Monday, March 29, 2010

तृणाचे पाते

अजून एक जालावर न सापडलेली कवितांच्या वहीतली कुसुमाग्रजांची कविता ...

तृणाचे पाते

अश्विन पिऊन तरारलेले एक तृणाचे गोंडस पाते
मला म्हणाले डुलता डुलता जीवित म्हणजे रहस्य मोठे


    कालच रात्री नऊ काजवे आले शिलगावून मशाली
    शोधित फिरती चहूकडे ते इथे तिथे त्या झडाखाली
    विचारले मी शंभर वेळा काय आपले हारवले ते
    मौन सोडिले कुणी न कारण त्यांनाही ते ठाऊक नव्हते!


जाग पहाटे येता दिसला क्षितिजावर एकाकी तारा
पडला होता ढगावरी तो रेलून तंद्रीमध्ये बिचारा
मी म्हटले त्या "घराकडे जा! जागरणाचे व्रत का भलते?"
तो रागाने बघे मजकडे कारण त्यासही माहित नव्हते!


    पलिकडच्या त्या आंब्यावरती कुणी सकाळी आला पक्षी
    खोदित बसला आकाशावर चार सुरांची एकच नक्षी
    मी पुसले त्या "कोणासाठी खुळावल्यागत गाशी गीते?"
    पंख झापुनी उडून गेला कारण त्यासही कळतच नव्हते!

दूर कशाला? मी वार्‍यावर असा अनावर डोलत राही
का डुलतो मी? का हसतो मी? मलाही केंव्हा कळले नाही!
मलाही केंव्हा कळले नाही!!

19 comments:

रोहन... said...

सुंदर .. एकदम सुंदर... मला कुसुमाग्रजांची 'अहिनकुल' ही कविता हवी आहे. तुझ्याकडे आहे का???

Gouri said...

रोहन, ’अहि नकुल’माझ्याकडे आहे, आणि जालावरही काही ठिकाणी सापडली ... हा त्यातलाच एक दुवा...
http://kavyanjali.info/?p=2651

रोहन... said...

अरे वा.. मस्त... आत्ताच बघतो... :)

शंतनू देव said...

सुंदर

Gouri said...

शंतनू,माझी एकदम आवडली कविता आहे ही.

रविंद्र "रवी" said...

सुंदर कवीता आहे. एकदम छान

Gouri said...

रवींद्र, ब्लॉगवर स्वागत, आणि प्रतिक्रियेबद्दल आभार!

Nikhil Purwant said...

बाय एनी चान्स कोण कुणास्तव .. (बहुतेक बोरकरांची आहे -- साळसूद मालिकेचे शिर्षकगीत) ... तुझ्या वहीत मिळेल का ?
बाकी ब्लॉग वाचन चालू आहेच .. छानच लिहितेस .. आणि लिहित रहा

Gouri said...

निखिल, ही कविता माझ्याजवळ नाही. जालावरही फक्त मिसळपाववर सापडली ... सुंदर आहे!

निखिलचं शाईपेन म्हणजे तूच का?

Prashant said...

http://lokvikas.com/misalpav/node/6730#comments

कोण कुणास्तव जगतो मरतो
कोण कुणास्तव सतत कष्टतो
माणुसकीचा गहिवर येतो
जेव्हा ज्याला जिथे सोयिचे
जगात नसते कुणी कुणाचे

युगे युगे ही प्रथा चालते
निकषांवर नाते उरते
बलवंतांचे खपून जाते
उजाड जीवन हो दुबळ्यांचे
जगात नसते कुणी कुणाचे

Gouri said...

प्रशांत, ब्लॉगवर स्वागत आणि कवितेबद्दल, दुव्याबद्दल आभार. ही संपूर्ण कविता आहे ना? कवी बोरकरच?

Dhananjay said...

kuthlya sangrahatali ahe?

Gouri said...

धनंजय, ही कविता मी कुसुमाग्रजांच्या काव्यवाचनाच्या कॅसेटवरून उतरवून घेतली होती. ती विशाखा, किनारा आणि वादळवेलमध्ये सापडली नाही - अन्य कुठल्या संग्रहातली असावी.

Dhananjay said...

मुक्तायन, हिमरेषा, समिधा मध्येही नाहीये. बाकीचे संग्रह तपासावे लागणार.

शांतीसुधा (Shantisudha) said...

कुसुमाग्रजांचीच आगगाडी आणि जमीन ही कविता आहे का तुझ्याकडे? असेल तर कृपया मला पाठवणे.

Gouri said...

शांतीसुधा, ब्लॉगवर स्वागत. आगगाडी आणि जमीन माझ्याकडे आहे. जालावरही काही ठिकाणी आहे - हा एक दुवा : http://ek-kavita.blogspot.com/2007/02/blog-post_20.html

Kiran said...

आज सकाळी आकाशवाणीवर ऐकली. शोधत शोधत इथे मिळाली धन्यवाद

Kiran said...

कुसुमाग्रजांच्या आवाजात आज रेडीओवर ऐकाली शेवटी ईथे सापडली
धन्यवाद

Gouri said...

अरे वा... इतक्या वर्षांनी कुणीतरी ही कविता शोधत इथे पोहोचलेलं बघून छान वाटलं किरण!