Saturday, May 24, 2008

भाषा

काही वर्षांपूर्वीपर्यन्त - म्हणजे नेमकं सांगायचं झालं तर सात वर्षांपूर्वीपर्यन्त - मी असं हिरीरीने म्हणत होते, की माझ्या मुलांचं शिक्षण मराठीमधूनच व्हायला हवं. मतृभाषेमधून शिक्षण घेणं मुलांना सोपं जातंच, शिवाय आपल्या भाषेशी, आपल्या मातीशी नाळ न तुटणं फार महत्त्वाचं आहे.माझ्या मुलांना पुण्यातल्या ’अक्षरनन्दन’ सारख्या शाळेत घालण्याचं - खरं म्हणजे स्वतः अशी शाळा सुरु करण्याचं स्वप्न मी बघत होते.

आजची परिस्थिती खूपच बदललेली आहे. माझ्या मुलांची मातृभाषा कोणती असणार? प्रसाद अणि मी एकमेकांशी मराठीमधून बोलतो, पण प्रसादचं मराठीचं ज्ञान कामचलाऊ म्हणता येईल इतपतच आहे. त्याला मराठी लिहिता - वाचता येत नाही, मराठी नाटक, कविता, वाङ्मयाचा गंध नाही. माझ्या मुलांची ’पितृभाषा’ कन्नड आहे - जिच्यामध्ये मला एक वाक्य सुद्धा धड बोलता येणार नाही. मी मराठीचा हट्ट धरून प्रसादला मुलांच्या शिक्षणापासून दूर ठेवणं हा प्रसादवर अन्याय होईल. आणि मुलांचं दहावीपर्यंतचं शिक्षण होईपर्यंत आम्ही महाराष्ट्रामध्येच राहणार असा निर्णय मी आज कसा घेऊ? महाराष्ट्रामध्ये - दस्तूरखुद्द पुण्यामध्ये आज मराठी शाळांची परिस्थिती दयनीय आहे. माझ्या मुलांना वेगवेगळ्या भाषा बोलणार्‍या, वेगवेगळ्या प्रांतांमधून आलेल्या मित्रमैत्रिणींबरोबर शिकायला मिळायला हवंय. त्यांच्या कानावर लहानपणापासून मराठी, हिन्दी, इंग्रजी, कन्नड, संस्कृत, जर्मन, फ्रेंच, जपानी ... शक्य तेवढ्या सगळ्या भाषा पडायला हव्यात. आपल्या देशामध्ये - खरं तर जगात कुठेही - त्यांना सहज संवाद साधता यायला हवाय. बंगळूरला रहायचं आणि पुण्याची स्वप्नं बघायची अशी त्यांची अवस्था होता कामा नये. Let them become citizens of the world!

पण अशी जडणघडण झाल्यावर मातीशी नातं जडणं त्यांना जड जाईल का? ती कुठल्या भाषेत कविता वाचतील? त्यांचा ब्लॉग, डायरी - जे काही ज्या कुठल्या स्वरूपात असेल, तसं, कुठल्या भाषेत लिहितील? कुठल्या भाषेत संवाद साधतांना त्यांना घरच्यासारखं वाटेल? त्यांना शिवाजी महाराज कसे भावतील? एवढॆ सगळे वेगवेगळे संस्कार घेतल्यानंतर त्यांचं भारतीयपण, मराठीपण / कानडीपण, पुणेकर / मंगळूरकरपण कशामध्ये असेल? तानाजी आणि शेलारमामाची, हिरकणीची गोष्ट ते त्यांच्या मुलांना कुठल्या भाषेमध्ये सांगतील?

सध्या ज्या वेगाने भाषांची, संस्कृतींची सरमिसळ चालू आहे, ती बघून असं वाटतंय की आणखी वीसएक वर्षांनी प्रादेशिक संस्कृती, भाषेची अस्मिता असं काही शिल्लकच राहणार नाही. खरं म्हणजे प्रादेशिक भाषाच आज आहेत तशा शिल्लक राहू शकणार नाहीत. आज माझ्या ऑफिसमध्ये मला मराठीमधून व्यवहार करता येईल का? नाही. महेशशी माझं बोलणं वरकरणी मराठीमधून असलं, तरी आमच्या संवादाची दोन - तीन वाक्यं घेतली तरी जाणवेल - या संवादाचा गाभा मराठी नाही. "या jar साठी E1 वर सर्च मार. नाहीतर google वर सापडेलच. ती FTP ने डाउनलोड करून मला मेल कर, निखिलला cc कर." या भाषेला काय म्हणायचं? ही आजची बोलीभाषा आहे. अन्य प्रांतीय कुणी असतील, तर या वाक्यांमधल्या मराठी शब्दांच्या जागी हिंदी / दुस‍र्‍या भाषेतले शब्द येतात एवढाच फरक. मित्रमंडळींच्या अड्ड्यांवर अशीच चौपाटीवरच्या भेळेसारखी भाषा असते. कॉलेजचीसुद्धा अशीच. आणखी पाच - दहा वर्षांनी नवे लेखक जे पुढे येतील, त्यांची मतृभाषा हीच असेल. त्यांचं ललित लेखन याच भाषेत असेल. या भाषेच्या व्याकरणाचे नियम (?), म्हणी, वाक्प्रचार, शुद्धलेखन यांची पुस्तकं येतील. (:०) ) आणि हो, या भाषेत स्माईली पण असतील. "r u thr?" हे एक प्रमाणभाषेतलं, शुद्ध वाक्य असेल. (डिक्शनरीमध्ये r - from old English 'are' असं स्पष्टीकरण सुद्धा सापडेल बहुतेक :))

15 comments:

आळश्यांचा राजा said...

विचार चांगले आहेत. पण भाषेला हे अमुक अमुक असच हवं असा काही आहे का? भाषा ही लोकांच्या सोयीने विकसीत होत आलेली आहे, नाही का? मी सध्या ओडीया शिकत आहे. मला हे फार jaanavale. शुद्ध संस्कृत चा आग्रह धरनारे त्या कालात असनारच. इथून पुधेही भाषा बदलत जातील. आपोआप. त्यात खंत करन्यासारखे खरंच काही आहे का?

Trupti said...

hey gouri, wt next? waiting to read more from u......trupti

~G said...

गौरी, छान लिहितेस. अजुन लिही :)

Gouri said...

अगं, खूप लिहायचं आहे. कधी लिहून होणार माहित नाही!!

अवधूत डोंगरे said...

हा एक खूपच महत्त्वाचा लेख आहे.
मराठी ब्लॉग, तुम्ही आणि इतर भरपूर वाचन असणारे ब्लॉगकार, इत्यादींचा विचार केल्यावर मलाही एकंदरीत आशा वाटत होती.
पण, मुख्यधारेतील मराठी माध्यमांची या सर्वांकडे लक्ष देण्याविषयीची बदलू न शकणारी निरिच्छा पाहाता (नुकत्याच पत्रकारितेमध्ये आलेल्या,अननुभवी,'बच्चा'असलेल्या माझी)ही आशा मावळली.(एका वृत्तपत्रामध्ये काम करत असल्यामुळे ही निरिच्छा मी आजूबाजूला अजूनही अनुभवत आहे.)
खूप मुद्दे आहेत, पण थांबतो.
लेखाबद्दल धन्यवाद.
शेवटच्या परिच्छेदातील आशावादाशी मी थोडा असहमत आहे, कारण. . .
आत्ता जास्त लिहायला नको.
पण लेख आवडला.

Gouri said...

अब्द, भाषा हा माझ्यासाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. आजची परिस्थिती विशेष आशादायक वाटत नाही हे खरंच आहे - पण तुमची भाषा ही तुमच्या अस्मितेचा भाग असते. त्यामुळे मी या बाबत खूप आशावादी आहे. तुमच्याशी याविषयी सविस्तर चर्चा करायला आवडेल.

Dk said...

hmmm mala kaahi phaar anubhv naahi (mulancha) pan je kahi mahitye tyavarun saangto ki mulana "maatrubhaashaa" phaar chatkan jamte, samjte! aata jar thodasa vel kaadhta aala tar aaiche an baabchee ashya donhee bhasha shikvta naahi ka yenar? :) I hope usheer zalela naahi ajun. aani french, jaopanese ch mhnsheel tar te hi havch nakkich pan matrubhaashaa/ pitrubhashaa nako ka neeT yaayla?

***
तुमच्याशी याविषयी सविस्तर चर्चा करायला आवडेल.>> hahaha he mhnje ekdam PULA type vaaky zaaly :D he as saar chya saar bhaashaavaiibhav mulana nako ka samjvaayla? aani jar tuz maaz mhnje aaplya pidich naahi adl phaar vernac. aslyaane (as mi samjun chaaltoy) tar mulaanch ka bar adel? baas karto aata nantr boluch.

Gouri said...

दीप, भाषा येणं आणि ती तुमची जिव्हाळ्याची भाषा बनणं यात फरक असतो. मला वाटतं, त्या भाषेत विचार करू शकणं महत्त्वाचं आहे, आणि त्यासाठी त्या भाषेत शिकायला हवं.

मराठी माध्यमातून शिकल्यामुळे माझं काहीही अडलं नाही. पण मी सलग दहावीपर्यंत मराठी माध्यमातूनच शिकत होते, आणि मराठी आणि इंग्रजी शाळांच्या गुणवत्तेत तेंव्हा फार तफावत नव्हती. (दुर्दैवाने आज ती आहे.)
नवऱ्याचं तसं नाही - वडिलांची बदलीची नोकरी असल्यामुळे त्याला एका माध्यमातून सलग शिकायला नाही मिळालं, आणि त्याचा त्याला नक्कीच त्रास झाला. असा हा तिढा आहे.

अवधूत डोंगरे said...

तुम्ही आशावादी आहात, हे वाचून बरं वाटलं.
तुम्ही चर्चेचं म्हणालात म्हणून मी निराश असण्याचं एक कारण सांगतो: आपण आर्थिकदृष्ट्या आपल्या भाषेला अधिकाधिक दुबळी करत नेतोय. हा नुसताच प्रमुख मुद्दा. ही एवढी भयानक प्रक्रिया आहे की नुसतं इथे लिहून ती योग्य प्रकारे मला सांगता येणार नाही. तपशील परत कधी बोलू तेव्हा. खूप मुद्दे आहेत.
(मी तुमच्यापेक्षा वयाने चांगलाच लहान आहे, 'तुम्ही' म्हणू नका.)

रोहन... said...

तुमचा ब्लॉग पहिल्यांदाच वाचतोय ... आज वर्षभराने.. नाही त्यापेक्षा जास्त उशिराने कमेंट देतोय.. :)

"त्यांना शिवाजी महाराज कसे भावतील?" हे वाक्य माझ्या आरपार गेलं. कुठे ही राहा पण शिवरायांचा विसर पडू देऊ नका.

’पितृभाषा’ कन्नड असली तरी मात्रुभाषा 'माय मराठी' आहे हे कसे विसराल तुम्ही???

अपेक्षा आहे आपण सुवर्णमध्य काढला असेल ...

Gouri said...

रोहन, ब्लॉगवर स्वागत. आणि आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.
शिवाजी महाराजांविषयी न सांगून मला राहवणारच नाही. पण मुलांनी इंग्रजीमध्येच प्रथम शिवाजी महाराजांचा इतिहास वाचण्याची कल्पना अजून पचत नाही.

रोहन... said...

शिवरायांवर इंग्रजी लिखाण तसे कमीच ... :( पण माझ्या ब्लॉगवर आहे काही. आवर्जुन वाचा आणि वाचायला दया..

http://shreeshivchatrapati.blogspot.com/

रोहन... said...

आणि मराठीतून हवे असेल तर माझा 'इतिहासाच्या साक्षीने ... !' हा ब्लॉग आहेच ... :D

http://itihasachyasakshine.blogspot.com/

Devendra said...

Very intriguing topic indeed! I believe this is a topic of discussion across households in the world now, not just in India.
Looking at the date of this post, I hope you would have come up with certain ideas so far for introducing Marathi.
Very keen to know your experience!
My little one is about that age now, but living in Auckland, I don't have a choice at the moment about the language of instruction. What I have seen here though, is most Marathi-speaking second generation can't read Marathi, can speak to a certain extent.
However, what I find interesting is this is unique for 'Marathi' unfortunately. Most other linguistic communities do manage to raise their children speaking fluent mother tongues.
I feel it really starts with "Why" they need to learn Marathi or any other tongue. Most of the time, parents don't have an answer or don't even encounter that question!

'मराठी अस्मिता' असं फक्त म्हणायला ठीक आहे, पण म्हणणाऱ्यांना देखील खरंच त्याचा काही खोलवर गाभा समजतो असं वाटत नाही. कदाचित पाल्यांच्याआधी पालकांनीच थोडे मराठी साहित्य वर्ग घ्यायची गरज आहे, ज्या मुळे भाषेचं सौन्दर्य नक्की काय आहे आणि ते कसं स्पष्ट करायचं हे समजेल!

सध्या सुरवात म्हणून माझं 'inteintion' पोराला सगळ्या भाषांना 'expose' करणं आहे. मराठी आणि हिंदी (त्याची मातृभाषा) यात शक्य तेवढी लहान मुलांची पुस्तकं मी आणून त्याला वाचायला देतो.

तो अजूनतरी 'childcare' पूर्ण वेळ जात नसल्यानी मराठी आणि त्यापेक्षा हिंदी अगदी अस्खलित बोलतो. त्याच्या एक 'nanny' सध्या त्याला भगवतगीता शिकवतायत. पुढे बघूया!

Keen to know your experience and journey! :)


Gouri said...

देवेन्द्र, लेक इंग्रजी शाळेत जाते, कारण तिच्या बाबाला मराठी लिहिता वाचता येत नाही. (त्याचा तिच्या अभ्यासात (नसलेला) सहभाग बघून आता वाटतं, की मराठी शाळेत घातलं असतं तरी चाललं असतं) अजूनही जमेल तेव्हा तिच्यासोबत मराठी, इंग्रजी पुस्तकं वाचत असते मी. तिच्या वयाच्या इतरांच्या मानाने मराठी चांगलंय तिचं, पण याहून चांगलं नक्की असू शकतं. वाचनाचा मनापासून कंटाळा आहे बाईंना. सुरुवातीला मला याची खंत वाटायची फार. पण माझी आवड तिची आवड असेलच असं नाही हे स्वीकारलंय आता.