Wednesday, January 10, 2018

काळं पाणी, निळं पाणी...२

पोर्ट ब्लेअरहून रॉस आणि व्हायपर बेटांची एका दिवसाची फेरी आम्ही घेतली. रॉस हे चिमुकलं बेट. इंग्रजांच्या काळात पोर्ट ब्लेअरमधले सगळे इंग्रज अधिकारी इथे राहत. काळ्यापाण्याच्या त्या वसाहतीमधला हा स्वर्ग होता – स्वतःला “अंदमानचा परमेश्वर” समजणारा जेलर बारीबाबा सुद्धा इथेच रहायचा. सुंदर बंगले, टेनिस कोर्ट, चर्चेस, क्लब हाऊस, पोहण्याचा तलाव असं हे चिमुकलं पण टुमदार “पूर्वेकडचं पॅरीस” होतं. दुसर्‍या महायुद्धाच्या सुमाराला रॉस बेटावरची वस्ती उठवण्यात आली. त्यानंतर भूकंपाने या बेटाची मध्यातून दोन शकलं केली. आज या बेटावर फक्त भग्न अवशेष बघायला मिळतात. सेल्युलर जेलचे सातापैकी तीन पाख तरी अजून शाबूत आहेत, साहेबांच्या बंगल्यांचे अवशेषही मातीला मिळालेत. इथल्या भिंतीभिंतीतून उगवलेले वड-पिंपळ बघतांना परत परत “विश्वात आजवरी शाश्वत काय झाले!” या सावरकरांच्या ओळी आठवल्यावाचून राहिल्या नाहीत.






व्हायपर बेटावर कुप्रसिद्ध “चेन गॅंग जेल” आणि अंदमानातला पहिला तुरुंग होता. इथे महिलांचाही तुरुंग होता असा उल्लेख सापडला, पण जास्त माहिती मिळाली नाही. कुठल्या स्त्रियांना इथे काळ्यापाण्यावर पाठवलं गेलं? काय झालं असेल त्यांचं पुढे? तसंही स्त्रियांना एकदा तुरुंगात गेल्यावर घर संपतंच. मग काळं पाणी काय आणि देशातले तुरुंग काय – काही फरक होता का त्यांच्यासाठी?



दुसर्‍या दिवशी पोर्ट ब्लेअरहून एक दिवसाच्या सहलीसाठी बाराटांगच्या चुनखडीच्या गुहा बघायला गेलो होतो. हा एक अगदी वेगळा अनुभव होता. सकाळी(?) तीन वाजता पोर्ट ब्लेअरहून निघालो. सव्वातीनच्या सुमाराला गावातून बाहेर पडता पडता रस्त्यात एक पळणारा दिसला, आणि एकदम मस्तच वाटलं! वाटेत “कॅटलगंज” च्या आसपास अंदमानात पोहोचल्यापासून पहिल्यांदाच शेणाचा वास आला, भरपूर गाईगुरं दिसली. इथे एकूणातच दुधाचा तुटवडा दिसला. सगळीकडे पावडरचं दूध. इथेली गुरं सुद्धा मांसासाठी पाळलेली, दुधासाठी नाही. या बेटांवर आता थोडीफार भातशेती  होते, नारळाच्या, सुपारीच्या, केळीच्या बागा आहेत, ऊस आहे. बेटाबाहेर गेलं नाही, तरी इथल्या स्थानिक लोकांची गरज भागण्याइतपत उत्पन्न निघतं. कोंबड्या – बकर्‍या पण थोड्या दिसतात. मग दूध दुभतं का बरं नसावं?

साडे पाचच्या सुमाराला जिरकाटांगला पोहोचलो. पोर्ट ब्लेअर सोडल्यापासूनच सुंदर जंगल सुरू झालं होतं – जिरकाटांगपासून पुढे जरावा आदिवासींचा भाग आहे, इथे पोलीस बंदोबस्तातच गाड्या जायला परवानगी असते. गाड्यांचा पहिला ताफा सकाळी सहा वाजता निघतो. तो गाठण्यासाठी म्हणून पोर्ट ब्लेअरहून इतक्या पहाटे निघायचं. आदिवासी भागातून जातांना कुणीही गाडीतून उतरायचं नाही, आदिवासी दिसले तर फोटो काढायचे नाहीत, त्यांच्याशी बोलायचा / काही देण्या-घेण्याचा प्रयत्न करायचा नाही. “माझी जन्मठेप”मध्ये हे आदिवासी त्या काळात नग्नावस्थेत रहायचे, बाहेरच्या माणसांना पाहिल्याबरोबर त्यांच्यावर हल्ला करायचे आणि मारून टाकलेल्या बाहेरच्या माणसाला खाऊनही टाकत असे उल्लेख सापडतात. आम्हाला या भागातून जातांना कॅमेरा बाहेर काढूच नका अशा सक्त सूचना होत्या. योगायोगाने परतीच्या वाटेवर काही जरावा दिसलेही. मूळ आफ्रिकन वंशाच्या या जमातीचे जेमतेम पाचशेएक लोक अजून शिल्लक आहेत. आता ते थोडेफार कपडे वापरतात. हातात तिरकमठा आणि अंगात जीन्सची पॅंट अशी काही १५ – १६ वर्षाची वाटाणारी मुलं दिसली, मग लहान मुलांना कडेवर घेऊन जाणार्‍या काही जरावा बायकाही दिसल्या.

पोलीस पहार्‍यात जिरकाटांगहून मिडल डिस्ट्रिक्टला पोहोचल्यावर तिथून पुढचा प्रवास बोटीने. बाराटांगमधल्या शेवटच्या टप्प्याला परत दुसरी लहान बोट आपल्याला खारफुटी जंगलातून घेऊन जाते, आणि मग शेवटचा साधारण दीड – दोन किमी अंतराचा चुनखडी गुहेपर्यंतचा प्रवास चालत. या गुहेमध्ये स्टॅलक्टाईट आणि स्टॅलग्माईट दोन्ही प्रकारच्या रचना तयार झालेल्या आहेत.  ते बघून मग “मड व्होल्कॅनो” बघायला गेलो. दिवसभरात एवढं वेगवेगळं काही पाहिल्यानंतर हा मड व्हॉल्कॅनो म्हणजे एकदम फुसका बार निघाला. तिथे कुंपण करून पाटी लिहिलेली नसती तर पाईपमधून गळालेल्या पाण्याने जरा चिखल झालाय असं वाटून तिकडे बघितलंही नसतं कुणी!  मड व्होल्कॅनोला नेणारी गाडी एकदम अठराशेसत्तावनच्या बंदींबरोबरच अंदमानात पोहोचलेली असावी इतकी जीर्ण वाटत होती. इतक्या ठिकाणून वाजणार्‍या आणि हलणार्‍या गाडीत बसायचा माऊचा हा पहिलाच अनुभव, तिने तो मनापासून एन्जॉय केला! :)
नजर जाईल तिथवर निळं पाणी, हिरवी जंगलं!

खारफुटीमधून जाताना



stalectites


चुनखडी गुहेकडे जाण्याचा रस्ता

खारफुटीमधून जाण्याचा रस्ता


मड व्होल्कॅनो! :)

***
दिवसभर प्रवास करूनही फक्त बोटीतून जातांना आम्हाला ऊन लागलं. संपूर्ण प्रवासात आजुबाजूला इतकी सुंदर झाडं होती, आणि बर्‍याच बुंध्यांवर झाडाची नावंही लिहिलेली. पण मी झाडांचे फोटो काढायचा प्रयत्न सोडून दिला, कारण अंदमानातली झाडं म्हणजे एल ग्रेकोच्या चित्रातल्या माणसांसारखी प्रमाणाबाहेर उंच आहेत.  त्यामुळे एक तर आपल्या ओळखीची झाडं पण अनोळखी वाटायला लागतात (वाटेत दोन – तीन मजले उंच केवड्याचं बन दिसलं!), आणि त्याहून मोठी अडचण म्हणजे बुंध्यावर झाडाचं नाव असलं, तरी त्याची पानं-फुलं-फळं पार वर उंचावर, आजूबाजूच्या गर्दीत मिसळून गेलेली असतात. म्हणजे कुणाचं नाव काय, कुठली पान कशाची काहीच समजत नाही. इथल्या जंगलांमध्ये अंडरग्रोथ म्हणून पसरलेली अजस्र फोलिडेड्रॉन्स आणि पामच्या वेगवेगळ्या जाती बघितल्यावर शहरी बागांमध्ये सावलीतली झाडं म्हणून लावलेली ही झाडं म्हणजे दहा-वीस फुटी पिंजर्‍यातले दात- नखं गळालेले बिचारे वाघ वाटायला लागले.

2 comments:

Bob1806 said...

This part is more interesting!

Gouri said...

Bob1806, इथे बघायच्या गोष्टींमध्ये खूप वैविध्य आहे, म्हणून असावं असं बहुतेक. :)