटणारी.   एक एक मंदिर बांधायला १५ -२० वर्षं सहज लागली असतील. अशी २० – ३० मंदिरं तरी इथे शाबूत आहेत. अजून एक मोठं मंदिर सापडलं आहे, त्याचं restoration चालू आहे. वास्तूविशारद, शिल्पकार, इंजिनियर आणि मजूर यांच्या किती पिढ्या इथे राबल्या असतील, आणि चंदेल राजांनी केवढा पैसा इथे ओतला असेल!

दुल्हादेव मंदिर

पार्श्वनाथ मंदिर
जवारी मंदिर


लक्ष्मण मंदिर

चित्रगुप्त मंदिर आणि उजवीकडे फुललेला पांढरा कांचन!

यात सगळ्यात मोठं, उंच आणि प्रमाणबद्ध मंदिर म्हणजे कंदारिया महादेवाचं विद्याधर चंदेलाच्या काळात बांधलेलं मंदिर. विद्याधर चंदेलाच्या राजवटीत (अकराव्या शतकाचा सुरुवातीचा काळ.) गझनीच्या महमूदाची भारतावरची आक्रमणं चालू होती, त्यात तो चंदेलांवर दोन वेळा चालून गेला. पहिली स्वारी अनिर्णित राहिली, महमूद गझनीला परतला, आणि पुन्हा चालून आला. कालिंजरच्या किल्ल्याला त्याने वेढा घातला. किल्ला ताब्यात घेण्यात त्याला अपयश आलं, विद्याधर चंदेलाबरोबर त्याने तह केला. या विजयाच्या (!) स्मृतीप्रित्यर्थ विद्याधर चंदेलाने हे भव्य मंदिर बांधलं. (विद्याधर चंदेल त्या काळातला सामर्थ्यवान राजा होता. मंदिर बांधण्यापेक्षा महमूदाच्या पुन्हा पुन्हा होणार्‍या स्वार्‍यांपासून रक्षणासाठी काही केलं असतं तर! पण जाऊ दे. कितीही आक्रमणं झाली तरी आपण त्यातून काही शिकलो नाही. हा आपल्या इतिहासाचा फार दुःखद कालखंड आहे.:( हे संपायला थेट सतरावं शतक उजाडावं लागलं! ) हे मंदिर ३० मीटरपेक्षा जास्त उंच आहे. त्याच्या इंचाइंचावर सुंदर शिल्पं आहेत. पण प्रत्येक शिल्प बघतांना, खरं तर इथलं प्रत्येक मंदिर बघताना मला गझनीचा महमूद आठवलाच आठवला. चंदेल राजांनी खरोखर अप्रतिम शिल्पं उभी केली आहेत इथे. पण सह्याद्रीमधले कुठलीच कलाकुसर नसलेले रांगडे सुंदर किल्ले बघतांना जे समाधान मिळतं, त्याची तुलना यांच्याशी होऊच शकत नाही!

कंदारिया महादेव मंदिर











खजुराहो फेस्टीव्हल संपल्याच्या दुसर्‍या दिवशी आम्ही तिथे पोहोचलो, त्यामुळे फारशी गर्दी नव्हती तिथे. खजुराहोची मंदिरं बघायला एक दिवस पुरेसा आहे एवढा घरचा अभ्यास जाण्यापूर्वी केलेला होता. पण खजुराहोच्या जवळपास बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत हे माहित नव्हतं.  जवळ कालिंजरचा (तोच तो - गझनीच्या महमूदाला जिंकता न आलेला.) प्रसिद्ध किल्ला, ओर्छा, अजयगड, पन्नाच्या हिर्‍याच्या खाणींची सफर, केन (कर्णावती) नदीवरचा धबधबा (पांडव फॉल्स) हे सगळं इथून बघता येतं. (पन्ना राष्ट्रीय उद्यानालाही भेट देता येते, पण पन्नापेक्षा सरस जंगलं मध्य भारतात आहेत. पन्नामध्ये आता वाघ शिल्लक नाहीत. कान्हा / बांधवगड / रणथंबोरला आहेत, पण ही जंगलं इथून तशी लांब आहेत.)

देवळं बघण्यापूर्वी जवळ १५ - २० किमीवर “क्रॉकोडाईल सफारी” आहे तिथे गेलो होतो. केन (कर्णावती) नदीमध्ये मगरी आहेत, आणि घडियाल पण सोडल्या आहेत. पण टेकडीवरून खाली नदीच्या पात्रात मगरी बघण्यात काही फारशी मजा आली नाही. (म्हणजे आपल्याला नदीपात्रात पडलेलं फळकूट वाटतं, तीच मोठी मगर आहे म्हणून गाईडने सांगायचं, आपण खूश व्हायचं असा प्रकार! ) जातांना वाटेतल्या जंगलात चितळं, नीलगायी, कोल्हे, लाल आणि काळ्या तोंडाची माकडं, कोल्हे, गिधाडं हे मात्र भरपूर बघायला मिळाले. पुढे जाऊन केन नदीवर पाच एक किमी लांबीची मोठी घळ आहे. तिथेच पात्रात ज्वालामुखीमुळे झालेलं मोठं विवर आहे. त्याच्या आजूबाजूला पाच रंगांचे कातळ दिसतात. पावसाळ्यात इथे मस्त धबधबा असतो. आता धबधबा नव्हता, पण नदीचं पात्र आणि बाजूचे कातळ (आमच्या ड्रायव्हरच्या भाषेत ‘मिनी ग्रॅंड कॅनयन!’) फार सुंदर दिसतात.

इथे पावसाळ्यात धबधबा असतो
ज्वालामुखीचं विवर

घळीतून वाहणारी केन नदी
एकूण, इथे परत येतांना अजून जास्त वेळ घेऊन यायचं असं ठरवलं निघतांना!