Tuesday, March 7, 2017

खजुराहो

मध्य प्रदेशमधे तशी थोडीफार भटकंती केलीय, पण खजुराहो बघायचं राहिलं होतं नेहेमीच. या वेळी खजुराहो बघायचंच असं ठरवलं होतं. त्या प्रमाणे एक संध्याकाळ आणि पुढचा संपूर्ण दिवस खजुराहोसाठी राखीव होता ट्रीपचा. पण भारतीय रेलच्या कृपेने आमची गाडी संध्याकाळऐवजी रात्री खजुराहोला पोहोचली, आणि हाताशी एकच दिवस उरला. खजुराहो हे दहा – बारा हजार लोकवस्तीचं बुंदेलखंडातलं गाव. भरपूर पाणी आहे, चांगली शेती आहे, पण सगळी अर्थव्यवस्था पर्यटनावर. आमचा ड्रायव्हर म्हणजे माऊशी स्पर्धा करू शकेल इतका बोलका होता. त्याच्या भाषेत सांगायचं, तर गावात ‘लपके’ भरलेले आहेत. म्हणजे पर्यटकांना चिकटणारे. स्वतःची भरपूर शेती असतांना देवळाबाहेर भीक मागतील (विदेशी पर्यटकांकडून डॉलरमध्ये भीक मिळते!), त्यांना बाईकवरून ट्रिपलसीट हिंडवतील, त्यांच्या पुढे पुढे करतील. त्यांच्याशी लग्न जमवायचा प्रयत्न करतील. कुठल्याही मार्गाने पर्यटकांकडून पैसा मिळवून त्यावर जगणारा तो लपका!

पर्यटक प्रामुख्याने विदेशी – राजस्थान, आग्रा किंवा वाराणसी याबरोबर खजुराहोला येणारे. देशी पर्यटक म्हणजे थोडीफार नवं लग्न झालेली जोडपी, नाहीतर फक्त पुरुष. लहान मुलं सोबत असणारे, कौटुंबिक सहली फारशा नाहीत. माऊला सोबत घेऊन तिथे जातांना मनात थोडी शंका होती. कारण खजुराहोच्या मंदिरांची “तसली” प्रसिद्धी. खरं तर खजुराहो इतकीच मैथुनशिल्पं कोणार्कच्या सूर्यमंदिरावर किंवा कर्नाटकात बेलूरच्या मंदिरावरसुद्धा आहेत. पण तिथे कोणी कामशास्त्राची शिल्पं बघायला म्हणून जात नाही, तिथले गाईडही मुद्दाम या शिल्पांविषयी सविस्तर बोलत नाहीत. इथेसुद्धा एकूण शिल्पांच्या फार तर १०% शिल्पं ही मैथुनशिल्पं असतील. इतक्या शिल्पांच्या गर्दीमध्ये गाईडने मुद्दाम दाखवल्याशिवाय त्यातली बहुसंख्य आपल्या लक्षातही येणार नाहीत. पण कामशास्त्रात वर्णन केलेल्या अनेक स्थिती, अगदी bestialityचं सुद्धा चित्रीकरण इथे आहे. समाजजीवनाच्या विविध अंगांचं चित्रीकरण या मंदिरांवर आहे – त्यात लढाया आहेत, राजाचे दरबार आहेत, खेळ आहेत, तशाच कामलीलाही. ही मंदिरं बांधणारा समाज आजच्यासारखा ढोंगी झालेला नव्हता असं वाटलं हे बघून. (सुदैवाने माऊला मन रमवायला तिथे भरपूर दुसर्‍या गोष्टी मिळाल्या. ती कंटाळलीही नाही आणि तिला सोबत घेऊन आपण पॉर्न बघतोय असंही कुठे वाटलं नाही.)







ही मंदिरं बांधली गेली इसवी सन ९०० ते १२०० या काळामध्ये. तेंव्हा इथे चंदेल राजपूत राजवट होती. मंदिरं नागर पद्धतीची, मोठ्या, उंच जोत्यावर बांधलेली आणि अतिशय प्रमाणबद्ध. Interlocking पद्धतीने, कुठल्याही binding material शिवाय चिर्‍यावर चिरा रचून बांधलेली. गुलाबी – पिवळ्या सॅंडस्टोनमधली. हा दगड इथे सापडत नाही, ४० – ५० किमी अंतरावरच्या पन्ना गावाजवळ मिळतो. तिथून सगळे दगड वाहून आणलेले. देवळं आतून बाहेरून शिल्पांनी नटलेली. सगळीच शिल्पं अतिशय आखीवरेखीव, जिवंत वाटणारी.   एक एक मंदिर बांधायला १५ -२० वर्षं सहज लागली असतील. अशी २० – ३० मंदिरं तरी इथे शाबूत आहेत. अजून एक मोठं मंदिर सापडलं आहे, त्याचं restoration चालू आहे. वास्तूविशारद, शिल्पकार, इंजिनियर आणि मजूर यांच्या किती पिढ्या इथे राबल्या असतील, आणि चंदेल राजांनी केवढा पैसा इथे ओतला असेल!

दुल्हादेव मंदिर

पार्श्वनाथ मंदिर
जवारी मंदिर


लक्ष्मण मंदिर

चित्रगुप्त मंदिर आणि उजवीकडे फुललेला पांढरा कांचन!

यात सगळ्यात मोठं, उंच आणि प्रमाणबद्ध मंदिर म्हणजे कंदारिया महादेवाचं विद्याधर चंदेलाच्या काळात बांधलेलं मंदिर. विद्याधर चंदेलाच्या राजवटीत (अकराव्या शतकाचा सुरुवातीचा काळ.) गझनीच्या महमूदाची भारतावरची आक्रमणं चालू होती, त्यात तो चंदेलांवर दोन वेळा चालून गेला. पहिली स्वारी अनिर्णित राहिली, महमूद गझनीला परतला, आणि पुन्हा चालून आला. कालिंजरच्या किल्ल्याला त्याने वेढा घातला. किल्ला ताब्यात घेण्यात त्याला अपयश आलं, विद्याधर चंदेलाबरोबर त्याने तह केला. या विजयाच्या (!) स्मृतीप्रित्यर्थ विद्याधर चंदेलाने हे भव्य मंदिर बांधलं. (विद्याधर चंदेल त्या काळातला सामर्थ्यवान राजा होता. मंदिर बांधण्यापेक्षा महमूदाच्या पुन्हा पुन्हा होणार्‍या स्वार्‍यांपासून रक्षणासाठी काही केलं असतं तर! पण जाऊ दे. कितीही आक्रमणं झाली तरी आपण त्यातून काही शिकलो नाही. हा आपल्या इतिहासाचा फार दुःखद कालखंड आहे.:( हे संपायला थेट सतरावं शतक उजाडावं लागलं! ) हे मंदिर ३० मीटरपेक्षा जास्त उंच आहे. त्याच्या इंचाइंचावर सुंदर शिल्पं आहेत. पण प्रत्येक शिल्प बघतांना, खरं तर इथलं प्रत्येक मंदिर बघताना मला गझनीचा महमूद आठवलाच आठवला. चंदेल राजांनी खरोखर अप्रतिम शिल्पं उभी केली आहेत इथे. पण सह्याद्रीमधले कुठलीच कलाकुसर नसलेले रांगडे सुंदर किल्ले बघतांना जे समाधान मिळतं, त्याची तुलना यांच्याशी होऊच शकत नाही!

कंदारिया महादेव मंदिर











खजुराहो फेस्टीव्हल संपल्याच्या दुसर्‍या दिवशी आम्ही तिथे पोहोचलो, त्यामुळे फारशी गर्दी नव्हती तिथे. खजुराहोची मंदिरं बघायला एक दिवस पुरेसा आहे एवढा घरचा अभ्यास जाण्यापूर्वी केलेला होता. पण खजुराहोच्या जवळपास बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत हे माहित नव्हतं.  जवळ कालिंजरचा (तोच तो - गझनीच्या महमूदाला जिंकता न आलेला.) प्रसिद्ध किल्ला, ओर्छा, अजयगड, पन्नाच्या हिर्‍याच्या खाणींची सफर, केन (कर्णावती) नदीवरचा धबधबा (पांडव फॉल्स) हे सगळं इथून बघता येतं. (पन्ना राष्ट्रीय उद्यानालाही भेट देता येते, पण पन्नापेक्षा सरस जंगलं मध्य भारतात आहेत. पन्नामध्ये आता वाघ शिल्लक नाहीत. कान्हा / बांधवगड / रणथंबोरला आहेत, पण ही जंगलं इथून तशी लांब आहेत.)

देवळं बघण्यापूर्वी जवळ १५ - २० किमीवर “क्रॉकोडाईल सफारी” आहे तिथे गेलो होतो. केन (कर्णावती) नदीमध्ये मगरी आहेत, आणि घडियाल पण सोडल्या आहेत. पण टेकडीवरून खाली नदीच्या पात्रात मगरी बघण्यात काही फारशी मजा आली नाही. (म्हणजे आपल्याला नदीपात्रात पडलेलं फळकूट वाटतं, तीच मोठी मगर आहे म्हणून गाईडने सांगायचं, आपण खूश व्हायचं असा प्रकार! ) जातांना वाटेतल्या जंगलात चितळं, नीलगायी, कोल्हे, लाल आणि काळ्या तोंडाची माकडं, कोल्हे, गिधाडं हे मात्र भरपूर बघायला मिळाले. पुढे जाऊन केन नदीवर पाच एक किमी लांबीची मोठी घळ आहे. तिथेच पात्रात ज्वालामुखीमुळे झालेलं मोठं विवर आहे. त्याच्या आजूबाजूला पाच रंगांचे कातळ दिसतात. पावसाळ्यात इथे मस्त धबधबा असतो. आता धबधबा नव्हता, पण नदीचं पात्र आणि बाजूचे कातळ (आमच्या ड्रायव्हरच्या भाषेत ‘मिनी ग्रॅंड कॅनयन!’) फार सुंदर दिसतात.

इथे पावसाळ्यात धबधबा असतो
ज्वालामुखीचं विवर

घळीतून वाहणारी केन नदी
एकूण, इथे परत येतांना अजून जास्त वेळ घेऊन यायचं असं ठरवलं निघतांना!

No comments: