Friday, December 4, 2009

राणीसारखी बसून ...

आईकडून ऐकलेली ही खास आमच्या आजीची कन्सेप्ट होती ... कधीतरी सगळं काम उरकलं, म्हणजे ती जाहीर करायची, "आता मी राणीसारखी बसून चहा पिणार आहे." मग छान चहा करून घ्यायचा, आणि तो अगदी निवांत बसून प्यायचा. आपण स्वतःच आपल्यासाठी चहा केला, तरी तो पिण्याची दहा मिनिटं का होईना, पण राणीपण अनुभवायचं!

रोजच्या रामरगाड्यात स्वतःकडे बघायलाही (तिच्याच भाषेत सांगायचं तर "xxx खाजवायला सुद्धा")उसंत मिळाली नाही, तरी कधीतरी दहा मिनिटं का होईना, पण आवर्जून स्वतःसाठी वेळ ठेवायचा. या दहा मिनिटांमध्ये तुमच्या तैनातीला कुणी दासी, हुजरे नसणार, तर त्याची सगळी तयारी आधी करून ठेवायची ... पण आपणच आपल्याला ही दहा मिनिटांची रॉयल ट्रीटमेंट बक्षीस द्यायची. मग तो चहा उरलासुरला, धड गरम नसणारा, टवका उडालेल्या कपातून नाही घ्यायचा - अगदी मनापासून आपल्याला आवडतो तसा करून घ्यायचा. आपलं असं कौतुक दुसरं कोणी करावं, म्हणून वाट बघत न बसता, स्वतःच मस्त एन्जॉय करायचं. या दहा मिनिटांच्या राणीपणाने इतकं मस्त वाटतं म्हणून सांगू?

कधीतरी मनात आलं की कामावरून घरी आल्यावर मस्त आवडतं गाणं लावायचं, फक्कड चहाचा बरोब्बर गरम कप घेऊन टेरेसवर सूर्यास्ताच्या रंगांची उधळण बघत बसायचं ... पुढची दहा पंधरा मिनिटं मी कुणाचंही काहीही देणं लागत नाही, सगळे फोन मेलेले आहेत, अगदी दारावरची बेल वाजलेली सुद्धा मला ऐकू येणार नाहीये ... कुठल्या राणीने एवढं मोठं सुख अनुभवलं असेल?

17 comments:

आनंद पत्रे said...

खुप दिवसांनी लिहिलेय....

लहानपणी नाही मात्र आता कधी कधी थोडा वेळ ’राजा’ सारखा घालावासा वाटतो...
एखादा दिवस ऑफ़ीसला बुट्टी मारुन मस्त घरी छान जेवन बनवतो आणि आवडते सिनेमा बघत बसतो...
मग फ़्रेश होवुन रुटीन जिवनाला लागतो....

~G said...

Ahaha! Vachunach masta vatla. :) Atta ghari jaun lolat ekhad pustak vachat chahaa marava ashi iccha zali. :(
Pan te vhayla ajun 3-4 taas ahet.

Anonymous said...

खुप मस्त झालंय.. मला वाटतं सगळ्याच जुन्या बायका ही फ्रेज वापरायच्या.. "राणीसारखी" आराम करणार, झोपणार वगैरे ..

भानस said...

गौरी खरचं गं,आपल्याकडे रामरगाड्यात वेळ मिळणे म्हणजे... मुद्दाम काढला तरच. छान लिहीलेस. आई म्हणायची बरेचदा...आता तुम्ही सगळे गेलात की सोफ्यावर निवांत बसून चहा घेईन....त्याची आठवण आली.:)

क्रांति said...

मस्त! खरच रोजच्या दगदगीतून स्वत:साठी थोडासा वेळ काढून मनासारखं वागणं याशिवाय वेगळं सुख काय असणार? अगदी छान कल्पना आहे.

Gouri said...

@ आनंद, खूप दिवस निवांत वेळ मिळत नव्हता ... त्यामुळे काल थोडा वेळ ‘राणीसारखं’ बसायचं ठरवलं, तेंव्हा लिहिली ही पोस्ट :)

@ G, खरंच असे काही खास आपल्यासाठीचे क्षण हवे असतात कधी कधी.

Gouri said...

@ महेंद्र,मी आणखी कुणाकडून हा शब्द ऐकला नव्हता (अर्थात त्या पिढीमधल्या अजून कुणी बायकांशी फारसं बोललेले नाही मी). पण ‘राणीसारखी’ ही अगदी चपखल उपमा दिली होती त्या बायकांनी.

@ भानस, अगं तुझी प्रतिक्रिया वाचून मला रिडर्स डायजेस्ट मध्ये वाचलेला चुटका आठवला ... आईच्या वाढदिवसासाठी मुलं आणि त्यांचे बाबा दिवसभरासाठी सहलीला जायचं ठरवतात. जायची सगळी तयारी केल्यावर थकलेली आई त्यांना म्हणते, आता तुम्ही सगळे दिवसभर सहलीला जाऊन या, वाढदिवसाची भेट म्हणून मी घरी आराम करते!

@ क्रांती: बहुतेक राणीसुद्धा म्हणत असेल मला जरा वेळ निवांत बसू द्या म्हणून :)

Anonymous said...

मस्त लिहलयेस....अगं मी पण स्वत:ला अशीच ट्रीट देते अधून मधून. एक उनाड वेळ आपली आपल्यासाठीची....मजा येते.....

बाकी तुझ्या आजीची ’राणीसारखी बसून’ कल्पना मस्त आहे....त्याकाळी असा विचार ईतर कोणी करत नसत गं!!! आजकाल आपले नवरेही बरेचदा आपल्याला चहापाणी करतात...आणि ’XXX खाजवायलाही वेळ नसणे’ मात्र कॉमन :D

Gouri said...

तन्वी, अगदी. त्या काळात घरातल्या बाईला चार क्षण निवांत मिळावेत असा विचार दुसरं कोणी करत नसे. आजकाल आपण हक्काने नवऱ्याला म्हणू शकतो, आणि आयतं मिळण्याचे इतके पर्यायसुद्धा आपल्यासमोर असतात - तरीही ही ’राणीसारखी’ चार मिनिटं हवीशी वाटतात.

Anonymous said...

छानच लिहिलस राणी(......:! चालेल न ). छोटीशी पोस्ट, छोटीशी गोष्ट पण एखाद्या राणी च्या रुबाबाची आहे.

अवधूत डोंगरे said...

chhan ahe.

Gouri said...

अनुजा, अग आपण्च आजचा दिवस स्वतःला राणी म्हणायचं ठरवल्यावर तूसुद्धा म्हटलेलं नक्कीच चालेल :)

अवधूत, धन्यवाद!

प्रसाद साळुंखे said...

माझ्या आजीच्या काळी बायकांना आताच्यापेक्षा खूप कामं असायची, घरोघरी नळ नसायचे त्यामुळे ते पाणी भरणं वगैरे, त्यात जर घरात पाण्याची काही गडबड झाली तर घरातल्या म्हातार्‍या बायका "घरात आहेत पाच-सात रंभा, तरी नाय पाण्याचा थेंबा" असं काहीतरी लेकींना, सुनांना म्हणायच्या. असं घरातल्या कोणी काही सांगितलं की आम्ही जाम हसतो. यांच्या आयुष्यात असे मनमोकळे हसायचे क्षण किती आले काय माहित? पोस्ट सही आहे मला आजीची आठवण येतेय.

Ajay Sonawane said...

मला हे वाचुन माझ्या आजीची आठवण आली. माझी आजी सुद्धा असेच नवनवीन वाक्यप्रयोग वापरत असते. बाय द वे, छान लेख झालाय. बाकीचेही लेख वेळ काढुन वाचेन बरं का

-अजय

Gouri said...

चुरापाव, अजय, ब्लॉगवर स्वागत. मलाही आजीची आठवण झाली म्हणून तिची ही phrase आठवली.

पाच सात रंभा :D :D

आजीच्या पिढीच्या भाषेत कितीतरी सुंदर वाक्प्रयोग, उपमा असायच्या. इंग्रजीच्या वाढत्या वापराबरोबर आपल्या मायबोलीचं हे सौष्ठव तितकं ऐकायला मिळत नाही.

Sonal Waikul M.D.(Alt.Med.) said...

Sunder..nusat waachun suddha shin gela manacha.

Gouri said...

thanks Sonal :)