बऱ्याच दिवसांनी कवितांची वही चाळली. त्या सगळ्या आवडत्या कवितांमधून आज सगळ्यात आवडलेल्या या दोन कविता . दोन्ही कविता जालावर कुठे सापडल्या नाहीत, त्यामुळे इथे देते आहे:
फटकळाचा फटका - वसंत बापट
पूर्वज ऐसे पूर्वज तैसे मिजास पोकळ करू नका
मनगट असता मेणाऐसे मशाल हाती धरू नका ॥
मनगट असता मेणाऐसे मशाल हाती धरू नका ॥
सुवर्णभूमी भारतमाता
राव मारता कशास बाता
घरादाराची होळी होता टिमकी बडवत फिरू नका ॥
प्रतिवर्षाला यमुना गंगा
महापुराचा दाविती इंगा
भगिरथाचे कूळ न सांगा नावही त्याचे स्मरू नका ॥
शरण जायचे जर अन्याया
कशास म्हणता ‘जय शिवराया’
अभिमानाचे नाटक वाया करून खळगी भरू नका ॥
विज्ञानाचा जिथे पराभव
तिथे मिरवता पुराणवैभव
ज्ञानरवि नभी येता अभिनव जा सामोरे डरू नका ॥
नव्या युगाची पायाभरणी
करील केवळ तुमची करणी
पराक्रमाने उचला धरणी आता हिंमत हरू नका ॥
*************************************************************
बेडकांचे गाणे : विंदा करंदीकर
डरांव् डुरूक् डरांव् डुरूक् डरांव् डरांव् डरांव्
आम्ही मोठे राव, डरांव् डरांव् डरांव् ॥
सागर म्हणती उगाच मोठा,
भव्य किती डबक्यांतिल लाटा,
सागर नुसते नाव, डरांव् डरांव् डरांव् ॥
गंगाजळ ना याहुन निर्मळ,
या डबक्याहुन सर्व अमंगळ,
बेडुक तितुके साव, डरांव् डरांव् डरांव् ॥
खोल असे ना याहुन कांही,
अफाट दुसरे जगात नाहीं,
हाच सुखाचा गांव, डरांव् डरांव् डरांव् ॥
चिखल सभोती अमुच्या सुंदर,
शेवाळ कसे दिसे मनोहर,
स्वर्ग न दुसरा राव, डरांव् डरांव् डरांव् ॥
मंत्र आमुचा डरांव आदी,
अनंत आणिक असे ‘अनादी’
अर्थ कसा तो लाव, डरांव् डरांव् डरांव् ॥
*************************************************************
9 comments:
गौरी, अग किती वर्षांनी वाचल्या या कविता... :) मला तर फारसे काही आठवतही नव्हते. खूप धन्यवाद. मी उतरवून घेतेयं गं.
कसल्या मस्त आहेत ग दोन्ही कविता. मी तर ऐकल्याच नव्हत्या.
@ भाग्यश्री, अगं एके काळी आवडत्या कविता वहीत उतरवून घेतल्या होत्या गंमत म्हणून ... आज ती वही चाळताना असा काहीतरी खजिना सापडतो :)
@ हेरंब, अरे सहीच आहेत त्या कविता ... आणि आजही तितक्याच रिलेव्हंट आहेत!
Mast ga.. Keep posting more. :)
शंतनू, आणखी बऱ्याच आहेत आवडत्या कविता. त्यातल्या जालावर ज्या उपलब्ध नाहीत, त्या टाकते.
कसल्या मस्त आहेत ग दोन्ही कविता. मी तर ऐकल्याच नव्हत्या.......बेडकाची कविता म्हटल्यावर लेकाने आधिच ऑप्शन दिले होते, ही नवी आहे म्हटल्यावर तो ही खुश!!!!
तन्वी, अगं माझी एक मैत्रीण म्हणाली की अवधूत च्या कुठल्या तरी बडबडगीतांच्या अल्बममध्ये हे बेडकांचं गाणं आहे. तिला अल्बमचं नाव माहित नाही.
माझ्याही नजरेखालुन गेल्या नाहीत हया कविता पण छान आहेत, दोन्ही आवडल्या.इथे सादर केल्याबद्दल आभार.
मस्त आहेत ग दोन्ही कविता. मी पण ऐकल्याच नव्हत्या.
Post a Comment