Wednesday, February 3, 2010

कॅच मी इफ यू कॅन...

    पुण्याला नवीनच रहायला आलो होतो तेंव्हाची गोष्ट. सोसायटीमध्ये आमची बिल्डिंग कोपऱ्याला होती ... त्यात आमचा मागच्या बाजूचा फ्लॅट.एका बाजूला ऊसाचं शेत आणि दुसरीकडे कालवा आणि त्याच्या बाजूची झाडी, पेरूची बाग असा ‘व्ह्यू’ मिळायचा खिडक्यांमधून. सगळीकडे हिरवंगार. आमच्यासारखेच ही हिरवाई ऍप्रिशिएट करणारे बरेच पाहुणेही यायचे घरी. मुख्यतः उंदीर. शेतातलं खाणं संपलं, की ते आमच्याकडे यायचे. एक दिवस तर आजी रात्री झोपलेली असताना तिच्या बोटाला उंदीर चावला! तर उंदरांचा बंदोबस्त हा एक आवश्यक कार्यक्रम झाला.

    सुरुवातीला एक - दोन वेळा उंदरावर विषप्रयोग करण्यात आला. पण विष खाऊन तो कुठेतरी कोपऱ्यात मरून पडलेला असायचा, आणि नंतर मेलेला उंदीर शोधणं फार जिवावर यायचं. त्यात परत हा उंदीर खाऊन कावळ्याला, कुत्र्याला अशी पूर्ण त्याच्या अन्नसाखळीमध्ये विषबाधा होणार, एका उंदरासाठी आपण पर्यावरणाचं एवढं नुकसान करणार हे काही योग्य नाही असं सर्वानुमते ठरलं. सापळा लावण्याचा पर्यायही फेटाळण्यात आला, (कारण आता आठवत नाही.) त्यानंतर उरलेला पर्याय म्हणजे उंदीर पकडणे. ही उंदीर पकडणे मोहीम म्हणजे एकदम ‘क्वालिटी फॅमिली टाईम’ असायचा ... आई, बाबा, मी, घरी असलेच तर भाऊ असे सगळेच ऍक्टीव्ह भिडू या रोमहर्षक खेळामध्ये भाग घ्यायचे. महाभारतामध्ये कसे आपण धर्मयुद्धाचे नियम वाचतो, तसे यातही नियम होते. पहिला नियम म्हणजे आपलं उद्दिष्ट उंदीर पकडणं हे आहे - उंदीर मारणं नाही. आपली बिल्डिंग दोन वर्षांपूर्वी झाली - आपण या जागेत उपरे आहोत. उंदरांच्या कित्येक पिढ्या इथे आपल्या कितीतरी आधीपासून राहत आहेत. दुसरं म्हणजे फेअर गेम. उंदीर आपणहून बाहेर जात असेल,तर त्याला धरायचं नाही. नाहीतरी आपण त्याला बाहेर काढण्यासाठीच हे करतोय ना? आणि धरल्यावर विनाकारण झोडपायचं नाही ... फक्त बाहेर जरा लांब कचराकुंडीमध्ये टाकून द्यायचं.

    साधारण आठ दहा दिवसातून एकदा आमचा सामना व्हायचा. म्हणतात ना, ‘प्रॅक्टिस मेक्स अ मॅन पर्फेक्ट’ ... सुरुवातीला शिकाऊ असणारी आमची टीम हळुहळू यात चांगलीच तरबेज झाली. गोल कीपर, सेंटर फॉरवर्ड असा प्रत्येकाचा रोलसुद्धा ठरलेला. कुठलं शस्त्र कोणी, कधी वापरायचं, हे सुद्धा ठरलेलं. एक दिवस मात्र हाईट झाली. सकाळीसकाळीच आईने उंदीर बघितल्याची खबर दिली. पद्धतशीर कामाला सुरुवात झाली. first define your scope. म्हणजे पहिल्यांदा बाकी खोल्यांची दारं बंद करायची, नॉन प्लेईंग मेंबर्सना मैदानाबाहेर काढायचं. उंदीर आणि त्याच्यापाठोपआठ हिंडणारी आमची टीम यांचं कार्यक्षेत्र मर्यादित करायचं. स्वयंपाकघरातल्या लॉफ्टवर खुडबूड ऐकू येत होती. काठीने तिथलं सामान हलवून उंदराला खाली उडी मारायला लावणं हे माझं काम. ते मी चोख बजावलं. दुसरीकडे काठी फिरवून उंदराला आईच्या दिशेने जायला भाग पाडणं हे भावाचं काम. done. येणाऱ्या उंदराला बरोबर खराट्याखाली धरायचं. आईचं काम. खराट्याखालून त्याला कोळश्याच्या चिमट्याने धरून प्लॅस्टिकच्या पिशवीत घालायचं - माझं काम. पिशवीला गाठ मारून ती कचरा कुंडीमध्ये फेकून यायची - बाबांचं काम. दहा मिनिटात operation successful.

    सगळे आपापली आयुधं जागेवर ठेवून वळणार, तोच पुन्हा फ्रिजच्या मागून खुडबूड ... दुसरा उंदीर. पुन्हा एकदा व्यूहरचना, काठ्या, खराटा, चिमटा, उंदराची कचराकुंडीमध्ये रवानगी. आता आजीच्या झोपायच्या खोलीतल्या लाफ्टवरून आवाज. तिसरा उंदीर. बाथरूमच्या वरच्या माळ्यावर. चौथा उंदीर. आईबाबांच्या बेडरूममध्ये ... पाचवा. तिथेच अजून एक ... सहावा! हे म्हणजे जरा अतीच होत होतं. एका वेळी उंदीर पकडायचे म्हणजे किती ... टीम आता बऱ्यापैकी दमलेली होती. तरीही हातासरशी सहाव्याची कचराकुंडीमध्ये रवानगी केलीच. हुश्श म्हणून शेवटी एकदाचे सगळे बसणार, तोच पुन्हा स्वयंपाकघरात लॉफ्टवर खुडबूड. आता मात्र हद्द झाली. हा नक्की शेवटाचा असं म्हणून अखेरीस सगळे उठले. तर हा उंदीर म्हणजे घुशीच्या आकाराचा होता ... आजवर पकडलेल्या सगळ्यांचा बाप शोभावा असा. त्याला मी सराईतपणे लॉफ्टवरून हुसकलं. भावाने नेहेमीप्रमाणे आईच्या खराट्याच्या दिशेने ढकललं. पण हा पठ्ठ्या आईच्या दिशेने जाण्याऐवजी परत खालून सरळ उडी मारून पुन्हा लॉफ्टवर पोहोचला. जमिनीवरून लॉफ्टवर उडी मारणारा उंदीर आम्ही पहिल्यांदाच बघत होतो. पुन्हा मी वरून हुसकल्यावर याच प्रसंगाची पुनरावृत्ती. दोन चार वेळा हे झाल्यावर उंदीर बहुतेक एवढी उंच उडी मारून दमला असावा. आता तो लॉफ्टवरून उतरायलाच तयार नव्हता. काठी त्याला लागून रक्त निघालं तरी हलत नव्हता. आता? शेवटी भावाने दुसरीकडून लॉफ्टवर काठी घातली, आणि उंदराने सरळ माझ्या अंगावर उडी मारली.

    "ईईईईईsssss" मी किंचाळले. त्यामुळे आई दचकली. ती बेसावध असताना उंदीर तिच्या समोरून फ्रिजच्या मागे जाऊन लपला.

    "आपण सगळे १० मिनिटाचा ब्रेक घेऊ या का? उंदीर सुद्धा किती दमलाय आता!" मी म्हटलं. प्रस्ताव एकमताने मंजूर झाला, आणि सगळ्यांनी एक छोटा ‘ड्रिंक्स ब्रेक’ घेतला. ब्रेक के बाद पुन्हा लढाईला तोंड फुटलं. उंदीर रक्तबंबाळ झालेला दिसत होता, पण थांबायला तयार नव्हता. काही केल्या तो खराट्याखाली येत नव्हता. "अरे बाबा, एवढा आकांताने पळू नकोस. इथे कुणाला तुझा जीव घ्यायचा नाहीये." मी म्हटलं. उंदीर काही ऐकण्याच्या मनःस्थितीमध्ये नसावा. त्याचं पळणं आता स्लो मोशनमध्ये चाललं होतं. पण आमच्या काठ्या आणि खराटेसुद्धा एव्हाना स्लो मोशनमध्येच फिरायला लागल्यामुळे तो हाती लागत नव्हता. अर्धा पाऊण तास अशी लढत दिल्यावर अचानक तो गायब झाला. आमच्या दमलेल्या भिडूंनी बराच शोध घेतला, पण त्याचा थांगपत्ता लागेना. अखेरीस तो उंदीर हवेत विरून गेला हे मान्य करून सगळ्यांना माघार घ्यावी लागली. दिवसभर कुठे काही खुडबूडही ऐकू आली नाही.

    रात्री आईबाबांनी अंथरूण घालताना बेडखालचा ड्रॉवर उघडला, तेंव्हा सकाळचा पराक्रमी उंदीर ड्रॉवरच्या झाकणाच्या आत चादरीच्या घडीवर सापडला!

29 comments:

रोहन... said...

गौरी... मस्त 'खेळ मांडियेला गं' ... सहीच. नियम काय..शस्त्र काय.. आणि एकावेळी ६ उंदीर म्हणजे ज़रा नाही जास्तच जास्त होतय... बाकी उंदीर कुठे सुद्धा शिरून गायब होऊ शकतो हे खरे...

मी आणि बाबांनी १ पकडलेला तेंव्हा ही धावपळ ... लिहेन त्यावर कधीतरी... तू काय माझ्या सर्व जुन्या आठवणी ताज्या करायच्या ठरवल्या आहेस वाटते... :D

THEPROPHET said...

Mast aahe varnan ekdum. prasang(yuddha prasang) ubha rahila dolyansamor.

Gouri said...

रोहन, अरे हल्ली पेस्ट कंट्रोलची वर्षाची कॉंट्रॅक्ट असतात त्यामुळे ही कला मागे पडत चालली आहे ... त्यामुळे आज हा प्रसंग आठवल्यावर म्हटलं सविस्तर लिहावा :D :D :D

इजा बिजा झाला ... आता माझी तिसरी पोस्ट परत तुझ्या आथवणी जागी करणार बघ :)

Pankaj - भटकंती Unlimited said...

उंदीर मारणे ही एक प्रोजेक्ट मॅनेजमेंटची केस स्टडी झालेली मे पहिल्यांदाच पाहिली :-D

वाचताना सगळे कुटुंब उभे राहिले डोळ्यांसमोर. ओढणी-पदर सरसावून तू आणि आई, अर्धी चड्डी घालून भाऊ, बनियन-लेंग्यातले बाबा आपापल्या आयुधांसह... एकदम जिवंत प्रसंग.

Gouri said...

पंकज, अरे प्लॅनिंग, क्रायसिस मॅनेजमेंट, टीमवर्क सगळं लागतं उंदीर मारायला :)

आनंद पत्रे said...

जबरीच लिहिले आहे...काही वर्षापुर्वी मी आणि माझा भाऊ देखिल असाच प्रोजेक्ट सेट अप करत असु :)
मजा आली वाचुन...

Gouri said...

आनंद, आता वाटतं या मोहिमेचं रेकॉर्डिंग करून ठेवायला पाहिजे होतं ... किमान ऑडिओ तरी ... :D :D

Gouri said...

The Prophet, ब्लॉगवर स्वागत, आणि प्रतिक्रियेबद्दल आभार! नुकताच घडल्यासारखा हा प्रसंग आठवतो आहे, त्यामुळे वर्णन करता आलं. :)

Anonymous said...

मस्त खेळ आहे. उत्साह ओसंडून वहात असेल नाही??
आमच्या घरी सौ.चं किंचाळणं ऐकु आलं की मग समजायचं की तिने कपाट उघडलं अन तिला समोर पाल दिसली. आता ह्या पालीवर पण एक पोस्ट लिहावीच लागेल..मस्त विषय दिलास लिहायला... :)

Gouri said...

महेंद्र काका, लिहाच!

आमच्या अनुभवावरून सांगते ... हे प्रसंग ‘कानात आणि डोळ्यात साठवून ठेवण्यासारखे’ असतात ... सगळ्यांच्या अंगात वीरश्री संचारलेली असते, अतिउत्साहामुळे अधून मधून उंदराऐवजी एकमेकांना काठी, झाडू इ.इ.चा प्रसाद मिळतो, दोन चार डबे वगैरे पडतात
:D

हेरंब said...

बा..... प...... रे..... !!!

म्हणजे उंदराला घाबरून म्हणत नाहीये मी असं. पण कसलं वर्णन केलं आहेस ग. युद्धभूमी काय, नियम काय, fair game काय.वा रे वा..

बापरे.. (हे "बापरे" उंदरांना घाबरूनच आहे).. अग सहा उंदीर म्हणजे घाबरायला होणारच ना.

मला त्या "एक हसीना थी" मधल्या शेवटच्या प्रसंगाची आठवण झाली. (अर्थात उंदीर सोडून बाकी काही कॉमन नाहीये म्हणा दोन्ही प्रसंगात ;-) )

Gouri said...

हेरंब, अरे त्या दिवशी बहुतेक शेजारच्या शेतात दुष्काळ असावा आणि तिथले झाडून सगळे उंदीर आमच्या घरात घुसले असावेत :D

एकापेक्षा जास्त उंदरांचा सामना करावा लागला असा त्या घरातला हा एकच दिवस होता. पण त्या दिवशी मात्र ‘टोळधाड’ असते तशी ही ‘उंदीरधाड’ होती आमच्यावर!

सिद्धार्थ said...

पार "हल्ला बोल". उंदारांच्या समस्त कुटुंबाला वेचून मारलात तर.

भानस said...

गौरी, भले शाब्बास. एकदम जबरी वर्णन. तुमची व्युहरचना आणि तुम्हाला पळविणारे ते सगळे उंदीर डोळ्यासमोर आले.:)

Gouri said...

@ सिद्धार्थ, मारलं नाही रे बाबा, नुसतं धरलं ... ‘ध’ चा ‘मा’ झालाय तुझ्या प्रतिक्रियेत हे हे

@ भानस, डायरेक्ट युद्धभूमीवर पोहोचलीस ना :) अगं उंदीर म्हटलं की तो दिवस आठवतो मला!

Pankaj - भटकंती Unlimited said...

प्लॅनिंग+टीमवर्क+थोडी भुरळ = साहित्यिकांचा SLRकॅमेरा+क्रायसिस मॅनेजमेंट (म्हणजे बायकोचा राग)

इथे पण आलो का मी? :-)

Gouri said...

पंकज, अरे तू उल्लेख केलेला साहित्यिक शांत आहे सद्ध्या ... बहुतेक क्रायसिस मॅनेजमेंट चालू असावं :D

Akhil said...

उंदीर पकडायचे पिंजरे मिळायचे ते माहित होते.. पूर्वी
जुने घर असताना माळ्यावर हमखास खुडबुड होत रहायची उंदरांची..
कधीकधी तर पावलांना घासून जायचे... रात्रीचे...
त्यांना पकडायचे म्हणजे सगळ्यांची तारांबळ ... मग पिंजरा हाच एक उपाय..
त्यातही बर्याचदा शिकार व्यायाचीच नाही...
एकूणच छान अनुभव असावा.. आणि
अनोखा व्यायाम प्रकारही...

Gouri said...

अखिल, चांगला व्यायामप्रकार होता हा :)

Anonymous said...

जबरा झालयं पोस्ट....आमच्या घरात असल्या प्रसंगात नवरोजी काठी हातात घेउन राखण करतात फक्त......अक्षरश: काहिही करत नाही तो, निव्वळ बघ्याची भुमिका...पण मी एक्सपर्ट आहे या विशेष कामात, एकीकडे तोंडाचा अखंड पट्टा सोडते आणि हत्यार चालवते....

Gouri said...

तन्वी, अगं तोंडाचा पट्टा या हत्यारामुळे भले भले नामोहरम होतात ... तू दुसरं काही चालवण्याआधीच अर्धमेला होत असेल तो हा हा

अपर्णा said...

ए मस्तच पोस्ट आहे गं...स्वारी(sorry) आज जरा घाऊकमध्ये वाचतेय..इतरवेळी लेकरु सारखं मधेमधे असतं म्हणून मग असं ठरवून एक दिवस पोस्टा वाचते झालं....असो...
काय लिहायचं होतं मला?? हं...इकडे उंदरांसाठी विशिष्ट फ़्रिक्वेन्सी एमिट करणारे इलेक्ट्रॉनिक रिपेलंट मिळतात त्याने ते उंदिर दूर पळतात (म्हणजे थोडक्यात आपल्याकडून शेजार्‍यांकडे) असं म्हणतात..खरं खोटं उंदिर आणि शेजारीच जाणे....

Gouri said...

अपर्णा, अगं कधी दिली त्यापेक्षा किती मनापासून प्रतिक्रिया आली ते जास्त महत्त्वाचं ... (मी पण कधी कधी आठवडे च्या आठवडे उशिराने प्रतिक्रिया टाकत असते ना, त्यामुळे शोधलेली सबब :D )

तू म्हणतेस तश्या प्रकारचं रिपेलंट डासांसाठी बनवण्याचा प्रयोग भावाने केला होता (आमच्या अनेक प्रयोगांपैकी एक) ... त्या प्रयोगाची एक वेगळी पोस्ट होईल आता :)

शंतनू देव said...

Mast lihilay

Gouri said...

शंतनु, ब्लॉगवर स्वागत, ब्लॉग फॉलो करण्याबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल आभार!

Nikhil Purwant said...

कित्ती छान ..!! अगदी जिवंत चेस ..आणि काय ते गॊंडस ऊंदराचे तितकेच गॊंडस वर्णन .. खुप छान

Gouri said...

निखिल, ब्लॉगवर स्वागत ... आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

Anagha said...

:) आमच्याकडे बाबा आणि माझी धाकटी बहिण मारायचे. मी फक्त background music द्यायचे!! म्हणजे ती घटना अगदी थरारक करण्यासाठीचा हातभार! माझ्या एका मैत्रिणीने ह्यावर एक पोस्ट लिहिलेय. तुला आवडेल का वाचायला?
http://itsmealka.blogspot.com/2010/11/blog-post.html

Gouri said...

अनघा, आमच्याकडे उंदीर मारण्याला तात्विक विरोध होता :)
छानच लिहिलंय तुझ्या मैत्रिणीने बाबुरावांविषयी!