Tuesday, March 7, 2017

झुकू झुकू झुकू झुकू अगीनगाडी ...

दुसरं काहीही निमित्त नाही, फक्त भटकण्यासाठी मोठा प्रवास असा माऊने केलाच नव्हता आतापर्यंत. खूप दिवसांपासून त्यामुळे माऊ आणि तिच्या बाबासोबत जरा मोठी भटकंती करायची होती. गेल्या आठवड्यात अखेरीस ग्वाल्हेर – खजुराहो - आग्रा – फतेहपूर सिक्री – भरतपूर – दिल्ली अशी भटकंती झाली. या वेळी जास्तीत जास्त प्रवास रेल्वेने करायचा ठरवला होता. त्याप्रमाणे पुणे – ग्वाल्हेर, ग्वाल्हेर – पुणे, ग्वाल्हेर – खजुराहो, खजुराहो ग्वाल्हेर आणि ग्वाल्हेर – आग्रा इतकी सगळी तिकिटं बुक केली, आणि त्यामुळे आय आर सी टी सी एका आयडीला एका महिन्यात सहापेक्षा जास्त बुकिंग करू देत नाही ही ज्ञानप्राप्ती झाली. (प्रवास ठरवतांना अर्थातच मिळतील ती तिकिटं काढली होती. त्यामुळे प्रत्यक्ष प्रवास करतांना यापैकी फक्त ग्वाल्हेर – खजुराहो, खजुराहो – ग्वाल्हेर तिकिटं आहेत तशी वापरली, बाकी सगळी दुसर्‍या आयडीने बदलली! :D)

रेल्वेचा प्रवास माऊचा लाडका. या वेळी अगदी तिनेसुद्धा कंटाळावं एवढा प्रवास केला रेल्वेने. खूप दिवसांनी एवढा रेल्वेचा प्रवास केला. बदलत असलेल्या रेल्वेत अजूनही पुणे जम्मूतावी झेलम पूर्वीसारखीच रटाळ राहण्यात यशस्वी झाली आहे हे कळलं. झेलमचं खाणं पूर्वीइतकंच बकवास होतं. खजुराहोला जाताना डब्यात खूप घाण होती, तर एस एम एस केल्यावर लगेच ती साफ करायला माणसं आली हा सुखद अनुभवही आला, आणि डब्यातली कचरापेटी भरलेली आहे म्हणून सांगितल्यावर त्यांना गाडीचं दार उघडून तो कचरा सरळ बाहेर टाकतानाही बघितलं. इ-केटरिंग वापरून मागवलेलं खाणं एकदा चांगलं निघालं, एकदा आलंच नाही आणि नुसतेच खयाली पराठे खावे लागले. पण नंतर तक्रार केल्यावर त्यांचा दिलगिरीचा फोनही आला. बायो-टॉयलेट मात्र कुठल्याच डब्यात दिसल्या नाहीत. हळुहळू का होईना, पण रेल्वेचा अवाढव्य हत्ती हलतो आहे, वेळ लागतोय, पण बदल होताहेत.

सगळ्यात मजा आली ती माऊची. एवढा प्रवास म्हणजे एवढे प्रवासी (= एवढे पोटेन्शीयल मित्र मैत्रिणी.) पुण्याहून निघताना “हा बोट इथे ठेवो” असं हिंदी बोलणारी माऊ परत येईपर्यंत बर्‍यापैकी हिंदी बोलायला लागली. अर्थात आम्ही खूप लोकांना फुकटात मनोरंजन पुरवलं.

खजुराहोला जाताना डब्यात एक मोठा कोरियन ग्रूप होता. थंडीमध्ये अंग कोरडं पडलं की पांढरं होतं हे माऊला माहित आहे. त्यामुळे अर्थातच हे लोक कोरडे पडलेले ठरले. सगळे ‘कोरडे पडलेले’ इतकी सुंदर गाणी एका सुरात म्हणत होते, की मला डब्यात कुठला मोठा भारतीय ग्रूप नाही, कुणी ‘अंताक्षरी’च्या नावाखाली घसे मोकळे करून घेत नाहीये याबद्दल फार बरं वाटलं. दर वेळी ‘कोरड्या’ भागातून जातांना माऊला खाऊ मिळत होता. एक कोरडा पडलेला आजोबा माऊवर इतका खूश होता की त्याने तिला मूठभर चॉकलेटं दिली! दुसर्‍या दिवशी देवळं बघतांना “आपले कोरडे पडलेले” लोक परत तिथे बघून माऊ खूशच झाली.
स्टेशनवर भेटलेला मित्र

आणि डब्यातली मैत्रीण!

या पोस्टमध्ये फक्त झुक झुक गाडीच्या गमती. बाकीची भटकंती पुढे.

No comments: