Tuesday, November 11, 2008

’क्रिस्टालनाख्त’च्या निमित्ताने

गेल्या १० नोव्हेंबरला ’क्रिस्टालनाख्त’ ला ७० वर्षे पूर्ण झाली. त्या प्रसंगाची आठवण म्हणून बर्लिनमध्ये चॅन्सलर आंगेला मार्केल यांच्या हस्ते एका सिनेगॉगचं उदघाटन होतं. सर्व उपग्रह वाहिन्यांवरच्या बातम्यांमध्ये ती एक ठळक बातमी होती. योगायोग म्हणजे बर्लिनची भिंतसुद्धा १९८९ मध्ये १० नोव्हेंबरलाच पडली. खरं तर हा जर्मनीच्या इतिहासातला एक महत्त्वाचा प्रसंग. पण आज त्याची आठवण म्हणून कुठेही आनंदोत्सव साजरा होतांना दिसत नाही. १० नोव्हेंबरला असलेल्या ‘क्रिस्टालनाख्त’च्या पार्श्वभूमीमुळे जर्मन एकीकरणाचा दिवस सुद्धा १० नोव्हेंबर ऐवजी ३ ऑक्टोबरला साजरा करतात! बर्लिनची भिंत पडण्यापेक्षा जास्त महत्त्व मिळणारा हा ’क्रिस्टालनाख्त’प्रकार आहे तरी काय?

’क्रिस्टालनाख्त’ ही नाझी राजवटीमध्ये म्युनिकमध्ये घडलेली एक ऐतिहासिक घटना. हा प्रसंग म्हणजे जर्मनीमध्ये हिटलरशाहीमधल्या ज्यूंवरच्या उघड अत्याचारांची सुरुवात होती. पोलीश ज्यूंच्या जर्मनीतून हद्दपारीचा परिणाम म्हणून १९३८ साली पॅरिसमधल्या जर्मन राजदूताची एका १७-१८ वर्षांच्या ज्यू विद्यार्थ्याने हत्या केली. या घटनेला नाझी प्रचारतंत्राने ज्यूंच्या जर्मन राष्ट्रविरोधी उठावाचं रूप दिलं, आणि हा ’उठाव शमवण्यासाठी’ हिटलरच्या आमदानीतली जर्मनीमधली पहिली ज्यूंची धरपकड म्युनिकमध्ये झाली. त्यांची घरं, दुकानं जाळली गेली. म्युनिकच्या रस्त्यावर फुटलेल्या काचांचा सडा पडला, आणि लागलेल्या आगीमुळे हे दृष्य कुणा नाझीला ’स्फाटिकांसारखं’ सुंदर दिसलं, म्हणून या रात्रीला नाझींनी अभिमानाने ’क्रिस्टालनाख्त’ (स्फटिकांची रात्र) असं नाव दिलं. या घटनेचे देशात किती पडसाद उमटतात याचा नाझींनी अंदाज घेतला. ज्यूंच्या धरपकडीविरुद्ध विशेष कुठे प्रतिक्रिया उमटली नाही, आणि मग जर्मनीमध्ये राजेरोसपणे, मोठ्या प्रमाणावर ज्यूंची गळचेपी सुरू झाली. आज म्युनिकमध्ये राहताना या साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या इतिहासाकडे इथले लोक कसं बघतात हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती. सगळं जग ज्या कृत्यांकडे सैतनी म्हणून बघतं, ती आपल्या देशात, आपल्या आईवडिलांच्या काळात घडली. आपले आईवडील, आपले काका-मामा या सगळ्यात समील होते, किंवा मूग गिळून बसले होते ही केवढी लाजिरवाणी गोष्ट वाटत असेल त्यांच्या वंशजांना!

इथे राहतांना जर्मन इतिहासाचे आणि वर्तमानाचे काही नवीनच पैलू समजले.

पहिला प्रश्न होता तो छळछावणीमधल्या पहारेकऱ्यांचा. बंद्यांवर इतका प्रदीर्घ काळ इतके अत्याचार सातत्याने करवले तरी कसे? एकादा माणूस दुष्ट असू शकतो. पण एकजात सगळे पहारेकरी इतके आंधळे होते? तर डाखाऊची छळछावणी बघताना समजलं, की छळछावणीमध्ये काम करणाऱ्या नाझी पहारेकऱ्यांचं सरासरी वय होतं १६ ते १८ वर्षे! या मुलांमध्ये काही वेळा आजच्या दिवसात किती ज्यू मारले अशा पैजासुद्धा लागत. मध्ययुगीन युरोपातल्या ‘धर्मयुद्ध’ खेळण्यासाठी तयार केलेल्या बारा-पंधरा वर्ष वयाच्या सैनिकांसारखं किंवा आजच्या अतिरेक्यांसारखं त्यांचं पूर्ण ब्रेनवॉशिंग झालेलं होतं.

आजच्या जर्मनीमधल्या ज्यू आणि ख्रिश्चन समाजाचे परस्पर संबंध कसे आहेत याचाही शोध घ्यावासा वाटला.म्युनिकची दुसऱ्या महायुद्धामधल्या बॉम्बिंगमुळे खूपच पडझड झाली होती. युद्ध संपल्यावर ६०% शहर पुन्हा उभारावं लागलं. म्युनिकमधलं प्रसिद्ध ’मारिएन चर्च’सुद्धा पुन्हा उभं केलं गेलं. या चर्चमध्ये युद्धानंतरच्या पुनर्निमाणासाठी ज्यांनी हातभार लावला, त्या संस्थांची चिन्हं काढलेली आहेत. त्यामध्ये एक ज्युईश कॅंडलस्टॅंडचं चिन्ह आहे. चर्चमध्ये ज्यू कॅंडलस्टॅंडचं चित्रं? म्युनिकच्या ज्यू समाजाने या चर्चच्या बांधणीसाठी देणगी दिली होती. आणि अशीच देणगी म्युनिकच्या कॅथोलिक चर्चनेसुद्धा ज्यूंचं बेचिराख झालेलं सिनेगॉग बांधण्यासाठी तेंव्हा दिली होती. हिटलर जसा ज्यूविरोधी होता, तसाच त्याचा अन्य धर्मांनासुद्धा विरोध होता. ख्रिश्चन धर्मगुरूंनाही त्याने छळछावण्यांमध्ये डांबले होते. तो स्वतःला निधर्मी - atheist - समजत असे. त्यामुळे संघर्ष सर्व धर्म विरुद्ध हिटलर असा होता ... ज्यू विरुद्ध ख्रिश्चन असा नाही.

एकदा आमच्या जर्मन शिक्षिकेने दिल्लीमध्ये भारत - पाकिस्तान क्रिकेट सामना जिंकल्यानंतरचा जल्लोष बघितला. हा खेळातला विजय आहे का युद्धातला असा प्रश्न पडला तिला. आताआतापर्यंत फुटबॉल मॅचमध्ये जर्मन संघ जिंकला तर जर्मनीचं राष्ट्रगीतसुद्धा वाजत नसे. 'Das Lied der Deutschen’ (The song of the Germans) हे १९२२ पासून जर्मन राष्ट्रगीत आहे. वायमार प्रजासत्ताकाच्या काळात ते राष्ट्रगीत झालं, नाझी जर्मनीमध्येही वापरलं गेलं, आणि युद्धानंतर पश्चिम जर्मनीने परत हेच राष्ट्रगीत निवडलं. कित्येकांना हे नाझी वापरामुळे कलंकित झालेलं राष्ट्रगीत बदललं पाहिजे असं वाटतं. प्रसिद्ध जर्मन नाटककार आणि साहित्यिक बेर्टोल्ड ब्रेख्त याचं एक गाणं आहे - Kinderhymne नावाचं. त्याला राष्ट्रगीताचा दर्जा द्यावा अशी एक मागणी होत असते. दर वर्षी ३ ऑक्टोबरला जर्मन एकीकरण दिवसाची सुट्टी असते - पण चुकूनही कुठे मार्चपास्ट, ध्वजवंदन असे काही कार्यक्रम होत नाहीत. आपल्या राष्ट्रीय भावनेचं चुकूनसुद्धा कुठे प्रदर्शन करत नाहीत हे लोक.

आज म्युनिक हे विदेशी पर्यटकांचं एक मोठं आकर्षण आहे - इथला सुंदर निसर्ग, आल्प्सपासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे ट्रेकिंग / स्किईंगला जाण्यासाठी सोयीचा बेस, आणि बाकी जर्मनीपासून हटके असणारी म्युनिकची खास एक वेगळी संस्कृती यामुळे बर्लिनच्या बरोबरीने परदेशी पर्यटक म्युनिकमध्ये येतात. पण म्युनिकला एक अंधारी बाजूसुद्धा आहे - थर्ड राईशच्या काळातली. हिटलर मूळचा ऑस्ट्रियाचा असला, तरी तो राजकीय क्षितिजावर पुढे आला, तो म्युनिकमधून. त्याचा बीअर हॉलमधला फसलेला उठाव इथेच झाला. ’क्रिस्टालनाख्त’ पण म्युनिकमध्येच. पहिली आणि ’आदर्श’ छळछावणी म्युनिकजवळ डाखाऊ मध्ये. विदेशी पर्यटकांपासून म्युनिक हा सगळा काळा इतिहास लपवून ठेवणार का? अनुल्लेखाने किंवा downplay करून त्याचं महत्त्व कमी करायचा प्रयत्न करणार का? हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती. म्युनिकची प्रवासी माहिती देणाऱ्या साईट्स आवर्जून या इतिहासाचा उल्लेख करतात.हे परत घडू नये म्हणून त्याची आठवण ठेवली पाहिजे, त्याचं भीषण स्वरूप लोकांना समजले पाहिजे असा दृष्टीकोन आहे. म्युनिकमध्ये, किंवा हाम्बुर्गसारख्या lively शहरामध्ये फिरताना आपण मध्येच या इतिहासाला ठेचकाळतो.एखाद्या सुंदर भागातून फिरतांना सहज खाली लक्ष गेले तर फुटपाथच्या टाईल्समध्ये मध्येच एक छोटीशी पितळी पाटी असते ... अमुक तमुक ज्यू इथे राहत होता - या या दिवशी नाझींनी त्याला पकडून नेलं,अमुक अमुक छळछावणीमध्ये डांबून ठेवलं, या तारखेला त्याला मृत्यू आला. एकदम दाताखाली खडा आल्यासारखं होतं.बर्लीनमध्ये एक मोठं स्मारक आहे हिटलरशाहीमध्ये भरडल्या गेलेल्या युरोपातल्या सगळ्या ज्यूंचं. पण मोठं स्मारक एखाद्या दिवशी बघितलं जातं, दुसऱ्या दिवशी आपण परत आपल्या विश्वात परत येतो. या छोट्या पाट्या तुमच्या रोजच्या जीवनाचा भाग असतात. त्या तुम्हाला रोज आठवण करून देतात. मला असं वाटतं की अशी स्मारकं उभी करण्यासाठी खूप धैर्य लागतं.

कुठलाही समाज समजून घेणं ही प्रक्रिया न संपणारी असते.ही फक्त त्या प्रक्रियेमधली एका टप्प्यावरची निरिक्षणं.

*******************************
हा लेख मी शब्दबंध २००९ मध्ये वाचला होता.


No comments: