Thursday, March 25, 2010

दोन घडीचा डाव

    आठवड्याच्या सुट्टीनंतर आलेल्या सोमवारची सकाळ. मनाला शनिवार - रविवारमधून बाहेर काढण्यासाठी धडपड चालू असते. शुक्रवारी रात्री निग्रहाने मिटलेल्या लॅपटॉपवरच्या न वाचलेल्या मेलची संख्या एकीकडे अस्वस्थ करत असते. आणखी तासाभरात ऑफिसमध्ये पोहोचलं, म्हणजे सरळ शुक्रवार रात्रीपर्यंत वेळ काळ काही सुचू नये एवढं काम आहे याचं कुठेतरी दडपण येत असतं. पुढच्या शनिवार रविवारचे बेत मनाच्या एका कोपर्‍यात हळूच आकार घेत असतात. खूप दिवसात न ऐकलेलं ‘म्युझिक ऑफ सीज’आठवणीने लावलेलं असतं. थोडक्यात, नेहेमीसारखाच एक सोमवार. नेहेमीच्याच सरावाने घरून ऑफिसकडे ड्रायव्हिंग. नेहेमीच्याच सुसाट वेगाने हायवेवरून पळणार्‍या गाड्या. आल इझ वेल.
    अचानक गाड्यांच्या रांगेत पुढे कुठेतरी करकचून ब्रेक दाबल्याचा आवाज येतो. मागच्या गाड्याही ब्रेक लावतात, टायर रस्त्यावर घासत गेल्याचे आवाज, कुणी समोरच्या गाडीला धडकलेलं, कुणाला मागच्या गाडीने ठेकलेलं, एखादा नशीबवान कुठला ओरखाडा न उठता त्या गर्दीतून सहीसलामत सुटतो. गाडी शिकताना शिकवलेलं डबल ब्रेकिंगचं तंत्र तिच्याकाडून आपोआप वापरलं जातं. स्किड न होता, समोरच्या गाडीला धक्काही न लागता गाडी थांबते. मागचीही थांबणार, तेवढ्यात मागून त्या गाडीला धक्का बसतो, आणि ती गाडी मागून येऊन धडकते.
    सुदैवाने फार नुकसान नाही झालेलं गाडीचं. थोडक्यात निभावलंय. ऑफिसच्या कामाचा मात्र आज जबरी खोळंबा होणार. गाडी आधी मेकॅनिककडे न्यायची म्हणजे अर्धा दिवस तरी गेलाच ... दोन मिनिटात मनात हिशोब होतो. पुढे रांगेत काय झालंय बघितल्यावर तिला कळतं ... बाकी सगळ्या गाड्यांना लहानसहान पोचे आलेत, दिवे फुटलेत. पण एक गाडी सोडून पुढे टाटा सफारी पुढच्या मिनीट्रकवर जबरदस्त आदळलीय ... सफारीची टाकी फुटून रस्त्यावर तेल पसरलंय, गाडीचं नाकाड ट्रकखालून काढायला क्रेन लागणार.
    पुढ्चे सगळे सोपस्कार पार पडतात, गाडी मेकॅनिककडे पोहोचवायला नवरा येतो. उरलेला दिवस ऑफिसच्या कामाचा ढीग उपसण्यात जातो. रात्री मात्र मनाची बेचैनी जाणवते. काय झालंय आपल्याला ? एक छोटा अपघात. सुदैवाने आपली त्यात काही चूक नव्हती. गाडीलाही मोठं काही झालेलं नाही. अपघाताच्या जागेपासून गॅरेजपर्यंत आपणच गाडी चालवत नेली. मग हे काय वाटतंय आता नेमकं?
    टेल लॅम्प नसणार्‍या त्या मिनीट्रकच्या मागे आपली गाडी असती तर?
    रस्ताभर स्किड झालेल्या चाकांच्या खुणा उमटवत त्या ट्रकवर आदळाणारी टाटा सफारी आपल्या मागे असती तर?
    प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून डबल ब्रेकिंग झालं नसतं तर?
    कधीही ड्रायव्हिंग करताना तो सोबत असतो, तिच्या नकळत तो अपघात टाळत असतो हे खरंय. पण म्हणून मुद्दाम त्याची परीक्षा बघणं बरोबर नाही.
    कधीतरी मरायचंय हे माहित आहे, पण तो कधीतरी नेहेमीच दूरवरच्या भविष्यातला आहे असं आपण समजून चालतो. आपल्याला कसं मरायचंय हे तरी आपण कुणाला सांगितलंय का? कुठलंही क्रियाकर्म करण्यापेक्षा देहदान कर माझं ... आणि एक मस्त वडाचं झाड लाव म्हणून सांगायला पाहिजे नवरोबाला.
   आताशी तर कुठे कसं जगायचं ते उमगायला लागलंय. एवढ्या गोष्टी करायच्या राहिल्यात. आणि कुठली गोष्ट अर्धवट सोडणं तिला आवडत नाही. जास्त जागरूक रहायला हवं तिने. तिची गाडी नकळतच नेहेमी फास्ट लेनमध्ये असते. कुठे पोहोचायचंय इतक्या वेगाने? ठरवून फास्ट लेनमधून बाहेर पडायला हवंय.
    गाडी दुरुस्त झाली, पुन्हा रूटीन सुरू झालं. पण रस्त्यावर त्या जागी गाडी स्किड झालेल्या खुणा बघितल्या, म्हणजे रोज तिला जाणवतं. its just not worth being in the fast lane.

23 comments:

आशिष देशपांडे said...

Kharay tumacha!! Chaan zaliye post!

Unknown said...

गौरी सुंदर लिहीलं आहेस.....खरयं गं या गतीला जरासा आवर घालायला हवाय..... आत्ताकुठे कसे जगायचे ते समजलेय, अगदी खरे गं!!! आणि नाही ग खरच आपल्याला माहिती यमदुत कुठे उभा आहे, जगायला हवेच गं, प्रत्येक क्षण भरभरून समरसून!!!

Gouri said...

@ आशिष, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

@ तन्वी, अगं कधी धावायला लागतो आपण ते समजतच नाही असं झालंय. नुसतीच धावपळ ... काय करावंसं वाटतं ते बाजूलाच राहून जातं.

हेरंब said...

बाप रे.. मस्तच लिहिलं आहेस. तो क्षण घडून गेल्यानंतर काही काळाने ते सगळं किती भयानक होतं त्याची जाणीव होते बर्‍याचदा.. !!

Gouri said...

हेरंब, खरंय. कधीकधी प्रसंग घडून गेल्यावर थोडा वेळ जावा लागतो घडू शकणारं किती भयानक होतं ते आत पोहोचायला.

रोहन... said...

असे अनेक क्षण येतात... माझ्या बाबतीत असे अनेकदा झाले आहे. वेगाने अपघात झालेला असुनही कधी फार मोठा वाटत नाही पण एखादा बारीक निसटता क्षण भारी असतो... :) मस्त लिखाण आणि विषय.

आनंद पत्रे said...

खरंय गौरी, एका जीवघेण्या अपघातातुन सुदैवाने काहीही न होता वाचल्यावर माझ्या मनावरचे ओरखडे अगदी असेच आहेत...

Gouri said...

आनंद, आतापर्यंत मी दुसर्‍याच्या गाडीला अपघात झालेला बघितला होता ... पहिलाच अनुभव बरंच काही शिकवून गेला असं वाटतंय.

Gouri said...

रोहन, मोठा अपघात होऊ शकत होता पण नशिबाने वाचवलं असा हा माझ्या आठवणीतला तिसरा प्रसंग ... पण आधीचे प्रसंग फार लहान असतानाचे आहेत - काही कळण्याएवढी मोठी नव्हते मी तेंव्हा. पण आपली काळजी घेणारं वर कुणीतरी आहे याची मात्र खात्री झालीय माझी. दोन वर्षाची असताना तर मी तिसऱ्या मजल्यावरच्या खिडकीतून खाली पडले होते - आणि खाली काम करणार्‍या मजूराने मला वरच्यावर झेललं होतं!

तृप्ती said...

गौरी, छान लिहिलं आहेस. माझी गाडी पण कायम फास्ट लेनमधे असते. सध्याच्या प्रोजेक्टसाठी गेल्या चार महिन्यात १५K माइल्स दामटले आहेत. हे असे कचाकच ब्रेक लावुन होणारे अपघात शक्यतो डाव्या लेनमधेच होतात असा माझा अनुभव. कोणी तरी मुर्खासारखं ईंडिकेटर न देता मेर्ग होतो नाहीतर कॉप कार दिसली की पुढे-मागे न बघता लोक ब्रेक्स लावतात. प्रत्येकवेळी वाटतं १०-१५ मिन उशीर झाल्याने काय होणार आहे. पण पुन्हा गाडी सवयीने फास्ट लेनमधे असते :(

its just not worth being in the fast lane >>> अगदी अगदी.
सॉरी फारच मोठा प्रतिसाद दिला. पण मी रीलेट करु शकते ह्याच्याशी, न राहवुन लिहिले.

रोहन... said...

तिसऱ्या मजल्या वरुन ??? आयला.. देव तुझे भले करो... :)

Gouri said...

तृप्ती, ब्लॉगवर स्वागत, आणि सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आभार. तू (चालेल ना?) या अनुभवाशी रिलेट होऊ शकलीस म्हणूनच ती प्रतिक्रिया आली ग.

Gouri said...

रोहन, अरे देव ओव्हरटाईम करतोय माझ्या भल्यासाठी म्हणूनच मी अजून हाती पायी धड आहे रे :D

kirti said...

Life is too precious to be given up for some small reasons. its not worth saving few minutes on teh road when we have so much to live for and so much to experience and ofcourse give back too.
Safe driving!
BTW-Commenting first time but following u for quite sometime.

भानस said...

गौरी, मी ह्याचा अतिशय भयानक अनुभव घेतला आहे. आणि तेही माझी शून्य चूक असताना. :( मी समजू शकते गं.... अशावेळी त्या एका क्षणात डोळ्यासमोर काय काय येऊन गेले.... तुला लागले नाही यातच सारे मिळवले. मात्र अशावेळी खरेच जाणवते, जगतोय का धावतोय... तेही नक्की कशापाठी.... सगळेच अनाकलनीय आहे.
बापरे! तिस~या मजल्यावरून पडलीस... ह्म्म्म. काळजी घे गं... म्हणजे काय करू हे मात्र विचारू नकोस... :D

Gouri said...

कीर्ती, पहिल्या प्रतिक्रियेबद्दल आभार! दोन मिनिटांसाठी आपण कधीकधी केवढं काय गमावू शकतो, ते जाणवत नाही त्या क्षणी!

Gouri said...

भाग्यश्री, अश्या वेळी चूक आपली नसली, तरी भोगायला आपल्याला लागू शकतं ग. सुदैवाने मोठा अपघात झाला नाही, पण हादरवून गेला तो प्रसंग.

(btw तो तिसर्‍या मजल्यावरून पडण्याचा किस्सा मी दोन वर्षाची असतानाचा आहे ... काश्मीरच्या ट्रिपला गेलो होतो आम्ही, आणि हॉटेलची खिडकी उघडायला आजीला मदत करायला गेले आणि सरळ खाली पडले ... आता काळजी घ्यायची असेल तर खिडकीशेजारच्या टेबलावर चढून गज नसणारी खिडकी उघडायची नाही असं लक्ष्यात ठेवायला पाहिजे ;) :D )

archie said...

Thanks Gouri, U made us realise a true aspect of everybody's life. Good work and interesting topic. Good Luck!!! Ashich lihat raha amhala vachayla khup avdel.

Gouri said...

archie, ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल आभार!

Vijay Deshmukh said...

khup mast lihilay.... accidents ghadu naye hech bar... pan kadhikadhi apali chuk nasatana hot !

Gouri said...

विजय, ब्लॉगवर स्वागत!

Anagha said...

मी नुकतीच गाडी शिकत होते तेंव्हा माझ्या एका मित्राने मला सल्ला दिला होता. "तू फास्ट लेन मध्येच रहा. म्हणजे दोन्ही बाजूने तुला कोणी ओव्हरटेक करणार नाही!" तो सल्ला आठवला! आणि मग मी माझी गाडी मध्यम गतीत, फास्ट लेनमध्ये घेऊन जायचे तेव्हा लोकांना किती वैताग येत असेल असा विचार येऊन हसूच आलं! :)

Gouri said...

अनघा, लोकांनी दोन्ही बाजूनी ओव्हरटेक करू नये म्हणून फास्ट लेनमध्ये? he he भारीच आयडिया आहे.बाकी आपला वेग काहीही असला, तरी आपल्यापेक्षा हळू चालवणारे ते चेंगट आणि आपल्यापेक्षा जोरात जाणारे ते निष्काळजी असतात, नाही का: :)