Thursday, January 11, 2018

काळं पाणी, निळं पाणी...३

“आशियातल्या सगळ्यात सुंदर समुद्रकिनार्‍यांपैकी पहिल्या दहात” असणारा राधानगरचा समुद्रकिनारा बघायचा होता. त्यासाठी हॅवलॉक बेटावर जायचं होतं. इथलं जंगल रिझॉर्ट, रिझॉर्टच्या परिसरातली झाडं, तिथून चालत दोन मिनिटांवर असणारा समुद्र हे सगळंच अप्रतिम.





झाडांच्या उंचीचा अंदाज यायला खाली ताईला उभं केलंय :)

  


वरून दुसरं झाडच वाटतंय ना? म्हणून झाडांचे फोटो बंद. :)

  






तिथून वॉटर स्पोर्ट्ससाठी एलिफंट बीचला गेलो होतो. इथे स्नॉर्केलिंग, स्कूबा डायव्हिंग इ. ची सोय आहे. स्नॉर्केलिंगमध्ये अप्रतिम प्रवाळ आणि मासे बघायला मिळाले. पण बोटीवाल्यांची दादागिरी, तुम्ही आवाज चढवल्याशिवाय तुमचा स्नॉर्केलिंगसाठी नंबर न लागणं हे प्रकार होतेच. तरीही, सगळ्यांनी एकत्र स्नॉर्केलिंग केल्यावर जे अनुभवायला मिळालं त्यामुळे असं वाटलं, की आलो हे बरं झालं. हॅवलॉकला असेपर्यंत माऊने दिवसभर पाण्यात डुंबून घेतलं.  :)










इथून पोर्ट ब्लेअरसाठी परत निघालो तेंव्हा आमचा ड्रायव्हर खूप अस्वस्थ होता – आज सकाळी त्याचा एक गाववाला  फेरीच्या धक्क्यावर पाण्यात बुडून मेला होता! कार्गो बोटीवर काम करणारा हा गाववाला आज खूप पिऊन कामावर आला. बोट धक्क्यात लागलेली. त्याने नांगर उचलून घेतला, आणि कसा कोण जाणे तोल जाऊन तो पाण्यात पडला. इथल्या उकाड्यापासून आराम म्हणून कित्येक बोटवाले पाण्यात डुबकी मारतात. त्यामुळे धक्क्यावर भरपूर गर्दी असून सुद्धा कुणी फारसं लक्ष दिलं नाही. लोकांच्या लक्षात येईपर्यंत नाकातोंडात पाणी जाऊन याचा जीव गेला! आमचा ड्रायव्हर रोज गाडी घेऊन बोटीतून पोर्ट ब्लेअरहून हॅवलॉकला येणारा. त्याने हे पाण्याशी संबंधित काम सोडून द्यावं म्हणून त्याची आई आज मागे लागली होती. पण मग खायचं काय?

***

अंदमान – निकोबार द्वीपसमुहात ६०० ते ७०० बेटं आहेत, त्यातली ६०- ७० माणसांची वस्ती असणारी. त्यातली जेमतेम ८ – १० पर्यटकांसाठी खुली आहेत. बाकी बेटांपैकी काही आदिवासीसाठी राखीव, काही संरक्षणदलाच्या ताब्यात. (इथून हाकेच्या अंतरावर असणारं कोको आयलंड काही वर्षांपूर्वी ब्रह्मदेशाने चीनला “भेट” दिलंय. त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने या बेटांचं महत्त्व अजूनच वाढलंय.) आदिवासींच्या ६ जमाती इथे सापडतात. आम्हाला दिसले ते जरावा, अजूनही बाहेरच्यांबाबत अतिशय आक्रमक असणारे सेंटिनेलीज, शिक्षण घेऊन सरकारी नोकर्‍यांपर्यंत पोहोचलेले निकोबारीज, ग्रेट अंदमानीज आणि ओंगे. (“जन्मठेप” मध्ये निकोबारमधल्या एका विशिष्ट जमातीविषयी वाचलं होतं – या जमातीच्या लोकांचं शेपटीचं हाड मोठं असल्यामुळे त्यांना खुर्चीवर बसता येत नाही, चेहेरा बराचसा माकडासारखा दिसतो, माकड आनि प्रगत मानव यांच्या मधल्या टप्प्यावरचे ते वाटतात असं काहीसं. यांचा कुठे उल्लेख सापडला नाही.) निकोबारी सोडता बाकी सगळ्या जमातींच्या लोकसंख्या शेकड्यामध्ये. इथे ट्रायबल टुरिझमवर सक्त बंदी आहे. देशावरून काही पिढ्यांपूर्वी इथे येऊन वसलेले बंगाली (दोन तृतियांश) आणि तमीळ (एक तृतियांश), बदली होईपर्यंत येणारे सरकारी अधिकारी आणि लष्कराचे लोक, पर्यटक आणि या सगळ्यांच्या कक्षेबाहेर जगणारे आदिवासी अशी इथली सगळी लोकसंख्या. ही सगळी वेगवेगळी, एकमेकांना क्वचितच छेदणारी विश्वं वाटली मला. आदिवासींसाठी हे विश्व प्रलयकाळाच्या जवळ पोहोचलेलं असावं – पन्नास-शंभर लोकसंख्येचे हे समुह कुठल्याही साथीमध्ये सुद्धा होत्याचे नव्हते होऊन जातील. अजून किती वर्षं टिकाव धरणार ते? पर्यटकांना फिरायला आलेल्या जागेविषयी सेल्फी पॉईंटपलिकडे देणंघेणं नसावं. सरकारी अधिकारी आणि लष्कराच्या लोकांसाठी हे बर्‍यापैकी पनिशमेंट पोस्टिंग असणार, कारण कित्येक भागांमध्ये कुटुंब घेऊन जाता येत नाही. मत्स्यव्यवसाय वगळता बाकी म्हणण्यासारखे उद्योगधंदे नाहीत. स्थानिकांचा उदरनिर्वाह बराचसा पर्यटकांवर अवलंबून. पर्यटन व्यवसाय अजून फारसा विकसित नाही. मुख्य भूमीपासून हजार किमी अंतरावरचा हा एक ठिपका. इथल्या तरूणांची स्वप्नं काय असतील? ती चेन्नई किंवा कलकत्ता न गाठता पूर्ण होत असतील का? रस्त्यात जागोजागी "आपलं गाव अंमली पदार्थमुक्त करू या" अशा पाट्या दिसतात, ज्या बघून इथे अंमली पदार्थांचा मोठा विळखा आहे का अशी शंका येते. पण आमच्या गप्पिष्ट ड्रायव्हरकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे गुन्हेगारी मात्र फरशी नाही. सगळी अर्थव्यवस्था देशातून येणार्‍या  मालावर अवलंबून – पेट्रोल -डिझेल, गाड्या, कापडचोपड, अन्नधान्य, फळं - म्हणजे आठवडाभर बाजारात बटाटे मिळालेले नाहीत, आज कार्गो आला तर पराठ्यात बटाटे असतील, नाहीतर प्लेन पराठा असं हॉटेलमध्ये सहज ऐकायला मिळतं.

काय भवितव्य असायला हवं या जागेचं, इथल्या लोकांचं? दीडशे वर्षांपूर्वी इंग्रजांनी इथे भारतातले बंदी पाठवले, म्हणून ही बेटं आज भारताचा भाग आहेत. संरक्षणाच्या दृष्टीने त्यांचं महत्त्व मोठं आहे. भारतीय वंशाच्या लोकांची आज तिथे वस्ती आहे, पण मुख्य भूमीपासून तुटलेपण अर्थातच आहे. आपल्या देशाच्या राजकारणात / समाजकारणात/अर्थकारणात काही स्थान मिळवण्यासाठी ही फारच छोटी लोकसंख्या आहे. इथले आदिवासी तर त्याहूनही कमी, कुणाच्या खिजगणतीत नसल्यातच जमा.  स्थानिक संस्कृती / अस्मिता / वैशिष्ट्यं असलं काही कुठे दिसलं नाही इथे. इथल्या दुकानात मिळणारी सुवनीअर्स सुद्धा मुख्य भूमीवरूनच आयात केलेली! Overall, they seem to be too small to matter. 

3 comments:

Bob1806 said...

Beautiful snaps!

Gouri said...

खूप सुंदर जागा आहे. फोटोग्राफरना मेजवानी! :)

Unknown said...

आपला ब्लॉग उत्कृष्ट वाटला.मराठी साहित्यातील काही अप्रतिम कालसुसंगत लेख,कथा आणि इतर साहित्य शोधून ते आम्ही आमच्या #पुनश्च या पोर्टलवर प्रसिध्द करतो. त्यासाठी १०० ते १५० व्र्षांपुर्वीचेही साहित्य आम्ही वाचतो आणि उत्तम निवडून वाचकांना पोर्टलवर देतो. नुकतीच मराठी ब्लॉगर्स साठी आम्ही एक अभिनव स्पर्धा जाहीर केली आहे. कुठलेही प्रवेशमुल्य नसलेल्या या स्पर्धेत तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर www.punashcha.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पर्धेबद्दल सविस्तर जाणून घेऊन भाग घ्या.