Thursday, March 9, 2017

आग्रा

तसं आग्रा पूर्वी बरेच वेळा बघितलेलं आहे. ताज महाल बघून माऊला फार काही ग्रेट वगैरे वाटणार नाही या वयात. त्यात तिथे गर्दी असली तर माऊला कितपत मजा येईल शंका होती. ताज महालाच्या मुख्य घुमटाच्या सफाईचं / restoration चं काम मार्चमध्ये सुरू होणार आहे आणि कदाचित mud pack मधला घुमट बघायला लागेल असंही समजलं होतं. त्यामुळे आग्र्याला जायला मी फारशी उत्सुक नव्हते. पण इतक्या जवळ येतो आहोत, भरतपूरच्या वाटेवरच आहे तर जाऊन येऊ, नाही आवडलं तर लवकर पुढे निघता येईल अशा विचाराने निघालो. आग्र्याला माझा दिल्लीचा मित्र येणार होता, त्याच्याबरोबर गाडीतून आग्रा आणि भरतपूर फिरायचं होतं. पहिले लाल किल्ला बघायला गेलो. माऊ सोबत असतांना गाईड करणं, किल्ल्याची माहिती समजावून घेणं शक्य नव्हतंच. तरी मी ऑडिओ गाईड तरी घेऊ म्हटलं, पण तिच्या प्रश्नोपनिषदापुढे मला त्यातलं काहीही ऐकता आलं नाही. त्यामुळे किल्ला बघणं म्हणजे फक्त समोर दिसेल तेवढं बघणं झालं. किल्ल्यात खेळवलेलं पाणी वगैरे ईंजिनियरिंगची करामत, जहांगीराची साखळी वगैरे बाकी कहाण्या ऐकायची संधीच नव्हती. किल्ल्यात प्रवेश करतांनाच दरवाजासमोर पहिले शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा माऊने पाहिला आणि खूश झाली. (खरं तर मी पण!) मग सगळा किल्ला बघतांना आम्ही शिवाजी महाराज औरंगझेबाला भेटायला इथे कसे आले होते, औरंगझेबाने त्यांना कसं नजरकैदेत ठेवलं, मग महाराज सगळ्यांची नजर चुकवून कसे पळून गेले अशी महाराजांची गोष्टंच आठवत होतो. बाकी अकबर - जहांगीर – शाहजहान वगैरे मंडळींच्या या किल्ल्यातल्या गोष्टींशी आम्हाला काहीच देणंघेणं नव्हतं! :)
किल्ल्याच्या कित्येक झरोक्यांमधून, सज्जांमधून यमुनेपलिकडचा ताज दिसतो

इथून अकबर जनतेला दर्शन द्यायचा

दीवान-ए-आमचा परिसर

किल्ला बघून मग ताज महाल बघायला गेलो. ताजच्या तीन मिनारांची सफाई पूर्ण झाली होती, चौथ्याची चालू होती. सुदैवाने मुख्य घुमटाचं काही काम चाललेलं नव्हतं त्यामुळे ताजचा घुमट काळा बघायची वेळ आली नाही.




भरतपूरला जातांना फतेहपूर – सिक्री वाटेवरच होतं, हाताशी वेळ होता म्हणून बुलंद दरवाजा बघायला गेलो. फतेहपूर – सिक्री हे अकबराने वसवलेलं गाव. चितोड, रणथंबोरच्या विजयानंतर त्याला आपली राजधानी इथे वसवायची होती. त्याचा प्रसिद्ध “इबादतखाना” – धार्मिक चर्चांची जागासुद्धा फतेहपूर सिक्रीलाच होती. (इबादतखाना नेमका कुठे होता ते माहित नाही.) इथला बुलंद दरवाजा हा अकबराने गुजरातवरच्या विजयाप्रित्यर्थ बांधलेला उंचच उंच दरवाजा. बुलंद दरवाजामधून आत गेलं, की सूफी संत आणि अकबराचा गुरू सलीम चिस्ती याची कबर आहे. (अकबराला याच्या कृपेने मुलगा झाला, त्याचं नाव सलीम ठवलं असं म्हणतात.) संगमरवरी दगडामध्ये बांधलेली ही कबर हा मुस्लीम स्थापत्याचा उत्तम नमुना समजला जातो. विशेषतः त्याच्या संगमरवरी जाळ्या. अतिशय नाजुक आणि सुंदर असं हे कोरीवकाम आहे. (इथे पोहोचेपर्यंत मी इतकी वैतागले होते की जाळ्यांचा फोटो काढलाच नाही!) १५ - २० वर्ष राजधानी वसवण्यासाठी काम केल्यावर फतेहपूर सिक्रीला पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आणि अकबराने हा विचार सोडून दिला.

लहानपणी अग्रा – फतेहपूर सिक्री बघितलं होतं तेंव्हा दोन्ही यूपीमधली जुनाट, बकाल गावं होती. आता आग्रा बरंच बदललंय - किमान पर्यटकांसाठीतरी. त्यांच्यासाठी पुरेशा सोयी केल्यात, ठिकठिकाणी माहिती लिहिलेली आहे, गाईड लोकांचे ठरलेले दर आहेत, माहितीपुस्तिका मिळतात. थोडं जागरूक असाल तर फसवणूक न होता तुम्ही आपले आपण आग्रा बघू शकता. फतेहपूर सिक्री मात्र अजूनही अंधारयुगातच राहिलंय. आत दर्गा असल्यामुळे बुलंद दरवाजा / कबर बघायला तिकिट नाही, सिक्युरिटी नाही, खरं सांगायचं तर कुणी वालीच नाही. गावाच्या वेशीच्या आत प्रवेश करता करताच गाईड मंडळींनी भंडावून सोडलं. चार चार लोक रस्त्यात गाडीसमोर येऊन, गाडीच्या काचेवर टकटक करून गाडी थांबवायला लागली, तर कुणीही भांबावून जाईल. “यहा से आगे गाडी नही जायेगी, यही टिकिट कटवा लो।“ म्हणून ते पटवायला लागले. कसलं तिकीट ते ही धड सांगेनात. आम्ही जेवायला चाललोय म्हणून त्यांना कटवलं. पुढे पुन्हा तीच गत. जेवण झाल्यावर अजून पुढे आलो आणि एका पार्किंगमध्ये गाडी लावली. (एवढ्याशा गावातल्या पार्किंगचं तिकीट आग्र्यापेक्षा जास्त!) १२-१३ वर्षांचा वाटणारा एक मुलगा आम्हाला बुलंद दरवाजापर्यंत ऑटोरिक्षाने सोडायला तयार झाला. (गाईड न घेता.). “आई, हा दादा तर छोटा आहे, त्याला गाडी चालवायचा कागद पोलीस काकानी कसा दिला?” माऊचा प्रश्न. पोलीस काकाला या गावात कुणीच विचारत नाही हे तिला कसं सांगणार?

रिक्षा बुलंद दरवाजाच्या अलिकडे चढाला लागणार तेवढ्यात दोन तीन गाईड पुन्हा रिक्षावर तुटून पडले, माझं गिर्‍हाईक – माझं गिर्‍हाईक म्हणून त्यांची वादावादी सुरू झाली. एक दोघं जण ऑटोमध्ये बसले सुद्धा. “आम्ही कुठल्याही गाईडला एक पैसाही देणार नाहीये, तू ठरल्याप्रमाणे आम्हाला दरवाजापाशी सोड” मित्राने ऑटोवाल्याला निक्षून सांगितलं. यावर त्याने “मग ऑटो अजून पुढे जाऊ शकणार नाही!” म्हणून आम्हाला तिथेच उतरवलं. दरवाजामध्ये पोहोचलो, तिथे काय ते बघितलं आणि परत निघालो तोपर्यंत गाईड लोकांचं पीडणं चालूच होतं. वर दरवाजाजवळ अर्थातच काहीही माहिती लिहिलेली नाही. (नाहीतर गाईड लोकांचं कसं फावणार?) थेट दरवाजामध्ये सुद्धा लोक पथारी पसरून काहीबाही विकायला बसलेले, बकर्‍या चरताहेत, कचरा. दरवाजामधून आत शिरल्यावर गाईड लोकांसोबतच दुसरी पीडा मागे लागली – आठ - दहा वर्षांची पोरं “शायरी सुनाऊ?” म्हणून भंडावून सोडत होती. कसं बसं सलीम चिस्तीची कबर, त्याच्या अप्रतिम कलाकुसर केलेल्या जाळ्या असं सगळं पाहिलं, आणि कडू तोंड घेऊन तिथून बाहेर पडलो. बाहेर पडतांना बघितलं, तर थेट दरवाजाच्या पायर्‍या सुरू होतात तिथे ऑटोरिक्षा उभ्या होत्या लोकांना परत घेऊन जायला. आणि दरवाजा जवळूनच पुढे दुसर्‍या  गावाला रस्ता जातो, म्हणजे तिथे गाडी नेता येत नाही असं काहीही नाही. गाव लहान आहे, गरिबी आहे, दुसरं काही उत्पन्नाचं साधन नाही हे सगळं मला मान्य आहे. पण तरीही प्रचंड चीड आली या गोचीड प्रवृत्तीची. मी पूर्वी हे बघितलेलं होतं, इथला इतिहास मला माहित होता, कितपत बघण्यासारखं आहे याची कल्पना होती. मित्र दिल्लीचा म्हणजे तसा लोकल म्हणण्यासारखाच. एवढं सगळं असताना आम्हालाच या लोकांनी इतका त्रास दिला, मग आग्र्याहून येणार्‍या  परदेशातल्या पाहुण्यांना किती लुटत असतील हे?

बुलंद दरवाजा - त्याच्या उंचीची कल्पना नाही येत फोटोत. (तसा ऍंगल मिळतच नाही!)

सलीम चिस्ती कबर
फतेहपूर सिक्रीहून जेमतेम पन्नस किमीवर भरतपूर असेल. पण राजस्थानात प्रवेश केल्याबरोबर इथला बकालपणा मागे पडला. गावातले सगळे लफंगे आपल्याला फसवण्यासाठीच जमलेत अशी जी भावना होते फतेहपूर सिक्रीमध्ये, ती एकदम गेली. भरतपूर जिल्ह्याचं ठिकाण आहे, पण तसं छोटंच. इथे बर्‍यापैकी हॉटेल बघितलं आणि आजचा भटकंतीमधला फारसा लक्षात न ठेवण्यासारखा दिवस संपवला.

No comments: