नवऱ्याची भेट होईपर्यंत मी कर्नाटकात फारशी कधी गेले नव्हते. बहुसंख्य द्रविडेतरांप्रमाणे मलाही दक्षिणेतल्या सगळ्या जिलब्या सारख्याच अनाकलनीय होत्या. महाराष्ट्राच्या दक्षिणेला राहणारे सगळे ‘मद्राशी’ असा एक सोप्पा समज होता.कानडीशी आलेला संबंध म्हणजे एकदाच गाणगापूरहून सोलापूरला येताना चुकून गुलबर्ग्याऐवजी गाणगापूर रोडला गेल्यावर सोलापूरला परतण्यासाठी झालेले हाल, आणि एकदा विजापूर बघायला जाताना वाटेत गाडीचा अपघात झाल्यावर गाडीबाहेर ऐकलेली कडकड एवढाच. त्यातून हे काही गुजराती किंवा पंजाबी सारखं सहज समजणारं प्रकरण नाही याची मात्र खात्री झाली होती. तर कोथरूडमध्ये भेटलेला, चारचौघांइतपत बरं मराठी बोलणारा नवरोबा मुळचा असं काही वेडवाकडं बोलणारा निघेल याची मला कशी कल्पना असणार?
लग्न ठरलं तेंव्हा मी पहिल्यांदा कर्नाटकात गेले. आणि नवऱ्याच्या आजी आजोबांसकट निम्म्यापेक्षा जास्त नातेवाईकांना माझ्याशी मराठीत बोलताना ऐकून गार झाले. उत्तर कर्नाटकातल्या बऱ्याच लोकांना कोकणी येतं आणि त्यामुळे मराठी समजतं, तोडकंमोडकं का होईना, पण बोलता येतं हा शोध लागला. त्यात भाषावार प्रांतरचनेपूर्वी धारवाड – हुबळी मुंबई इलाख्यात होते, त्यामुळे जुन्या मंडळींना बंगळूरपेक्षा मुंबई-पुणे जवळची हे ज्ञान प्राप्त झालं.
नवऱ्याच्या काकूंनी कानडी अंकलीपी भेट दिली, आणि मग रस्त्याने चालताना प्रत्येक दुकानाची पाटी कोड्यासारखी ‘सोडवण्याचा’ नवा खेळ सुरू झाला. (अजूनही जोडाक्षरं आणि आकडे घात करतात, पण एव्हाना हुबळीतल्या नेहेमीच्या रस्त्यावरच्या बहुसंख्य पाट्या माझ्या तोंडपाठ झाल्या आहेत:) ) देशपांडेनगर? हे देशपांडे इथे कर्नाटकात काय करताहेत? तर आजवर अस्सल मराठी समजत असलेली निम्मीअधिक नावं अस्सल कानडीसुद्धा आहेत हे समजलं. या नावांसारखेच हळुहळू अस्सल मराठी शब्दसुद्धा कानडी वेषात भेटायला लागले – अडनिडा, गडबड, किरणा, अडाकित्ता, रजा … परवा तर मामेसासुबाईंनी सुनेचं कौतुक करताना ‘अरभाट’ म्हटलं, आणि मला एकदम जीएंची अरभाट आणि चिल्लर माणसं आठवली.
नुकतंच लग्न झालं होतं, तेंव्हा एकदा नवऱ्याच्या दोस्तांनी बाहेर जमायचा बेत केला एक दिवस. आणि नवऱ्याने घरी येऊन घोषणा केली,
“आम्ही आज वैशालीला जाऊ.”
“म्हणजे ? मला न विचारता ठरवताच कसं तुम्ही सगळे असं?”
“अगं आम्ही वैशालीला जातोय. .. तुला आवडतं न तिथे जायला?”
अस्सं. म्हणजे मला तिथे जायला आवडतं, म्हणून मुद्दाम मला वगळून वैशालीमध्ये भेटताय काय? बघून घेईन … हळुहळू तापमान वाढायला लागलं, आणि आमचं लग्नानंतरचं पहिलं कडाक्याचं भांडण झालं. या प्राण्याचा ‘आम्ही’ आणि ‘आपण’ मध्ये हमखास गोंधळ होतो हे माझ्या हळुहळू लक्षात आलं. बेळगावच्या पलिकडून मराठीकडे बघणाऱ्यांची गोची लक्षात यायला लागली. ज्या भाषेत ‘ते’ इंजीन आणि ‘तो’ डबा जोडून ‘ती’ गाडी बनते, ती भाषा शिकणं किती अवघड आहे तुम्हीच बघा!
22 comments:
तुमच्या मिस्टरना सांगा:- "नमगे एन कन्नडा कलिलिक्के साध्य ईल्ला, निवं मराठी कलिस्कोरी"
मस्त.
कानडीच्या अजून गमती जमती लिहा.
आपला,
(मराठी) अनिकेत वैद्य.
@ आशिष॰ ब्लॉगवर स्वागत. माझ्या कन्नड ज्ञानापेक्षा खूपच चांगलं आहे त्याचं मराठी :)
@ अनिकेत, माझ्या वेगाने(?) लिहिते.
गौराई भन्नाट लिहलयेस... मी आजवर सांगायचे अगर आपको हिंदी आता है तो मराठी म्हणजे काय येकदमच सोपा है आपके लिये!!! आता नाय बा हिम्मत आपली, ’ज्या भाषेत ’ते’ ईंजिन, ’तो’ डबा जोडून ’ती’ गाडी बनत” ती भाषा सोपी कशी????... काय मस्त लिहीलेस गं... आयला खरच काय कठीण आहे गं!!!
नशीब आपलं जन्म महाराष्ट्रात असल्यामुळे ’धन्य जाहलो’ आपण.... नाहीतर आपणही लोकांची करमणूक करणारे मराठी बोललो असतो....
Pan aata Kaanadi na mhanta Kannad mhalat jaat...improvemnt aahe tashi :-)
Manal barka.Panchvis varshe solapur rahun; and anekvela kalburgi la thambun shudha; Jilebi aankhi kaahi walat nahi. Haan pan Bolayala jamat thod far. Tyatoon hi gochi ashi ; north karnataka wali public mazya banglori kanndala hasate and vice versa. Sagalach gondhal aahe. :-)
pan mast lihalay. Aawadal. :-)
"‘ते’ इंजीन आणि ‘तो’ डबा जोडून ‘ती’ गाडी बनते"
एकदम मस्तंच!
ओह्ह... हे जाहिर गुपित मला माहितच नव्हते.:)माझ्या काही मैत्रिणींकडून एकतर भाषा ( कडकड मधली ) म्हणून प्रयत्न करतेय... तेलगु,तमिळ वाल्या दोघी उत्साहाने शिकवत आहेत... पण आमची गाडी दोन पावले पुढे तर चार मागे....:(. सुरवातीला तर तू अगदीच भंजाळली असशील ना....,मस्तच लिहिलेस. येऊ देत अजून...
झक्कास.. 'आम्ही' आणि 'आपण' मधली ही गडबड अजूनही बरेचजण (अमराठी) करतातच हमखास. बाकी तो डबा , ते इंजिन आणि ती गाडी हे तर भारीच.
उटा आईता? येनु? येष्टु ?... काही नाही.. हे असले २-३ 'कानडीचे खून' येतात मला तेवढे जाता जाता टंकले..
हा हा! आवडला लेख. यान्डु-कुन्डु (हा ठाकरेंचा शब्द, माझा नव्हे) शिकताना धमाल झाली असेल, हे लक्षात आलंच.
तन्वी, खरंय अगं ... मराठी मातृभाषा असल्यामुळे ती शिकायला सोपी आहे का कठीण असा प्रश्नच आला नाही, नाहीतर आपणही लोकांची करमणूक केली असती.
BlueMist, माझं उलट आहे ... वाचायला जमतं, बोललेलं थोडफार समजतं, पण मला काही बोलता येत नाही! आणि धारवाडची भाषा आणि बंगळूर - म्हैसूरची भाषा असा फरक म्हणजे अजूनच गंमत होते.
आनंद, ‘ते इंजीन आणि तो डबा ...’ हे उदाहरण माझं नाही ... मी कुठेतरी वाचलंय. आणि वाचल्यावर ते इतकं पटलं, की लक्षात राहिलं :)
भानस, कडकड वर्गीय दोन भाषा आवड म्हणून शिकते आहेस म्हणजे ग्रेटच. तेलुगु कन्नडला तशी जवळची आहे, आणि जरा सोपीही आहे असं मी ऐकलं आहे - पण तमीळ म्हणजे काहीतरी भयंकर किचकट प्रकरण आहे म्हणे. माझ्या एका तमीळ मित्राला मी शिकव म्हटलं तर फार अवघड आहे, अशी सहज जमणार नाही म्हणून सांगितलं होतं त्याने.
हेरंब, महत्वाचं शिकून घेतलं आहेस की ... आधी पोटोबा:)
विनय, धमाल अजूनही येते आहे :)
shevti kandi ti kandi mi hi aadhi bolaycho thodishi mazak mhanun....
dilip
दिलिप, ब्लॉगवर स्वागत
गौरी उगाच मनात आलं कदाचित बोलायला आतापर्यंत सराईतही झाली असशील..पण ते सगळे ळ ळ ळीपीसारखं वाटतं त्याचं काय करायचं....:)
आणि ते डब्बा, गाडी मला असं वाटतं की पु.ल.देशपांडेंनी दिलंय उदा. म्हणून कुठेतरी पण खात्री नाही...वय झालं आता बहुतेक....(माझं नाही त्या लेखाचं...ही ही)
अपर्णा, नाही ग अजूनही बोलता येत नाही मला. दर वेळी सासरी गेले की दोन - तीन दिवसात जरा तोंड उघडता येईल इतपत सराव होतो, तोवर परत यायची वेळ होते.
ळीपी एकदम बरोब्बर :D:D
आणि त्या लेखाचं नक्कीच वय झालंय ... मला अजिबात संदर्भ आठवत नाहीये त्या उदाहरणाचा.
hehe! मस्त! भांडकुदळ कुठली!! :p
अनघा बघ ना ... हा भाषेचा प्रश्न नसता ना, तर आमचं भांडणच झालं नसतं कधी ... यापुढची भांडणं मला कन्नड येत नाही म्हणून झाली असावीत ;)
Post a Comment