Tuesday, April 6, 2010

तीन जिप्सी

हरेकृष्णजींची ही पोस्ट वाचली, आणि निकोलाउस लेनाऊ (Nikolaus Lenau) या ऑस्ट्रियन कवीची Die drei Zegeuner (तीन जिप्सी) ही कविता आठवली. लेनाऊची मूळ कविता बॅलड प्रकारची - म्हणजे गेय आहे. हा त्या कवितेचा मी केलेला स्वैर अनुवाद ...

************************************************************
एकदा माझी थकली भागलेली गाडी
रेताड माळरानावरून
रडत खडत चालली होती
तेंव्हा कुरणामध्ये मला तीन जिप्सी दिसले.

सायंकाळच्या प्रकाशात उजळून
त्यांच्यातला एकजण आपल्याचसाठी
हातातल्या सारंगीवर
एक मनस्वी गाणे छेडत होता

दुसर्‍याच्या हातात चिलीम होती
आणि जगातल्या आणखी कुठल्याच गोष्टीची
गरज नसावी अश्या समाधानात
तो चिलीमीच्या धुराकडे बघत होता

तिसर्‍याने आपल्या झांजा एका झाडावर अडकवून
मस्त ताणून दिली होती
झांजांच्या दोरीवरून वार्‍याची झुळुक जात होती
आणि त्याच्या हृदयावरून एक स्वप्न चाललं होतं

तिघांच्या फाटालेल्या कपड्यांवर
रंगीबेरंगी ठिगळं होती
पण नियतीवर
तिघांनीही मात केली होती

आयुष्य आपल्यावर रुसतं तेंव्हा
त्याला कसं झटकून टाकायचं
हे झोपून, चिलीम ओढून, सारंगी वाजवून
तीन प्रकारे त्यांनी मला दाखवलं होतं.

जिप्सींचे सावळे चेहेरे
आणि काळेभोर केस
कितीतरी वेळ बघितल्यावर
पुढे जाणं भाग होतं

************************************************************

11 comments:

HAREKRISHNAJI said...

सुरेख. किती अर्थपुर्ण आहे ही कविता

kirti said...

its a beautiful poem.Thanx for translating it for us and making it reach us.
I generally don't shy away from commenting ,if I do like a post but , in your case I am following your blog for last 2 months but not able to comment because I am still trying to figure out how to comment in marathi.

Gouri said...

हरेकृष्णजी, ही कविता आवडली म्हणून लक्षात राहिली. आज तुमच्या ब्लॉगवरचा फोटो बघून आठवण झाली ... आपल्याला हिचा मराठी अनुवाद करायचा होता.

Gouri said...

कीर्ती, प्रतिक्रिया बघून छान वाटलं. मराठी लेखनासाठी गुगल किंवा बराहा मला सगळ्यात सोयीचं वाटालं. ते वापरून बघितलं का?

Anonymous said...

anuwadabaddal khup khup aabhaar. nahitar eka changalya kavitela mukale asate. khup chaan.

आळश्यांचा राजा said...

हेच ते. आम्हाला हेच करायचं होतं आयुष्यात. आम्ही याला ’निवांत बसणे’ म्हणतो. असं वाटतंय की निवांत बसण्यासाठी बरेच पापड बेलावे लागतात! भेटलं पाहिजे या जिप्सींना.

Gouri said...

सोनल, कविता आवडली तर अनुवाद करण्यात मजा आहे :) प्रतिक्रियेबद्दल आभार!

Gouri said...

आ.रा, अजून भेटले नाहीत हे जिप्सी तुला? निवांत बसता येणं हा तर आळश्यांच्या राजाच्या हातचा मळ असायला हवा ... नाही तर सुखाने आळस कसा करणार? ;)

Gouri said...

भाषांतरात एक ढोबळ चूक झालीय.राजगुरू सरांनी लक्षात आणून दिली. जर्मनमध्ये दोन वाद्यांची नावं खूप जवळची आहेत -

Cimbal (Cymbal, Cimbalom)हे एक संतूरसारखं पण हातात धरून बोटांनी वाजवण्याचं तंतुवाद्य आहे, प्रामुख्याने पूर्व युरोपातल्या लोकसंगीतात वापरलं जाणारं.

Zimbal म्हणजे झांजा. मी वापरलेल्या पाठभेडामध्ये Cimbal ऐवजी Zimbal दिलंय, आणि मी भाषांतर ‘झांजा’ म्हणून केलंय. जालावरची कविता न तपासता वापरल्याचा परिणम. :(

कवितेचं चौथं कडवं बदलून टाकते लवकरच.

Vivek said...

खूपच छान कविता आहे.

मला कविता फारशा कळत नाहीत, पण ही खूप आवडली.

-विवेक.

Gouri said...

विवेक, ब्लॉगवर स्वागत, आणि प्रतिक्रियेबद्दल आभार!